शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

विठ्ठलाच्या स्त्रिया

(एका संस्थळावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने हा विषय समोर आला.)

विठोबा-रखुमाईचा गजर करणार्‍या महाराष्ट्रदेशी विठोबाच्या स्त्रिया हा विषय कदाचित आश्चर्यकारक वाटेल. पण लोकपरंपरेला तो तसा मुळीच नाही. आपल्या लाडक्या विठोबाचे नाव या ना त्या प्रकारे अनेक जणींशी जोडले गेले आहे. त्यात (म्हणजे नंतर त्याच्यावर आरोपित केलेल्या विष्णूची... म्हणून त्याचा अवतार घोषित केलेल्या कृष्णाची... या बादरायण संगतीने) त्याची राणी रुक्मिणी तर आहेच, पण अभिजात परंपरेबाहेर त्याच्या पदुबाई उर्फ पद्मावती, तुळशीबाई या अन्य पत्नी तर आहेतच, पण जनी सारखी साधीसुधी स्त्री सुद्धा आहे. इरावती कर्वेंसारखी एखादी विदुषी त्याला बॉयफ्रेंड म्हणून त्याच्याशी आधुनिक नातेही जोडू पाहते. यामुळे या विठोबाच्या स्त्रिया हा हा विषय दुर्गा भागवत, इरावती कर्वे आणि अरुणा ढेरे या तीन विदुषींच्या लिखाणाआधारे इथे मांडला आहे. (बरेचसे त्यांचे लिखाण जसेच्या तसे उद्धृत केले आहे, माझा सहभाग संपादक म्हणून.)

VithobaStatue

एका कथेनुसार विठोबा हा माळशिरसचा राजा, खंडोबाचा (ज्याच्या पुन्हा दोन बायका आहेत म्हाळसा नी बानू) मांडलिक. त्याची बायको पदुबाई (म्हणजे पद्मावती). एकदा विठोबाच्या एका भक्ताचा आदरसत्कार तिने जाणूनबुजून केला नाही असा गैरसमज झाल्याने विठोबाने तिला शाप दिला (तो शाप फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, पण विषयांतर नको म्हणून सोडून देऊ) त्यामुळे ती भ्रमिष्ट झाली आणि मरण पावली. इथे एक विचित्र संदर्भ आहे. विठोबाने कोणालाही तिच्या मृतदेहाला स्पर्श करू दिला नाही आणि घारी गिधाडांकरवी त्याची विल्हेवाट लावली. नंतर पावसाला बोलावून तिची हाडे समुद्रात वाहविली. पण ज्या भक्तासाठी हे घडले, त्या भक्ताने थोर तप केले आणि समुद्राकडून ती हाडे परत मिळविली. ती पद्माळ्यात विसर्जित केली. अर्थात नंतर विठोबाला पश्चात्ताप झाला.  तो ही भ्रमिष्टावस्थेत फिरत असताना पंढरपूरच्या पद्माळ्यात त्याला एक सुंदर कमळ दिसलं. ते खुडताच त्यातून पदुबाई साकार उभी राहिली. अर्थात विठोबाने ‘तिच्याशी संसार करणार नाही’ अशी आण घेतली असल्याने तिला स्वतंत्र मंदिरात संसार थाटावा लागला.

तसा विठोबा हा मूळचा दक्षिणेकडिल, पण तो पंढरपुरात राहिला तो पुंडलिकामुळे असे संतपरंपरा सांगते. परंतु धनगर म्हणतात तो आला पदुबाईमुळे. किंबहुना पदुबाई ही मूळची राणी नि रुक्मिणी ही तिची छाया (किंवा पदुबाई हीच पुनर्जात रूपात रूक्मिणी) अशीही त्यांच्यात समजूत आहे. लोकधारणा आणि अभिजात संकल्पनेची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असू शकेल. किंवा अवैदिक विठोबाचे वैदिकीकरण होताना हा बदल झाला असेल.

अशीच कथा तुळशीची. ही कथा कुणबी परंपरेतील. एका दरिद्री ब्राह्मणाची काळी मुलगी; ‘तिला वर मिळणार नाही’ असे भविष्य होते म्हणून बापाने तिला वाऱ्यावर सोडले. विठोबाने तिला आश्रय दिला. पण रुक्मिणीने मत्सरग्रस्त होऊन काही कारस्थान केले म्हणून ती जमिनीत गडप झाली. परंतु ती गडप होत असताना विठोबाने तिला केस धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर एक सावळे झाड वर आले. विठोबाच्या हातात मंजिऱ्या होत्या. मानवी तुळशीला दिलेले लग्नाचे वचन त्या झाडाशी लग्न करून विठोबाने पुरे केले. (जे आता त्याच्यावर विष्णू-अवताराचे आरोपण झाल्यावर तुळशीच्या लग्नाच्या कर्मकांडामध्ये रूपांतरित केले गेले. भर म्हणजे तुलसीविवाहामध्ये तुळशीचे लग्न लागते ते कृष्णाशी— विष्णूच्या अवताराशी, विष्णूशीही नव्हे.)

हा देव तसा अन्य गृहस्थधर्माला जागणारा आहे. तो कधीकधी भक्तांकडे चहापाण्यालाही जातो. मग त्याचा पाहुणचार केला जातो. मग रुक्मिणीला साडी-चोळी मिळते, तर सत्यभामेला चोळीसाठी दोरव्याचे कापड. पण विट्ठलाला काय द्यायचे?

रुख्माईला साडी-चोळी, सत्यभामेला दोरवा ।
विठ्ठल देवराया, तुळशीबाईचा गारवा ॥

तुळशीबाईशी त्याचे– विवाहबाह्य का असेना– असलेले नाजूक नाते भक्तांनाही माहित आहे. म्हणून ते देवाची तुळसाबाईशी गाठ घालून देतात.

अरूणा ढेरेंच्या ‘ओव्यांमधली रुक्मिणी’ या लेखात तर त्यांनी विठोबाच्या अन्य स्त्रियांमुळे रुसलेल्या रुक्मिणीच्या काही ओव्याच उद्धृत केल्या आहेत. त्यातील एक दोन इथे देतो. इथे विठोबा हा कृष्णाचा अवतार असल्याचा संदर्भ अधिक ठळक होतो. इथे रुक्मिणी नाराज आहे ते विठोबाच्या राधेशी असलेल्या संबंधांबद्दल. त्याबद्दल आयाबाया दळताना म्हणतात:

राणी रुक्मिणी परीस राधिकेला रूप भारी
सावळा पांडुरंग नित उभा तिच्या दारी

अर्थात रुक्मिणी यामुळे त्या द्वारकेच्या राण्यावर रुसली आहे.

थोरली रुकमिण जशी नागीन तापली ।
देवाच्या मांडिवर तिने राहीला* देखली ॥

(* राधेला)

इथे रुक्मिणी ही गृहकृत्यदक्ष गृहिणी आहे. ती घरची नेहेमीची कामे तर करतेच, पण विठोबाच्या भक्तांसाठी बुक्का दळून ठेवते, त्यांच्या भक्तांची, नातेवाईकांची उस्तवारही करते.

द्रौपदीने दिले घोडे पांडुरंगाहाती ।
नणंदेच्या नात्यानं रखुमाय पाय धुती ॥

असं असलं तरी विठोबा तिचा एकटीचा नाही. त्यामुळे ती विचारते:

इट्ठलाच्या पाया रखुमाई लोणी लावी ।
देवाला इचारती, ‘जनी तुमाला कोण व्हवी’ ॥

ही जनी– जनाबाई विट्ठलाची लाडकी आहे. म्हणून असं म्हटले आहे:

