गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २

<< मागील भाग

कालिबाबू आत्यंतिक श्रद्धाळू आहेत. गेली चाळीस-एक वर्षे ते देवीची आराधना करताहेत. ‘तिच्याच कृपेने घराची भरभराट झाली आहे’ अशी त्यांची श्रद्धा आहे. या पारलौकिक श्रद्धेबरोबरच त्यांची आपल्या धाकट्या सुनेवरही श्रद्धा आहे. या घराचे सगळे चांगले होते ते तिच्या पायगुणाने किंवा खरेतर हातगुणाने. त्यामुळे कदाचित अर्धजागृत अवस्थेत त्यांच्या अबोध मनाने या दोन्ही प्रतिमा त्यांना एकामागोमाग दाखविल्या असाव्यात. पण आत्यंतिक श्रद्धेपोटी कालिबाबू यातून भलताच अर्थ काढतात. त्यांना वाटते की देवीनेच त्यांना दृष्टांत दिला आहे आणि ह्या देवीनेच आपल्या सुनेच्या रुपात अवतार घेतला आहेत. स्वप्नात जे पाहिले त्याने भारावलेले कालीबाबू उठून ‘माँ’ ‘माँ’ अशा हाका मारत तिच्या खोलीकडे धावतात. भर रात्री त्यांच्या हाका ऐकून बाहेर आलेल्या दयामयीच्या पायावर डोके ठेवतात. ती हतबुद्ध.

त्यांच्या हा ऐकून बाहेर आलेल्या त्यांच्या थोरल्या मुलाला– तरपदाला या प्रकाराचा अर्थच लागत नाही. तेव्हा त्या कालिबाबू आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात नि तिच्या पायावर डोके ठेवायला सांगतात. क्षणभर भांबावलेला तो निमूटपणे तिच्या पायावर डोके ठेवतो. पलिकडे आपल्या खोलीच्या दारात उभी असलेली त्याची पत्नी झाल्या प्रकाराने स्तंभित आणि क्षुब्ध झालेली. इथे सुरवात होते दयामयीच्या नव्या आय़ुष्याची, माणूसपण नाकारून देवत्वाची झूल पांघरून जगण्य़ाची.

इथे जाता जाता तरपदाबद्दल सांगितले पाहिजे. कालिबाबूंच्या थोरल्या मुलाला स्वतंत्र अस्तित्वच नाही. तो पोटापाण्याचा वा हौसेचा कोणता व्यवसाय करतो याबद्दल चित्रपटात काहीच उल्लेख नाही. बहुधा वडिलांची जमीनदारी सांभाळणे हेच त्याचे काम असावे. तसेच धाकट्या सुनेने सासर्‍याची मर्जी संपादन केल्याने त्याच्या पत्नीकरवी काही स्थान निर्माण होण्याची शक्यताही मावळलेली. अशा स्थितीत वडिलांच्या पैशावर जगत असल्याने त्यांच्या म्हणण्यापुढे मान तुकविण्याशिवाय पर्यायच नाही. दयाच्या पायावर डोके ठेवल्याने संतप्त झालेल्या पत्नीला तो सांगतो. की हे घर त्यांचे, जमीनदारी त्यांची, पैसा त्यांचा असल्याने मर्जी चालणार ती त्यांची. त्याविरुद्ध जाण्याचे धाडस माझ्यात नाही.

आता सासरा आपल्य सुनेचे देवीपण जाहीर करतो. तिची पूजाअर्चा/आरती, अनुष्ठाने वगैरे सुरू होतात. आता रोजच तिचे ‘भक्त’ जमू लागतात. सकाळ संध्याकाळ देवीचे दर्शन, पूजाअर्चा, पाद्यपूजा इ. चालू होते. सततच्या दगदगीने तिने थकून जाऊ नये म्हणून तिच्या पहिल्या मजल्यावरील खोलीऐवजी तळमजल्यावरील एक खोली तिला देण्यात येते. एकंदरित रागरंग पाहून दयाची जाऊ उमाप्रसादला पत्र टाकून बोलावून घेते.

यानंतरचा प्रसंग अतिशय महत्वाचा. दयाच्या घरी दररोज पहाटे एक भिकारी येऊन देवीस्तुती गात असतो. या भिकार्‍याचा चार-पाच वर्षांचा मुलगा आठवडाभर आजारी आहे. किरकोळ उपचार करून झाले आहे. हताश होऊन तो ‘देवी’च्या पायाशी येतो. कालिबाबू प्रथम त्याच्या मुलाची नाडी पाहतात नि सगळे काही ठीक होईल असा विश्वास देतात. (हा प्रसंग काही सुचविणार असावा, कदाचित कालिबाबूंना वैद्यक व्यवसायाचे ज्ञान असावे असे आधी वाटले. पण पुढील चित्रपट पाहता तसे नसावे.) त्या मुलाला देवीच्या पायावर घालून देवीचे तीर्थ (दूध, फुले इ. नी पादप्रक्षालन केल्यानंतर जमा झालेले पाणी) थेंब थेंब त्या मुलाच्या तोंडात घालायला सांगतात. इकडे जावेचे पत्र मिळाल्याने तातडीने निघालेला उमाप्रसाद हवेलीच्या दाराशी येऊन पोचलाय. त्याला समोर दिसते ती त्याची पत्नी, पुष्पमालांनी सजविलेली, पायाशी बसलेले तिचे भक्त आणि तिच्या समोर जमिनीवर निजवलेला तो मुलगा. हे दृष्य पाहून तो थिजून जातो. दाराशी चाहूल लागल्याने ती नजर तिकडे वळवते. त्याला पाहून तिचा चेहरा उजळतो आणि दुसर्‍याच क्षणी डोळ्यात अश्रू.

पुढचे मिनिटभर दोघे नजरेनेच बोलतात. इथे दोघांकडून अप्रतिम मुद्राभिनयाचे दर्शन घडते. प्रथम त्याच्या चेहर्‍यावर दिसते ते प्रश्नचिन्ह, हे सगळे काय चालले आहे असा शंकित भाव, चेहर्‍यावरचे– त्याला पाहून आलेले स्मित मावळून त्याची नजर टाळू पाहणारी ती. तिच्या या वागण्याने बुचकळ्यात पडलेला तो, दुसर्‍याच क्षणी त्याच्या नजरेला नजर देऊन मूक याचना करणारी आणि आपली हताशा दर्शविणारी ती. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात फुललेला तो अंगार आणि या सगळ्या प्रकाराची चीड. हा संपूर्ण प्रसंग जेमतेम एक मिनिटभराचा, पण मनावर खोल कोरला जाणारा.

संतापलेला उमाप्रसाद तातडीने आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांच्याशी वाद घालू पाहतो. ‘केवळ स्वप्न हा दयाच्या देवीपणाचा पुरावा कसा?’ आणि ‘गेले तीन वर्षे मी जे संसारसुख भोगले ते काय खोटे, तिच्या माणूसपणाची मला पटलेली साक्ष काय खोटी?’ असा प्रश्न विचारतो. वडील परंपरेचा, दार्शनिकतेचा आधार घेतात, ‘मी खोटे का बोलेन?’ असा भावनिक प्रश्नही करतात. यांचा असा वाद चालू असतानाच तिकडे तो आजारी मुलगा शुद्धीवर येतो. देवीच्या नावाच्या जयजयकार होतो. अशा स्थितीत वाद पुढे चालू ठेवणे उमाप्रसादला शक्यच होत नाही.

इकडे एरवी या सगळ्या प्रकाराबद्दल केवळ कंटाळ्याची भावना असणार्‍या दयाच्या चेहर्‍यावर प्रथमच साशंक भाव येतो.

(क्रमशः)

    << पुढील भाग


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा