बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

'राजनीती’चे महाभारत

मंडळी काल आम्ही ’राजनीती’ पाहिला, सहज टीवीवर दिसला म्हणून पाहिला. अगदी शेवटपर्यंत पहावे असे काय होते त्यात ते काही समजले नाही. एरवी १०-१५ मिनिटात पुढील चित्रपटाची इस्टुरी ९५% अचूकतेसह (संख्याशास्त्री ना आम्ही, ५% सोडावे लागतात) सांगून टीवी बंद करणारे आम्ही, या चित्रपटात काय होते की शेवटपर्यंत चिकाटीने पाहिले. कदाचित एरवी ’पहावी’ लागणारी भिकार गाणी नव्हती म्हणून, कि दर दहा मिनिटांनी होणारा पंधरा मिनिटांचा ’छोटासा’ ब्रेक न घेता अर्धा तास सलग चित्रपट पाहता आला म्हणून, की त्यात ती कत्रिना का कोण - जी सुंदर आहे, म्हणे - होती म्हणून, की त्या रणवीर - चुकलो ’रणबीर’ म्हणायला हवं नाही का - चा एकही चित्रपट पूर्वी पाहिला नसल्याने ’He deserves a chance' असाही एक सुप्त हेतू असावा. तर कारण काहीही असो, आम्ही तो चित्रपट टिच्चून बसून पाहिला एवढं खरं.

आसं व्ह्य, पायला. बरं मंग...? आता हितं काय त्येचं...? का आता परत बैलाच्या कासर्‍यावानी बयाजवार इस्टुरी सांगून बोर करायचा इचार हाय?

सांगतो ना. तर विषय असा आहे साधारण (नाय हो सम्दी इस्टुरी नाय सांगत, थोडक्यात सांगतो ज्येंनी पायला नसंल त्येंच्यासाटी). आटपाट नगरात राष्ट्रवादी पार्टी नावाचा एक - प्रादेशिक - राजकीय पक्ष आहे. त्याचे अध्यक्ष असलेले भानुप्रताप नुकतेच अर्धांगवायूने अंथरूणाला खिळले आहेत. यांचे एक चिरंजीव आहेत वीरेंद्रप्रताप (मनोज वाजपेयी). ते - अर्थातच - वडिलांच्या अनुपस्थितीत स्वत:ला त्यांचे वारस समजत असल्याने पार्टीची धुरा आता आपल्याकडे यावी असे त्यांना वाटते. पण अध्यक्ष ही धुरा सोपवतात आपल्या धाकट्या भावाकडे, चंद्रप्रतापकडे. या धाकल्या पातीचे दोन पुत्र आहेत, पृथ्वीप्रताप (अर्जुन रामपाल) आणि समरप्रताप (रणबीर कपूर). आता मूळ अध्यक्षांनी ’कार्यकारी अध्यक्ष केलेल्या चंद्रप्रतापनाच पार्टीचा मुख्य चेहरा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न पृथ्वी करतो, यात वीरेंद्रप्रतापला पद्धतशीरपणे बाजूला सारले जाते. या सर्व आणि इथून पुढेही या सर्व कामात पृथ्वी-समर यांचा मामा (नाना पाटेकर) आपल्या भाच्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. दुसरीकडे दलित वस्तीमधे राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे, परंतु तिथे स्थानिकांना उमेदवारीची मागणी करत आता सूरज (अजय देवगण) च्या रूपाने एक बंडखोर उभा राहिला आहे. त्याच्या पाठीशी युवा पिढी असल्याचे पाहून मामा धूर्तपणे सूरजच्या वडिलांनाच - जे त्याच्या पूर्णपणे मुठीत आहेत - राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ करतो. अर्थातच सूरजला त्या विरूध्द काही बोलता येत नाही पण तो दुखावला जातो. हे पाहून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने वीरेंद्रप्रताप आपल्या अधिकारात त्याला पार्टीच्या पॉलिटब्यूरोत सामावून घेतो, एवढेच नव्हे तर त्याला मागासवर्गीय सेलचे अध्यक्षपदही देतो. आता सुरू होते ते शह-काटशहाचे राजकारण, यात प्रथम चंद्रप्रतापांची हत्त्या होते, यात सूरजवर संशय घेतला जातो. वीरेंद्रप्रतापचा उजवा हात झालेला सूरज त्याच्या बरोबर अध्यक्षांना भेटून पृथ्वीला पार्टीतून निलंबित करायला भाग पाडतो. वडिलांच्या मृत्यूने नि भावाच्या हकालपट्टीने चिडलेला समर आता सारी सूत्रे आपल्या हातात घेतो. इथून पुढे राजकारणाच्या नि हिंसेच्या सारीपाटावर समर विरूद्ध सूरज असा डाव रंगतो.

अर्थात हा हिंदी चित्रपट असल्याने प्रेमपात्र हवेच. पण इथे मात्र जरा परिस्थिती नेहमीपेक्षा वेगळी आहे बर्का. आऽऽऽणि ते सुखाने नांदू लागले वगैरे प्रकार नाही. आपल्या कत्रिनाची समरवर ’बचपन की प्रीत’ असते. पण तो फारिन रिटर्नड असल्याने आधीच एका गोर्‍या पोरीच्या प्रेमात असतो. पण तरीही पृथ्वीप्रताप नि वीरेंद्रप्रताप यांच्या लढ्यात पृथ्वीच्या नव्या पार्टीला पैसा उभा करून देण्यासाठी बक्कळ पैका असलेला बाप असल्याने कत्रिनाला मागणी घालतो. आता तिचा बाप पण लै बेरकी. आम्रिकेत राहणार्‍या समरचा सासरा होऊन त्याला काय फायदा, त्या ऐवजी नव्या उगवत्या पक्षाचा नेता असलेल्या पृथ्वीलाच तो जावई म्हणून पसंती देतो. सुटका झाल्याच्या भावनेने म्हणा किंवा पैसा हवाच या अपरिहार्यतेने म्हणा, समर नि त्याचे कुटुंबिय देखील याला मान्यता देतात. यानंतरच्या राजकीय लढाईत पृथ्वी आणि समरची गोरी प्रेयसी (जिने ’मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ’ हे जगप्रसिद्ध वाक्य - अर्थात इंग्रजीत - त्याला आधीच ऐकवलेले असते) बळी पडते. आता सहनशक्ती संपलेला मामा पिस्तुल घेऊन सूरजला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात शिरतो. तो बाहेर पडतो तो एका गुपिताचा उलगडा होऊन. सूरज हा समरच्या आईचाच कुंवारपणीचा पुत्र असतो. त्याने स्वत:च त्या पुत्राला आईपासून दूर केलेले असते. परत येऊन आपल्या बहिणीला तो ही गोष्ट सांगतो. पुढचा संघर्ष थांबवावा म्हणून ती सूरजकडे जाते (तिचा भाऊच तिला तिकडे घेऊन जातो) त्याला वस्तुस्थिती सांगते नि आपल्या घरी येण्याचे आवाहन करते. पण तो सांगतो माझ्या निष्ठा फक्त वीरेंद्रप्रतापशी आहेत त्या तशाच राहतील.

आता आमच्या टक्कुर्‍यात प्रकाश पडला. अहो हे आपले ओळखीचे आहे की. कर्ण नि कुंतीचा संवाद आठवतो का? तिथे तू माझा पुत्र आहेस, आपल्या घरी ये असे आवाहन करणार्‍या कुंतीला माझ्या निष्ठा दुर्योधनाशीच राहतील असे बजावणारा कर्ण आठवला. मग सगळे बयाजवार समजले. पण ही कुंती त्या ’पृथा’ कुंतीच्या अगदी विपरीत लहानखुरी - अगदी आपल्या मुलांचीच मुलगी शोभावी इतकी - आहे. आता कर्ण/कुंतीची भेट घडवणारा मामारूपी कृष्ण आहे इथे. तो शकुनिमामा नाहीये इथे कारण तो गांधारीऐवजी कुंतीचा भाऊ आहे. त्याचबरोबर बघा ना पृथ्वी-समरच्या सगळ्या राजकीय लढाईत पडद्याआडचा सूत्रधार तोच तर आहे, कृष्णच तो! कत्रिनाचा बाप हा जणू आपल्या जावयाला युद्धाची रसद/सैन्य पुरवणार्‍या द्रुपदासारखा, इथे तो पार्टीला आवश्यक तो पैसा पुरवतो आहे इतकेच. अरेच्या मजा आहे की. चला आता एकदम उगमाकडे जाऊ या. सुरवात कुठे आहे पहा. मूळची गादी - अध्यक्षपद - एकाची, पण तो - आंधळ्या धृतराष्ट्राप्रमाणे - पांगळा झाल्याने नि त्याच्या धाकट्या भावाकडे - चंद्रप्रताप = पंडु - येते. त्याच्या आधारे त्याची मुले त्या गादीवर हक्क सांगू लागतात. अर्थात मूळ अध्यक्षाचा मुलगा त्यांना आपल्या राज्यातून - पक्षातून - हाकलून लावतो. ते पुढे द्रुपदाच्या (कत्रिनाचा बा) मदतीने स्वत:चे इंद्रप्रस्थ - जनशक्ती मोर्चा नावाचा पक्ष - स्थापन करतात. दुर्योधन ऊर्फ वीरेंद्रप्रताप सूतपुत्र - आपलं हे दलितनेता - कर्ण ऊर्फ सूरज याला अंगदेशचा राजा -आपलं मागासवर्गीय सेलचा अध्यक्ष करतो. सत्तेच्या सारीपाटावर या हस्तिनापूर (राष्ट्रवादी) नि इंद्रप्रस्थ (जनशक्ती) च्या नेत्यांचा संघर्ष सुरू होतो.

आता कलियुगात धनुक्श-बाणाचे युद्ध वगैरे काही नाही, मग बंदुका घेऊन मार्‍यामार्‍या होतात. (इलेक्शन वगैरे आहेच, पण त्याला कथेत काही फारसे महत्त्वही नाही. सारी राजनीती बंदुकीच्या नि कटकारस्थानांच्या आधारे चालू आहे.) इथे समर युक्तिने वीरेंद्रला एका बंद पडलेल्या फॅक्टरीत यायला भाग पाडतो. निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने चिडलेला वीरेंद्र एकटाच तिकडे जायला निघतो. हे समजताच सूरज त्याला फोन करून त्याने सांगतो की तो ही तिकडे येतोय नि तो तिथे पोचेपर्यंत वीरेंद्रने गाडीतून - जी बुलेटप्रूफ आहे- बाहेर पडू नये असा इशारा देतो. गांधारीने आपल्या नजरेने अजेय बनवलेला पण लज्जारक्षणापुरते घेतलेल्या पर्णवस्त्राने मांडी कमकुवत राहिलेला दुर्योधन आठवला का? आता पुढचा प्रसंग त्या संदर्भात पहा बघू, जमतंय का? सूरज तिथे पोचतो, हुशारीने समरच्या पाठीमागे पोचतो. समरचे लक्षच नाही. पण तरीही सूरज समरवर गोळी झाडू शकत नाही. बिचारा कर्ण! आपल्या भावावर कसा गोळी झाडणार, नाही का? यानंतरच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वीरेंद्रला उचलून नेऊ पाहणार्‍या सूरजला समर नि मामा गाठतात. ’मला वीरेनला हॉस्पिटलमधे नेऊ दे, मग तू म्हणशील तिथे येईन (तुझी गोळी झेलायला)’ सूरज त्याला सांगतो. इथे ’रथचक्र उद्धरू दे’ म्हणणार कर्ण डोळ्यासमोर येतो का? आता मामा समरला प्रवचन देतात. आपल्या सुदैवाने पूर्ण गीता -आणि तो तुझा भाऊ आहे हे सत्य - न सांगता फक्त पूर्ण सत्ता मिळवणे हे ध्येय वगैरे थोडक्यात कृष्णनीती सांगतात. इकडे वीरेंद्रची मान कलंडते नि तिकडे समर सूरजला गोळी घालून संपवतो. थांबा थांबा, इथे संपत नाही. पुढे समर पांगळ्या भानुप्रतापना व्हील-चेअरवरून आणताना दिसतो (आणि मी हे मुद्दाम केलं नाही हे तुम्हाला ठाऊक आहे ना असे बिनडोक समर्थनही देतो.). शेवटी कृष्णाने घडवून आणलेली पांडवांची नि अंध धृतराष्ट्राची भेट आठवली का? अर्थात इथला धृतराष्ट्र आंधळा नसून पांगळा असल्याने त्यांने खंजीर लपवून ठेवून पांडवांपैकी भीमाला ठार मारण्याचा प्रयत्न करणे वगैरे सीन टाकता आलेला नाही इथे. चित्रपटाच्या बाकी घटनांशी आमचे देणे-घेणे नाही. आम्ही फक्त राजनीती’तील महाभारत सांगू म्हटले होते ते सांगितले.

तर असे हे ’कलयुग का महाभारत’. आता याला वाङ्मयचौर्य वगैरे म्हणू शकत नाही आपण. याचे पहिले कारण म्हणजे हिंदी चित्रपटाबाबत हे वेगळे सांगायची गरज नसते हे आणि ’व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ हे आपल्याला आधीच ठाऊक आहे हे दुसरे, हो ना?

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - ३

...टॉडला पुढे सलमानची भूमिका देऊन त्याचे ज्युनियर्स ’साजन के घर आयी...’ वर नाचायलाही लावतात. तो पठ्ठ्याही त्या ठेक्यावर मस्तपैकी नाचून बिचून घेतो. (पुढे चालू)

गेस्ट हाऊसमधे प्रवेश करणार्‍या टॉडला एकदा भिंतिपलिकडून हाक येते. भिंतीवरून पलिकडचा एक धोबी टॉडला त्याच्या घरी बोलावत असतो. हो ना करता टॉड जायला तयार होतो. भिंतीवरून उडी मारून तो पलिकडे जातो. ही भिंत देखील एक मेटॅफर आहे. या भिंतीपलिकडचे जग नि अलिकडचे जग वेगळे आहे, त्या दोन जगांना वेगळे करणारी ही भिंत! आल्या आल्या पहिल्याच दिवशी भिंतीआडच्या त्या जगात तो डोकावला होता. पण तो त्या जगात कधीच शिरला नव्हता. टॉडचे ही भिंत ओलांडून जाणे हे एक प्रकारचे पलिकडच्या जगात प्रवेश करणे आहे.
कसे दिसले त्याला हे जग? जेमतेच त्याच्या उंचीची दाटीवाटीने वसलेली बैठी घरे. भिंती कळकटलेल्या, त्या कधी कुडाच्या, कधी पत्र्याच्या तर कधी निव्वळ पुठ्ठ्याच्या, अरूंद गल्ल्या, त्याच्या मधोमध वाहणारे गटार. त्याच्या बाजूलाच उघड्यावर आंघोळीपासून, कपडे धुणे, भांडी घासणे, जेवणखाण इ. अनेक प्रकारची कामे करणारे लहानथोर, वृद्ध, त्या एवढ्याश्या खुराड्यात जगणारी माणसं. टॉडला हे जग अगदी नवीन आहे. इंडियाचा परिचय त्याला त्याच्या एम्प्लॊईजनी करून दिला होता, त्यापलिकडचा भारत तो आता पाहत होता. अनेक गल्लीबोळातून तो धोबी त्याला आपल्या घरी घेऊन जातो. घर एवढेसे, त्यामुळे दारासमोर बाहेरच बैठक मारली जाते. त्या धोब्याची वृद्ध आई त्याच्यासाठी भरड तांदुळाचा दोन तीन चमचे भात नि त्यावर चमचा दोन चमचे करी वाढते. त्याच्यासाठी खास केलेले - एकमेव - उकडलेले अंडे त्यावर ठेवते (आता आपल्याला ही वृद्धा आपण आधीही पाहिली असल्याचे आठवते. आधीच्या प्रसंगात टॉड ऑफिसमधून परतत असता, एका अंडी विकणारीशी शिल्लक राहिलेले एकमेव अंडे स्वस्तात देण्यासाठी हुज्जत घालताना दिसलेली असते, तीच ही). धोब्याची पत्नी वरून लटकणार्‍या एका वायरला मिक्सरची वायर झटक्यात जोडते नि मिक्सर चालू होतो. ती वायर कुठून आलेली आहे हे कुतूहलाने पाहणार्याला टॉडला वरच्या एका मुख्य वाहिनीवरून आलेली दिसते (या ’तंत्राचा’ वापर पुढे तो करून घेतो.). धोब्याची पत्नी एका खोलगट तव्यातून त्याच्यासाठी जाडसर उत्तप्पा भाजते. तयार झालेला उत्तप्पा उलथून तो टॉडला वाढते. त्यावर वोक्सवॅगन कंपनीचा लोगो उमटलेला दिसतो.
एकीकडे मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपला स्वत:चा लोगो लहानग्या वासरावर चरचरून उमटवणारे अमेरिकन तर दुसरीकडे तवा घेण्याची ऐपत नसल्याने वोक्सवॅगन गाडीच्या स्टेपनीचा पत्राच तव्याऐवजी वापरल्याने कोण्या दुसर्‍याचा लोगो प्रत्यक्ष आपल्या अन्नावर उमटला तरी त्याबद्दल फारशी फिकीर करण्याच्या स्थितीत नसलेला तो धोबी. आणखी एक विरोधाभास टॉडच्या समोर असतो. त्याचवेळी त्याच्याशी नित्यनेमाने पळवापळवीचा खेळ खेळणारं ते पोरगं त्याच घरचं आहे हे त्याला समजते. टॉडचा पळवलेला मोबाईल ते त्याला परत देतं. आता तो मोबाईल छान नक्षीदार स्टिकरने सजवलेला असतो. टॉड समाधानाने हसतो.

टॉड आता घारापुरीमधे चांगला रुळलाय. येथील आचारविचार, इथली माणसे, जीवनपद्धती हळू हळू त्याला उमगू लागली आहे. ’आपला जॉब हिरावून घेणारे’ ही ओळख आता पुसट झाली आहे. अशातच एक दिवस त्याचा बॉस डेव अचानक येऊन थडकतो. त्याला स्टेशनवर रिसीव करायला गेलेल्या टॉडल दिसतो तो बर्फाचा गोळा खाणारा डेव. तो हसतो, डेवला गोळा खाण्यापासून मुळीच परावृत्त करत नाही की त्याच्या परिणामाबाबत त्याला सावध करण्याचा प्रयत्नसुद्धा करीत नाही. निव्वळ पैसे वाचवण्यासाठी आपली चांगली नोकरी घालवून परागंदा व्हायला लावणार्‍या डेववर एक छोटासा का होईना, सूड घेण्याची संधी तो का सोडेल?

डेवला घेऊन टॉड ऑफिसमधे प्रवेश करतो. त्याला दिसतात पाणी उपसणारे त्याचे कर्मचारी, त्यात आघाडीवर मॅनेजर पुरू. पुरू त्याला सांगतो मागे असलेल्या शेताला पाणी देताना ओसंडून वाहिलेले पाणी इथे शिरले आहे. आपल्याकडची काही वर्कस्टेशन्स बंद पडून फक्त आठच काम करताहेत. हे सांगत असतानाच इलेक्ट्रिक बोर्डवर स्पार्किंग होते नि उरलेली वर्कस्टेशन्सही धराशायी होतात. डेवच्या आगमनाच्या वेळीच हे घडल्याने आपल्याला वाटते आता संपला खेळ. पण थांबा, हा टॉड काय करतोय ते पाहू या. संतापलेल्या डेवला तो आश्वासन देतोय की लवकरच सर्व काही ठीक होईल. तो सर्वांना सांगतो की आपण सर्व टर्मिनल्स गच्चीवर हलवतोय. पुढच्या वीस मिनिटात सर्व काही चालू व्हायला हवे. तोवर मी जाऊन ’टेक्निकल कन्सल्टंट’ ला घेऊन येतो.

इथे पाण्यावर त्रिकोणी आकाराच्या चीज सारखा दिसणारा स्पंज तरंगताना दिसतो. यावरून आपल्याला आयटेम नं फोर झीरो थ्री (अमेरिकन मंडळी स्पोर्ट्स इवेंट्सना जाताना घालतात ती टोपी) आठवते.

सर्व कर्मचारी गच्चीवर मशीन्स जोडत असतानाच टॊड त्याच्या शेजारी असलेल्या त्या धोब्याला घेऊन येतो नि हा आपला ’कन्सल्टंट’ अशी ओळख करून देतो. कुत्सित नजरेने ’हा तुझा कन्सल्टंट?’ असे विचारणार्‍या डेवला ’हो’ असे ठाम उत्तर देतो. टॉडच्या विश्वासाला हा कन्सल्टंटही जागतो. वरून जाणार्‍या मुख्य वाहिनीवरून तो खालच्या मशीन्सना वीजपुरवठा चालू करून देतो. डेव अवाक होतो.
मशीन्स चालू होतात, सेंटरचे काम सुरळीत चालू होते. मि. मनमीत पुन्हा एकदा एलिझाबेथशी कोर्टिंग करताना सापडतात. टॉड बजावतो ’मॅरेज प्रपोजल इज नॉट स्मॉल टॉक. इफ शी बाईज् समथिंग एवरी फाईव मिनट अँड यू क्लॉक इट अ‍ॅज अ सेपरेट इन्सिडन्स देन इट्ज ए डिफरन्ट स्टोरी.’ मनमीतला मोकळे कुरणच मिळते. परिणामी एमपीआय प्रथमच सहाच्या खाली जातो. सर्वजण जल्लोष करतात. इतक्यात एका कॉलवर सुपरवायजरी डिमान्ड होते. एक संतप्त अमेरिकन ग्राहक आउटसोर्सिंगला जोरदार शिव्या देत असतो आणि मला अमेरिकन सर्विसच हवी असा आग्रह धरून बसलेला असतो. त्याला अमेरिकन ईगलची प्रतिकृती हवी असते आणि त्यासाठी एका देशी कंपनीशी व्यवहार करायची तयारी नसते. सुपरवायजर म्हणून टॉड तो फोन घेण्यासाठी उठतो, पण तोवर आशाने त्या फोनचा ताबा घेतलेला असतो. ती त्या ग्राहकाला सांगते की आम्हाला तुमचा राग समजू शकतो. तो उसळून म्हणतो ’मुळीच नाही. मागच्या महिन्यातच माझा जॉब गेला. मी तिथे बावीस वर्षे रक्ताचं पाणी केलं तो जॉब आज मेक्सिकोत गेला आहे. माझ्या भावाची नोकरीसुद्धा गेली आहे.’ ती त्याला आश्वासन देते. ’तुमच्या सारख्या आग्रही ग्राहकांसाठी आम्ही एका अमेरिकन कंपनीबरोबर टाय-अप केले आहे. ही कंपनी आमच्या कंपनीप्रमाणे कोणतेही काम आउट्सोर्स करत नाही. त्यांची सर्व उत्पादने १००% अमेरिकन असतात. मी तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नि वेब-साईट अ‍ॅड्रेस देते त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. फक्त एकच करावे लागेल तुम्हाला...’ ती थांबते. अधीर झालेला ग्राहक विचारतो ’पण किमतीचे काय?’ ’...तुम्हाला फक्त २१२ डॉलर जास्त द्यावे लागतील.’ ती सांगते. पलिकडील आवाज शांत होतो. काहीवेळाने तो ग्राहक वेस्टर्न नॉवेल्टीचा ईगल खरेदी करण्यासाठी ऑर्डर नोंदवतो.

इथे नोकरी गमावलेल्या आणि त्यामुळे कधी नव्हे ते काटकसरीने पैसे खर्च करण्याची वेळ आलेल्या त्या ग्राहकाबद्दल क्षणभर सहानुभूती वाटते. नोकरी गेल्याने कमी पैशात आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करायची असेल तर शेवटी अपरिहार्यपणे त्यांच्याकडेच जावे लागते ज्यांनी त्याची नोकरी हिरावून घेतली आहे. सार्‍या जगाला स्पर्धात्मक व्यापार शिकविणार्‍या, त्यासाठी राजनैतिक, कूटनितिक, लष्करी मार्गाने विविध देशांवर दबाव आणून त्यांचा व्यापार-उदीम खुला करण्यास भाग पाडणार्‍या अमेरिकेच्या नागरिकांनाच त्या व्यवस्थेचा फटका बसावा हा काव्यगत न्याय म्हणता येईल. स्वत:च्या फायद्यासाठी, आपल्या कंपन्यांना पलिकडील मार्केटमधे प्रवेश करता यावा म्हणून जी ज्या भिंती पाडल्या त्यातून पलिकडचेही इकडे येऊ शकतात हे अमेरिका समजू शकली नाही त्याचे हे फळ. सारे जग हे फक्त अमेरिकेच्या फायद्यासाठीच आहे, जे आपण करू तेच बरोबर या भ्रमात राहून जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेत इतरही लोक येतात हे सोईस्करपणे विसरली त्याचा हा परिणाम होता. इथे जीएंच्या’ ’प्रवासी’ मधल्या आंधळ्या शिकार्‍याची गोष्ट आठवली. डोळस माणसांवर सूड घेण्यासाठी त्याने केलेला आरशांचा व्यूह एक कुत्रे सहज पार करून जाते - बरोबर त्या प्रवाशालाही सहिसलामत बाहेर काढते - तेव्हा हताश होऊन तो म्हणतो. ’माझंच चुकलं. मी सगळं जग माणसांचं गृहित धरलं. त्यांच्यासाठी अगदी चिरेबंद व्यूह निर्माण केला, एकादी लहानशी फटसुद्धा ठेवली नाही. पण या विश्वात माणूस एकटा नाही हे मला सुचलं नाही. म्हणूनच एका यक:श्चित कुत्र्याने आज माझा पराभव केला.’ म्हणूनच आज ओबामाकाका स्वदेशीचा नारा देतात, सिटी बँक सारख्या जायंट बँका वाचवण्यासाठी सरकारी खजिना खुला करतात तेव्हा मोठी गंमत वाटते आणि एकेकाळी खुली अर्थव्यवस्था म्हणजे चिरेबंद व्यवस्था, प्रोटेक्शनिझम सर्वात घातक मानणारी अमेरिका घड्याळाची निदान काही चक्रे उलटी फिरवू लागल्याचे जाणवते.

एमपीआय सहाच्या खाली आणण्याबद्दल जवळच्या ’लोटस कोर्ट’ मधे पार्टी अ‍ॅरेंज केली जाते. पार्टीपूर्वीच डेव हे सेंटर बंद करून चीनमधे हलवण्यात येणार असल्याचे सांगतो. तिथे एका अमेरिकनाच्या पगारात मला वीस माणसे कामावर ठेवता येतील, तो सांगतो. पुन्हा एकवार हा पटींचा हिशोब टॉडला वेटाळून राहतो. ही बातमी इथल्या कर्मचार्‍यांना देण्याचे काम टॉडवरच येते. लोटस मधे पार्टीच्या मूड मधे असलेल्या एम्प्लॉईजना तो सांगतो ’ऑल योर जॉब्स हॅव बीन आउटसोर्सड्. यू विल गेट वन मंथ्स सर्वंट्स पे.’ त्यांच्या मधे कुजबूज सुरू होते. त्यातून ’एक महिन्याचा पगार... नॉट सो बॅड’ असा आशाचा आवाज ऐकू येतो. या पैशात काय चैन करता येईल याची चर्चाही चालू होते. इतक्यात मनमीत उठतो नि न्यू जर्सी येथील एलिझबेथ वॉटसन हिच्याशी आपली एंगेजमेंट निश्चित झाल्याचे जाहीर करतो. सगळॆ जल्लोष करतात, त्याचे अभिनंदन करतात. 'ओ टॉड भैया, नौकरी गयी तो गयी, की फर्क पैंदा’ तो टॉडला म्हणतो. पार्टी सुरू होते.

या सर्वापासून अलिप्त आहे तो फक्त पुरू. सगळॆ जल्लोष करीत असताना खिन्न झालेला तो एकटाच बार टेबलपाशी उभा आहे. सर्वांच्या प्रतिक्रियेने गोंधळ्लेला टॉड त्याला विचारतो नोकरी गमावूनही हे सगळे खूष कसे? पुरू म्हणतो ’खूष होतील नाहीतर काय. तुम्ही दिलेल्या ट्रेनिंगच्या बळावर आठ्यवड्याभरात बहुतेक सगळ्यांना दुसरी नोकरी मिळेल, वर एक महिन्याचा फुकट पगार. त्यात आणखी चैन करता येईल. ’ ’व्हॉट अबाउट यू?’ टॉड विचारतो. ’मॅनेजमेंट इज डिफरंट, अँड आय अ‍ॅम नॉट यंग एनिमोअर’ धास्तावलेला पुरू सांगतो. त्याच्या लग्नाबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते हे ही टॉडला समजते. विकल होऊन पुरू सांगतो तिला दुसर्‍याबरोबर पाहण्यापेक्षा मरण पत्करेन मी किंवा भारताबाहेर स्थलांतर करेन.’ पण कदाचित टॉडचीही नोकरी जाईल हे ऐकून तो टॉडचेच सांत्वन करतो. तू एक चांगला बॉस आहेस असे सांगतो. आशा ’हॉलिडे इन गोवा’ चे पुढचे प्रकरण लिहिण्यासाठी टॉडला घेऊन जाते.टॉडला डेव सांगतो की वेस्टर्न नॉवेल्टी ला टेक-ओवर करण्यात आले आहे. नवी कंपनी चार हजार जॉब्ज शांघायला आउटसोर्स करणार आहे. तिथे तुझी आम्हाला गरज आहे. पण टॉडला आता या प्रकाराचा उबग आला आहे. तो नकार देतो. डेव त्याला मोठे पॅकेज, अधिक पर्क्स देऊ करतो, पण तो आपल्या निर्णयावर आता ठाम असतो. हे संभाषण चालू असताना आजपर्यंत न आलेली सुपरवायजर केबिनची काच आणून बसवली जात असते. टॉड असताना त्याचे एम्प्लॉई आणि तो यांच्यात नसलेली ही भिंत तिथे डेव बसताच त्याच्या नि टॉडच्या मधे उभी राहिलेली असते. (यात भारतीयांच्या कामातील वेगाला हळूच चिमटाही काढला आहे.) टॉड स्वत: ऐवजी पुरूची शिफारस करतो आणि पुरू एक नवा टॉड बनून पत्नी भाग्यश्रीसह शांघायकडे प्रयाण करतो.
टॉड आता अमेरिकेत परतलाय. आल्याआल्या तो प्रथम आपल्या आईला फोन करून भेटायला येत असल्याचे सांगतो. घरात येताच आणलेल्या ग्रोसरीतले अंडे काढून क्षणभर त्याच्याकडे पाहतो. (कदाचित त्याला भिंतीपलिकडील जगात आपल्या धोबी मित्राकडे खाल्लेल्या त्या अंड्याची आठवण होत असावी.) कॉफी करून टेबलवर ठेवतो. तीन चमचे साखर घालून झाल्यावर क्षणभर थांबतो पण (आंटीच्या गेस्ट हाउसवर प्यायलेल्या कॉफीची आठवण होऊन) लगेच चवथा चमचा कॉफीमधे घालतो. ती पिता पिताच त्याला समोरची जॉर्ज वॉशिंग्टनचे चित्र असलेली प्लेट दिसते.
’हॉलिडे इन गोवा’च्या दुसर्‍या प्रकरणाची आठ्वण म्हणून आणलेली टिकली तो त्या वॉशिंग्टनच्या माथी लावतो. जणू अमेरिका आता भारताचे सौभाग्य मिरवणार असे तो सूचित करतो आहे. हे करत असतानाच त्याचा मोबाईल खास बॉलिवूड रिंगटोन वाजवू लागतो.'

(समाप्त)
ता.क.: कथानकाचा विषय लक्षात घेता बरेचसे संवाद मूळ इंग्रजीत तसेच ठेवले आहेत. फक्त वाचनाच्या सलगतेसाठी देवनागरीमधे लिहिले आहेत.

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - २

...कोणताही प्रसंग उपरा वाटत नाही, त्याचा कुठे ना कुठे सांधा जोडून घेतलेला दिसून येतो. (पुढे चालू)

टॉड ज्या कामासाठी आलेला आहे ते ट्रेनिंगचे काम चालू होते. तो इथल्या एम्प्लॉईजना सांगतो की इथल्या ऑफिसच्या कामावर कंपनी समाधानी नाही. ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत नि बहुतेक सर्व या येथील कर्मचार्‍यांना अमेरिकेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने उद्भवल्या आहेत. यावर उपाय म्हणून सर्वांना कंपनीची प्रॉड्क्टस, अमेरिकन वोकॅब्युलरी, जीवनपद्धती इ. बद्दल त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे. इथल्या ऒफिसचा एम.पी.आय. (मिनिट्स पर इन्सिड्न्स) जो १२ मिनिटाच्या आसपास आहे तो फार जास्त आहे नि तो ६ पर्यंत खाली आणण्याची आवश्यकता आहे हे ही सांगतो. ’बेसिकली यू पीपल शुड लर्न अबाउट अमेरिका’ टॉड म्हणतो. ’जर ग्राहकाशी तुम्ही नेटिव इंग्रजी मधे बोललात तर संभाषण लवकर पूर्णत्त्वाला जाईल’. ’बट वी आर स्पीकींग नेटिव इंग्लीश’ एक एम्प्लॉई म्हणते. ती म्हणते ’आमच्या देशाची कारभाराची भाषाच मुळी इंग्रजी आहे. तुम्ही आम्ही दोघांनीही ही भाषा ब्रिटिशांकडून घेतली आहे. आमचे उच्चार तुमच्या पेक्षा वेगळे आहेत हे खरे पण बहुधा आमचे उच्चार तुमच्यापेक्षा अचूक असतात’. ’उदाहरणार्थ आम्ही ’इंटरनेट’ असा नेमका उच्चार करतो तर तुम्ही ’इंट्रनेट’ असा सदोष उच्चार करता’ ती हसत हसत सांगते. टॉड म्हणतो ’हे बरोबर आहे. पण हाच तर मुद्दा आहे. तुम्हाला जर अमेरिकनाशी अमेरिकन बनून बोलायचे असेल तुम्हाला ’इंट्रनेट’ असाच उच्चार करावा लागेल’. एक एम्प्लॉई शंका विचारण्यासाठी हात वर करतो. ’मी मनमीत...’ तो सांगतो. ’मॅनमीट...?’ टॉड उच्चारतो. मनमीत त्याचा उच्चार दुरूस्त करतो, पण टॉडला बरोबर उच्चार करता येत नाहीच. आता आपल्याला टॉड ऐवजी इथे सरसकट टोड म्हणून का हाक मारली जाते ते टॉडला समजून येते. स्मॉल टॉक म्हणजे काय हे समजावून सांगताना तो म्हणतो की ’समजा तुम्ही एखाद्या खेळाबद्दल बोलत असाल...’, ’उदाहरणार्थ क्रिकेट’ पुरू मधेच बोलतो. बेसबॉल नि हाताने खेळण्याचा ’फुट’बॉल च्या चाहत्या नि ’जे जे इंग्लिश ते ते टाळावे” अशा वृत्तीच्या देशातून आलेला टॉड चटकन विषय बदलून टाकतो. तो त्यांना काही किमान काळजी घेण्यास सांगतो. 'इफ समवन आस्कस हाऊज द वेदर, आलवेज से विंडी’ तो सांगतो. मगाशी इंग्रजीबद्दल सडेतोड बोलणारी ती कन्या पुन्हा एकदा त्याचे बोलणे थांबवते. ती म्हणते, आम्ही इथे घारापुरीत आहोत, शिकागोत नाही. मग हे खोटं बोलणे नाही का? आम्हाला नोकरी देताना आमचे काम फोनवरून प्रॉडक्टस विकण्याचे आहे असे सांगण्यात आले होते, ग्राहकांशी खोटे बोलण्याचे नाही.’ ’बहुतेक अमेरिकन हे आउटसोर्सिंगवर नाराज आहेत.’ तो समजावू पाहतो. ’पण ते विकत घेत असलेल्या बहुतेक सर्व गोष्टी तर ’मेड इन चायना’ असतात ना?’ या तिच्या प्रश्नावर तो निरुत्तर होतो. ही मुलगी - आशा तिचे नाव - ही पुढे आणखी एक-दोनदा त्याचे तोंड बंद करते, पण ते वेगळ्या प्रकारे.

ट्रेनिंग चालू होते. कंपनीच्या प्रॉडक्टसबद्दल एंप्लॉईजना असलेल्या शंकांचे टॉड एकएक करून निरसन करतो आहे, त्या निमित्ताने त्यांना अमेरिकन जीवनपद्धतीची ओळख होते आहे. काही गोष्टींचा खुलासा देणॆ टॉडला अवघड जाते आहे.

आयटेम नं एच फोर-झीरो-थ्री - चीज कॅप.

टॉड : बरेच अमेरिकन्स एखाद्या खेळाचा सामना बघायला जाताना ही टोपी घालतात’

मनमीत : का?’
टॊड : (गडबडलेला) ’अम्म... इट्स हार्ड टू एक्स्प्लेन’

आयटेम नं ए टू-टू-वन - बर्गर ब्रँड.
टॉड : ’काही अमेरिकन्सना अन्न शिजवताना अन्नावर आपला खास शिक्का उमटवायला आवडतो. जसे आपल्या मालकीच्या गायींच्या पाठीवर मालकी दाखवणारे शिक्के उमटवतात तसे’

राणी: ’पण गाय पळून जात नाही का?’

टॊड : ’नाही, अगदी लहान वासरू असतानाच - जेव्हा त्याला पकडून ठेवता येऊ शकते - तेव्हाच हे ब्रँडिंग केले जाते’. या उत्तरावर प्रश्न विचारणार्‍या मुलीला - राणीला - विलक्षण धक्का बसल्याचे दिसते. या ठिकाणी पुन्हा एकवार आशा काही बोलण्याची परवानगी मागते ’एक अनाहुत सल्ला आहे टॉड. यू नीड टू नो अबाऊट इंडिया’. इंडियातल्या लोकांना ’यू मस्ट लर्न अबाऊट अमेरिका’ म्हणणार्‍या टॉडला त्याचाच सल्ला देऊन आशा वास्तवाची जाणीव करून देते. एक वर्तुळ पूर्ण होते. हा ब्रँडिंगचा प्रसंगही नीट लक्षात ठेवण्याजोगा. पुढे एका प्रसंगात याचा भारतीय संदर्भ येतो तो अतिशय मार्मिक नि दोन जगातला फरक दाखवणारा.

ट्रेनिंग चालू आहे. टॉड एक रेकॉर्डेड कॉल ऐकवतो. एक अमेरिकन आजीचा फोन आहे हेल्पडेस्कला. त्यात ती सांगते की तिचा नातू आता शाळेत जाणार आहे. त्यासाठी आवश्यक गोष्टींची खरेदी तिला करायची आहे. पण तिला हल्लीच्या व्यवस्थेत काय काय हवे ते ठाऊक नाही. हेल्पडेस्कवरील एग्जिक्युटिव तिला यादी देऊ लागतो, त्यात ’रबर’ हा शब्द ऐकून आजी किंचाळतातच ’काय??????’. ’तुमचा नातू पेन्सिल वापरेल ना, मग त्याबरोबर रबर नको का?’ एग्जिक्युटिव खुलासा करू पाहतो. हे ऐकवून झाल्यावर टॉड विचारतो की या संभाषणात काय चूक आहे. बहुतेक सर्वांना काहीच समजत नाही. तो सांगतो रबर नव्हे ’इरेजर’ म्हणायला हवे, ’रबर’ म्हणजे काँडम, रबर जे संततीनियमनासाठी वापरले जाते ते. या संवादाकडे मनमीत चे अर्धवट लक्ष आहे. तो ’संततीनियमन’ हा शब्द ऐकतो, बुचकळ्यात पडतो, त्या ’इरेजर’चे कव्हर काढतो, त्याकडे साशंक नजरेने पहात विचारतो ’बट डज इट वर्क?’.


ऑफिसमधील बहुतेक सर्व प्रसंगांचे चित्रण हे सुपरवायजर्स केबिनच्या कोनातून केले आहे. त्यामुळे समोरच्या भिंतीवरचा एमपीआय मॉनिटर सतत दिसत राहतो. ट्रेनिंग जसजसे पुढे सरकते तसतसा त्यावरचा आकडा हळूहळू कमी होत गेलेलाही दिसतो.

देशी खाणे खाऊन हैराण झालेल्या टॉडला एकदा पेपरमधे मॅक्डोनल्डस ची जाहीरात दिसते. आता त्याला बर्गर खायचा आहे. पण ते दुकान मुंबईत आहे. एका टॅक्सीवाल्याला चार हजार रुपये देऊन अखेर तो त्या दुकानी पोहोचतो नि खुषीत दोन चीज बर्गर्सची ऒर्डर देतो. ऑर्डर घेणारा नम्रपणे सांगतो ’इथे चीज बर्गर मिळत नाही’. ’काय सांगतोस? मॅक्डोनल्ड्समधे चीज बर्गर मिळत नाही?’ टॉड वैतागाने विचारतो. ’सॉरी सर, धिस इज Mc Donnells नॉट Mc Donalds'. तेवढ्यात एक शेजारचा गोरा साहेब ’एक महाराजा वेज बर्गर’ अशी ऑर्डर देतो नि टॉड कडे वळून सांगतो ’दॅट इज क्लोजेस्ट यू गेट.’ टॉड पूर्ण वैतागतो. तो म्हणतो मी चार हजार रुपये खर्च करून घारापुरीहून फक्त चीज बर्गर खाण्यासाठी इथे आलोय. ’तुला माहित नाही का, घारापुरी मधेच एक खरे खुरे मॅक्डोनल्डस आहे ते?’ दुसरा गोरोबा सांगतो. ’अर्थात तिथेही चीज बर्गर मिळत नाहीच.’ अशी पुस्तीही जोडतो.

हे दोन गोरोबा समदु:खी असतात. दोघांचेही जॉब्स भारतात आलेले नि ज्यांना ते मिळालेत त्यांनाच मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली. संभाषणाच्या ओघात दुसरा सांगतो ’मी जोवर या व्यवस्थेचा, भारताचा विरोध करत होतो तोवर मला त्रास होत होता. आता मी तो सोडून दिल्यावर स्थिती बरीच सुधारली आहे.’ टॉड अंतर्मुख होतो.

एकदा सुपरवायजर केबिनमधून टॉड एम्प्लॉईजचे कॉल मॉनिटर करत असतो. एक एग्जिक्युटिव आपण शिकाsssगो (हा टॉडने शिकवलेला अमेरिकन उच्चार) मधे असल्याची बतावणी करत न्यू जर्सीतल्या कुण्या एलिझबेथ बरोबर फोनवरून फ्लर्ट करतोय. टॉड चिडतो. तेवढ्यात पुरू एक ट्रे घेऊन येतो. टॉड आपला वैताग त्याच्यावर काढतो. माफी मागून पुरू जाऊ लागतो. त्याने ठेवलेला ट्रे पाहून टॉड हे काय आहे म्हणून विचारतो. ’हे तुझ्यासाठी. इथल्या जेवणामुळॆ तुझे पोट बिघडते म्हणून खास हायजिनिक अन्न तुझ्यासाठी आणले आहे.’ टॉड शरमतो नि त्याच्यावर राग काढल्याबद्दल माफी मागतो.

काही दिवस जातात. होळीचा दिवस आहे. सकाळी घाईघाईत बाहेर पडलेल्या टॉड दारावर आंटीने लावलेली 'आज बाहेर जाऊ नये' ही चिठी न पाहिल्यामुळे बाहेर जातो. आधी घाबरतो पण नंतर मस्तपैकी होळीचा आस्वाद घेतो. बेसबॉलच्या अनुभवाचा वापर करून अचूक नेमबाजी करून पोरांना भिजवतो. त्यानंतर जवळच्या कुंडात स्वत:ला झोकून देतो. थोडक्यात सांगायचे तर दुसर्‍या गोरोबाने दिलेला सल्ला अंगीकारून गाडी रुळावर आणतो.
होळीची मजा करून तो आणि पुरू ऑफिसात पोचताच तो ऑफिस अमेरिकन पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माफी मागतो नि ऑफिसमधे योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक ते करण्याची सर्वांना मुभा देतो. एवढेच नव्हे तर कंपनीची उत्पादने एम्प्लॉईजना भरघोस डिस्काउंट मधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही देतो. यावर कंपनीतर्फे त्याची कान उघाडणी करणार्‍या त्याच्या बॉसला तो शांतपणे सांगतो ’एक बिलियन लोकांच्या देशात या मार्गाने कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा शिरकाव व्हावा अशी माझी योजना आहे.’ तडतडणारा बॉसचा आवाज बंद होतो.

याच प्रसंगात एक गंमत आहे जी कदाचित संवादाच्या ओघात दुर्लक्षित राहू शकते. एक एम्प्लॉई काही शंका विचारण्यासाठी हात वर करते. तिचे नाव टॉडला आठवत नाही. तो विचारतो ’वॉटज् योर गुड नेम?’. पहिल्या भेटीत आंटीच्या या ब्रिटिश इंग्रजीला बावचळलेला टॉड आता त्याच्या इंडियन एम्प्लॉईजच्या संगतीने त्याला नुसताच सरावलेलाच नाही तर नकळत त्याने ते काही प्रमाणात अंगीकारले सुद्धा आहे.

होळीची संध्याकाळ. पुरू नि टॉड मस्तपैकी मदिरेच्या संगतीत गप्पा मारतायत. टॉड थोडा होमसिक थोडा नॉस्टाल्जिक झालाय. ’होली’ या शब्दावरून त्याला त्याच्या आईने बनवलेल्या कॉस्चुमस्ची आठवण येतेय. गाडीने गेल्यास ती त्याच्या घरापासून दोन तासाच्या अंतरावर राहते. तरीही ते वर्षातून एकदोनदाच भेटतात. इतक्या जवळ राहूनही इतक्या कमी वेळा भेटता? पुरू आश्चर्यचकित झालेला. मद्याच्या अंमलामुळॆ थोडा सैलावलेला तो सांगतो ’तुमच्या जीवनपद्धतीचे हेच मला कळत नाही. तुम्ही लोक आईवडिलांबरोबर का रहात नाही?’ आणि तुला तुझा बॉस आवडत नाही मग तू दुसरी नोकरी का शोधत नाहीस?’ एकाच प्रश्नात त्या जीवनपद्धतीमधला अंतर्विरोध स्पष्ट होतो. आईवडिलांचे घर सहज सोडणार्‍या अमेरिकन्सना कटकट्या बॉसस असूनही कंपनी सोडणे सहजासहजी जमत नाही. टॉडकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. ’इन अवर वर्ल्ड, वी वर्क अवर अ‍ॅस आउट’ तो कडवटपणे म्हणतो.

यानंतर आशाचे नि टॉडचे जवळ येणे हा एक भाग येतो, परंतु तो बहुतेक हिंदी चित्रपटाच्या वळणाने जातो त्यामुळे त्याबद्दल फारसे सांगण्यासारखे काही नाही. या घारापुरी ऐवजी कंपनीचे पार्सल घारापुरी बेटांवर जाणे, ते आणण्यासाठी स्वत: टॉड नि असिस्टंट मॅनेजर इन-मेकिंग आशा या दोघांनीच जाणे (जसे काही एक फोन करून नव्या पत्त्यावर रिडायरेक्ट करणॆ या मागास देशात शक्यच नसते... पण हा चित्रपट आहे राव, थोडासा रोमान्स टाकायला चानस नको का? ) शेवटची फेरीबोट रद्द होणे, त्यांना तिथेच रहावे लागणे, धूर्त होटेल मॅनेजरने त्यांना सर्वात महाग स्वीटच उपलब्ध असल्याचे सांगणेआणि मग आशाने ’हॉलिडे इन गोवा’ साजरा करणे वगैरे आपल्या ओळखीचे सगळे घडते नि टॉड नि आशा जवळ येतात. परत येताना आशा टॉड च्या मोबाईलवर स्वत:च्या नंबरसाठी खास बॉलिवूड रिंगटोन सेट करून देते आणि हा तुझ्या इंडियन ट्रेनिंगचा भाग आहे असा मिश्कील चिमटाही काढते.इथे रुळलेल्या टॉडला पुढे सलमानची भूमिका देऊन त्याचे ज्युनियर्स ’साजन के घर आयी...’ वर नाचायलाही लावतात. तो पठ्ठ्याही त्या ठेक्यावर मस्तपैकी नाचून बिचून घेतो.

(क्रमशः)

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

आउट्सोर्सड् : भिंतीपलिकडच्या जगात - १

एक मार्केटिंग एग्जिक्युटिव एका ग्राहकाशी फोनवर बोलतो आहे. ग्राहकाला हव्या असलेल्या उत्पादनाच्या शिपिंग बद्दल बोलणे चालू आहे. एग्जिक्युटिव त्या ग्राहकाला ’नेक्स्ट डे डिलिवरी’ बद्दल पटवू पाहतो आहे. या ताबडतोब डिलिवरीसाठी वीस डॉलर किंमत आहे पण ग्राहकाला अजिबात घाई नाही. सराईत एग्जिक्युटिव त्याला त्याबद्दल १५ डॉलर एग्जिक्युटिव डिस्काउंट देऊ करतो. (यावरून तो सिनियर/मॅनेजर लेवलचा आहे हे लक्षात येते). अखेर ’नेक्स्ट डे डिलिवरी” साठी त्या ग्राहकाला राजी करण्यात तो यशस्वी होतो. त्यांचे संभाषण चालू असतानाच कॅमेरा आजूबाजूला फिरत त्या ऑफिसच्या परिसराचे दर्शन घडवतो. त्यावरून एका उच्चभ्रू अमेरिकन शहरातील पब्लिक मार्केट नावाच्या मोठ्या इंडस्ट्रीयल भागात हे ऑफिस आहे हे लक्षात येते. अखेर कॅमेरा येऊन स्थिरावतो तो त्या एग्जिक्युटिववर, टॉड अँडरसनवर. कॅमेर्‍याकडे पाठमोरा असलेला टॉड फोन खाली ठेवतो नि आपल्या संगणकावर आल्ट+टॅब दाबून अपुरा राहिलेला पेशन्सचा गेम खेळू लागतो. टॉडच्या समोर दोन-तीन क्युबिकलच्या पलिकडे असलेल्या भिंतीवर कंपनीचे नाव दिसते. टॉडच्या क्युबिकलमधे त्याच्या समोरच एक वीकली चार्ट लावलेला आहे, त्याच्या डाव्या बाजूला थोडे मागे एक कमोडिटी लिस्ट आहे. त्याच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला एका जुन्या प्रकारच्या स्कूटरचे मॉडेल ठेवले आहे, काही नोट्स/चिट्ठ्या समोरच्या सॉफ्ट-बोर्डवर चिकटवून ठेवलेल्या दिसतात. टॉडच्या समोर साताठ क्युबिकल्समधे त्याच्याप्रमाणेच कानाला मायक्रोफोनसहित हेडफोन लावलेले आणखी काही एग्जिक्युटिव्स बसलेले आहेत. त्या सर्वांच्या मागे, टॉडच्या बरोबर समोरच्या दिशेला त्या ऑफिसमधे प्रवेश करण्याचा दरवाजा आहे, या दरवाजाच्या बाजूलाच सर्व क्युबिकल्समधून दिसतील अशा ठिकाणी वेगवेगळ्या वेळ दाखवणारी तीन घड्याळे शेजारीशेजारी लावली आहेत. हे दृष्य आहे ’वेस्टर्न नॉवेल्टी’ नावाच्या कंपनीच्या ’ऑर्डर फुलफिलमेंट डिपार्टमेंट’च्या ऑफिसमधले.

आता कॅमेरा जागा बदलून टॉडच्या समोरच्या बाजूला जातो. टॉडच्या पाठीमागे एक केबिन दिसते. त्यातून टॉडचा बॉस - डेव - उठतो नि दारातून बाहेर झुकून टॉडला हाक मारतो. टॉडला आत बोलावून तो केबिनचे दार लावून घ्यायला सांगतो. त्याला एक महत्त्वाचा निर्णय टॉडला सांगायचा आहे. ’वुई आर रिस्ट्रक्चरिंग अवर डिपार्ट्मेंट’ तो प्रस्तावना करतो. ’रिस्ट्रक्चर हाऊ?’ या टॉडच्या प्रश्नावर ’ऑफशोअर द होल डिपार्टमेंट’ तो शांतपणे उत्तर देतो. टॉडच्या चेहर्‍यावर एक हास्य उमटते. त्याला वाटते त्याचा बॉस त्याची थट्टा करतोय. पण अर्थातच तसे नाही. टॉड चिडतो, तो म्हणतो आपली सर्व प्रॉडक्टस ही १००% या देशाच्या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहेत, एखाद्या परक्या देशातील एग्जिक्युटिव त्यांचे मार्केटिंग कसे करू शकतील? उदाहरण म्हणून तो डेवच्या टेबलवर असलेल्या - अमेरिकेचा राष्ट्रीय चिन्ह असलेल्या - गरूडाची अमेरिकन ध्वजांकित प्रतिकृती उचलून दाखवतो. ’जमेल त्यांना, त्यासाठीच तर त्यांना ट्रेनिंग द्यायचे आहे, खास करून उच्चारांचे’ डेव सांगतो. आता मात्र हे आउटसोर्सिंग अटळ आहे हे टॉडला समजते. गेली चार साडे-चार वर्षे तो तिथला इन-चार्ज आहे. त्यामुळे तो तेथील सर्वांचा बॉसच नाही तर मेंटॉर सुद्धा आहे. तो विचारतो ’हे मी सर्वांना सांगावे अशी तुमची इच्छा आहे का?’. ’ते काम मी स्वत: करेन’ असे आश्वासन डेव त्याला देतो. अटळ ते समजून थोडा विषण्ण झालेला टॉड केबिनच्या काचेतून बाहेर नजर टाकतो. अचानक मागे वळतो, त्याच्या चेहर्‍यावर काळजी दाटून आली आहे. ’याचा अर्थ मलाही घरी जावे लागणार असा आहे ना?’. डेव नकारार्थी उत्तर देतो. किंचित आश्वस्त झालेला टॉड उसळून विचारतो, ’माझी सारी टीम गेल्यानंतर कंपनीला माझा काय उपयोग? कंपनीला माझीही गरज नाही’. ’बरोबर.’ निराकार चेहर्‍याने खांदे उडवून डेव उत्तर देतो. ’कंपनीला तुझी’ ’इथे’ गरज नाही, पण इंडियामधे आहे...’ टॉड अवाक होतो. ’..तिथे जे पर्यायी ऑफिस सेट-अप केले जात आहे तेथील एग्जिक्युटिवना ट्रेनिंग देण्यासाठी.’ डेव खुलासा करतो. ’पण त्यानंतर...?’ टॉड विचारतो. ’कंपनी वेगाने विस्तारते आहे, तुझ्यासाठी काहीतरी निघेलच... आणि हो... नोकरी तर तू केव्हाही सोडू शकतोस.’ डेव शांतपणे सांगतो. ’पण विचार कर. तू अजून तुझे स्टॉक-ऑप्शन्स वापरलेले नाहीत. नोकरी सोडल्यावर तुझे पेन्शन, मेडिकल बेनेफिटस सुद्धा नसतील. तू ही या बाहेर बसलेल्यांप्रमाणेच - जे पुढच्या वीस मिनिटात बेरोजगार होणार आहेत - घटत चाललेल्या जॉब-मार्केटमधे असशील... नोकरीच्या शोधात.’ अतिशय थंडपणे पुढील विदारक चित्र तो टॉडसमोर उभे करतो. टॉड उसळतो ’मी जाऊन त्या लोकांना ट्रेनिंग देऊ जे माझाच जॉब हिरावून घेतायत? अशक्य!. मला जमणार नाही.’ डेव सांगतो की टॉडच्या पोजिशनचा माणूस तिथे ’हाफ-ए-मिलियन रुपीज’ किंवा अकरा हजार डॉलर वार्षिक पगारावर मिळू शकतो, कंपनी टॉडला त्याच्या आठपट रक्कम मोजत असते. ’इथल्या प्रत्येक माणसासाठी मी तिथे आठजण रिक्रूट करू शकतो’ छ्द्मीपणे हसत डेव सांगतो. या ’पटी’च्या हिशोबाला टॊडला भविष्यात पुन्हा एकदा सामोरे जावे लागणार असते.

ही आहे सुरवात ’आउटसोर्सड’ची. माझ्या एका दोस्ताने हा चित्रपट पहाच असा आग्रह धरला तेव्हा मी प्रथम साशंक होतो. या प्रसंगातून तर माझी शंका खरीच ठरेल असे वाटू लागले होते. वाटले होते की हा चित्रपट म्हणजे पाश्चात्त्य माध्यमांनी आउटसोर्सिंग विरोधात चालवलेल्या प्रचाराचा पुढ्चा अंक असेल. पण सुदैवाने तसे घडले नाही. हळूहळू चित्रपट जसजसा उलगडत गेला तशी ही शंका मावळली नि एक नितांतसुंदर चित्रपट पाह्यला मिळाल्याची जाणीव झाली. एका मॉडर्न विषयावरसुद्धा एक संवेदनशील, अप्रचारकी चित्रपट निघू शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अर्थात संस्कृती श्रेष्ठत्त्वाच्या गंडाने पछाडलेल्या दोन्ही बाजूंकडील व्यक्तींना हा चित्रपट आवडणार नाहीच. याउलट जे माणसाकडे माणूस म्हणून पाहू शकतात, जगण्याचे एकाहून अधिक मार्ग असतात हे समजून घेतात, प्रत्येकाच्या काही चांगल्या काही वाईट बाजू असतात हे ज्यांना ठाऊक असते अशां सर्वांना आपण स्वीकारलेली जीवनपद्धती ही आपल्यापुरती - कदाचित- उपयुक्त असेल परंतु तीच श्रेष्ठ असे न समजता इतर पर्यायांकडे स्वीकृतीच्या नजरेने पाहता आले नाही तरी आस्थेच्या नजरेने पाहिले तरीही सहजीवन कितीतरी सुसह्य होऊ शकते हे ठसवणारा हा चित्रपट आवडून गेला नाही तरच नवल. अर्थात हा चित्रपट इंग्रजी असला तरी तो टॉडच्या दृष्टिकोनातून पाहिला जात असल्याने फक्त एक बाजूच समोर येते आहे. भारतीय बाजूला झुकते माप देणारा, खरेतर केवळ ती बाजू दाखवणारा चित्रपट असला तरी जसे टॉड आस्थेवाईकपणे भारतीय जीवनपद्धती अनुभवू पाहतो, येथील जगण्याशी जुळवून घेऊ पाहतो तसे भारतीय मन पाश्चात्त्यांच्या बाबतीत करते का असा प्रश्न राहतोच. नुसते मॅक्डोनल्डसमधे बर्गर खाणे, वीकेंडमधे विविध होटेल्समधे ’डिनर’ला जाणे, आई-वडिलांची (सासू-सासर्‍यांची हे लिहितसुद्धा नाही, यावर बहुतेकांची प्रतिक्रिया इंग्रजीत ज्याला ’फ्राउनिंग’ म्हणतात तशी होईल हे ठाउक आहे मला.) जबाबदारी टाळण्यापुरता व्यक्तिवाद जोपासणे (आणि एरवी इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निर्लज्ज गॊसिप करणे), मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळवणे म्हणजे ’करियर’ करणे अशी अर्धवट नि सोयीची अमेरिकन जीवनपद्धती स्वीकारून एरवी ’आपली संस्कृती श्रेष्ठ’ असा देखावा निर्माण करण्यासाठी त्यातील केवळ कर्मकांडांचे उपचार करणे अशी ’संकरित’ स्वार्थी जीवनपद्धतीच आपण स्वीकारली आहे. जसा एखादाच टॉड जसा एखादाच अमेरिकन असतो तसा एखादाच भारतीय असे करू शकतो. उरलेले क्षुद्र जीव संस्कृती श्रेष्ठत्त्वाच्या शाब्दिक लढाया करीत राहतात.

पुढच्या प्रसंगात मुंबई एअरपोर्ट्वर उतरलेला टॉड दिसतो. तिथे अनेक लोक येणार्‍या पाहुण्यांच्या नावाच्या पाट्या घेऊन उभे आहेत. त्या गर्दीतच एक ड्रायवर त्याला नेण्यासाठी गाडी घेऊन आलेला आहे, टॉड त्याच्या अगदी समोर जेमतेम एक फुटावर उभा आहे. आपल्याला नेण्यासाठी कोणी आले आहे का ते तो शोधतोय. कोणीही आलेले दिसत नाही हे पाहून तो ’कॅब’ पकडावी म्हणून तो पुढे जातो आणि इतका वेळ टॉड समोर असल्याने झाकून गेलेली त्या ड्रायवरच्या हातातली पाटी दिसते ’Mr. Toad'. आपली हसून हसून पुरेवाट होते. इकडे टॉड एअरपोर्टमधून बाहेर येतो. पांढरे ड्रेस घातलेले टॅक्सी-चालक त्याला गराडा घालतात नि त्याला कोण नेणार यावर भांडू लागतात. यातच दूरवर एका कूल - कॅब ला टेकून शांतपणे उभा राहिलेला एक ड्रायवर - जो खाकी कपड्यात आहे! - त्याला दिसतो. भांडणार्‍या टॆक्सीवाल्यांमधून कशीबशी सुटका करून घेत टॉड त्याच्याकडॆ धावतो. ’तू मला रेल्वे स्टेशनवर सोडू शकतोस का?’. ड्रायवर होकारार्थी मान हलवतो. तो टॉडची बॅग उचलत असताना टॉड त्या कॅबचे दार उघडून आत शिरू लागतो. इतक्यात तो ड्रायवर ती बॅग उचलून शेजारच्या रिक्षात ठेवतो (आता तो ड्रायवर खाकी ड्रेसमधे का होता हे उलगडते). ते पाहून टॉड धावत जाऊन रिक्षात बसतो नि त्याला रिक्षा नको आहे, गाडी थांबव म्हणून ओरडू लागतो. एवढ्यात भांडणार्‍या टॅक्सी ड्रायवर्सचा गराडा पडतो. आता मात्र ’थांबू नको, गाडी पळव, लवकर पळव’ असे टॉड ओरडू लागतो. अखेर तो सीएसटीवर सुखरूप पोहोचतो. तिथे मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस मधे आपली सीट शोधत असता त्याला एक आगंतुक गाठतो नि त्याच्याशी गप्पा मारू पाहतो. आणखी एका संभाव्य धोक्याची जाणीव होऊन टॉड सावध होतो. तेवढ्यात गाडी सुरू होते, आसपास लोकांची धावती गाडी पकडण्याची कसरत चालू होते. टॊडला याची सवय नसल्याने तो साहजिकच तो भांबावतो. पण तो आगंतुक त्याची बॅग आत फेकतो नि चालती गाडी पकडायला त्याला मदतही करतो. प्लॅटफॉर्मवरून तो टॉडला टा-टा करीत असतानाच गाडी वेगाने दूर जाऊ लागते.

या पहिल्या प्रसंगात पुढीच चित्रपटाचा टोन दिसून येतो. टॉडला ठकवू पाहणारे रिक्षा आणि टॅक्सीवाले जसे भेटतील तसेच या नव्या जगाच्या वेगाशी जुळवून घ्यायला मदत करणारेही भेटणार आहेत याची सूचनाच दिग्दर्शक या प्रसंगातून देऊन ठेवतो. आता घारापुरी स्टेशनमधून बाहेर येणारा टॉड दिसतो. बाहेर येताच त्याला बर्फाचे गोळे विकणारा दिसतो. खूष होऊन तो चक्क शंभर रुपये देऊन तो गोळा खरेदी करतो. गोळा खात असतानाच एक व्यक्ती - मि. पुरोहित नरसिंहा विराजनारायण या भक्कम नावाची - व्यक्ती त्याला विचारते ’आर यू मि. टोड?’ ’मि. टॉड .’ टॉड दुरूस्ती करतो. झालेल्या गोंधळाबद्दल माफी मागून पुरू त्याला घेऊन निघतो. जाताना गोळे विकणारा (सिद्धार्थ जाधव) आपल्या अफाट इंग्रजीत त्याला पुन्हा या असे सांगतो. ही पुन्हा अस्सल भारतीय पद्धत, आवर्जून ’पुन्हा या’ म्हणत निरोप घेण्याची, पण त्यातच ’एका गोळ्याला शंभर रुपये देणारं गिर्‍हाईक’ असल्याने त्याला एक गंमतीशीर असा स्वार्थाचा रंग पण आलेला.

आता पुरूच्या गाडीतून टॉडचा प्रवास सुरू होतो. हवापाण्याच्या गप्पा सुरू होतात. मुंबईच्या तुलनेत घारापुरी स्वच्छ आहे असे पुरू सांगतो. त्याचवेळी एका भिंतीवर नैसर्गिक रंगकाम करणारा एक जण टॉड दिसतो. अशा लहानलहान प्रसंगातून, विरोधाभासातून त्याला त्या परिसराची ऒळख होऊ लागते. त्यांच्या संभाषणातूनच टॉड ’एग्जिक्युटिव वाईस प्रेसिडेंट ऒफ मार्केटिंग ऎंड ऒर्डर फुलफिलमेंट’ या पदावर असल्याची माहिती आपल्याला कळते. पुरू प्रभावित होतो, तो म्हणतो ’धिस इज वेरी इम्प्रेसिव’, ’नॉट अ‍ॅज मच अ‍ॅज इट साऊंड्स’ टॉड खुलासा करतो. तो म्हणतो ’All I do is sell kitsch to some rednecks. And now I am going to train some shmucks' . त्याचा सगळा वैताग त्याच्या प्रतिसादातून बाहेर पडतो. पंचाईत अशी होते की त्याचा अर्थ न समजून बिचारा पुरू त्याला kitsch , redneck” आणि ’shmucks’ या शब्दांचा अर्थ विचारतो नि वर ते आपल्या टिपणवहीत टिपून ठेवतो. अर्थात टॉड शेवटच्या शब्दाचा अर्थ त्याला सांगत नाहीच. पुरू हा एक गंमतीशीर माणूस आहे. त्याने ’फ्यूचर कॉल सेंटर मॅनेजर’ असा हुद्दा लावून आपली बिजनेस कार्डस सुद्धा छापून घेतली आहेत. हाच माणूस इथल्या कॉल सेंटरचा इन-चार्ज होणार आहे हे टॉड ला समजते. गोर्‍या साहेबासमोर नम्रता दाखविण्याचा, त्याला खूष करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो आहे. पण तो लाचार नाही. आपल्या हातून काही चूक होऊ नये, हाती आलेली ५ लाख रू. ची नोकरी जाऊ नये या दृष्टीने तो काळजी घेतो आहे इतकेच. बोलता बोलता स्तुती करण्याच्या ओघात तो टॉडला सांगतो की बहुतेक परदेशी प्रवासी बर्फाचा गोळा खाऊन आजारी पडतात. तू खूप स्ट्राँग आहेस. यथावकाश तो बर्फाचा गोळा टॉडला त्याचा प्रताप दाखवतोच.

मुख्य रस्त्यापासून थोडे दूर जाताच गाडी दोन्ही बाजूनी झाडांनी वेढलेल्या रस्त्यावरून धावू लागते. यावेळी सतारीचे बोल ऐकू येऊ लागतात. चित्रपटात अशा समर्पक संगीताचा वापर जागोजाग केलेला आहे. टॉड अमेरिकेत असताना वापरलेले संगीत, तो मुंबईत उतरल्यानंतर रिक्षातून मुंबईच्या रस्त्यावरून जात असताना वापरलेले पंजाबी ढंगाचे उडते संगीत, तर घारापुरीच्या रस्त्यावरून जाताना ऐकू येणारे हे शांत सतारीचे स्वर यातून त्या त्या ठिकाणची जीवनपद्धती सूचित केली जाते.

टॉडचे बुकिंग येथील घारापुरी पॅलेस होटेलमधे झालेले आहे. पण पुरू सांगतो की ती जागा अतिशय एकाकी आहे. त्याऐवजी मी तुम्हाला ’आंटीज गेस्टहाऊस' मधे नेतो. आंटी तुझी तुझ्या आईप्रमाणे काळाजी घेईल. वाद घालू पाहणार्‍या टॉडच्या विरोधाला न जुमानता तो त्याला आंटीज गेस्ट हाऊसला नेतोच. एका लहानशा बंगलीवजा दुमजली घरात हे आंटीचे गेस्ट हाऊस आहे. आंटी ही तिथली सर्वेसर्वा. ही आंटी फर्डे इंडियन-इंग्लिश बोलते. तिच्या ’व्हॉट इज युअर गुड नेम?’ या अतीव ब्रिटीश वळणाच्या ('गुड नेम?’) प्रश्नाने अमेरिकन टॉड बुचकळ्यात पडतो. अखेर पुरू त्याची ऒळख करून देतो. आत जाऊन बसत नाहीत तो आंटी आपल्य देशी पद्धतीने त्याचे आईवडील काय करतात, त्याचे लग्न झाले आहे का, नसल्यास त्याला गर्ल-फ्रेंड आहे का, त्याला पगार किती मिळतो वगैरे प्रश्नांची सरबत्ती करते. व्यक्तिवादी समाजात वावरलेला टॉड चांगलाच बावरून जातो. चाचरत चाचरत तो सांगतो की त्याची एक गर्लफ्रेंड होती परंतु त्यांचा नुकताच ब्रेक-अप झालेला आहे. ’का?’ हा प्रश्न आंटी विचारणार हे ओघाने आलेच. ’शी वाँटेड टू स्टार्ट अ फॅमिली अँड आय वॉज नॉट रेडि फॉर दॅट’ टॉड सांगतो. ’बट व्हाय, यू आर ओल्ड इनफ टू बी ए ग्रँड्फादर.’ हा टिपीकल आंटीचा शेरा! टॉड कसनुसं हसतो. काय करणार बिचारा. पुढे एका प्रसंगात ही आंटी बिचार्‍या एकाकी टॉडला एखाद्या छानशा इंडियन मुलीशी भेटवण्याची ऑफर देते. त्याने नकार देताच तो ’होमो’ आहे का अशी विचारणाही बिनदिक्कत करते तर दुसरीकडे ’अगदी हाडांचा सापळा आहेस. भरपूर खाल्ले पाहिजेस तू.’ असा प्रेमळ दम देऊन भरपूर खायलाही देते. एकदा ही आंटी धोब्याकडून आलेल्या त्याच्या अंडरवेअरला सुद्धा इस्त्री करून ठेवते. आश्चर्यचकित झालेल्या टॉडला विचारते ’तुझी आई इथे असती तर तिने नसती केली का?’ अशी पृच्छा करते. एकुण ही आंटी भलतीच प्रेमळ नि सर्वांची काळजी करणारी आहे, एक प्रेमळ पण मॉडर्न आजीबाई.

तेवढ्यात चहा नि खाणे येते. खाण्यासाठी आणलेले फरसाण डाव्या हाताने खाणार्‍या टॉडला पाहून आंटी आणि पुरू अस्वस्थ होतात. त्यांची नेत्रपल्लवी चाललेली पाहून टॉडला काहीतरी गडबड आहे याची जाणीव होते. अखेर पुरू सांगतो ”डाव्या हाताने खाऊ नको कारण तो हात आम्ही... अशुद्ध .. हो अशुद्ध समजतो’. टॉडपुन्हा बावरलेला. ते पाहून अंकल - आंटीचा नवरा - उठतो आणि डाव्या हाताचा उपयोग सप्रयोग समजावतो. हा अंकल फक्त या एकाच प्रसंगापुरताच हालचाल करतो. एरवी तो दिसतो तो आरामखुर्चीवर बसून आराम करताना किंवा खाताना. एकुण हा अंकल आंटीच्या जिवावर जगतो आहे हे लक्षात येते. भारतीय नवर्‍यांची जगण्याची ही ही एक पद्धत! रोजच्या जगण्यातले हे छोटे छोटे तपशील टॉड हळू हळू आत्मसात करू लागतो. त्याच्या खोली लावलेला कालीचा फोटो असो, की बक्कळ चार चमचे घालून केलेली कॉफी असो, एक एक गोष्ट त्याला इथल्या जगण्याची ओळख करून देऊ लागते. एकदा आंटीच्या बागेत चहा घेत बसलेल्या टॉडला तेथील बोगनवेलीच्या झाडावर दिसतो तो शमेलिऑन, भारतात जवळजवळ सर्वत्र आढळणारा सरडा. आपल्या परिसराशी एकरूप होण्यासाठी रंग बदलणार्‍या या सरड्याबद्दल या नव्या परिसराशी जुळवून घेण्याची वेळ आलेल्या टॉडला विशेष कुतूहल वाटते.
गेस्ट हाउसच्या दारातून आत येताना डाव्या बाजूला कुंपणाची दगडी भिंत आहे. ही बरीच उंच आहे. पलिकडे काय आहे ते या बाजूने दिसू शकत नाही. परंतु बरेचदा गेस्ट हाउस मधे शिल्लक राहिलेले अन्न एका ट्रे मधे भरून त्या भिंतीवर ठेवले जाते. पलिकडून ते काढून घेऊन ट्रे पुन्हा त्या भिंतीवर ठेवण्यात येते. पलिकडील जगाचा नि त्या गेस्ट हाउसचा - त्यातील गेस्टस चा - एवढाच संबंध. पुढे आंटीने दिलेले भरपूर खाणे न संपवता आल्याने अनेकदा टॉडही आपले अन्न पलिकडच्या जगासाठी त्या भिंतीपलिकडच्या जगासाठी ट्रे मधे घालून भिंतीवर ठेवू लागतो. गोर्‍या माणसाला खाता येणार नाही इतके मिळावे तर भिंतीपलिकडच्या जगाचे निव्वळ उरलेल्या अन्नातही भागावे असा एक अर्थ यातून दिसू शकतो. अखेर कुतूहल अनावर होऊन तो त्या भिंतीवर चढून पलिकडे डोकावतो. त्याला दिसतो एक धोबीघाट, एका विहिरीभोवती वसलेला. आजूबाजूला असलेल्या जुनाट कळकट चाळवजा इमारतींच्या गॅलर्‍यांमधे लोंबकळणारे कपडे, नि धोबीघाटावर नित्य कलकलाट करीत धुणे धुणारे धोबी. त्यातला एक - कदाचित त्यांचा नेता वा सुपरवायजर - पिवळा टी शर्ट घातलेला धोब्याचे लक्ष भिंतीवरून डोकावणार्‍या टॉडकडे जाते. अन्न शेअर करणारे दोघे एकमेकांना प्रथमच भेटतात, ते ही भिंतीच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या जगात राहूनच. यथावकाश त्या भिंतीचे बंधनही दूर होते, तो भाग पुढे येईलच.

पहिल्या दिवशी सकाळी ऑफिसकडे जाताना पुरू टॉडकडून त्याला पाच लाख पगार दिला जाणार असल्याची खात्री करून घेतो, नि स्वत:वरच खूष होतो. त्यातच तो सांगतो की या नोकरीमुळेच त्याला भाग्यश्री सहस्रबुद्धे नावाच्या त्याच्या जुन्या मैत्रिणीशी लग्न करता येईल. चांगली नोकरी नसल्याने इतके दिवस रखडलेले हे लग्न आता सुरळितपणे पार पडणार असल्याने स्वारी खुषीत आहे. त्या भरातच ती ऐश्वर्या राय पेक्षाही सुंदर असल्याचा दावा तो करतो नि आपण गालातल्या गालात हसतो.

गाडी ऑफिसपाशी पोचते. ’हे आपले ऑफिस’ पुरू सांगतो. टॉड इकडेतिकडे पाहतो. एका एकमजली अर्धवट बांधलेल्या बांधकामाखेरीज तिथे काहीच नाही. ऑफिसला बाहेरून रंग दिलेला नाही. दुसर्‍या मजल्यावरचे पिलर्स पुरे झालेत पण स्लॅबचा नि भिंतींचा पत्ता नाही. बांधकामाच्या ठिकाणी वापरला जाणारी शिडी (जिला ते लोक ’घोडा’ म्हणतात) तशीच तिथे उभी. वरच्या चार पिलर्सला जोडणारे चार बांबू नि त्यावर प्लास्टिकचे निळे कापड टाकलेले. त्याच्या जवळच लावलेला एकुलता एक ए. सी. खालच्या मजल्याला खिडक्या नाहीतच आणि आत जाण्यासाठी पार्टिशनचे वाटावे असे एक दार नि त्यावर ’Fulfilment' असे कंपनीचे नाव असलेला एक फ्लेक्स टांगलेला. ’इथे हवी तशी जागाच उपलब्ध नव्हती, म्हणून आम्हाला स्वत:च हे बांधकाम करावे लागले’ पुरू स्पष्टीकरण देतो. परंतु आत प्रवेश करताच टॉडला दिसते एक सुसज्ज ऑफिस. अजून एखाद दुसरी चुकार वायर लोंबते आहे हे खरे पण एकुण ऑफिस उत्तम बनवलेले. दहा ते पंधरा सर्विस एग्जिक्युटीव ना बसण्यासाठी क्युबिकल्स नि त्या सर्वांवर एकाच वेळी नजर ठेवता येईल अशी एक सुपरवायजर्स केबिन, मॅनेजर पुरू नि व्हीपी असलेल्या टॉड यांच्यासाठी. टॉड प्रथमच समाधानी दिसतो. थोडे पुढे येताच त्याला दिसते मागचे दार नि त्यातून डोकावणारी एक गाय. ती जिथे उभी असते त्या व्हरांड्यातही साधी टेबल्स टाकलेली नि प्रत्येक टेबलवर दोन दोन एग्जिक्युटिव्ज ना बसायची सोय केलेली. हे सारे पाहत असतानाच सकाळचा बर्फाचा गोळा आपली करामत दाखवू लागतो. न राहवून तो गेस्ट हाऊसला परतण्याचा निर्णय घेतो.

अवघडलेला टॉड घाईघाईने गेस्ट हाउस कडे परतत असताना वाटेत एक पोरगं उगाच भुकेला आहे एक रुपया द्या म्हणून त्याच्या मागे लागते. पोटावर हात धरून चाललेला टॉड ’नो नो, नॊट अ गुड टाईम(!)’ म्हणून टाळू पाहतो. पण ते पोरगं त्याचा पिच्छा सोडत नाही. अखेर त्याला पैसे देण्यासाठी पोटावरून हात काढताच ते पोरगं त्याचा कमरेला लावलेला मोबाईलच पळवून नेतं. (पण ते पोरगं चोर नसतंच, फिरंग्याची गंमत करावी एवढाच त्याचा उद्देश असतो. काही काळाने ते तो फोन परत आणून देतं. पुढेही टॉडची नि त्याची ही गंमत चालू राहते.) हातघाईच्या स्थितीत असलेला टॉड धावतच आपल्या खोलीत शिरतो. पण हाय रे दैवा. त्याच्या टॉयलेट मधील टॉयलेट बोल त्याच्या देखतच एक गवंडी बाहेर आणताना दिसतो. दुसरा गवंडी सांगतो ’नीचे नीचे... डाउनस्टेर्श.. बाथरूम.. नो प्रॉब्लेम’. बिचारा धावतच जिना उतरतो नि खालच्या मजल्यावरील टॉयलेटमधे घुसतो. घाईघाईने पँटचा पट्टा काढत असताना एकीकडे नजरेनेच तो टॉयलेट पेपर वगैरे शोधत असतो. पण त्याला ते सापडत नाही. एवढ्यात त्याचे खाली लक्ष जाते. तिथे कमोड ऐवजी इंडीयन पद्धतीचा टॉयलेट दिसतो. हतबुद्ध झालेल्या टॉडच्या चेहर्‍यावर हळूहळू काही समजल्याचे भाव दिसतात. सावकाशपणे तो आपला डावा हात वर आणतो नि त्याकडे पाहतो नि एक सुस्कारा सोडतो.या ’अशुद्ध डाव्या हाता’च्या प्रसंगाप्रमाणे इतरही अलिकडचे पलिकड्चे काही प्रसंग असे छानपैकी जुळवून घेतलेले दिसतात. पुढेही अनेक वेळा पूर्वार्धातील अनेक प्रसंगांची सावली उत्तरार्धातील प्रसंगांवर पडलेली दिसते. त्यामुळे कथानकाला एक प्रकारचा बांधीवपणा आलेला आहे. कोणताही प्रसंग उपरा वाटत नाही, त्याचा कुठे ना कुठे सांधा जोडून घेतलेला दिसून येतो.

(क्रमशः)

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

नरोटीची उपासना

पन्नासहून अधिक वर्षे लोटली आहेत या पु.गं. नी 'नरोटीची उपासना' लिहिल्याला. त्याला पन्नास वर्षे झाली त्या वर्षी एका प्रथितयश वृत्तपत्राने तो पुनर्मुद्रित केला होता. आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्याची आठवण झाली.

हा लेख पु.गं.चा लेख नाही, त्याचा आजच्या काळात वेध घेणारा म्हणून शकू कदाचित. प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करतो (फारसा उपयोग नसतो हे ठाऊक असूनही) ती म्हणजे पु. गं.चा लेख किंवा हा लेख आपल्या परंपरांचे/प्रवृत्तीचे प्रचलित विचारांच्या/सश्रद्धतेच्या मर्यादेतच विचार करतो आहे. इथे अश्रद्धतेचा विचार येणार नाही. (प्रतिवादाच्या सोयीसाठी प्रथम तसा शिक्का मारणे सोपे असते, पण लेखाची व्याप्ती ती नाही.)

नरोटी म्हणजे करवंटी, नारळाच्या आतील जीवनदायी पाण्याचे, खोबर्‍याचे रक्षण करणारे भक्कम वेष्टण. श्रद्धा आणि परंपरांच्या भाषेत सांगायचे तर खोबरं नि पाणी हे मूलतत्त्व नि नरोटी म्हणजे त्याभोवती उभे राहिलेली व्यावहारिक कर्मकांडे वा उपचार. आपल्या लेखात पु.गं.नी त्याचा विचार साररूपाने मांडला आहे तो असा.

कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, त्याचा योगक्षेम नीट चालावा, त्याची उन्नती व्हावी यासाठी त्यातील धुरीणांनी वेळोवेळी काही तत्त्वे मनाशी निश्चित करून त्याअन्वये काही नियम, काही शासने सांगितलेली असतात. त्या शासनांच्या मागची जी तत्त्वे, त्यांचा जो मूळ हेतू त्याकडे लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचे पालन करीत असतो तोपर्यंत ती फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणास, रक्षणास, अभ्युदयास त्यांचे साह्य होते. कालांतराने स्वार्थामुळे, मोहामुळे, अज्ञानामुळे, आळसामुळे, श्रद्धाशून्यतेमुळे त्या मूळतत्त्वांचा विसर पडून समाज केवळ त्या जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचे बाह्यरूप तेवढे जाणतो. अंतरीचे तत्त्व, त्याचा आत्मा तो जाणत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. आतले खोबरे कोणी नेले, ते नासले, तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त नरोटीची उपासना करीत राहतो. पण त्याची श्रद्धा मात्र असते की आपण श्रीफळाचीच उपासना करीत आहोत. समाजाचा अध:पात येथूनच सुरू होतो.

या मूलत्त्वाचे निरूपण त्यांनी काही ऐतिहासिक काही तात्कालिक उदाहरणांच्या आधारे केले होते. आजच्या काळाचा विचार करता परिस्थिती फार बदलली आहे का असा विचार मनात येतो. रोजच्या जगण्यातले तुमचे-माझे काही अनुभव आहेत ज्यावरून असे वाटते की आजही परिस्थिती काही वेगळी नाही. कदाचित उद्याचीही काही वेगळी नसेल.

आज नागपंचमी आहे, नागपूजेचा दिवस. हा सण खरेतर शेतकर्‍यांचा. वावरातील धान्याची नासाडी करणार्‍या उंदरांवर जगणारा नाग हा एकप्रकारे शेतकर्‍याचा उपकारकर्ताच असतो. परंतु हा उपकारकर्ता मवाळ वृत्तीचा नाही. खुद्द तो शेतकरी वा त्याचे कुटुंबिय त्याच्या जगण्याआड आले तर त्यांनाही डसण्यास कमी करणार नाही. यास्तव, एका बाजूने त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे नि दुसर्‍या बाजूने वावरातले सहजीवन सुखदायी व्हावे म्हणून त्याला अन्न देऊन स्नेह जोडणे असा दुहेरी हेतू यात असावा.

आता मुद्दा असा आहे की मुळात हा वावराशी निगडित सण आहे. मग ज्यांनी जन्मात कधी वावराचे तोंड पाहिले नाही अशा पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील फ्लॅट्-संस्कृतीमधे वाढलेल्या नि कदाचित (त्यातील काही) गांडूळ दिसले तरी चप्पल घेऊन मारायला धावणार्‍या स्त्रिया, नागपंचमीचे व्रत करतात हा विरोधाभास नाही का? बराच काळ गारुडी नाग दाराशी घेऊन येत नि या तथाकथित सश्रध्द स्त्रिया त्या नागाची पूजा करून पुण्य कमावत. यात अनेक नाग मृत्युमुखी पडतात हे लक्षात आल्यावर पुण्यातील एका प्राणिमित्र संघटनेने दाराशी आलेल्या नागाची पूजा न करता सर्पोद्यानात जाऊन करा अथवा प्रतिमेची पूजा करा असे सांगताच त्यांच्यावर 'संस्कृती विरोधक' असल्याचा शिक्का मारला गेला (आमच्यासारखाच). एका विद्वान साहित्यिकाने लेख लिहून 'दाराशी नाग येणे नि तो पहायला मिळणे हा आमच्या मुलांचा सांस्कृतिक हक्क आहे' असा दावा केला होता. आता नागपूजा हक्क हे खरे पण त्यापाठोपाठ 'दाराशी येण्याचा हक्क' हे त्याचे पिलू कुठून आले? जसे गणोशोत्सवाबरोबर कर्णकटू स्पीकर लावण्याचा हक्क हा देखील संस्कृतीचा भाग होतो तसेच बहुधा.

अशीच गोष्ट निर्माल्याची. आपल्याकडे देवाच्या अंगावरून काढलेले निर्माल्य नदीत सोडण्याचा प्रघात आहे. यामागे अतिशय सुंदर नि संवेदनशील कारण आहे. पण संस्कॄतीच्या नावाखाली त्याचे पालन करणार्‍या किती जणांना ते ठाऊक आहे? विचारा स्वतःला हा प्रश्न. कारण असे आहे की आपण आपल्या उपासनेसाठी निसर्गातून त्याच्या चैतन्याचा अंश ती फुले काढून आणतो. जे आपले नाही ते आपण निसर्गाकडून घेतो. ते पुन्हा निसर्गालाचा परत करावे हा हेतू असतो. मग नदीतच का, तर वाहते पाणी हा चैतन्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. सुकलेल्या फुलांना - ज्यांचे चैतन्य आपण हिरावून घेतले होते - पुन्हा एकवार चैतन्याच्या सहवासात सोडावे, संकेतार्थाने त्यांचे चैतन्य त्यांना पुन्हा मिळवून द्यावे हा.

आजच्या आपल्या नद्यांची अवस्था काय आहे. पुण्यातील मुठा नदी हे सार्‍या शहराचे मैलापाणी पोटात घेऊन गटार झाले आहे. दोन धरणांमुळे वाहते पाणी हा मुद्दा पूर्णपणे निकाली निघालाय. अशा पाण्यात निर्माल्याचे विसर्जन करणे हे त्याचे अवमूल्यन नाही का? आमच्या मातोश्रींना अनेकदा हा मुद्दा सांगण्यात आला परंतु तो नाकारून आमच्या माघारी निर्माल्य नदीतच विसर्जन केले जाते. माझी खात्री आहे बहुतेकांकडे हीच स्थिती असणार आहे.

आता याची दुसरी बाजू पाहूया. काही वेळा आपण कर्मकांडात बदल करतो. पण त्यात हेतू मूल्यमापनाचा/सुधारणेचा असतो की स्वार्थाचा/सोयीचा? श्रावणात एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलावण्याची पद्धत आहे. आता बहुतेक नोकरदार स्त्रिया रविवारी बोलावतात, कारण एरवी सुटी नसते. आता सवाष्ण बोलावण्याचे हेतू काय असतील हे मला माहित नाही. पण माझ्यापुरता एक अर्थ मी लावला आहे तो सांगतो. श्रावण हा महिना असा आहे की हा बहुधा दुष्काळी महिना. मागच्या वर्षीचे धान्य संपत आलेले नि यावर्षीची कापणी व्हायला वेळ असते. अशा वेळी घरची स्त्री अन्नधान्य पुरवून वापरत असते. बहुधा घरच्या धन्याला नि पोरांना अधिक देऊन ती अर्धपोटी राहत असेल. अशा वेळी निदान एक दिवस तिला चांगले जेवण मिळावे हा एक हेतू असावा. बहुधा अशा गरजू स्त्रीला बोलावण्याचा मूळ प्रघात असावा. तसेच फळत्या-फुलत्या घरात एक दिवस एक माणूस सहज खपून जाते त्यामुळे फार काही खर्च वाढत नाही हा ही एक फायदा.

आज काय स्थिती आहे? जिला सवाष्ण म्हणून बोलावण्यात येते ती गरजू असते का?. एक धक्कादायक प्रकार - निदान त्यावेळी मला तसा वाटला- पाहण्यात आला. वारः शनिवार, स्थळः अभिषेक वेज, मेहेंदळे गॅरेज समोर. आम्ही एका मित्राची वाढदिवसाची पार्टी काढायला गेलो होतो. शेजारी दोन टेबलवर एकुण आठ स्त्रिया बसल्या होत्या. मधे चांदीचे ताम्हण आणि निरांजन. प्रकार काय आहे समजून घेण्यासाठी जरा कान देऊन ऐकले तर धक्काच बसला. ते सवाष्ण भोजन होते. अ ने बला, ब ने कला असे करत ट ने अला दिलेले. एकच ताम्हण नि निरांजनात भागते, है का आव्वाज. त्यातच एक बया तिच्या अफाट हिंदीत (हिंदी का कुणासा ठाऊक) दुसर्‍या अफाट स्त्रीला म्हणत होती 'मै तो उसको (एखाद्या अनुपस्थित महिलेबद्दल असावे) बोली की तुम दोनोही आजाव, मेहुण करके'. मला फेफरं यायचं बाकी होतं.

असे अनेक मुद्दे आहेत. दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटायची पद्धत आहे. हल्ली सर्रास मोठी असतात नि तजेलदार दिसतात म्हणून त्या झाडाच्या सजातीय असलेल्या कांचनवृक्षाची पाने वाटली जातात. श्रावणात जीवतीच्या पुजेसाठी प्रत्यक्ष लेकुरवाळ्या स्त्रीला न बोलावता तिच्या चित्राची पूजा केली जाते, तीच गोष्ट वटपौर्णिमेची. काही चतुर लोकांनी अशा आळशांच्या सोयीसाठी श्रावण महिन्यातील सार्‍या सणांचे एक पानाचे टेम्प्लेटच तयार केले आहे. ते देव्हार्‍यात चिकटवायचे की बास झाले काम.

तात्पर्य. आपल्या सोयीनुसार आवडीनुसार परंपरेत आम्ही बदल करू, त्यासाठी मूळ हेतूला बाधा येते का हे आम्ही पाहणार नाही. अर्थातच हे आम्ही गुपचूप करू, गाजावाजा करणार नाही. आणि आम्ही संस्कृती जाणतो त्यामुळे आम्हाला तो हक्कच आहे. आम्ही मूळ हेतूला हरताळ फासतो आहोत हे सांगणार्‍याला आम्ही संस्कृती विरोधक ठरवू, त्यांचा निषेध करू, त्यांच्या तोंडाला काळे फासू. आम्ही म्हणू ती परंपरा, आम्ही सांगू ती संस्कृती, आमच्या हेतूबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही.

अखेरीस नरोटीला चिकटून राहण्याचा अट्टाहास कुठल्या थराला जातो याचे उदाहरण म्हणून एक श्लोक देतोय.

वरं हि मातृगमनं, वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्या न भोजनम्

परंपरेने घृणास्पद मानली गेलेली सगळी पापे केली तरी चालतील पण एकादशीला भोजन केलेले चालणार नाही. हो हे लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते हे मला ठाऊक आहे, पण मुळातच ही तुलना इतकी घृणास्पद आहे की ही जर संस्कृती असेल तर आम्ही सुखे संस्कृती विरोधक म्हणवून घेऊ. खोबरे सडून गेले तर नवे श्रीफल आणून उपासनेसाठी - मग ते भले जुने नसेना- पण नरोटीची उपासना कधीही करणार नाही.

शुक्रवार, १४ मे, २०१०

होते कुरूप वेडे (कथा)

(Italo Calvino यांच्या The Black Sheep या कथेचा स्वैर अनुवाद.)

कोण्या एका गावी सगळेच चोर होते.

प्रत्येकजण रात्री आपली पिशवी आणि काजळी धरलेले कंदिल घेऊन बाहेर पडत आणि एखाद्या शेजाऱ्याचे घर लुटून पहाटे जेंव्हा आपल्या घरी परतून येत तेंव्हा आपलेही घर लुटले गेलेले त्यांना आढळून येई.

अशा तऱ्हेने सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. या व्यवस्थेत कुणाचेच नुकसान होत नसे वा कुणाचा फायदा. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करे, तर दुसरा तिसऱ्याच्या. अशा तऱ्हेने चालू रहात पुन्हा अखेरचा पहिल्याच्या घरी चोरी करून साखळी पूर्ण करी. गावातील व्यापारही सर्वस्वी फसवण्याच्या कलेवर अवलंबून होता. विक्रेते आणि ग्राहक दोघेही तिचा यथाशक्ती वापर करीत. येथील नगरपालिका ही एक गुंडांचा अड्डाच होती. तिचे शासक आपल्या नागरिकांना छळण्याचे आपले एकमेव काम मोठ्या निष्ठेने करीत असत. तर नागरिकही आपल्या परीने त्याना ठकवण्याचे काम करीत असत. अशा तऱ्हेने या गावातील जीवन सुरळित चालू होते.

कुठून कोण जाणे, पण एके दिवशी त्या गावात एक प्रामाणिक माणूस राहण्यास आला.

रात्री आपली पिशवी आणि कंदिल घेऊन लुटण्यास बाहेर पडण्याऐवजी तो घरीच धूम्रपान करीत पुस्तक वाचत बसला. काही चोर त्याचे घर लुटण्यास आले आणि घरात दिवा चालू असलेला पाहून हात हलवित परतले.

असे काही दिवस गेले. अखेर गावच्या काही 'प्रतिष्ठित' मंडळी त्या प्रामाणिक माणसाला भेटायला गेली. त्यांनी त्याला तेथील सर्व परिस्थिती नीट समजावून सांगितली. त्याला जर इतराना लुटण्याची इच्छा नसेल तर किमान त्याने घरी राहून इतरांच्या लुटण्याच्या आड येऊ नये असे सुचवले. त्या प्रामाणिक माणसाकडे या तर्काला काही उत्तरच नव्हते.

त्या दिवशी पासून त्यानेही इतरांप्रमाणेच रात्री बाहेर पडून पहाटे घरी परत येण्याचा क्रम सुरू केला. फक्त त्याने इतर कोणालाही कधी लुटले नाही. रात्री तो आपल्या घराजवळच्या नदीवरील पुलावर जाऊन बसे आणि चांदण्यात नदीचे पात्र न्याहाळत राही. पहाटे जेंव्हा तो घरी परते तेंव्हा आपले घर लुटले गेल्याचे त्याला आढळून येई.

जेमतेम एकाच आठवड्यात तो प्रामाणिक माणूस पूर्ण निष्कांचन झाला. त्याच्याकडे खायला काही नव्हते आणि त्याचे घर पूर्ण रिकामे होते. अर्थातच त्याबद्दल तो कोणालाही दोष देऊ शकत नव्हता कारण ही परिस्थिती त्यानेच ओढवून घेतली होती.

परंतु यामुळे गावात एक वेगळीच समस्या निर्माण झाली.

तो प्रामाणिक माणूस इतर कोणाचेही घर न लुटता स्वतःचे घर मात्र लुटू देत होता. त्यामुळे दररोज पहाटे गावात एक माणूस असा असे की जो इतर कोणाचे घर लुटून घरी परते तेंव्हा आपले घर लुटले गेलेले नाही असे त्याला दिसून येई. हे घर खरेतर त्या प्रामाणिक माणसाने लुटणे अपेक्षित होते आणि आपले हे 'काम' त्याने केलेले नसे. अशा तऱ्हेने ज्यांचे घर लुटले जात नव्हते ते इतरांपेक्षा अधिक श्रीमंत झाले. आता इतरांपेक्षा अधिक पैसा जमा झाल्याने त्यांना इतरांचे घर लुटण्यासाठी जाण्याची गरज वाटेनाशी झाली. तसेच दुसर्या बाजूला जे लोक त्या प्रामाणिक माणसाचे घर लुटण्यास येत, त्यांना तिथे लुटण्यासारखे काहीच मिळत नसे. त्यामुळे त्या रात्री त्यांना हात हलवित परत जावे लागे. त्यामुळे असे लोक इतरांपेक्षा अधिक गरीब झाले.

दरम्यान जे अधिक श्रीमंत झाले होते त्यापैकी काहीना रात्री पुलावर फिरायला जाणे हे प्रतिष्ठेचे वाटू लागले. त्यांनीही मग रात्री पुलावर जाऊन चांदण्यात नदीचा प्रवाह न्याहाळत बसायला सुरवात केली. यामुळे तर गोंधळात अधिकच भर पडली. पुलावर जाऊन बसणाऱ्यांची घरे वारंवार लुटली गेल्यामुळे आणखी काही लोक श्रीमंत झाले, तसेच उरलेले श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. याचा परिणाम असा झाला की आणखी काही लोक गरीब झाले. पण अजूनही ते सर्व चोर होते आणि एकमेकाना लुटत होते.

आता आणखी श्रीमंत झालेल्यांनाही पुलावर फिरायला जावेसे वाटू लागले. पण आता अनुभवातून त्यांच्या हे लक्षात आले की जर आपण तसे केले तर आपणही गरीब होऊ. त्यावर त्यांनी एक तोडगा शोधून काढला. आधीच गरीब झालेल्या काही जणांना त्यांनी आपल्यासाठी लुटण्यास पाठवायला सुरवात केली. त्यासाठी त्या गरीबांना त्यांनी वेतन, भत्ता इ. देऊ केले. आता ते निश्चिंतपणे पुलावर फिरायला जाऊ लागले. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिक गरीब. पण अजूनही ते सर्व चोरच होते आणि एकमेकाना लुटत होते.

असेच काही दिवस गेल्यानंतर काही श्रीमंत इतके श्रीमंत झाले की त्यांना स्वतः लुटायला जाण्याची वा इतरांना त्यासाठी पाठवण्याची गरजच उरली नाही. पण जर त्यांनी इतरांना लुटणे थांबवले तर ते स्वतः गरीब होण्याचा धोका होता. कारण ते इतरांना लुटणार नसले ती इतर लोक त्यांना लुटणारच होते. हे टाळण्यासाठी त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला. काही अगदी गरीब लोकाना शोधून काढून त्यानी आपल्या घराची निगराणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. याची परिणती पोलिस यंत्रणा निर्माण करण्यात आणि तुरुंग बांधण्यात झाली.

अशा तऱ्हेने तो प्रामाणिक माणूस त्या गावात आल्यानंतर काही वर्षातच लोक लुटण्याचे वा लुटले जाण्याचे नाव काढेनासे झाले. आता ते फक्त श्रीमंती आणि गरीबीबद्दल बोलत. पण अजूनही ते सर्व चोरच होते.

त्या प्रामाणिक माणसाचे प्राण मात्र उपासमारीने पूर्वीच लुटून नेले होते.

मंगळवार, ११ मे, २०१०

मी आणि माझा (?) पक्ष

मंडळी आमच्यासमोर एक प्रश्न आहे सध्या. आमच्या एक मित्रवर्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला परवा की 'मी कोणत्या राजकीय पक्षाचा समर्थक आहे?' आणि 'तुझे नेहमीचे विचारजंती संदिग्ध उत्तर नको, एका पक्षाचे नाव सांग' असे दटावले. आता आली पंचाईत. नेमके उत्तर द्यायचे तर आधी ते आम्हाला माहित हवे ना. मग आम्ही आमचे विचारजंती डोके खाजवून विचार करू लागलो की याचे उत्तर काय द्यावे.

बरेचदा 'तुमच्यासारखे कम्युनिस्ट' अशी प्रेमळ शिवी 'घरे-बाईरे' मिळत असते, तर म्हटले मग आपण बहुधा कम्युनिस्ट पार्टीचे समर्थक असू. एक निश्चित तत्त्वज्ञानाच्या आधारे उभा असलेला/ले पक्ष हा एक गुण म्हणावा. तसेच पक्षीय फाटाफुटीपासून - अपवाद मूळ कम्युनिस्ट पक्षापासून फुटून झालेली मार्क्सवादी पक्षाची स्थापना - दूर असलेला, आपल्या अयाराम-गयाराम राजकीय संस्कृतीमधे या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधे असलेले पक्षांतराचे अत्यल्प प्रमाण ही दुर्मिळ गोष्ट. बंगालमधे इतकी वर्षे राखलेले शासन/वर्चस्व हे ही भक्कम पक्षबांधणीचे निदर्शक म्हणायला हरकत नाही. चला हे चांगले झाले, मग आपण कम्युनिस्ट-समर्थक व्हायला हरकत नाही. पण मग पुन्हा विचारजंती डोके चालू लागले. जरा मागचा इतिहास आठवला. एका तत्त्वज्ञानाआधारे पक्ष उभा असला तरी प्रसंगी त्यापलिकडे जाऊन तथाकथित यशस्वी नेत्यांप्रती दाखविलेली निष्ठा नि त्यामुळे एकाच मुद्यावर घेतलेल्या उलटसुलट भूमिका, ऐन महत्त्वाच्या प्रसंगी कचखाऊपणा गाखवून आपल्याच कार्यकर्त्यांचा केलेला तेजोभंग (उदा. तेलंगण), एकाच तत्त्वज्ञानाआधारे प्राकृतिक जीवनातील सर्व समस्यांची उकल करता येईल असा अनाठायी विश्वास, भावी वर्गविहीन समाजात सारे आलबेल असेल असा - परंपरावाद्यांना शोभणारा - भाबडा आशावाद, एकीकडे धर्म/श्रद्धा यातून येणार्‍या पारलौकिक श्रद्धांचा धिक्कार करताना रुजवलेला हा नवा - एक प्रकारे - पारलौकिकच आशावाद, कला/साहित्य यांचे मूल्यमापनसुद्धा स्वीकृत तत्त्वज्ञानाशी सुसंगत असावे असा दुराग्रह हे सगळे 'गुण' कसे दुर्लक्ष करता येतील? छे, आपण नाहीच कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक.

मग आम्ही वळलो आपल्या 'ग्रँड ओल्ड पार्टी' अर्थात काँग्रेसकडे. जग जेव्हा दोन टोकाच्या विचारसरणीमध्ये विभागले गेले होते तेव्हा प्रवाहपतित न होता स्वीकारलेला मध्यममार्ग, देशांतर्गत बाबतीत संपत्ती निर्माण वा परंपरा जतन अशा दोन परस्परविरोधी नि टोकाच्या मार्गांचा साधलेला समन्वय, त्यातून संथ गतीने पण निश्चित दिशेने टाकलेली पावले, केलेले प्रयत्न; गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान स्वीकारूनही सबल देशाच्या निर्मितीचे नेमके प्रयत्न, जागतिक पातळीवर एक जबाबदार देश म्हणून प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली देशाची इमेज, सामाजिक धोरणातही एकांगीपणा टाळून समन्वयाची घेतलेली भूमिका हे मला दिसलेले काही श्रेयस्कर मुद्दे. चला बरेच चांगले दिसताहेत. पण थांबा. राजकारणाची बाजू पाहिली तर त्यात रुजवलेली आयाराम-गयाराम संस्कृती, विधिनिषेधशून्य राजकारणाचा उद्गाता पक्ष अशी रास्त इमेज, पक्षांतर्गत संस्थानिकांमुळे राजकारणात रुजवलेली सरंजामशाही, गैरसोयीचे निर्णय टाळण्यासाठी कालापव्यय हा रामबाण उपाय वापरून जन्माला घातलेली सुस्त नोकरशाही व्यवस्था, प्रशासन, न्यायसंस्था नि पोलिस/सुरक्षा यंत्रणांचा गैरवापर करण्याचा पाडलेला अनिष्ट पायंडा इ. अनेक गोष्टी आठवल्या नि म्हटले इथेही आपले जमणार नाही.

मग आम्ही म्हटले की देशाच्या राजकारणाबद्दल बोलताना देशप्रेम हा एक महत्त्वाचा मुद्दा समजायला हवा. अनेक वंश-संस्कृतींचे, परंपरांचे लोक उदरी घेऊन राहणार्‍या या देशात राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी या सर्वांना बांधणारा एक समान धागा निर्माण करायला हवा. धर्म/जात/प्रांत/भाषा इ. घटकांमुळे विखंडित झालेल्या समाजाला सांधून घेणारा हा धागा तसाच बळकट असायला हवा. केवळ राष्ट्रप्रेम वा एखादे तत्त्वज्ञान हे समाजाला दीर्घकाळ एकत्र ठेवू शकत नाही. यासाठी 'हिंदुत्त्वा'ची नवी व्याख्या करून देशातील सर्वांना बांधणारा एक बळकट धागा देणारा भाजपा अथवा पूर्वाश्रमीचा जनसंघ हा ही एक 'सशक्त' पर्याय आमच्यासमोर होता. सुसंस्कृत नेतृत्व, परंपरेचे गुणगान करतानाही बदलत्या काळाचे राखलेले भान, स्वातंत्र्यपूर्व नि स्वातंत्र्योत्तर काळातही काळात काँग्रेस, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट यांच्या तुलनेत दुय्यम असलेल्या पक्षाने देशात खर्‍या अर्थाने पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन करण्यापर्यंत मारलेली भरारी, त्यानंतर अनेक परस्परविरोधी भूमिका घेणार्‍या पक्षांचे शासन पूर्ण कार्यकाल यशस्वीपणे चालवून संयुक्त शासनकल्पनेची रोवलेली मुहूर्तमेढ, रा स्व. संघासारख्या संलग्न संघटनांच्या सहाय्याने केलेली केडर बेस्ड पक्षबांधणी, नि त्याच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमासारख्या (व अन्य प्रासंगिक) सामाजिक कामांना पुरवलेले पाठबळ इ. काही उल्लेखनीय गोष्टी. पण मग हिंदुत्त्वाची व्यापक व्याख्या कागदावरच राहून त्याची पुन्हा हिंदु परंपरांशी घातलेली सांगड, 'पार्टी विथ डिफरन्स' चा दावा करत उत्तरप्रदेश, झारखंड, कर्नाटक इथे केलेल्या विधिनिषेधशून्य राजकीय तडजोडी, राजकारणातील गुंडगिरीबद्दल भरपूर गदारोळ करूनही उत्तर भारतात त्याच गुंडांच्या आधारे मिळवलेले राजकीय यश, धार्मिक बाबतीत फार गुंतल्यामुळे नेमक्या सामाजिक धोरणाचा अभाव, हिंदुत्त्वासारख्या व्यापक तत्त्वज्ञानाचा अंगीकार केल्याने स्थानिक पातळीवरील समस्यांकडे पाहताना उडणारा उद्दिष्टांचा संघर्ष अशा अनेक गोष्टी समोर येताचा आम्ही भाजपावरही फुली मारली.

पुढचा पर्याय होता समाजवादी पक्षांचा. पण आता मोठा प्रश्न असा की कोणता समाजवादी पक्ष निवडावा, मुलायमसिंहांचा, लालूप्रसाद यादवांचा, बहेनजी मायावतींचा, झोपाळू देवेगौडांचा कि स्वतः एकेकाळी विक्रमी मतांनी निवडून आलेल्या पण आज २००९ च्या लोकसभेत एक खासदार सुद्धा निवडून आणू न शकणार्‍या रामविलास पासवानांचा. एके काळी राममनोहर लोहिया, एम. एन. रॉय, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, जयप्रकाश नारायण, प्रधान मास्तर वगैरे दिग्गजांनी जागवलेल्या नि जगवलेल्या समाजवादी चळवळीचे काप गेले नि भोके राहिली अशा अवस्थेत स्वतःला समाजवादी म्हणवणार्‍या या संधिसाधूंच्या पक्षांचे समर्थक असणे म्हणजे धडावर डोके नसल्याची कबुली देण्यासारखेच आहे.

आता समाजवादी पक्षांचा उल्लेख करताना प्रादेशिक पक्षांचा अंतर्भाव केलाच आहे तर आपल्या महाराष्ट्रापुरता शिवसेनेचा विचार करायला काय हरकत आहे? एक मराठी माणूस म्हणून विचार करता आज मुंबईत मराठी माणूस शिल्लक आहे याचे श्रेय फक्त आणि फक्त शिवसेनेचेच हे शिवसेनाविरोधक सुद्धा अमान्य करू शकत नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातीविरहित राजकारण करणारा एकमेव पक्ष अशी ओळख. अनेकदा प्रतिकूल स्थिती येऊनही मुंबईवर राखलेले वर्चस्व आणि तत्त्वज्ञानाच्या मर्यादेत सर्व सामाजिक/भौगोलिक विभागात केलेला उत्तम पक्षविस्तार हे ही खास दखल घेण्याजोगे. पण मूळ उद्दिष्टाची प्रादेशिक व्याप्ती नि त्यामुळे पक्षविस्तारावर पडणार्‍या स्वाभाविक मर्यादा, आक्रमक आंदोलनाचे शस्त्र वापरताना भान सुटून काही वेळा गुंडगिरीकडे वळणारे कार्यकर्ते, पक्षाचा विस्तार सर्व समाज घटकात होऊनही निश्चित सामाजिक भूमिका वा विधायक कार्यात परिवर्तित करण्यात सातत्याने येणारे अपयश यामुळे शिवसेनेलासुद्धा संपूर्ण समर्थन देणे अवघड झाले आहे.

आता नव्याने उभा राहिलेला नि वेगाने वाढणारा मनसे हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तरूण चेहरा, शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात दाखवलेली तडफ पुन्हा दाखविणारा, धडाडीचे कार्यकर्ते नि काम पुरे करतात असा सर्वसामान्यामधे जागवलेला विश्वास. इथेही पुन्हा मर्यादित उद्दिष्टामुळे विस्तारावर येणारी मर्यादा आहेच. शिवाय अजून राजसाहेबांनी आश्वासन दिलेली महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट आम्हाला तरी पहायला मिळाली नाहीये. त्यामुळे अजून तरी आम्ही मनसे समर्थक आहोत असे म्हणता येत नाही.

आता असे झाले आहे बघा. म्हणजे एखादे सनसनाटी विधान, शिवतीर्थावरच्या लाखालाखाच्या सभा, एक तत्त्वज्ञान, सामाजिक न्यायाची बतावणी, आक्रमकता, महान देशाची महान परंपरा वगैरे गप्पा, डोक्यावर गांधीटोपी घालून सुजनत्वाचा केलेला दावा, समतेच्या उद्घोष, लोहिया नि रॉय यांचे नामस्मरण या गोष्टी आम्हाला कधीच पुरेशा वाटल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला आता एक पक्ष निवडणे अवघड झाले आहे. म्हणून आम्ही आता तुमच्या दारी आलोय.

नाही आमची वरील मते तुम्हाला पटणार नाहीत हे माहीत आहे आम्हाला. पण आम्ही आमची मते तुम्हाला सांगण्यासाठी हे लिहिलेलेच नाही. आम्ही जरा विदा गोळा करू म्हणतोय. आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या पक्षाचे समर्थन करायचे की नाही याचा निर्णय करताना वा एकाच पक्षाची निवड करताना कसा विचार करता? कुठले मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, कुठल्या निकषांच्या आधारे तुमचा निर्णय होतो. 'केल्याने देशाटन, पंडितमैत्री...' वगैरे आम्ही वाचले होते. आता आमचा प्रश्न देशाटन केल्याने काही सुटणार नाहीये, म्हणून मग जालटनाचा वा पंडितमैत्रीचा आधार घेतो आहे. तुमच्या विचारांच्या/निकषांच्या आधारे आमचा प्रश्न सुटतोय का ते पाहू या.

बुधवार, ५ मे, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५

सत्यजित रे यांच्या चित्रपटांची एक दोन परिच्छेदात ओळख करून देणारे एक लहानसे पुस्तक वाचले होते. लेखक अमृत गंगर (प्रकाशक लोकवाङ्मय गृह). त्यांनी हा चित्रपट भारतातील अंधश्रद्धेवर आसूड ओढणार होता असे म्हटले आहे. तसेच तो प्रकाशित झाला तेव्हा अनेक धार्मिक संघटनांनी त्याविरुद्ध गदारोळ केला अशी माहिती दिली आहे. आता डावे नि उजवे यांचे ज्यावर एकमत झाले आहे त्याबाबतच मी मतभेद व्यक्त करू इच्छितो. मला वाटते इथे आपले टिपिकल भारतीय मन विचार करते आहे. आपल्याला जसे असावे असे वाटते तसे 'आहे' असा आपला समज असतो. वरवर न पाहता, थोडे वस्तुनिष्ठ होऊन बारकाईने पाहणे आपल्याला जमत नाही. चटकन एक शिक्का मारला की आपण 'वा' म्हणायला किंवा दगड मारायला मोकळे होतो.

मुळात ही शोकांतिका ही व्यक्ती-समष्टीची लढाई आहे, माणसे निमित्तमात्र आहेत, मूळ कारण आहे ती परिस्थिती नि या सार्‍याची पार्श्वभूमी असलेला नि तुमच्या आमच्या आयुष्यावर अदृष्य बंधने घालणारा समाज. इथे कुणाला नियतिवाद दिसू शकेल. इथे शोकांतिका आहे ती आहे ती दयाचे माणूस म्हणून जगण्याचे हक्क हिरावून घेतले जातात ही. आता इथे ज्या काळात हा चित्रपट केला त्या काळाच्या संदर्भात - नि अन्य काही संदर्भ अधिक ठळक व्हावेत म्हणून - देवत्वाचे संदर्भ आले आहेत. अन्यथा हीच कथा एखाद्या अन्य पार्श्वभूमीवर अन्य समाजिक स्थितीतही दाखविता आली असती. चित्रपटातील हिरो/हिरोईन, खेळाडू यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या प्रसिद्धीचाच दबाव येतो. कल्पना करा अमिताभ बच्चन, किंवा सचिन तेंडुलकर निवांत चौपाटीवर बसून भेळ खाऊ शकेल? हरवलेले स्वातंत्र्य ही त्या यशाची मोजलेली किंमत असते. हीच प्रसिद्धी कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी किंमत मोजायला लावते. 'आंधी' आठवतो का? राजकारणात शिखरावर पोचलेली पण त्यामुळे विलक्षण प्रेम करणार्‍या पण ध्येयहीन पतीपासून नि मुलीपासून दुरावलेली आरती ही दयाचीच एक प्रतिमा म्हणता येईल.आणखी एक चित्रपट होता (नाव विसरलो) ज्यात चित्रपटाची नायिका ही साध्यासुध्या घरातून आलेली, आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर चित्रपटात मोठे नाव कमावते पण तिला अगदी लहानपणापासून साथ देणार्‍या प्रेमिकापासून दुरावत जाते. चित्रपटाचे नाव आठवत नाही, पण नायिका बहुधा जरीन वहाब होती, याचा एक 'मिथुन रिमेक' पण आला होता 'सितारा' नावाने. आणि आपला गाईडमधील वहिदाची वाटचाल थोडीशी अशाच मार्गाने होणारी (पण तिथे देवला जरा काळ्या रंगात रंगवून तिला झुकते माप दिले आहे). या सर्व नायिका नि देवीतील दया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे. या सर्व नायिकांनी आपले आयुष्य, ते यश, ती प्रसिद्धी स्वतः जाणीवपूर्वक नि हेतुतः निवडलली आहे. तो त्यांच्या ध्येयाचा भाग आहे. परंतु दयाचे तसे नाही. हे देवत्त्व तिच्यावर लादले गेले आहे. ते नाकारण्याचे स्वातंत्र्य तिला नाही, किंवा खरंतर असे म्हणता येईल की त्या स्वातंत्र्याची जाणीव तिला नाही. भोवतालची परिस्थितीही अशी आहे की ते स्वातंत्र्य जाणवले तरी त्याचा वापर ती करू शकणार नाही.

इथे आणखी एका अजोड कलाकृतीचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. जी. एं. ची एक अप्रतिम कथा आहे 'स्वामी' नावाची. या कथेशी 'देवी'ची तुलना करण्याचा, त्यातील मूळ तत्त्वातील कमालीचे साम्य अधोरेखित करण्याचा मोह आवरत नाही. या कथेत एका श्रांत वाटसरूला अन्न/निवास यांची लालूच दाखवून एक मठात नेले जाते. त्याची सर्वप्रकारे सेवा करून अखेर विश्रांतीसाठी एका लहानशा खोलीत नेले जाते. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की तो आता त्या लहानशा खोलीत बंदिवान झाला आहे. खोली किती तर जेमतेम आडवा होता येईल इतकी, उंची किती तर जेमतेम तो बसू शकेल इतकी. बाजूला तेवढीच लहान खोली जी न्हाणीघर म्हणून वापरायची. अन्नाचे ताट आत सरकवण्यासाठी एक दाराला एक लहानशी फट नि छतामधे हवा येण्याइतके लहानसे छिद्र, तेही इतके उंच गेलेले की त्याचा शेवट खालून दिसणे दुरापास्तच. बराच आरडाओरडा केल्यानंतर त्याला सांगण्यात येते की आता तो आता त्या मठाचा महंत आहे आणि उरलेले आयुष्य त्याला तिथेच काढायचे आहे. त्याच्यासाठी उंची वस्त्रे नि सुग्रास अन्न सदैव तयार असेल, पण ते त्याला त्याच्या खोलीतच मिळेल. त्याच्या मृत्युनंतर त्याचे कलेवरच तेथून बाहेर येईल नि अशाच एखाद्या वाटसराची त्याच्याजागी वर्णी लागेल. ही एक विलक्षण रिपल्सिव (समर्पक मराठी प्रतिशब्द सुचला नाही, क्षमस्व) कथा आहे (वाचताना छातीवर विलक्षण दडपण आल्यासारखे वाटले पण वाचणे थांबवू शकलो नाही. आमच्या एका मित्राचे वडील कार्यक्रमानिमित्ताने गावोगाव हिंडत असतात. ते म्हणाले ही कथा वाचल्यावर आता आडगावी एस्टी स्टँडवर थांबण्याची आता भीती वाटते.) पण त्याचे सार देवीशी बरेचसे मिळतेजुळते आहे. महंत बनणे म्हणजे एका अर्थी लौकिक जीवनाचा त्याग करून, जगण्याचे इतर सारे पैलू नाकारून एका छोट्या खोलीत बंदिस्त होणेच तर असते. एकदा तिथे गेलात की परतीची वाट बंद असते, तसा प्रयत्न केलेल्यांचे काय होते ते आईबापांचे छत्र गमावलेल्या त्या चार पोरक्या पोरांना विचारा.

सामान्यपणे समजायला सोपे म्हणून जी मांडणी आपण अपेक्षित ठेवतो तशी सुष्ट/दुष्टाची लढाई इथे नाही. तसे इथे कोणीच सुष्ट वा दुष्ट नाही नि तशा काळ्या पांढर्‍याच्या तथाकथित लढाईतून येणारा बटबटीतपणा/भडकपणा सुद्धा नाही. सबकुछ पु.ल. असलेला 'गुळाचा गणपती' आठवतो का? ती 'देवी' ची एक भ्रष्ट नक्कल म्हणावी लागेल. नायकाला गरीब बिचारा दाखवून नि त्याला बुवा बनविणार्‍यांना खलपुरूष दाखवून, नि नायकाला प्रेमपात्र देऊन (एखाद्या चांगल्या गाजलेल्या परदेशी वा देशी पण स्थानिक भाषेतील चित्रपटांवरून हिंदी चित्रपट बनविताना जे जे करतात ते ते सर्व करून) अंती सत्याचा विजय वगैरे भाबड्या नि गल्लाभरू शेवटाकडे नेला आहे. पण 'देवी' मधे कोणीही विलन नाही, अगदी ही शोकांतिका ज्यांच्या एका स्वप्नातून परिणत झाली ते कालिबाबूही नव्हेत. कारण त्यांचे स्वप्न खरेच आहे, आवई नाही; भक्तीही खरीखुरीच आहे, बनाव नाही. त्यांचा खरोखरच असा विश्वास आहे की दया ही कालिमाता आहे. यात तिच्या देवत्त्वाचा गवगवा असला तरी त्यांनी तिचा - गुळाचा गणपतीप्रमाणे - बाजार मांडलेला नाही, उलट या देवीच्या उपासनेची संधी इतरांनाही मिळावी असाच त्यांचा हेतू आहे. इथे उमाप्रसाद नास्तिक/बुद्धिवादी आहे पण त्यानेही कुठे या टोकाच्या श्रद्धेला प्रत्यक्ष विरोध केलेला नाही. तो फक्त दयाला त्यातून सोडवू पाहतो ते तिचे मूळचे माणूस म्हणून असलेले जगणे तिला परत मिळावे म्हणून, प्रत्यक्ष श्रद्धेबद्दल वा अंधश्रद्धेबद्दल कोणतेही भाष्य तो करीत नाही. त्याचे बुद्धिवादी असणे हे फक्त कालिबाबूंच्या वाक्यातूनच तुमच्या-आमच्या पर्यंत पोचते आहे. एखाद्या उथळ दिग्दर्शकाने लगेच इथे आस्तिक/नास्तिक, बाप/मुलगा असा संघर्ष कदाचित उभा केला असता. दयाला आपल्याबरोबर नेण्याचा उमाप्रसादचा डाव हाणून पाडण्यासाठी कालिबाबूंनी दयाच्या देवी असण्याची हाकाटी पिटण्याचा नि त्यायोगे तिला हवेलीतच ठेवून घेण्याचा डाव केल्याचेही दाखवले असते. पण इथेच सत्यजित रे इतरांहून वेगळे आहेत. त्यांना काय म्हणायचे आहे ते त्यांना नेमके ठाऊक आहे. त्याहून वेगळा किंवा दुय्यम असा एखादा पैलू चुकून सुद्धा डोईजड होऊ नये म्हणून ते अतिशय काळजीपूर्वक पटकथा लिहिताहेत. त्याबाबतचे आणखी काही मुद्दे पुढील भागात.

(क्रमशः)

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४

मग ती ही हळूहळू त्याच्यापासून दूर निघून जाते. (पुढे चालू)

आणखी काही दिवस गेले आहेत. आता छोटू आजारी आहे. पण त्याच्या आईने हे कालिबाबूंना किंवा छोटूच्या वडिलांपासून लपवून ठेवले आहे. त्यांना समजले तर पुढे काय होईल हे तिला स्वच्छ दिसते आहे. त्यांच्यापासून लपवून तिने वैद्याला बोलावले आहे. आल्याआल्या तो विचारतो की घरात साक्षात ’देवी’ असताना मला बोलावण्याचे काय कारण. बोलता बोलता तो हे ही सांगून टाकतो की देवीने त्याचे दीर्घकाळ त्रास देणारे दुखणे बरे केले आहे. तरीही तिच्या विनंतीवरून तो छोटूला तपासतो आणि औषधे पाठवून देण्याचे मान्य करतो. अर्थात या पेक्षा छोटूला देवीच्या पायावर घालणे अधिक चांगले हे सांगायलाही विसरत नाही. वैद्यबुवा बाहेर पडत असतानाच छोटूचे वडिल तिथे येतात आणि छोटूला आजारी पाहून कालिबाबूंना सांगायला धावतच बाहेर जातात. छोटूच्या आईला ज्याची भीती वाटत होती तेच घडते. बेशुद्धीतच ’काकीमॉ' च्या नावाचा धोशा लावलेल्या छोटूला कालिबाबू आणि तरपदा देवीच्या पायावर घालण्यासाठी घेऊन जातात. अनेक दिवसांनी भेटलेल्या छोटूला पाहून दया आनंदते. त्याची आई तिला सांगते कि जोपर्यंत तू त्याला मांडीवरून खाली ठेवत नाहीस तोवर त्याला मी घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा तू लवकर त्याला खाली ठेव. इथे दयाच्या मनातील माणूसपण उसळून वर येते. ती स्वार्थी होते. बर्‍याच काळानंतर मिळालेला छोटूचा सहवास तिला सहजासहजी सोडायचा नाहीये. तिची अनिच्छा छोटूच्या आईला समजते. इथे हताश होऊन ती विचारते, तू खरंच देवी आहेस का? खरंच तू माझ्या मुलाला बरं करू शकतेस का? कृपा करून माझ्या मुलाला बरं कर. आतापर्यंत दयाचे देवीपण मान्य न करणारी ती पुत्रवियोगाच्या धास्तीने विकल होऊन दयाकडेच त्याच्या आयुष्याची भीक मागते आहे. अखेर आजची रात्र छोटूला माझ्याकडे राहू दे, उद्या सकाळीच मी तुला तुझा मुलगा परत देईन असे आश्वासन दया छोटूच्या आईला देते.

दुसर्‍या दिवशी छोटूच्या आजाराची बातमी ऐकून कलकत्त्यावरून धावत आलेल्या उमाप्रसादला कळते ती छोटूच्या मृत्युची बातमी. देवीच्या गाभार्‍यासमोर बसलेल्या शोकमग्न वडिलांना उमाप्रसाद छोटूच्या मृत्युबद्दल जबाबदार धरतो आहे.. पण कालिबाबूंची श्रद्धा अढळ आहे. माझ्याकडून देवीच्या सेवेत काहीतरी चूक झाली असेल, एरवी इतक्या सर्वांवर अनुग्रह करणारी देवी माझा छोटू का हिरावून घेईल असा त्यांचा प्रश्न आहे. मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून देवीने मला यश दिले नाही, मला शिक्षा केली असे त्यांचे म्हणणे आहे. उमाप्रसाद त्यांना म्हणतो या सगळ्या प्रकारातून तुम्ही काय मिळवले मला माहित नाही पण तुम्ही दयाचे सर्वस्व हिरावून घेतले आहे.

इथे झाल्या घटनेबद्दल स्वत:ला दोष देणारे कालिबाबू हे सर्वसाधारण सश्रद्ध मनाचे प्रातिनिधिक रूप आहे. आधी संभ्रम आणि भीतीमधून स्वतःमधल्या देवत्वावर विश्वास ठेवणारी दया आणि आपल्या श्रद्धेला छेद देणारा पुरावा नाकारून स्वतःकडे दोष घेणारे कालिबाबू, श्रद्धेच्या व्यावहारिक जगातील प्रवासाची सर्वात सुसंगत कारणमीमांसा अधोरेखित करतात.

तिथून उमाप्रसाद आपल्या जावेचे सांत्वन करायला गेला आहे. त्याच्याकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकून ती एकच वाक्य बोलते, ’त्या चेटकीणीनं माझं मूल खाल्लं’. इथे दयाने छोटूला सांगितलेल्या विचित्र गोष्टीचा संदर्भ जुळून येतो.

यानंतर उमाप्रसाद दयाला भेटायला तिच्या खोलीकडे धावतो. त्याची अपेक्षा असावी -आणि आपलीही- की एवढा लळा असलेल्या छोटूच्या मृत्यूने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. त्या क्षणी तिला नवर्‍याच्या आधाराची अतिशय आवश्यकता असेल. पण दाराशी थबकलेल्या उमाप्रसादला दिसते ती संपूर्ण शृंगार केलेली दया. विविध दागदागिने, हातभर बांगड्या आणि भरजरी शालू ल्यायलेली ती. इथे आठवते चित्रपटाच्या सुरवातीच्या प्रसंगातील देवीची मिरवणूक. विसर्जनासाठी नेले जात असणारी देवीची सालंकृत मूर्ती. बुचकळ्यात पडलेला उमाप्रसाद तिला विचारतो, हे सगळे काय आहे. ती म्हणते ’मला जायचं आहे’. तो पुन्हा पुन्हा विचारत राहतो की ’कुठे जायचे आहे’, ती उत्तर न देता पुन्हा पुन्हा ’जायचं आहे’ असंच म्हणत राहते. आता पडद्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला फुलांचा ताटवा दिसतो आणि क्षितिजावर धुक्याची चादर. डाव्या बाजूकडून खालच्या कोपर्‍यातून दया धावत येते आणि त्या ताटव्यातून धावत जात धुक्यात विलीन होते. या पार्श्वभूमीवर उमाप्रसादचा प्रश्न प्रतिध्वनित होत राहतो 'पण कुठे?', 'पण कुठे?'

या प्रसंगात जाणीवपूर्वक प्रतीकाचा वापर आहे असे दिसते. छोटूच्या मृत्यूने दयाला तिच्यापुरते तिच्या देवत्वाबद्दलचे उत्तर सापडले असावे. आपल्या मनुष्यपणाचा पुरेसा पुरावा तिला मिळाला असावा. परंतु हे असूनही ज्यांना देवीच्या कृपेने काही चांगले झाल्याचा, दु:ख निवारण झाल्याचा अनुभव आला त्यांच्या दृष्टीने ती देवी आहेच. माझ्याकडून काही आगळीक घडली म्हणून माझा नातू मला दुरावला असे म्हणणार्‍या कालिबाबूंच्या दृष्टीने ती अजूनही देवी आहेच. तिचे देवी असणे वा नसणे हे केवळ तिच्या निर्णयावर अवलंबून नाही (तसेही ते तिच्या निर्णयावर अवलंबून नव्हतेच). त्यामुळे या आहे/नाही च्या संभ्रमात दयाचा मृत्यू हा अवतारकल्पनेचा मृत्यू नाहीच. मग तिच्यामधे असलेल्या संभाव्य देवीच्या अंशाचे काय. तो अंश जिथून आला त्या क्षितिजाच्या पार असलेल्या तिच्या मूळ स्थानी परत जाणे हाच संयुक्तिक शेवट होऊ शकतो. अखेरच्या प्रसंगाचा मला लागलेला अर्थ हा असा आहे.

आता पुन्हा पडद्यावर येतो तो सुरवातीला पाहिलेला मुखवटा, अनलंकृत. देवत्वाचा सारा साजशृंगार उतरून गेलेला, निव्वळ पुतळा म्हणून शिल्लक राहिलेला. इथे चित्रपट संपतो.

नमनाला अनेक घडे तेल खर्ची घातले आहे. पुढील भागात या अनुभवाला मी 'अस्वस्थ करणारा अनुभव' का म्हटले आहे याचे विवेचन थोडक्यात मांडण्याचा विचार आहे.


श्रेयनामावली:
चित्रपट: देवी
कथा: प्रभातकुमार मुखर्जी
पटकथा आणि दिग्दर्शनः सत्यजित रे
संगीतः उस्ताद अली अकबर खान


कलाकारः

दयामयी: शर्मिला टागोर
कालिबाबू: छबि बिस्वास
उमाप्रसादः सौमित्र चॅटर्जी
ताराप्रसादः पूर्णेंदू मुखर्जी
हरसुंदरी: करुणा बॅनर्जी
छोटू: अर्पण चौधुरी

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३

इकडे एरवी या सगळ्या प्रकाराबद्दल केवळ कंटाळ्याची भावना असणार्‍या दयाच्या चेहर्‍यावर प्रथमच साशंक भाव येतो. (पुढे चालू)

हा प्रकार थांबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून उमाप्रसादने दयाला आपल्याबरोबर कलकत्त्याला नेण्याचा निर्णय घेतला आहे. कालिबाबूंच्या उपस्थितीत जाणे शक्य नसल्याने उत्तररात्री निघण्याचे ठरवून त्यासाठी त्याने बोटीची सोयही करून ठेवली आहे. पतीबरोबर जायला मिळणार या आनंदात दयाच्या चेहर्‍यावर स्मित उमटते. रात्री ते दोघे घाईघाईने नदीकिनार्‍याकडे येत असता ती अचानक थांबते. त्याला कळत नाही की ती का थांबलीये. तो तिला घाईने पाऊल उचलायला सांगतो आहे. पण ती स्तब्धच. अचानक नजर उचलून ती म्हणते ’पण माझ्यात जर खरंच देवीचा अंश असेल तर... तर मग माझ्या असे निघून जाण्याने माझे निहित कार्य मी टाळल्यासारखे होईल. त्यामुळे तुमच्यावर, आपल्या घरावर देवीचा कोप होईल.’ तो परोपरीने समजावू पाहतोय, पण ती म्हणते ’तो मुलगा केवळ तीर्थाने बरा कसा झाला हे खरेच ना?’. खरेतर तिला आपण देवीचा अवतार असण्याबद्दल किंवा आपल्यामधे देवीचा अंश असण्याबद्दल अजूनही खात्री नाही. परंतु आता तिच्या मनात संभ्रम आहे की कदाचित तसे असूही शकेल आणि भीतीही आहे की जर तसे असेल तर देवीने नेमून दिलेल्या कामात कुचराई केली म्हणून देवीचा कोप होऊ शकेल. अखेर संभ्रम आणि भीतीचा विजय होतो. उमाप्रसाद तिला घेऊन घरी परततो.

श्रद्धेचा उगम - आणि प्रसार - हा असा संभ्रम आणि भीतीपोटीसुद्धा होऊ शकतो.

आणखी एक सकाळ होते. ज्याचा मुलगा देवीने बरा केला होता तो नेहमीप्रमाणे हवेलीच्या पायरीवर बसून देवीस्तवन गातो आहे. भक्तांची गर्दी वाढू लागलीय. हवेलीसमोर भक्तांची रांग दिसते. कॅमेरा त्या रांगेचा वेध घेत पुढे सरकतो नि दाखवू लागतो समोरच्या माळावरून पुढे सरकणारी भक्तांची रांग, दूरपर्यंत गेलेली. रांगेत दिसते एक जराजर्जर वृद्धा, काठीचा आधार घेत कष्टाने एकएक पाऊल टाकत देवीच्या दर्शनाला जाणारी, तिच्या मागे आहे एक माता आपल्या मुडदुशी पोराला देवीच्या पायावर घालण्यासाठी घेऊन चाललेली, त्यांच्या मागे अशाच हीन दीन भक्तांचा जमाव, देवीच्या स्पर्शाने आपले दुरित हरावे अशी इच्छा घेऊन आलेला. एकुणच देवीच्या पंचक्रोशीत पसरलेल्या कीर्तीची व्याप्ती दाखविणारा.

घराबाहेर देवीची कीर्ती अशी वाढत असताना इकडे घरातही बराच बदल घडून आले आहेत. आता दया तिच्या उपासनेच्या कलावधीव्यतिरिक्त बहुतेक वेळ तिच्या तळमजल्यावरील खोलीत आराम करताना दिसते. एकदा अशीच ती आपल्या खोलीत पलंगावर पडून आराम करते आहे. बाहेर छोटू चेंडू खेळतो आहे. त्याचे खिदळणे दयाला ऐकू येते आहे. ती देवीचा अवतार आहे हे जाहीर झाल्यापासून तिला छोटूसाठी वेळ देणे अवघड झाले आहे. बाहेर एकटे खेळत असतानाही तो खिदळतो आहे. त्यावरून तिच्याशिवाय जगणे त्याच्या अंगवळणी पडले असावे असे दिसते. तिच्या मुद्रेवर खिन्नता दाटून येते. खेळता खेळता छोटूचा चेंडू तिच्या खोलीत येतो, चेंडूमागे धावत आलेला छोटू दाराशी थबकतो. कदाचित काकीमाँच्या खोलीत जायला त्याला मनाई असावी. पलंगावर पडलेली ती त्याला पाहून हसते. मानेनेच इशारा करून त्याला आत बोलावते. क्षणभर विचार करून छोटू धावत आत येतो आणि चेंडू उचलून धावत निघूनही जातो. तिला जाणवते की आयुष्यातील कोवळीक जपणारा हा लहानसा तुकडा देखील तिच्याकडून हिरावून घेतला गेला आहे. ते तुटलेपण जाणवून ती पुन्हा खिन्न होऊन पुन्हा भिंतीकडे मान वळवते. समोर दिसतो ’देवी’च्या गळ्यातून काढून ठेवलेला फुलांचा हार, तिच्या आयुष्यातील ओलाव्याप्रमाणेच आता सुकून गेलेला.

आता तिला आठवतो तिच्या लग्नाचा प्रसंग, अधोवदन उभ्या असलेल्या तिला बोलते करण्याचा त्याचा प्रयत्न, तिला आठवते शर्टचे बटण अडकल्याचा बहाणा करून तिला मिठीत घेण्याची धडपड. हे सारे सारे आता तिला परके होऊन गेलेले. ती खंतावते, अश्रू ढाळते मग त्याची पत्रे काढून त्याच्या आधारे तो भूतकाळ पुन्हा जगू पाहते. त्या भूतकाळाचा आणखी एक तुकडा सांधून घेण्यासाठी जेव्हा ती तिच्या लाडक्या पोपटाकडे जाते, त्याच्याशी पूर्वीप्रमाणे संवाद साधू पाहते तेव्हा पूर्वीप्रमाणे खाण्याबद्दल हट्ट करण्याऐवजी तो ही तिला माँ माँ अशी हाक मारत रहातो. पुन्हा एकवार तिच्या चेहर्‍यावर वेदना उमटते. मग ती ही हळूहळू त्याच्यापासून दूर निघून जाते.

(क्रमशः)

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २

या स्वप्नाआधारे चित्रपट एक निर्णायक वळण घेतो, किंवा इथेच खर्‍या अर्थाने चालू होतो म्हटले तरी चालेल. (पुढे चालू)

कालिबाबू आत्यंतिक श्रद्धाळू आहेत. गेली चाळीसएक वर्षे ते देवीची आराधना करताहेत. तिच्याच कृपेने घराची भरभराट झाली आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. या पारलौकिक श्रद्धेबरोबरच त्यांची आपल्या धाकट्या सुनेवरही श्रद्धा आहे. या घराचे सगळे चांगले होते ते तिच्या पायगुणाने किंवा खरेतर हातगुणाने. त्यामुळे कदाचित अर्धजागृत अवस्थेत त्यांच्या अबोध मनाने या दोन्ही प्रतिमा त्यांना एकामागोमाग दाखविल्या असाव्यात. पण आत्यंतिक श्रद्धेपोटी कालिबाबू यातून भलताच अर्थ काढतात. त्यांना वाटते की देवीनेच त्यांना दृष्टांत दिला आहे आणि ह्या देवीनेच आपल्या सुनेच्या रुपात अवतार घेतला आहेत. स्वप्नात जे पाहिले त्याने भारावलेले कालीबाबू उठून ’माँ’ ’माँ’ अशा हाका मारत तिच्या खोलीकडे धावतात. भर रात्री त्यांच्या हाका ऐकून बाहेर आलेल्या दयामयीच्या पायावर डोके ठेवतात. ती हतबुद्ध. त्यांच्या हा ऐकून बाहेर आलेल्या त्यांच्या थोरल्या मुलाला - तरपदाला - या प्रकाराचा अर्थच लागत नाही. तेव्हा त्या कालिबाबू आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात नि तिच्या पायावर डोके ठेवायला सांगतात. क्षणभर भांबावलेला तो निमूटपणे तिच्या पायावर डोके ठेवतो. पलिकडे आपल्या खोलीच्या दारात उभी असलेली त्याची पत्नी झाल्या प्रकाराने स्तंभित आणि क्षुब्ध झालेली. इथे सुरवात होते दयामयीच्या नव्या आय़ुष्याची, माणूसपण नाकारून देवत्वाची झूल पांघरून जगण्य़ाची.

इथे जाता जाता तरपदाबद्दल सांगितले पाहिजे. कालिबाबूंच्या थोरल्या मुलाला स्वतंत्र अस्तित्वच नाही. तो पोटापाण्याचा वा हौसेचा कोणता व्यवसाय करतो याबद्दल चित्रपटात काहीच उल्लेख नाही. बहुधा वडिलांची जमीनदारी सांभाळणे हेच त्याचे काम असावे. तसेच धाकट्या सुनेने सासर्‍याची मर्जी संपादन केल्याने त्याच्या पत्नीकरवी काही स्थान निर्माण होण्याची शक्यताही मावळलेली. अशा स्थितीत वडिलांच्या पैशावर जगत असल्याने त्यांच्या म्हणण्यापुढे मान तुकविण्याशिवाय पर्यायच नाही. दयाच्या पायावर डोके ठेवल्याने संतप्त झालेल्या पत्नीला तो सांगतो. की हे घर त्यांचे, जमीनदारी त्यांची, पैसा त्यांचा असल्याने मर्जी चालणार ती त्यांची. त्याविरुद्ध जाण्याचे धाडस माझ्यात नाही.

आता सासरा आपल्य सुनेचे देवीपण जाहीर करतो. तिची पूजाअर्चा/आरती, अनुष्ठाने वगैरे सुरू होतात. आता रोजच तिचे ’भक्त’ जमू लागतात. सकाळ संध्याकाळ देवीचे दर्शन, पूजाअर्चा, पाद्यपूजा इ. चालू होते. सततच्या दगदगीने तिने थकून जाऊ नये म्हणून तिच्या पहिल्या मजल्यावरील खोलीऐवजी तळ्मजल्यावरील एक खोली तिला देण्यात येते. एकंदरित रागरंग पाहून दयाची जाऊ उमाप्रसादला पत्र टाकून बोलावून घेते.

यानंतरचा प्रसंग अतिशय महत्वाचा. दयाच्या घरी दररोज पहाटे एक भिकारी येऊन देवीस्तुती गात असतो. या भिकार्‍याचा चार-पाच वर्षांचा मुलगा आठवडाभर आजारी आहे. किरकोळ उपचार करून झाले आहे. हताश होऊन तो ’देवी’च्या पायाशी येतो. कालिबाबू प्रथम त्याच्या मुलाची नाडी पाहतात नि सगळे काही ठीक होईल असा विश्वास देतात. [हा प्रसंग काही सुचविणार असावा, कदाचित कालिबाबूंना वैद्यक व्यवसायाचे ज्ञान असावे असे आधी वाटले. पण पुढील चित्रपट पाहता तसे नसावे.] त्या मुलाला देवीच्या पायावर घालून देवीचे तीर्थ (दूध, फुले इ. नी पादप्रक्षालन केल्यानंतर जमा झालेले पाणी) थेंब थेंब त्या मुलाच्या तोंडात घालायला सांगतात. इकडे जावेचे पत्र मिळाल्याने तातडीने निघालेला उमाप्रसाद हवेलीच्या दाराशी येऊन पोचलाय. त्याला समोर दिसते ती त्याची पत्नी, पुष्पमालांनी सजविलेली, पायाशी बसलेले तिचे भक्त आणि तिच्या समोर जमिनीवर निजवलेला तो मुलगा. हे दृष्य पाहून तो थिजून जातो. दाराशी चाहूल लागल्याने ती नजर तिकडे वळवते आणि त्याला पाहून तिचा चेहरा उजळतो आणि दुसर्‍याच क्षणी डोळ्यात अश्रू.

पुढचे मिनिटभर दोघे नजरेनेच बोलतात. इथे दोघांकडून अप्रतिम मुद्राभिनयाचे दर्शन घडते. प्रथम त्याच्या चेहर्‍यावर दिसते ते प्रश्नचिन्ह, हे सगळे काय चालले आहे असा शंकित भाव, चेहर्‍यावरचे - त्याला पाहून आलेले - स्मित मावळून त्याची नजर टाळू पाहणारी ती. तिच्या या वागण्याने बुचकळ्यात पडलेला तो, दुसर्‍याच क्षणी त्याच्या नजरेला नजर देऊन मूक याचना करणारी आणि आपली हताशा दर्शविणारी ती. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात फुललेला तो अंगार आणि या सगळ्या प्रकाराची चीड. हा संपूर्ण प्रसंग जेमतेम एक मिनिटभराचा, पण मनावर खोल कोरला जाणारा. याची कल्पना करावी फक्त रे बाबूंनीच. अर्थात त्या कल्पनेला उचलून धरणारे सशक्त अभिनेते त्यांना मिळाले हे ही तितकेच खरे.

संतापलेला उमाप्रसाद तातडीने आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांच्याशी वाद घालू पाहतो. केवळ स्वप्न हा दयाच्या देवीपणाचा पुरावा कसा आणि गेले तीन वर्षे मी जे संसारसुख भोगले ते काय खोटे, तिच्या माणूसपणाची मला पटलेली साक्ष काय खोटी असा प्रश्न विचारतो. वडील परंपरेचा, दार्शनिकतेचा आधार घेतात, मी खोटे का बोलेन असा भावनिक प्रश्नही करतात. यांचा असा वाद चालू असतानाच तिकडे तो आजारी मुलगा शुद्धीवर येतो. देवीच्या नावाच्या जयजयकार होतो. अशा स्थितीत वाद पुढे चालू ठेवणे उमाप्रसादला शक्यच नसते.

इकडे एरवी या सगळ्या प्रकाराबद्दल केवळ कंटाळ्याची भावना असणार्‍या दयाच्या चेहर्‍यावर प्रथमच साशंक भाव येतो.

(क्रमशः)

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १

मागील शनिवारी NFAI च्या फिल्म क्लबमधे सत्यजित रेंचा ’देवी’ पाहिला. हा रेंचा तुलनेने कमी प्रसिद्धी मिळालेला चित्रपट, कोणाला ठाऊक असेलच तर तो त्यात प्रमुख भूमिका केलेल्या शर्मिला टागोरमुळे. एरवी पाथेर पांचाली, चारुलता, अभिजान वगैरेंच्या तुलनेत तसा बाजूला पडलेला. एखादा युरोपियन चित्रपट पाह्यला मिळेल अशी आशा असताना अचानक आपल्या मातीतील हा चित्रपट पहायला मिळाला आणि त्या अनुभवातून सुन्न होऊन बाहेर आलो. किती तरी वेळ त्यातून बाहेरच येता येईना. अंधश्रद्धा, बुवाबाजी इ. विषयांवरील अनेक भडक चित्रपट पाहण्यात आले आहेत. पण आत्यंतिक श्रद्धेतून झालेले स्त्रीचे दैवतीकरण आणि त्यातून ओढवलेला तिचा अंत हा अतिशय चटका लावून जाणारा अनुभव होता.

चित्रपटाच्या सुरवातीलाच एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा अनलंकृत पुतळा दिसतो. प्रथम त्याचे रेखीव डोळे अधोरेखित केले जातात, मग त्याच्या भालप्रदेशावर उमटतो एक बाण. हळूहळू देवीचे रूप साकार होऊ लागते. मग दिसते संपूर्ण देवी, सालंकृत सजवलेली अशी. आता कॅमेरा हळूहळू पॅन होत मागे येतो आणि आजूबाजूचे दृष्य दिसते. एका विशाल हवेलीमध्ये अनेक लोक जमले आहेत, दुर्गापूजा चालू आहेत. उच्चरवाने सर्व लोक देवीची आरती म्हणताहेत. या सर्व गर्दीच्या सर्वात पुढे नम्रपणे हात जोडून उभे आहेत त्या हवेलीचे मालक, चंडीपूरचे जमीनदार कालिकिंकर राय. आरतीचा सूर टिपेला पोहोचला आहे आणि इकडे मातेला बळी देण्यासाठी सज्ज असलेला डोंब आपले खड्ग उंचावतो आणि वेगाने खाली आणतो. तेवढ्यात बाहेर शोभेचे दारूकाम चालू होते. आकाशात नळे-चंद्रज्योती फुटताहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर ’काका’ अशी हा ऐकू येते. आता पडद्यावर दिसतो उमाप्रसाद - कालिबाबूंचा धाकटा मुलगा - त्याच्या खांद्यावर बसलेला आहे तो खोका - म्हणजे छोटू- त्याच्या मोठ्या भावाचा - तरपदा याचा - मुलगा. आपल्या पुतण्याला फटाक्यांची आरास दाखवायला उमाप्रसाद घेऊन आला आहे, सोबत आहे त्याची पत्नि दयामयी (शर्मिला टागोर). रोषणाई पहात असताना उमाप्रसाद हळूच दयाकडे एक कटाक्ष टाकतो, ती ही सलज्ज हसून त्याला प्रतिसाद देते. या एका कटाक्षातून त्यांचे परस्परांबद्दलचे प्रेम रेबाबू दाखवून देतात. कॅमेरा पुन्हा फिरतो. आता देवीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुर्गेच्या जयजयकार करीत सर्व मूर्ती एकएक करून विसर्जित केल्या जात आहेत. सुमारे पाच मिनिटाचा हा पहिला प्रसंग पुढे घडणार्‍या कथावस्तूचा आधार स्पष्ट करून ठेवतो.

यानंतर दिसतात उमाप्रसाद आणि दयामयी. दुर्गापूजेला सुटीवर आलेला उमाप्रसाद आता परत निघालेला आहे. स्वत:च्या कलकत्त्याचा पत्ता लिहिलेल्या लिफाफ्यांचा एक गट्ठाच तो तिच्या हवाली करतोय आणि रोज पत्र पाठवण्याबद्दल बजावतोय. ती - अर्थातच रुसलेली - अनेक कारणे पुढे करते आहे. ती विचारते की जर लिहिण्यासारखे काही घडलेच नसेल तर काय लिहू? तो म्हणतो मग तसेच - म्हणजे विशेष घडले नाही - असे लिहून कळव. पण पुढे जेव्हा लिहिण्याइतके महत्त्वाचे काही घडते तेव्हा तिला आपल्या जावेकडून ते कळविण्याची व्यवस्था करावी लागते.

उमाप्रसाद हा कालिबाबूंचा धाकटा मुलगा, कलकत्त्याला राहून शिक्षण घेत असलेला, कालिबाबूंच्या भाषेत नास्तिक पण खरेतर बुद्धिवादी म्हणावा असा. इंग्रजी शिकून उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याची उमेद बाळगणार्‍या तत्कालिन भद्रसमाजातील तरुणांचा प्रतिनिधी. दयामयी त्याला विचारते की इंग्रजी शिक्षण घ्यायचे, का तर चाकरी मिळवायची म्हणून आणि चाकरी मिळवायची ती पैसे मिळवायचे म्हणून. पण तुमच्या वडिलांकडे तर भरपूर पैसे आहेत, मग तुम्हाला हे इंग्रजी शिक्षण कशाला? ही बंगाली समाजातील साधीसुधी मुलगी. वयात येताच लग्न होऊन कालिबाबूंच्या घरात आलेली. बाहेरील जगाचा वारासुद्धा तिला लागलेला नाही. इतके स्थिरस्थावर असलेले घर सोडून विलायतेस जाण्याचे नवर्‍याचे स्वप्न तिला समजू शकत नाही. तो तिला तू माझ्याबरोबर येशील का असे विचारतो तेव्हा ती कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणे ताबडतोब उत्तर देते ’तुम्ही न्याल तिकडे मी येईन’. पण दुसर्‍याच क्षणी ती विचारते की पण मग तुमच्या वडिलांचे काय होईल? ते माझ्याशिवाय कसे राहू शकतील? आणि ते विलायतेस जायला परवानगी देतील? आणि छोटूसुद्धा माझ्याशिवाय कसा राहील?

या दोन प्रश्नातच तिचे घरातील स्थान काय आहे ते स्पष्ट होते. तिचा सासरा घरात तिच्यावर पूर्ण अवलंबून आहे. तो तिला खूप मान देतो. काही काळापूर्वी विकलांग अवस्थेत पडलेला असतानाच पत्निवियोगाचे दु:ख पदरी आल्याने आत्महत्येचा विचार करणार्‍या कालिबाबूंना या नव्या सुनेने सावरले. त्यांची मनोभावे सेवाशुश्रुषा केली आणि त्यांचे आरोग्य तर सुधारलेच पण कर्त्या स्त्रीविना पोरके झालेल घरही तिने तोलून धरले आहे. कालिबाबू तिला ’माँ’ अशी हाक मारतात नि स्वत:चा उल्लेख तिचे म्हातारे मूल असा करतात. अगदी घरातल्या पोपटानेसुद्धा डाळ-दाणे खावे तर छोट्या बहूच्या हातूनच. त्याचे मालक तिला ’माँ’ म्हणतात म्हणून तो ही तिला तशीच हाक मारतो. तर दुसर्‍या बाजूला तिच्या मोठ्या जावेचा मुलगा छोटू (बंगाली घरात बहुधा बडे, मंजे आणि खोका म्हणजे मोठा, मधला आणि छोटा अशी हाक मारण्याची नावे असतात. पण इथे घरातला सर्वात लहान म्हणून खोका) याचाही तिला लळा आहे, तो इतका की कधीकधी त्याच्या आईलाही याचा हेवा वाटावा. छोटू इतका बेरकी की आईने धपाटा घालून झोपवले नि आई कामाला बाहेर पडली की उशी उचलून याने सरळ ’काकीमाँ’ कडे पळ काढावा. मग सासर्याच्या औषधपाण्याची काळजी घेऊन परतलेल्या काकीमाँकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरावा. मग ती विचारते की कोणती गोष्ट सांगू, तर तो सांगतो ’ती मुलांचे मांस खाणार्‍या चेटकीणीची सांग’. ती गोष्ट सांगू लागते. इथे हवेलीचा दिवस संपतो.

इथे मी चरकलो, हे काय आहे. ही असली बीभत्स/क्रूर कथानकाची गोष्ट ती का सांगते आहे त्याला? त्याला त्यातील फॅंटसी आवडत असेल कदाचित, पण नेहमीच्या पर्‍यांच्या, जादूच्या गोष्टी सांगायच्या सोडून तिने अशी गोष्ट का सांगावी? त्याहून पुढचा प्रश्न म्हणजे रे बाबूंनी ही अशी गोष्ट का निवडली असेल? चित्रपट संपता संपता मला या गोष्टीचा उलगडा झाला. या कथेचा सांधा पुढे जोडून घेतल्यासारखा वाटला. अर्थात इथे या प्रतीकात्मतेच्या मोहात रे बाबूंनी पडायला नको होते असे वाटले.

असाच एक दिवस संपवून कालिबाबू झोपायला जातात. झोप नीटशी येत नाही, जरा चाळवलेलीच. अशा अर्धनिद्रित अवस्थेत त्यांना एक स्वप्न पडते. स्वप्नात त्यांना दिसते देवी, म्हणजे खरेतर तिचे डोळे आणि तिच्या भालप्रदेशावरील तो बाण. हळूहळू ते डोळे सजीव होऊ लागतात, डोळ्यांची सीमारेषा पुसट होत जाते आणि दिसतात ते दयामयीचे डोळे. नंतर बाण नाहीसा होऊन दिसते तिच सौभाग्यलेणे. हळूहळू तिचा पूर्ण चेहरा दृष्यमान होतो. कालिबाबू दचकून जागे होतात.

या स्वप्नाआधारे चित्रपट एक निर्णायक वळण घेतो, किंवा इथेच खर्‍या अर्थाने चालू होतो म्हटले तरी चालेल.

(क्रमशः)

लिहिन म्हणतोय एक कविता...

जालावरच्या चंद्राच्या, ढगांच्या, त्याच्या/तिच्या, पाना-फुलांच्या, आईच्या थोरवीच्या, विरहाच्या/प्रेमाच्या, त्यागाबिगाच्या शाळकरी कविता वाचून आम्ही लै म्हणजे लैच वैतागलो होतो. एकदोन ठिकाणी त्याची चेष्टा केल्यावर आम्हाला च्यालेंज कम विचारणा झाली की मग तुम्हाला काय पाहिजे कवितेमधे. आता कवितेबद्दल लिहायचे तर लेखात लिहून चालणार नाही, त्याला कविताच लिहायला पाहिजे. मग आम्ही जालीय कवितेत दिसणारे वर्ण्यविषय - जिथे सामान्यपणे कवि थांबतात - नि त्यांच्या विस्तारातून पुढे जाऊन जिथे पोचणे शक्य आहे असे विषय यावर एक कविताच लिहीली. मग लक्षात आले अरे देवा, आपलेही पाय मातीचेच. पण आता काळंबेंद्र असलं तरी आपलंच पोर ते, आपल्याला चांगले म्हटलेच पाहिजे. तर ती ही कविता.

पहिल्या दोन ओळीत जालीय कवितात आढळणारे वर्ण्यविषय, नि तिसर्‍यात ओळीत हे विषय आणखी पुढे नेऊन कुठवर भिडविता येतील असे काही - सुचवलेले -विषय अशी ढोबळमानाने रचना आहे.
_________________________________________________________________________________लिहिन म्हणतोय एक कविता...


तळपणार्‍या सूर्याची, शांत-शीतल चंद्राची
भुरभुरणार्‍या पावसाची, भिजणार्‍या पक्ष्यांची
हरवलेल्या वाटेची, वाटेवरल्या काट्यांची आणि काट्यांमधे सुरक्षित फुलांचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...


प्राण्यांची, पक्ष्यांची, कोसळणार्‍या प्रपातांची
डुलणार्‍या झाडांची, झाडांच्या सावल्यांची
सावलीतल्या वाटसराची, वाटसराच्या श्रांत पायांची आणि पायातील विदीर्ण भेगांचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...

एक कविता तिची, एक कविता त्याची
एक कविता दोघांची, दोघांच्या प्रेमाची
प्रेमातील हळवेपणाची, हळवेपणातील रुसव्याची आणि रुसव्यातील ओलाव्याचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...

एक कविता दुराव्याची, एक कविता ओलाव्याची
एक कविता सुखाची, एक कविता दु:खाची
सुखदु:खाच्या नात्याची, नात्यामधल्या गुंत्याची आणि गुंत्यामधल्या स्नेहाचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...

एक कविता विद्रोहाची, एक त्यातील अंगाराची
एक कविता जाळणारी, एक कविता पोळणारी
पोळण्यातल्या घावांची, घावांच्या वेदनेची आणि त्यावरल्या फुंकरीचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...

कविता निवडक शब्दांची, उपमांची, उत्प्रेक्षांची
विशेषणांच्या खैरातीची, गुळगुळीत कल्पनांची
कल्पनेच्या विस्ताराची, विस्ताराच्या भासाची आणि भासातील संतुष्टतेचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...

आणिन काही शब्द ताजे, काही नवे काही जुने
काही वृत्ते, काही अलंकार, यमकांची शब्दफुले
शब्दफुलांच्या हारांची, जमून आलेल्या सुरांची आणि न जमलेल्या कवितेचीही

लिहिन म्हणतोय एक कविता...

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

विठ्ठलाच्या स्त्रिया

(एका संस्थळावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने हा विषय पुन्हा समोर आला.)

विठोबा-रखुमाईचा गजर करणार्‍या महाराष्ट्रदेशी विठोबाच्या स्त्रिया हा विषय कदाचित आश्चर्यकारक वाटेल. पण लोकपरंपरेला तो तसा मुळीच नाही. आपल्या लाडक्या विठोबाचे नाव या ना त्या प्रकारे अनेक जणींशी जोडले गेले आहे. त्यात त्याची राणी रुक्मिणी तर आहेच, पण अभिजात परंपरेबाहेर त्याच्या पदुबाई उर्फ पद्मावती, तुळशीबाई या अन्य पत्नी तर आहेतच पण जनी सारखी साधीसुधी स्त्री सुद्धा आहे. इरावती कर्वेंसारखी एखादी विदुषी त्याला बॉयफ्रेंड म्हणून त्याच्याशी आधुनिक नातेही जोडू पाहते. यामुळे या विठोबाच्या स्त्रिया हा हा विषय दुर्गा भागवत, इरावती कर्वे आणि अरुणा ढेरे या तीन विदुषींच्या लिखाणाआधारे इथे मांडला आहे. (बरेचसे त्यांचे लिखाण जसेच्या तसे उद्धृत केले आहे, माझा सहभाग संपादक म्हणून.)

एका कथेनुसार विठोबा हा माळशिरसचा राजा, खंडोबाचा (ज्याच्या पुन्हा दोन बायका आहेत म्हाळसा नी बानू) मांडलिक. त्याची बायको पदुबाई (म्हणजे पद्मावती). एकदा विठोबाच्या एका भक्ताचा आदरसत्कार तिने जाणूनबुजून केला नाही असा गैरसमज झाल्याने विठोबाने तिला शाप दिला (तो शाप फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, पण विषयांतर नको म्हणून सोडून देऊ) त्यामुळे ती भ्रमिष्ट झाली आणि मरण पावली. इथे एक विचित्र संदर्भ आहे. विठोबाने कोणालाही तिच्या मृतदेहाला स्पर्श करू दिला नाही आणि घारी गिधाडांकरवी त्याची विल्हेवाट लावली. नंतर पावसाला बोलावून तिची हाडे समुद्रात वाहविली. पण ज्या भक्तासाठी हे घडले त्या भक्ताने थोर तप केले आणि समुद्राकडून ती हाडे परत मिळविली आणि पद्माळ्यात विसर्जित केली. अर्थात नंतर विठोबाला पश्चात्ताप झाला आणि तो ही भ्रमिष्टावस्थेत फिरत असताना पंढरपूरच्या पद्माळ्यात त्याला एक सुंदर कमळ दिसलं, ते खुडताच त्यातून पदुबाई साकार उभी राहिली. अर्थात विठोबाने तिच्याशी संसार करणार नाही अशी आण घेतली असल्याने तिला स्वतंत्र मंदिरात संसार थाटावा लागला.

तसा विठोबा हा मूळचा दक्षिणेकडिल, पण तो पंढरपुरात राहिला तो पुंडलिकामुळे असे संतपरंपरा सांगते. परंतु धनगर म्हणतात तो आला पदुबाईमुळे. किंबहुना पदुबाई ही मूळची राणी नि रुक्मिणी ही तिची छाया (किंवा पदुबाई हीच पुनर्जात रूपात रूक्मिणी) अशीही त्यांच्यात समजूत आहे. लोकधारणा आणि अभिजात संकल्पनेची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असू शकेल. किंवा अवैदिक विठोबाचे वैदिकीकरण होताना हा बदल झाला असेल.

अशीच कथा तुळशीची. ही कथा कुणबी परंपरेतील. एका दरिद्री ब्राह्मणाची काळी मुलगी, तिला वर मिळणार नाही असे भविष्य होते म्हणून बापाने तिला वाऱ्यावर सोडले. विठोबाने तिला आश्रय दिला. पण रुक्मिणीने मत्सरग्रस्त होऊन काही कारस्थान केले म्हणून ती जमिनीत गडप झाली. परंतु ती गडप होत असताना विठोबाने तिला केस धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर एक सावळे झाड वर आले. विठोबाच्या हातात मंजिऱ्या होत्या. मानवी तुळशीला दिलेले लग्नाचे वचन त्या झाडाशी लग्न करून विठोबाने पुरे केले. हा देव तसा अन्य गृहस्थधर्माला जागणारा आहे. तो कधीकधी भक्तांकडे चहापाण्यालाही जातो. मग त्याचा पाहुणचार केला जातो. मग रुक्मिणीला साडी-चोळी मिळते तर सत्यभामेला चोळीसाठी दोरव्याचे कापड. पण विट्ठलाला काय द्यायचे?

रुख्माईला साडी-चोळी, सत्यभामेला दोरवा ।
विठ्ठल देवराया, तुळशीबाईचा गारवा ॥

तुळशीबाईशीसे त्याचे -विवाहबाह्य का असेना - असलेले नाजूक नाते भक्तांनाही माहित आहे. म्हणून ते देवाची तुळसाबाईशी गाठ घालून देतात.

अरूणा ढेरेंच्या 'ओव्यांमधली रुक्मिणी या लेखात तर त्यांनी विठोबाच्या अन्य स्त्रियांमुळे रुसलेल्या रुक्मिणीच्या काही ओव्याच उधृत केल्या आहेत. त्यातील एक दोन इथे देतो. इथे विठोबा हा मूळ कृष्णाचा अवतार असल्याचा संदर्भ अधिक ठळक होतो. इथे रुक्मिणी नाराज आहे ते विठोबाच्या राधेशी असलेल्या संबंधांबद्दल. त्याबद्दल आयाबाया दळताना म्हणतात:


राणी रुक्मिणी परीस राधिकेला रूप भारी
सावळा पांडुरंग नित उभा तिच्या दारी

अर्थात रुक्मिणी यामुळे त्या द्वारकेच्या राण्यावर रुसली आहे.

थोरली रुकमिण जशी नागीन तापली ।
देवाच्या मांडिवर तिने राहीला* देखली ॥
(* राधेला)

इथे रुक्मिणी ही गृहकृत्यदक्ष गृहिणी आहे. ती घरची नेहेमीची कामे तर करतेच, पण विठोबाच्या भक्तांसाठी बुक्का दळून ठेवते. त्यांच्या भक्तांची, नातेवाईकांची उस्तवार करते.


द्रौपदीने दिले घोडे पांडुरंगाहाती ।
नणंदेच्या नात्यानं रखुमाय पाय धुती ॥

असं असलं तरी विठोबा तिचा एकटीचा नाही. त्यामुळे ती विचारते:

इट्ठलाच्या पाया रखुमाई लोणी लावी ।
देवाला इचारती, 'जनी तुमाला कोण व्हवी' ॥

ही जनी - जनाबाई - विट्ठलाची लाडकी आहे. म्हणून असं म्हटले आहे:

रखुमाईच्या पलंगाला गाद्या गिरद्या बख्खळ ।
देवाला आवडती जनाबाईची वाकळ ॥

क्वचित कधी थोडी अधिक धीट होऊन रखुमाई पुसते:

रुक्मिण पुशिते, देव व्हते कुठं राती ।
शेल्याला डाग पडे, तुळशीची काळी माती ॥

रुक्मिण पुशिते, कुठं व्हते सारा वेळ ।
शेल्याला लागलं कुण्या नारीचं काजळ? ॥

पण विठोबा चतुर आहे, हरप्रयत्नाने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुक्मिणीला तो काहीच उत्तर देत नाही. इथे अरुणाबाईंनी रुक्मिणीविषयी एक अतिशय हृद्य वाक्य लिहिले आहे. त्या म्हणतात रुक्मिणीला सर्व काही कळले होते पण 'कळण्यानं दु:ख मिळतं, परिस्थिती बदलंत नाही हे ही तिला कळलं होतं'. अतिशय चटका लावणारं हे मूल्यमापन सर्व भारतीय स्त्रियांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

साऱ्या संतपरंपरेने मात्र विठोबाचा राजेपणा मोडला आणि त्याला आपल्यात ओढला. तो ही त्यांच्या प्रेमाने बांधला गेला. अनेक मार्गाने त्याने सर्वांच्या सुखदू:खात त्यांची सोबत केली. एखादी बाई दळिताकांडिता त्याला विचारत राहिली:

जिवाचं सुखदुक तुला सांगते विट्ठला।
माज्या पंढरीच्या हरी, कधी भेटशील एकला ॥

आणि तो तिला भेटत राहिला वास्तपुस्त करीत राहिला. म्हणून तर आपण त्याने रुक्मिणीवर केलेल्या अन्यायाची आठवण विसरू शकतो.

जनीशी विठ्ठलाचे सर्वात जवळचे नाते आहे.


माय गेली बाप मेला
आता सांभाळी विट्ठला
मी तुझे गा लेकरू
नको मजसी अव्हेरू

अशी विनवणी करणाऱ्या जनीला या दासीला त्याने सर्वस्वाने आपले म्हटले आहे. इतर कोणासाठी नाही, पण जनीसाठी विठोबा राबला आहे. जनीने झाडलोट केली की याने केर भरावा, दूर टाकावा, तिने साळी कांडायला काढल्या की याने उखळ साफ करून कांडपाला हातभार लावावा, कोंडा पाखडावा, पाणी भरावे अशी सगळी कामे विठोबाने तिच्यासाठी केली आहेत.

पण असे बापाचे नाते सांभाळणाऱ्या विठोबाला जनी कधी "अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या' असेही म्हटले आहे. क्वचित ती त्या पोरट्याला आपल्या म्हातारीची काठी असेही म्हटले आहे.

पंढरीचा विठुराया, जसा पोरगा पोटीचा
मज आधार काठीचा, म्हातारीला
विठुराया पाठीवरी, हात फिरवे मायेने
पुसे लेकाच्या परीने, बये फार भागलीस?

तर याउलट तिच्या संबंधाने रखुमाईने विठोबाची शंकाही घेतली आहे. तर जनीनेच आणखी एक पाऊल पुढे टाकून 'डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी' असे म्हणत विठोबासाठी वेसवापणही स्वीकारले आहे. जनीचे विठोबाशी असे गुंतागुंतीचे नाते आहे. ते समजण्यासाठी ढेरेबाईंचा 'डोईचा पदर... ' (पुस्तकः कवितेच्या शोधात) हा लेख मुळातून वाचायला हवा.

संदर्भः

पैस- दुर्गा भागवत
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी: पृ. २३-२४
स्त्री आणि संस्कृती - अरुणा ढेरे
आठवणीतले अंगण - अरुणा ढेरे
कवितेच्या शोधात - अरुणा ढेरे
गंगाजल - इरावती कर्वे