रखुमाईच्या पलंगाला गाद्या गिरद्या बख्खळ ।
देवाला आवडती जनाबाईची वाकळ ॥

क्वचित कधी थोडी अधिक धीट होऊन रखुमाई पुसते:

रुक्मिण पुशिते, देव व्हते कुठं राती ।
शेल्याला डाग पडे, तुळशीची काळी माती ॥

रुक्मिण पुशिते, कुठं व्हते सारा वेळ ।
शेल्याला लागलं कुण्या नारीचं काजळ? ॥

पण विठोबा चतुर आहे, हरप्रयत्नाने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुक्मिणीला तो काहीच उत्तर देत नाही. इथे अरुणाबाईंनी रुक्मिणीविषयी एक अतिशय हृद्य वाक्य लिहिले आहे. त्या म्हणतात रुक्मिणीला सर्व काही कळले होते पण ‘कळण्यानं दु:ख मिळतं, परिस्थिती बदलंत नाही हे ही तिला कळलं होतं’. अतिशय चटका लावणारं हे मूल्यमापन सर्व भारतीय स्त्रियांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

साऱ्या संतपरंपरेने मात्र विठोबाचा राजेपणा मोडला आणि त्याला आपल्यात ओढला. तो ही त्यांच्या प्रेमाने बांधला गेला. अनेक मार्गाने त्याने सर्वांच्या सुखदु:खात त्यांची सोबत केली. एखादी बाई दळिताकांडिता त्याला विचारत राहिली:

जिवाचं सुखदुक तुला सांगते विट्ठला।
माज्या पंढरीच्या हरी, कधी भेटशील एकला ॥

आणि तो तिला भेटत राहिला, वास्तपुस्त करीत राहिला. म्हणून तर आपण त्याने रुक्मिणीवर केलेल्या अन्यायाची आठवण विसरू शकतो.

जनीशी विठ्ठलाचे सर्वात जवळचे नाते आहे.

माय गेली बाप मेला
आता सांभाळी विट्ठला
मी तुझे गा लेकरू
नको मजसी अव्हेरू

अशी विनवणी करणाऱ्या जनीला या दासीला त्याने सर्वस्वाने आपले म्हटले आहे. इतर कोणासाठी नाही, पण जनीसाठी विठोबा राबला आहे. जनीने झाडलोट केली की याने केर भरावा, दूर टाकावा; तिने साळी कांडायला काढल्या की याने उखळ साफ करून कांडपाला हातभार लावावा– कोंडा पाखडावा, पाणी भरावे अशी सगळी कामे विठोबाने तिच्यासाठी केली आहेत.

पण असे बापाचे नाते सांभाळणाऱ्या विठोबाला जनी कधी “अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या” असेही म्हटले आहे. क्वचित ती त्या पोरट्याला आपल्या म्हातारीची काठी असेही म्हटले आहे.

पंढरीचा विठुराया, जसा पोरगा पोटीचा
मज आधार काठीचा, म्हातारीला
विठुराया पाठीवरी, हात फिरवे मायेने
पुसे लेकाच्या परीने, बये फार भागलीस?

तर याउलट तिच्या संबंधाने रखुमाईने विठोबाची शंकाही घेतली आहे. तर जनीनेच आणखी एक पाऊल पुढे टाकून ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ असे म्हणत विठोबासाठी वेसवापणही स्वीकारले आहे. जनीचे विठोबाशी असे गुंतागुंतीचे नाते आहे. ते समजण्यासाठी ढेरेबाईंचा ‘डोईचा पदर... ’ (पुस्तकः कवितेच्या शोधात) हा लेख मुळातून वाचायला हवा.

- oOo -

संदर्भः

पैस- दुर्गा भागवत
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी: पृ. २३-२४
स्त्री आणि संस्कृती - अरुणा ढेरे
आठवणीतले अंगण - अरुणा ढेरे
कवितेच्या शोधात - अरुणा ढेरे
गंगाजल - इरावती कर्वे.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा