गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १

मागील शनिवारी NFAI च्या फिल्म क्लबमधे सत्यजित रेंचा ‘देवी’ पाहिला. रेंचा तुलनेने कमी प्रसिद्धी मिळालेला हा चित्रपट, कोणाला ठाऊक असेलच तर तो त्यात प्रमुख भूमिका केलेल्या शर्मिला टागोरमुळे. एरवी पाथेर पांचाली, चारुलता, अभिजान वगैरेंच्या तुलनेत तसा बाजूला पडलेला. एखादा युरोपियन चित्रपट पाह्यला मिळेल अशी आशा असताना अचानक आपल्या मातीतील हा चित्रपट पहायला मिळाला आणि त्या अनुभवातून सुन्न होऊन बाहेर आलो. किती तरी वेळ त्यातून बाहेरच येता येईना. अंधश्रद्धा, बुवाबाजी इ. विषयांवरील अनेक भडक चित्रपट पाहण्यात आले आहेत. पण आत्यंतिक श्रद्धेतून झालेले स्त्रीचे दैवतीकरण आणि त्यातून ओढवलेला तिचा अंत हा अतिशय चटका लावून जाणारा अनुभव होता.

---

चित्रपटाच्या सुरवातीलाच एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा अनलंकृत पुतळा दिसतो. प्रथम त्याचे रेखीव डोळे अधोरेखित केले जातात, मग त्याच्या भालप्रदेशावर उमटतो एक बाण. हळूहळू देवीचे रूप साकार होऊ लागते. मग दिसते संपूर्ण देवी, सालंकृत सजवलेली अशी. आता कॅमेरा हळूहळू मागे येतो आणि आजूबाजूचे दृष्य दिसते. एका विशाल हवेलीमध्ये अनेक लोक जमले आहेत, दुर्गापूजा चालू आहे. उच्चरवाने सर्व लोक देवीची आरती म्हणताहेत. या सर्व गर्दीच्या सर्वात पुढे नम्रपणे हात जोडून उभे आहेत त्या हवेलीचे मालक, चंडीपूरचे जमीनदार– कालिकिंकर राय. आरतीचा सूर टिपेला पोहोचला आहे आणि इकडे मातेला बळी देण्यासाठी सज्ज असलेला डोंब आपले खड्ग उंचावतो आणि वेगाने खाली आणतो. तेवढ्यात बाहेर शोभेचे दारूकाम चालू होते. आकाशात नळे-चंद्रज्योती फुटताहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर ‘काका’ अशी हा ऐकू येते.

आता पडद्यावर दिसतो उमाप्रसाद – कालिबाबूंचा धाकटा मुलगा. त्याच्या खांद्यावर बसलेला आहे तो खोका (म्हणजे छोटू), हा त्याच्या मोठ्या भावाचा– तरपदा याचा मुलगा. आपल्या पुतण्याला फटाक्यांची आरास दाखवायला उमाप्रसाद घेऊन आला आहे, सोबत आहे त्याची पत्नी, दयामयी (शर्मिला टागोर). रोषणाई पहात असताना उमाप्रसाद हळूच दयाकडे एक कटाक्ष टाकतो, ती ही सलज्ज हसून त्याला प्रतिसाद देते. या एका कटाक्षातून त्यांचे परस्परांबद्दलचे प्रेम रेबाबू दाखवून देतात. कॅमेरा पुन्हा फिरतो. आता देवीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुर्गेच्या जयजयकार करीत सर्व मूर्ती एकएक करून विसर्जित केल्या जात आहेत. सुमारे पाच मिनिटाचा हा पहिला प्रसंग पुढे घडणार्‍या कथावस्तूचा आधार स्पष्ट करून ठेवतो.

यानंतर दिसतात उमाप्रसाद आणि दयामयी. दुर्गापूजेला सुटीवर आलेला उमाप्रसाद आता परत निघालेला आहे. स्वत:च्या कलकत्त्याचा पत्ता लिहिलेल्या लिफाफ्यांचा एक गट्ठाच तो तिच्या हवाली करतोय आणि रोज पत्र पाठवण्याबद्दल बजावतोय. ती अर्थातच रुसलेली. अनेक कारणे पुढे करते आहे. ती विचारते, ‘जर लिहिण्यासारखे काही घडलेच नसेल तर काय लिहू?’ तो म्हणतो मग तसेच – म्हणजे विशेष घडले नाही – असे लिहून कळव. पण पुढे जेव्हा लिहिण्याइतके महत्त्वाचे काही घडते, तेव्हा तिला आपल्या जावेकडून ते कळविण्याची व्यवस्था करावी लागते.

उमाप्रसाद हा कालिबाबूंचा धाकटा मुलगा, कलकत्त्याला राहून शिक्षण घेत असलेला, कालिबाबूंच्या भाषेत नास्तिक– पण खरेतर बुद्धिवादी म्हणावा असा. इंग्रजी शिकून उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याची उमेद बाळगणार्‍या तत्कालिन भद्रसमाजातील तरुणांचा प्रतिनिधी. दयामयी त्याला विचारते, ‘इंग्रजी शिक्षण घ्यायचे, का तर चाकरी मिळवायची म्हणून आणि चाकरी मिळवायची ती पैसे मिळवायचे म्हणून. पण तुमच्या वडिलांकडे तर भरपूर पैसे आहेत, मग तुम्हाला हे इंग्रजी शिक्षण कशाला?’ ही बंगाली समाजातील साधीसुधी मुलगी. वयात येताच लग्न होऊन कालिबाबूंच्या घरात आलेली. बाहेरील जगाचा वारासुद्धा तिला लागलेला नाही. इतके स्थिरस्थावर असलेले घर सोडून विलायतेस जाण्याचे नवर्‍याचे स्वप्न तिला समजू शकत नाही. तो तिला ‘तू माझ्याबरोबर येशील का?’ असे विचारतो, तेव्हा ती कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणे ताबडतोब उत्तर देते ‘तुम्ही न्याल तिकडे मी येईन’. पण दुसर्‍याच क्षणी ती विचारते, ‘पण मग तुमच्या वडिलांचे काय होईल? ते माझ्याशिवाय कसे राहू शकतील? आणि ते विलायतेस जायला परवानगी देतील? आणि छोटूसुद्धा माझ्याशिवाय कसा राहील?’

या दोन प्रश्नातच तिचे घरातील स्थान काय आहे ते स्पष्ट होते. तिचा सासरा घरात तिच्यावर पूर्ण अवलंबून आहे. तो तिला खूप मान देतो. काही काळापूर्वी विकलांग अवस्थेत पडलेला असतानाच पत्निवियोगाचे दु:ख पदरी आल्याने आत्महत्येचा विचार करणार्‍या कालिबाबूंना या नव्या सुनेने सावरले. त्यांची मनोभावे सेवाशुश्रुषा केली. त्यांचे आरोग्य तर सुधारलेच पण कर्त्या स्त्रीविना पोरके झालेले घरही तिने तोलून धरले आहे. कालिबाबू तिला ‘माँ’ अशी हाक मारतात नि स्वत:चा उल्लेख ‘तिचे म्हातारे मूल’ असा करतात.

अगदी घरातल्या पोपटानेसुद्धा डाळ-दाणे खावे तर या छोट्या बहूच्या हातूनच. तिच्या मोठ्या जावेचा मुलगा छोटू (बंगाली घरात बहुधा बडे, मंजे–मंझले आणि खोका म्हणजे मोठा, मधला आणि छोटा अशी हाक मारण्याची नावे असतात. पण इथे घरातला सर्वात लहान म्हणून खोका) याचाही तिला लळा आहे, तो इतका की कधीकधी त्याच्या आईलाही याचा हेवा वाटावा. छोटू इतका बेरकी की, आईने धपाटा घालून झोपवले नि आई कामाला बाहेर पडली की उशी उचलून याने सरळ ‘काकी-माँ’ कडे पळ काढावा. मग सासर्‍याच्या औषधपाण्याची काळजी घेऊन परतलेल्या काकी-माँकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरावा.

मग ती विचारते, की ‘कोणती गोष्ट सांगू?’ तो सांगतो, ‘ती मुलांचे मांस खाणार्‍या चेटकीणीची सांग.’ ती गोष्ट सांगू लागते. इथे हवेलीचा दिवस संपतो.

इथे मी चरकलो, हे काय आहे. ही असली बीभत्स/क्रूर कथानकाची गोष्ट ती का सांगते आहे त्याला? त्याला त्यातील फँटसी आवडत असेल कदाचित, पण नेहमीच्या पर्‍यांच्या, जादूच्या गोष्टी सांगायच्या सोडून तिने अशी गोष्ट का सांगावी? त्याहून पुढचा प्रश्न म्हणजे रे-बाबूंनी ही अशी गोष्ट का निवडली असेल? चित्रपट संपता संपता मला या गोष्टीचा उलगडा झाला. या कथेचा सांधा पुढे जोडून घेतल्यासारखा वाटला. अर्थात इथे या प्रतीकात्मतेच्या मोहात रे बाबूंनी पडायला नको होते असे वाटून गेले.

असाच एक दिवस संपवून कालिबाबू झोपायला जातात. झोप नीटशी येत नाही, जरा चाळवलेलीच. अशा अर्धनिद्रित अवस्थेत त्यांना एक स्वप्न पडते. स्वप्नात त्यांना दिसते देवी, म्हणजे खरेतर तिचे डोळे आणि तिच्या भालप्रदेशावरील तो बाण. हळूहळू ते डोळे सजीव होऊ लागतात, डोळ्यांची सीमारेषा पुसट होत जाते आणि दिसतात ते दयामयीचे डोळे. नंतर बाण नाहीसा होऊन दिसते तिचे सौभाग्यलेणे. हळूहळू तिचा पूर्ण चेहरा दृष्यमान होतो. कालिबाबू दचकून जागे होतात.

या स्वप्नाआधारे चित्रपट एक निर्णायक वळण घेतो, किंवा इथेच खर्‍या अर्थाने चालू होतो म्हटले तरी चालेल.

(क्रमशः)

    << पुढील भाग


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा