शनिवार, ३० जुलै, २०२२

भूतकालाचा करावा थाट

SinkingInThePast
bigstock.com येथून साभार.

भूतकालभोगी भारताच्या अगदी सुरुवातीच्या पिढ्यांनी जे निर्माण केले ते मुद्दल गुंतवून मधल्या पिढ्यांनी त्यावर गुजराण केली. अधिक मिळवण्यापेक्षा बचत करुन पोट भरण्याचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांना दिला. शेतीकेंद्रित समाजव्यवस्थेचे चिरे निखळायला सुरुवात झाली, उद्योगांचे नि रोजगारांचे इमले उठू लागले नि माणसे अधिकच परावलंबी होत चाकरमानी झाली. त्यांची उरलीसुरली निर्मितीक्षमता लयाला जाऊन त्यांचे एककीकरण होऊ लागले. निर्मितीक्षम आणि निर्मितीशील समाज व त्यातील व्यक्तिंमध्ये असणारा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला, की माणूस उसन्या काठ्यांचे आधार घेऊ लागतो. त्यातही डोक्याला फार ताण देता, काहीही गुंतवणूक न करता फुकट मिळणार्‍या अशा काठ्या म्हणजे वारसा आणि भूतकालवैभव.

मग भूतकालभोगी पुढच्या पिढ्यांनी डोके भूतकाळात खारवून, मुरवून ठेवले आणि वर्तमानात हातांनी रोजगार करण्याचे मॉडेल स्वीकारले. पाश्चात्त्य देश, चीन, रशिया वगैरेंच्या प्रगतीला क:पदार्थ लेखत ’पण आम्ही नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ’ची पिपाणी वाजवण्यास सुरुवात केली. आणि हे करत असताना तहान भागवण्यासाठी पुन्हा त्यांच्याच पाणवठ्यावर रांग लावायला सुरुवात केली. नैतिकता ही सापेक्ष असते आणि ’आम्ही वागतो ते नैतिक’ अशी उफ़राटी व्याख्या करण्याची चलाखी आमच्या मेंदूत असल्याने आम्ही तिचा वापर केला.

मधल्या पिढ्यांनीही सर्जनशील(creative), विचारशील वगैरेऐवजी अनुकरणशील (obedient) नि पाठांतरप्रवीण समाज घडवण्याचे संस्कार केले. दांभिकपणा हा अजिबातच लज्जास्पद नाही हे बिंबवले. मग भूतकालाचे सत्यनारायण घालत वास्तवात रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन परदेशी जाऊन भरपूर पैसे मिळवण्याची स्वप्ने रुजली. आणि व्हॉट्स अ‍ॅप वा अन्य समाजमाध्यमांवर भूतकाल-भजने गाणे सुरू झाले.

वर्तमानाचा आणि भविष्याचा भार पाश्चात्त्यांकडून आलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानावर आणि चीनच्या उत्पादकतेवर सोपवून भारतीय भूतकालाचा खार चाटत समाजमाध्यमावर वाटत बसण्याइतके निवांत झाले.

अलीकडच्या काही शतकांत इथे एकच महत्वाचा शोध लागला आणि तो म्हणजे 'पाश्चात्त्यांनी लावलेले सगळे शोध इथे आधीच लावले गेले होते'.

या एकाच शोधाच्या मास्टरस्ट्रोकने पाश्चात्त्यांचे नाक खाली करुन तरुण पिढीला भूतकाळाचे झेंडे मिरवण्याची, इतिहासाची अफू चाटून धुंदीत राहण्याची सोय झाली. ’क्रिएट इन इंडिया’ ऐवजी ’मेक इन इंडिया’ हा आपल्या प्रगतीचा... नव्हे विकासाचा मूलमंत्र ठरला. प्रगतीशी आमचे नाते संपून गेले याची खंत आम्ही केली नाही. आणि आपल्या या संकुचित दृष्टिकोनाचे खापरही पुन्हा भूतकाळातून सैतान शोधून त्यांच्यावर फोडायला सुरुवात केली.

म्हणून बाबा रमताराम म्हणतात...

भूतकालाचे करावे स्मरण
भूतकालाचे वाटावे पुरण
आचविण्यांस त्याचे चूरण
चाटवावे

विज्ञान पाश्चात्त्यांचे काम
उत्पादनांस चीन ठाम
आम्ही मोजावे दाम
दोघांनाही

इतिहासाचा करावा थाट
इतिहासाचा मांडावा हाट
इतिहासाचेच चर्‍हाट
नित्य चालो

भूतकालाचा अभिमान
त्यात शोधावा सैतान
अपयशाचे तो कारण
सांगो जावे

इतिहासाचीच शाळा
नको पुस्तक वा फळा
भव्य एक पुतळा
दारी ठेवा

ऐसे वर्तिले रमतारामे
करा कोणतीही कामे
परी भूतकालाच्या नामे
पिंड द्यावा 

- oOo -

हे वाचले का?

बुधवार, २७ जुलै, २०२२

एक अवघड गणित

TeFiti
डिस्ने पिक्चर्सच्या Moana या चित्रपटातील Te Fiti ही निसर्गदेवता.

कॅलिफोर्निया ते केरळ, उत्तराखंड ते उरल
निसर्गाचा प्रकोप आणि लहर पाहून
प्रकृतीमातेला माणसाची दया आली.
प्रकट होऊन ती माणसांना म्हणाली,
"मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारते.
जर कुणीही याचे उत्तर बरोबर दिलेत,
तर मी निसर्गाला लगाम घालेन.
तुम्हाला अधिक सुखकर आयुष्य देईन."

"मला सांगा ’एक अधिक एक किती?’"

टोपी सावरत इंग्रज ऐटीत म्हणाला,’
’We ruled all five continents;
obviously the answer is five.'

वाईनचा घुटका घेत फ्रेंच म्हणाला,
Well, the damn world is
a big zero; so zero it is.

सॉक्रेटिसला स्मरून ग्रीकाने विचारले,
’Could you please explain
to me, what is one?’

बौद्ध डोळे मिटून म्हणाला,
’तथागतांनी आम्हाला पंचशील दिले,
म्हणजे याचे उत्तर पाच.’

क्षणभर विचार करुन मुस्लिम म्हणाला,
"एक अल्लाह ही पूज्य है
तो जवाब होना चाहिए एक।"

पान तोंडात टाकत हिंदी-हिंदू वदला.
’रामलल्ला बारा बरस बनवास काटे;
तो इस प्रश्न का उत्तर हुआ बाऽरा।’

उपरणेवाला हिंदू त्याला अडवत म्हणाला,
’सारे काही ज्ञान हे त्रिदेवांची देणगी,
म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे तीन’

प्रथेप्रमाणे कुणीतरी हा प्रश्न
फेसबुकवर नेला
प्रथेप्रमाणे पार्ट्या पाडून
तमाशा झाला
प्रथेप्रमाणे कुणी नेता बरळला
नि हा मागे पडला
...
...

ही सारी उत्तरे पाहून
प्रकृतीमाता हताश झाली
माणसांची परीक्षा घेणारी
शिक्षिकाच नापास झाली...

...आणि तेव्हांपासून माणसे
गणिताचा द्वेष करु लागली

- स्वामी जिज्ञासानंद
- oOo -


हे वाचले का?

सोमवार, २५ जुलै, २०२२

भुभुत्कारुनी पिटवा डंका

मी प्रभातफेरीला जातो तो रस्ता चांगला चार-पदरी आहे. रस्त्याचा शेवटचा टप्पा एका वळणापाशी सुरु होतो नि साधारण चारशे मीटर अंतरावर स्टेडियमच्या दारात जाऊन तिथल्या वडाच्या झाडाला टेकून विश्रांती घेतो. त्यामुळे रहदारी नगण्य आणि म्हणून प्रभातफेरीला सोयीचा.

सकाळी आमच्यासारखे नव-ज्येष्ठ नागरिक कानटोपी नि स्वेटर घालून, मफलर गुंडाळून काठी टेकत टेकत फिरत असतात. सोबतीला निवांत रस्त्यावर निवांत पहुडलेली श्वानसेना असतेच.

BarkingDogs

आज भली गंमत झाली. मी रस्त्याच्या (किंवा भूमितीच्या भाषेत रस्ताखंडाच्या) अंदाजे मध्यभागी असताना एका टोकाकडून जोरदार बोंब उठली. तिकडचे श्वानराज ठणाणा बोंबलू लागले. ते ऐकून माझ्या आसपासच्या, रस्त्याच्या दोनही बाजूंच्या पार्किंगच्या आडून, झाडाआडून, एका बाजूच्या बैठ्या घराकडून श्वानसेना ठणाणा बोंबलत रस्त्यावर धावली.

त्यातल्या एका श्वानाने समोरच चाललेल्या एका प्रभातफेरीकरावर सूर धरला. दुसरे श्वान ठणाणा बोंबलत समोर आलेल्या एका मोटारीच्या मागे धावत होते. आणखी एक श्वान नैऋत्येकडे मान उंच करुन (लांडग्यांची पोज) भुंकत होते. दुसरे एक त्या दिशेने निघून आग्नेयेकडे भुंकत भुंकत पळत होते. हे सारे अक्षरश: निमिषार्धात डोळ्यासमोर आलेले चित्र. एखादी रणगर्जना ऐकू यावी नि सैनिकांनी एकसमयावच्छेदेकरुन प्रतिपक्षावर तुटून पडावे तशी ही मंडळी अचानक सक्रीय झाली.

पण तरीही हा भुंकसंप्रदाय अचानक कुणावर तुटून पडला ते समजेना. सामान्यपणे एखादे पाळीव कुत्रे मालकासोबत प्रभातफेरीला आलेले दिसले वा एखाद्या आगंतुक भटक्या कुत्र्याने आपल्या राज्यात घुसखोरी केल्यामुळे ही भूमिपुत्र मंडळी सक्रीय होत असतात. पण इथे प्रत्येकाचे टार्गेट वेगळ्या दिशेला दिसत होते. त्यामुळे शत्रू नेमका कोणत्या दिशेने आला आहे हेच समजेना. मला तर सोडाच त्या सेनेलाही समजलेले दिसत नव्हते. एका कोपर्‍यातून सेनापतीने रणगर्जना केली आणि ही फौज समोर दिसेल त्याला शत्रू मानून तुटून पडलेली होती.

जंगल सोडून माणसांसोबत राहू लागली आणि कुत्र्यांनाही आपले शत्रू समजेनासे झाले आहेत किंवा असे म्हणू की शत्रू असे उरलेच नाहीत. आणि त्यामुळे ते स्वत:च कुणाला तरी शत्रू मानून वैर धरू लागले आहेत. कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष वैराखेरीज केवळ नेत्याने सांगितले म्हणून कुणालाही शत्रू मानू लागली आहेत. ’माणसाची संगत वाईट’ असं यलोस्टोनमधील एक लांडगा आपल्या पोरांना सांगताना एका माहितीपटात पाहिला होता, त्याची आठवण झाली.

- oOo -


हे वाचले का?

रविवार, २४ जुलै, २०२२

साहित्याचे वांझ(?) अंडे

क्रिकेटमध्ये फलंदाजाचा दर्जा ठरवण्यासाठी त्याने आजवर केलेल्या धावांची सरासरी पाहिली जाते, तसे लेखनाच्या दर्जा किती हे ठरवण्यासाठी फेसबुकवर लाईक्सची. त्याबाबतीत माझी कामगिरी म्हणजे कधी ज्याच्या बॅटला बॉल लागला की सत्यनारायण घालावा लागतो अशा महंमद सिराज किंवा जसप्रीत बुमराहच्या दर्जाची. कधीतरी सहज म्हणून खालील परिच्छेदाची फेसबुक पोस्ट केली आणि माझ्या पोस्टना सरासरीने मिळतात त्याच्या दुप्पटीहून अधिक लाईक्स तिने मिळवले. वरील दोघांपैकी एकाने एखाद्या सामन्यात अर्धशतक करुन जावे नि पॅव्हलियनमध्ये जाऊन ’हे कसं काय बुवा झालं’ म्हणून स्वत:च विचारात पडावे तसे माझे झाले.

माझी कविता समजण्यासाठी तुम्हाला माझ्या नेणिवेच्या आत डोकावून पहावे लागेल. कविता अशी हमरस्त्याने येऊन भेटत नाही, तिला आडवळणांचे हिरवे स्पर्श लागतात. अर्थांतरन्यासाच्या जाळीतून सरपटणार्‍या अर्थ-सर्पांच्या समोर, करुणामयी गायीचे डोळे जसे शांतवतात तशी कविता भेटायला हवी. प्राक्तनातील अवतरणांचे भारे वाहात असताना त्यात गुंतून न पडता, केवळ भारवाही या भूमिकेशी तादात्म्य राखत एखाद्या गोसावड्याप्रमाणे दिशांतापार जाता यायला हवे. एखादी कविता श्वत्थात्म्याच्या शिरी असलेल्या शिरोमण्याप्रमाणे वेदना देत असेल, तर फादर सर्जियसच्या आवेगाने ती छिलून काढली पाहिजे. एखाद्या मृत शेणकिड्याच्या अवशिष्ट राहिलेल्या कंकालाप्रमाणे तळहाती घेऊन जोजवली पाहिजे. त्यातून अर्थांचे किरण बाहेर पडणार नाहीत हे ठाऊक असूनही, एखाद्या पर्णहीन वृक्षाला फूल दत्तक दिल्याप्रमाणे अन्य कुण्या, कवितेची जाणीव वठलेल्या रसिकाला आंदण दिली पाहिजे. कुण्या आफ्रिकन कवयित्रीच्या स्वप्नी येणार्‍या त्या हिरव्या पोर्कुपाईनला स्मरून दारच्या इमानी कुत्र्यासाठी चार ओळींचे दान देता आले पाहिजे...

त्यानंतर असेच कधीतरी ’ब्रह्मांडाचे वांझ अंडे’ या शीर्षकाची एक कविता खरडून फेसबुक वॉलवर फेकून दिली. तिला नुसते लाईक्सच नव्हे तर काही प्रथितयश कवी, संपादक, समीक्षक यांची दादही मिळाली. मी या प्रकारचे वारंवार लिहिले पाहिजे असा सल्लाही मला एका समीक्षक/संपादकाकडून मिळाला.

पोस्ट केलेला परिच्छेद आणि ही कविताही माझ्या स्वत:च्या मते संपूर्णपणे भंपक आहे! किंबहुना तोच माझा उद्देशही होता. कोणत्या दृष्टिकोनाशिवाय, भाष्याशिवाय, प्रतिमासृष्टीशिवाय, वास्तवाच्या प्रेरणेशिवाय मांडलेली ओळींची उतरंड कविता म्हणून खपवले जाण्याचा अनुभव तर नित्याचाच होता. पण एखाद्या शाळकरी मुलाने लिहिलेल्या निबंधात लिहिल्यासारखा एक परिच्छेदच एकदा कविता म्हणून खपवलेला पाहिला. त्यावेळी आलेल्या वैतागातून अक्षरश: जे शब्द सुचतील ते पुढच्या ओळीत फेकत, मागचा पुढचा काहीही विचार न करता, कसेही वाक्य पुरे करत ती कविता(?) मी लिहिली होती.

त्यावर आलेले प्रतिसाद नि लाईक्स पाहून स्वत:च्या साहित्यिक समजाबाबतचा माझा न्यूनगंड आणखी बळावला. ज्यात कवीने(?) स्वत:च कोणता आशय ओतलेला नाही त्यात या स्तुतिभास्करांना काय सापडले असावे? दिलखेचक शब्द? अगम्यता (तेच मूल्य?)? ’मला माझ्याच या कवितेचा अर्थ लावून हवा आहे. देईल का कुणी?’ असा प्रश्न मी केला असता या समस्त स्तुतिभास्करांनी गप्प बसणेच पसंत केले.

पहिला परिच्छेद हा साधारण ग्रेस किंवा जीए यांनी लिहिल्यासारखा आभास होत असावा. त्यातून त्यांच्या चाहत्यांना हे लेखन ’आपल्यापैकी’ वाटलं असावं असा माझा संशय आहे. त्यातून त्यांनी केलेली लाईक-खैरात पाहून ’मति गुंग जाहल्या पाहुनि आपल्या लायका’(१) अशी माझी गत झाली.

MonkeysWrite
https://fewfleetingmoments.files.wordpress.com/ येथून साभार.

या अनुभवावरुन दशकभरापूर्वी पाहिलेल्या ’साराभाई व्हर्सेस साराभाई’ या विनोदी मालिकेमधील एक एपिसोड आठवला. इंद्रवदन साराभाई हा पत्नी मायाच्या नाटकाचा फज्जा उडवण्यासाठी तिच्यासाठी लिहून आलेला नाटकाचा मसुदा पळवतो. त्यानंतर एक माळी, प्लमर आणि म्युनिसिपालिटीतील एक शिपाई यांना एका जागी बसवून त्यांना सुचेल ते लिहून घेतो. ती वाक्ये नाटकातील पात्रांच्या तोंडी घुसवून नवा मसुदा बनवतो नि मायासाठी ठेवून देतो. एका समीक्षकासमोर त्या पहिल्या मसुद्याचे वाचन होणार असते.

ते जेव्हा सुरु होते तेव्हा प्रेक्षकांच्या दृष्टीने धमाल घडते. पण माया आपले सारे कौशल्य वापरून त्या निरर्थकाला अर्थ देण्याचा प्रयत्न करते. त्यातच समीक्षक आधीच (सकारात्मक) पूर्वग्रह घेऊन आलेला असल्याने, किंवा तो ही भंपकच असल्याने, किंवा ’तू माझी भलामण कर मी तुझी करतो’ या गटबाजीच्या तत्त्वाला अनुसरून तो त्या लेखनाची तारीफ करतो. थोडक्यात मायाचा पोपट करायला गेलेल्या इंद्रवदनचा स्वत:चाच पोपट होतो... माझे ब्रह्मांडाचे अंडे माझ्याच डोक्यावर फुटून झाला तसा!

मध्यंतरी अशाच एका अगम्यताप्रेमी स्वघोषित कवीशी थोडी चर्चा झाली होती. तो अर्थातच 'जुन्या सुगम कवितेने साहित्याचा कचरा केला आहे. (पुलंनी गद्य साहित्याचा केला तसा... म्हणे.)’ वगैरे टेप नेहमी वाजवणारा. त्याला म्हटलं, "तुझी कविता काही वेगळे सांगते, जिचा आस्वाद कसा घ्यावा हे अनेकांना समजत नाही. हरकत नाही. तू जुनी काव्यदृष्टी खोडून नवी काव्यदृष्टी रुजवण्याच्या दृष्टीने आम्हां जुनाट कवितेच्या रसिकांचे बौद्धिक घे. शिकवणी घे."

त्यावर पहिली प्रतिक्रिया होती, "मी बरेच ठिकाणी लिहिले आहे. ते वाच."
मी म्हटलं, "बाबा रे, एकतर ते सामान्यांना उपलब्ध नाही. आणि जे आहे ते तुझ्या कवितेहून अगम्य आहे. कविता सुगम नसली तरी चालेल, शिकवणी तर सुगम हवी."
तो म्हणे, "मी कवी आहे मास्तर नाही. आपली अभिरुची आपणच विकसित करायला हवी. त्यासाठी स्वत:च अभ्यास करायला हवा."
मी म्हटलं, ’बाबा रे, मी थोडाफार केलाय. कदाचित हा माझा गैरसमज आहे अशी शक्यताही आहे. पण तरी नाही समजली बुवा तुझी कविता. आता मी काय करायला हवे?"
"बरोबर आहे. मुळात प्रामाणिक प्रयत्नच करायचे नाहीत, वाकड्यातच शिरायचं. नवं काही नको. त्याच त्या झाडा-फुलांच्या फालतू कविता वाचायच्या, मिरवायच्या आहेत तुम्हाला." असे फणकारुन त्याने विषय संपवला.

गंमत अशी, की तो जेव्हा मागच्या साहित्यिक पिढीबाबत खडेफोड कार्यक्रम करत असतो, तेव्हा ’मागच्या पिढीचे लेखन नाकारताना तूही प्रामाणिक प्रयत्न केला नाहीस.’ असा आरोप करुन मी ही त्याला खोडून टाकू शकतो. जवळजवळ प्रत्येक तर्काला प्रतिबिंब-स्वरूप विरोधी तर्क देता येईलच. तेव्हा तर्ककर्कशता सोडून आस्वादाचा विचार का करु नये?

आमच्या वरील चर्चेतील स्वयंघोषित कविच्या म्हणण्याचा गोषवारा असा निघतो की, ’तुमची अभिरुची बकवास आहे! का, तर आम्ही म्हणतो म्हणून. आमचे लेखन वा आम्हाला आवडणारे लेखन ग्रेट आहे... पुन्हा, आम्ही म्हणतो म्हणून! ते कसे ते विचारु नका. आम्ही सांगितले तरी समजावे इतकी तुमची कुवत नाही. नाहीतर स्वत: अभ्यास करा. नाही समजले तरी आम्ही म्हणतो म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणा. नाहीतर आम्ही तुम्हाला ओल्ड जेनेरेशनवाले, टुकार अभिरुचीचे म्हणणार.’ हाच अनुभव मला गद्य लेखन करणार्‍यांबाबत, चित्रपटादी दृश्य कलांबाबतही आला.

तेव्हा पासून ’छान किती दिसते फुलपाखरू’ किंवा ’देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही माझी सर्वात आवडती कविता आहे असे बेधडकपणे सांगू लागलो. अमर चित्र कथांमधील चित्रे ही जग्गात भारी आहेत, 'खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करु नये’ वगैरे सांगणार्‍या बोधकथा माझ्या दृष्टीने जगातील सर्वश्रेष्ठ कथा आहेत' असे स्वत:च सांगू लागलो. हो, म्हणजे अशा उन्नतनासिका मंडळींनी आपल्याला खोक्यात (compartment) बसवण्याआधी आपणच त्यात जाऊन बसून त्यांचा पोपट केलेला चांगला. तसेही नसलेल्या उच्च अभिरुचीचा आव आणणार्‍यांपेक्षा आपल्या सामान्य अभिरुचीशी प्रामाणिक असणारे माझ्या मते अधिक चांगले म्हणता येतील.

विना कारणे मी बोलेन । बोली विरूपाचे रूप दावीन ॥
अगम्य वा अर्थहीन । श्रेष्ठता मोठी ॥(२)

असे म्हणणारे 'विरुपाक्ष' लेखक विरूपतेला कला आणि विध्वंसकतेला काव्य म्हणून खपवण्याचा आटापिटा करत असतात. शब्दांचा अस्ताव्यस्त भडिमार करून वाचकाला हतबुद्ध करून सोडणारे स्फुटच कविता म्हणून खपवू पाहणारे अनेक जण त्याच्या आशयाबाबत बोलायला नाखूष असतात हे ओघाने आलेच. अनाकलनीयता, दुर्बोधता हे श्रेष्ठ ठरू पाहणार्‍या कलेचे, साहित्याचे अपरिहार्य आयाम अथवा पैलू झाले आहेत. 'त्यांची तीव्रता जितकी अधिक, तितकी कला अधिक श्रेष्ठ' असे काहीसे प्रस्थापित होते आहे. ’ब्रह्मांडाचे वांझ अंडे’बाबत नेमके हेच झाले आहे.

कलेचा आविष्कार जितक्या कमी लोकांना उमगेल तितका तो श्रेष्ठ असे काहीसे प्रस्थापित होताना दिसते. बरं मग या ’मूठभरांनी, मूठभरांसाठी, मूठभर घडवलेले साहित्य वा कला’ यांना सामान्यांमध्ये स्थान नाही याबद्दल आगपाखड या स्वयंघोषित श्रेष्ठींनी का करावी? सर्वसामान्यांचे याबाबत प्रबोधन करा म्हटले तर ’ती आमची जबाबदारी नाही’ म्हणायचे कारण आम्ही साहित्यिक/कलाकार आहोत, (वरच्या संवादात म्हटले तसे) मास्तर थोडीच आहोत?

मग नाईलाजाने सर्वसामान्य जनता आपल्यासमोर जे आहे, त्यात आपल्या आकलनाच्या मर्यादेत मिळणारा आनंद मानू लागली, त्याचा आस्वाद घेऊ लागली, की 'साहित्य/कलांचे अवमूल्यन होते आहे' म्हणून ओरडायलाही आम्हीच तयार. थोडक्यात ’तुम्ही गाढव आहात’ असे म्हणणार्‍या या स्वयंघोषित शहाण्यांसमोर ’हो आम्ही गाढव आहात नि तुम्ही देवतुल्य आहात.’ अशी शरणागती बहुसंख्येने द्यावी अशी यांची अपेक्षा आहे का?

बरं समजा ती ही दिली. तरी त्यातून यांच्या स्वयंघोषित श्रेष्ठ साहित्याचा, कलेचा प्रचार-प्रसार कसा होणार आहे? की डोक्यावर देव्हारा घेऊन त्यात टाक मिरवावा तसे यांचे लेखन सामान्यांनी मिरवावे अशी यांची अपेक्षा आहे? ’गजलेला दोनच गोष्टी मारक असतात; अनभिज्ञाची दाद आणि जाणकाराचे मौन’ अशा अर्थाचा एक शेर आहे. तो यांना माहित नसावा का? की फेसबुक लाईकच्या पातळीवरची अनभिज्ञाची दाद यांना पुरेशी वाटते?

की त्यांच्या मते श्रेष्ठ असलेल्या साहित्य-कला यांचा प्रचार-प्रसार हा यांचा उद्देशच नाही, केवळ ’जे श्रेष्ठ आहे ते फक्त मला नि माझ्यासारख्या मोजक्यांनाच ठाऊक आहे.’ असे सर्टिफिकेटच त्यांच्या मते अज्ञ जनांकडून त्यांना हवे आहे? ’ते जर अज्ञ आहेत तर त्यांची अभिरुची आपण दुर्लक्षित ठेवली तरी पुरेसे आहे’ असे यांना का वाटत नसावे?

’जीएंचे लेखन म्हणजे मोठ्यांचा चांदोबा’, ’लंपनवरचे साने गुरुजी टाईप लेखन’ वगैरे शेरेबाजी करुन आपल्या दृष्टीने महत्त्वाचे साहित्य सामान्यांमध्ये पोचवण्यापेक्षा ’मी लै भारी’ हा उद्दाम अहंकारच दिसत नाही का? आणि अशा अहंकारी लेखनाला फक्त त्यांच्या भाटांची किंवा त्यांच्यासारख्या उन्नतनासिका स्वयंघोषित रसिकांचीच दाद मिळणार आहे. त्यातून त्यांचा वैताग, वैफल्य जाहीर होण्यापलिकडे काहीच बदल होणार नाही हे यांना समजत नसावे का?

यांच्यापैकी एखादा म्हणेल की, "’ब्रह्मांडाचे अंडे’मध्ये तुझ्याही नकळत तू काहीतरी आशयघन लिहिले असेल, तुला समजले नसेल पण त्यांना दिसले असेल." चला हे ही मान्य करु. समजा अशा यांत्रिक पद्धतीने लिहिलेल्या कविता कविता-रसिकांना नि जाणकारांच्या पसंतीस उतरल्या, मी त्यांचा काव्यसंग्रह मी काढला नि त्याला कुठ्ल्याशा साहित्यसभेचा वा ग्रंथालयाचा पुरस्कार जाहीर झाला. आता मला असा प्रश्न असा पडला आहे, की हा पुरस्कार मी स्वीकारावा का?

ज्या अर्थनिर्णयनाच्या, रसास्वादाच्या आधारे त्याची निवड झाली तो मला स्वत:ला अपेक्षित नव्हताच. या कवितेत तर मला निरर्थकताच अपेक्षित होती. म्हणजे पुरस्कार-परीक्षकाच्या मनातील कविता, तिचे परिशीलन ही माझी निर्मितीच नाही मुळी. मग जी माझी निर्मिती नाही, तिचा कर्ता म्हणून मी तो सन्मान स्वीकारणे कितपत नैतिक आहे?

जिथे खुद्द कवीनेच कोणत्याही अभिव्यक्तीशिवाय, भाष्याशिवाय शब्दांची चळत लावली आहे, तिथे इतरांना त्यात कोणती अभिव्यक्ती दिसते? आणि सापेक्षतेचा मुद्दा विचारात घेतला तर मग ’रसिकाला दिसते तेच कवीला अभिप्रेत असावे असे नाही’ हे मान्य करावे लागेल. आणि तसे असेल तर रसिकाला ती कविता आवडली याचे श्रेय कवीला का मिळावे? जे त्याने निर्माणच केले नाही, जे कदाचित रसिकानेच निर्माण केले, त्याचे श्रेय त्या रसिकाकडेच राहायला हवे. थोडक्यात कवीने जी कविता दिली तिची भूमिका साधारणपणे एखादा पदार्थ रांधण्याच्या कच्च्या मालाची आहे. त्यांच्या सहाय्याने कोणता पदार्थ बनवावा हे ज्याचे-त्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणू या. मग ज्याने तो बनवला त्यालाच तो गट्ट करु द्यावा की.

त्याचप्रमाणे कवीची अभिव्यक्ती आणि परीक्षकाची अभिरूची नि आकलन यात फरक असेल, तर तो पुरस्कार तो कवीला का द्यावा? ’कर्ता-करविता तो आहे. त्याने लिहून घेतले. मी तो हमाल भारवाही’ असे कृतक-विनयाने म्हणणारे त्याबद्दल मिळालेला साहित्यिक पुरस्कार मात्र स्वीकारतात तेव्हा तेव्हा मला हा प्रश्न पडतो. या लेखक वा कविच्या हातून निर्हेतुकपणे आशयसंपन्न कविता लिहिली गेली असेल, तर तो तिचा कर्ता म्हणावा का? त्याचप्रमाणे एखाद्याला तुफान आवडली नि दुसर्‍याला कचरा वाटली तर मूळ कवितेचा दर्जा काय म्हणायचा? तो ठरवण्याचे निकष कुठले?

जेव्हा वास्तववादी शैलीपलिकडे सर्व प्रकारच्या चित्रशैलींना सरसकट ’मॉडर्न आर्ट’ म्हटले जात असे, त्या काळात तिची टिंगल करणारे लोक ’कुत्री-मांजरी रंगात बुडवून कॅनव्हासवर नाचवली आहेत’ असे म्हणत असत. एखाद्याने खरोखरच तसे केले नि ते चित्र नावाजले गेले, तर त्याबद्दल कलेच्या क्षेत्रात तथाकथित चित्रकाराला मान मिळावा की त्याच्या मांजरीला? (इथे आयनेस्कोच्या ’र्‍हिनसोरस’मधला तत्त्वज्ञ ’मांजर निरर्थक फटकारे मारते, काळे निरर्थक लिहितात, म्हणून काळे मांजर आहेत.’(३) असा निष्कर्ष काढेल अशी भीती मला वाटते.)

याबाबत की काही कविंना छेडले होते. पण एकुणात असे दिसते की त्यांच्या स्वत:च्या कवितेबद्दल, लेखनाबद्दल बोलते करण्याचा प्रयत्न केला होता. ’लेखकाने स्वत:च स्वत:च्या कलाकृतीबद्दल बोलायचे नसते.’ असे म्हणून ही मंडळी आपली शेपूट सोडवून घेताना दिसतात.

मग मला अनेकदा संशय येतो, की त्यांची कलाकृतीदेखील ’ब्रह्मांडाचे वांझ अंडे’ सारखी यांत्रिक करामत असू शकते. जी लयीने, वा केवळ तांत्रिक करामतीमुळे अथवा भाषिक सौंदर्याने लोकांना भावलेली असेल. कदाचित त्यातील अगम्यता, शाब्दिक फुलोरा, खुर्चीवर बसल्या-बसल्या केलेला जळजळीत विद्रोह, थेट लैंगिक उल्लेख यांनी दिपून जाऊनही वाचक ’आपल्याला कळत नाही, पण काहीतरी भारी आहे.’ म्हणत त्याला दाद देत असतील. अशी छद्म-रसिक मंडळी त्याबद्दल प्रश्न करणार्‍यावर ’तुम्हाला कविता समजत नाही, समज कमी आहे तुमची’ म्हणून डाफरून झटकून टाकतात किंवा तुच्छतेने ’तुम्ही आपल्या पानाफुलांच्या कविता वाचा’ म्हणून टिंगल करताना दिसतात.

यावर एका लेखकाने खासगीत असे सांगितले की ’लेखकाचा हेतू नि एखाद्या वाचकाला दिसलेला अर्थ वा हेतू जुळला नाही’ तर असा वाचक गमावण्याचा धोका असतो. पण माझ्या मते लेखक नि अनेक वाचक यांच्या सामूहिक रसास्वादातून त्या साहित्यकृतीमधून एकाहून अधिक पर्यायी शब्दचित्रे, अर्थपात्रे तयार झाली तर ते चांगलेच नाही का? मला उलट अशी विविध प्रतिबिंबे दाखवणारी कलाकृती आवडेलच.

’मलेना’ नावाचा एक इतालियन चित्रपट आहे. तो युद्धाच्या पार्श्वभूमीवरील सामाजिक अध:पाताचे चित्रण करणारा चित्रपट म्हणून पाहता कसा दिसतो, त्या परिस्थितीमध्ये वावरणार्‍या एका स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून पाहिला तर तो कसा दिसतो, आणि पौगंडावस्थेत नुकतेच पदार्पण केलेल्या, लैंगिक आकर्षण व जाणीव नुकतीच जागी झालेल्या मुलाला केंद्रस्थानी ठेवून पाहिला, वा त्याच्या नजरेतून पाहिला तर तो कसा दिसतो हे पाहणे अनुभवणे आनंददायक होते. हा चित्रपट मी स्वत: तीन वेळा पाहिला. तरुण वयात एकदा नि मध्यमवयीन झाल्यावर दोनवेळा. प्रत्येक वेळी माझे वय नि त्यावेळची मानसिकता वा परिस्थिती यानुसार मला यातील एक केंद्र अधिक ठळक, तर इतर दोन धूसर दिसली आणि त्यातून चित्रपटाचा वेगवेगळा अन्वयार्थ लागत गेला.

अशाच प्रकारे विविध पापुद्रे वा अनुषंगे असणारी साहित्यकृती विविध रसिक व जाणकाराला वेगळा अनुभव देतील. हे लेखक, रसिक नि जाणकार अशा तिघांनीही समजून घ्यायला काय हरकत आहे? आपल्याच कलाकृतीबद्दल बोलताना लेखक त्याच्या दृष्टिकोनातून, हेतूच्या आधारे बोलत असतो हे गृहित धरले तर विसंगतीचा दोष निर्माण होणार नाही. पण त्यासाठी ’मी मांजर नाचवतो नि चित्र काढतो. शंभर लोक त्यातून शंभर अर्थ काढू देत. पण त्या सर्व आशय-शक्यतांचा स्वामी मलाच मानले पाहिजे’ हा हट्ट चित्रकाराने, कविने, लेखकाने सोडायला हवा.

पुन्हा पुरस्काराकडे (आणि मांजरांकडे) यायचे तर प्रश्न हा की लेखक/कवीच्या हेतूचा भाग नसलेल्या अर्थाच्या, रसपरिपोषाच्या आधारे जर ती कलाकृती नावाजली गेली, तर ते लेखक/कवीचे श्रेय मानावे का? कुणी म्हणेल एखाद्या लहान मुलाने रंगाचे निर्हेतुक फराटे मारले नि त्यात तुला मांजर दिसली, तर निदान फटकारे मारल्याचे श्रेय देशील की नाही? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर होय असे आहे. फक्त महत्त्वाचा मुद्दा असा, की मी त्याला रंगांचे फटकारे मारल्याचे श्रेय देईन, मांजराचे चित्र काढल्याचे नव्हे! माझ्या मते तो रंगकाम करणारा आहे, चित्रकार नव्हे. त्याच्या अभिव्यक्तीचे चित्राशी, शब्दांच्या क्षेत्रात अर्थाशी एकरुपत्व असेल तेव्हाच मी त्याला चित्रकार वा साहित्यिक/कवी म्हणेन.

असं म्हणतात की 'अनंत संख्येने माकडे जमवून त्यांना टाईपरायटर (आता संगणकाचा कळफलक) दिले, तर त्यांच्या निर्हेतुक कळफलक बडवण्यातूनही कधीतरी शेक्स्पिअरचे एखादे सुनीत लिहिले जाईल अशी शक्यता असते.' (तिची संभाव्यता शून्य नसते.) पण ती माकडे त्याच्या आशयाचे स्वामी म्हणता येतील का? असा माझा प्रश्न आहे.

- oOo -

(१) मूळ ओळ: ’श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि अपुली वार्ता’ ही कुसुमाग्रजांच्या ’वेडात मराठे वीर दौडले सात’ या कवितेमधील.

(२) मूळ ओवी:

तेणे कारणे मी बोलेन । बोली अरूपाचे रूप दाविन ।
अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियाकरवी ॥ (ज्ञानेश्वरी: ३६/६)

(३) मूळ विधान: ’सगळी मांजरे मरतात, सॉक्रेटिस मेला आहे, म्हणजे सॉक्रेटिस मांजर आहे.’


हे वाचले का?

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

आता घरीच तयार करा एक किलो सोने

भारतीयांच्या मनात सोने या धातूच्या हव्यासाबाबत 'Why Indians are obsessed with the yellow metal' या शीर्षकाचा एक लेख मध्यंतरी पाहण्यात आला होता. (इंग्रजी भाषेत असल्याने नुसताच पाहिला, वाचू शकलो नाही.). नोटाबंदी काळात मायबाप सरकारने सोने खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी दिल्यावर जणू काही सोनेच स्वस्त झाले असे समजून ज्यांच्याकडे बदलून घेण्यासाठी जुन्या नोटा नव्हत्या ते लोकही चेकबुक नि क्रेडिट कार्ड घेऊन सोने घेण्यास धावले होते.

अशा माणसांच्या अडाणीपणाचे मला वाईट वाटले होते. थोडेसे पैसे खर्च करुन हवे तितके सोने ते घरच्या घरीच तयार करु शकत असताना बाजारातून विकत आणण्याचा गाढवपणा का करावा हे मला उमगले नव्हते. तेव्हाच मला विचारले असते तर ही रेसिपी त्यांना देऊन टाकली असती. असो. निदान आता ही सर्वांसाठी खुली करुन भरपूर सोने निर्माण करुन त्याआधारे दागिने, आभूषणे निर्माण करुन वा ते विकून भरपूर संपत्ती निर्माण करण्याची संधी मी सगळ्यांनाच देतो आहे.
---

RemovingProton
shutterstock.com येथून साभार.

१. प्रथम एक काम करा. बाजारातून एक किलो पारा (मर्क्युरी) विकत आणा. (अंदाजे १४,५००/- रुपये खर्च येईल.)

२. आता त्यातील प्रत्येक अणूमधून आपल्याला एकेक प्रोटॉन बाहेर काढायचा आहे. त्यासाठी आवश्यक त्या आकाराचा एक प्लॅस्टिकचा चिमटा आणा. बाजारात मिळणार्‍या डिसेक्शन बॉक्समधला वापरु नका. तो स्टीलचा असतो. त्याने शॉक बसण्याचा संभव आहे.

३. त्या चिमट्याच्या सहाय्याने एक एक प्रोटॉन काळजीपूर्वक वेचून बाहेर काढा. आसपास फिरणार्‍या इलेक्ट्रॉन्सना स्पर्श होणार नाही याची नीट काळजी घ्या. शॉक बसण्याचा संभव आहे.

४. सारे प्रोटॉन वेचून बाहेर काढले (आणि तुम्ही जिवंत असून भ्रमिष्ट झालेला नसलात) की तुमच्याकडे जवळजवळ १ किलो शुद्ध सोने तयार झालेले असेल. ज्याची किंमत अंदाजे चाळीस लाख रुपये असेल.

५. दरम्यान बाहेर काढलेल्या प्रोटॉन्सचे काय करायचे हा प्रश्न पडला असेल आणि तुम्हाला आणखी थोडा पैसा मिळवायचा असेल तर पार्‍यासोबतच अंदाजे ३०० ग्रॅम टंग्स्टन विकत आणा. खर्च अंदाजे ३५,०००/-. काढलेले प्रोटॉन याच्या अणूमध्ये घुसवा. यातून तयार झालेल्या इरिडियमची बाजारातील किंमत सुमारे २१ पट आहे.

६. तयार झालेले सोने (न्यूट्रॉन्स कमी असल्याने कमअस्सल असल्याचे कळण्याच्या किंवा त्याचे शिशात रूपांतर होण्याच्या आत) ताबडतोब बाजारात विका.

७. मिळालेल्या पैशातून चैन करा.

('डार्कर साईड ऑफ सायन्स’ या ग्रुपमधील एका पोस्ट आणि चर्चेवरुन)

- oOo -

ता. क. १: सदर प्रयोग आपापल्या जबाबदारीवर करावेत. परिणामांना सल्लागार जबाबदार नाहीत.
ता. क. २: या सार्‍या खटाटोपाला १० कोटी अब्ज इतकी वर्षे लागतील. तेव्हा जितक्या लवकर सुरुवात कराल तितके चांगले.

(शीर्षक वाचून ’मटा ऑनलाईन’ वाल्यांनी हा लेख छापायला मागितला होता. पण मी बाणेदारपणे नकार देऊन सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. )


हे वाचले का?

बुधवार, २० जुलै, २०२२

’तो देव, मी त्याचा प्रेषित’ : मानवी संस्कृतीचा उदयकाळ आणि अर्वाचीन राजकारण

या वर्षी मे महिन्यामध्ये ’धर्मवीर’ नावाचा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला. विषयाचा विचार करत त्यात हिंदुत्ववादी मंडळींनी त्याला अधिक उचलून धरले हे ओघाने आलेच. त्यांच्यासह इतरांनीही सध्या आलेल्या चरित्रपटांच्या लाटेतील एक चित्रपट इतकेच महत्त्व त्याला दिले. परंतु त्या चित्रपटाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हते किंवा राष्ट्रभक्ती वा धर्मभक्तीच्या प्रचारपटांच्या सध्याच्या प्रवाहाचा तो केवळ एक भागच होता असेही नाही. त्या पलिकडे त्या चित्रपटाला आणखी मोठे उद्दिष्ट साध्य करायचे होते. त्या चित्रपटाचे निर्माते, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवणार्‍या एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाद्वारे त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाचा नारळ फोडला होता हे पुढे स्पष्ट झाले. एखाद्याचा वारसा सांगत आपली वाट सुकर करणे, बस्तान बसवणे याला मानवी इतिहासात खूप मोठी परंपरा आहे. माणूस निसर्गजीवी होता, टोळ्या करुन राहात होता, तेव्हापासून याची सुरुवात झाली आहे.

DigheAbhishek

माणूस टोळ्यांमध्ये राहात होता, तोवर भटका वा अस्थिर होता. या काळात जीवनावश्यक अशा नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये वाटेकरी होऊ पाहणारी प्रतिस्पर्धी टोळी अथवा टोळ्या, आणि शिकार वा संकलन मार्गे अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरणारे हिंस्र प्राणी हे त्याचे शत्रू होते. त्यांच्याशी मुकाबला बाहुबळाने वा कौशल्यानेच होऊ शकत असे. यासाठी टोळीतील सर्वात बलवान पुरुषाकडे टोळीचे नेतृत्व ओघानेच येई. शारीरबल हे राजकीय सत्ता मिळवण्याचे एकमेव हत्यार होते.

या वास्तविक शत्रूंबरोबरच प्राकृतिक घटक (वणवा, पाऊस, पूर, वादळ वगैरे) हे ही त्याचे शत्रू होते. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याची शक्ती त्याला अद्याप सापडलेली नव्हती. त्यामुळे तो निसर्गापुढे हतबल होता. त्याच्या प्राकृतिक भयाला त्याने देवत्वाचे रूप देऊन(१) त्यांच्यासमोर तो लीन झाला होता. या देवत्वाशी संवादाचे माध्यम म्हणून टोळ्यांमध्ये भगताची नेमणूक झालेली असे. हा भगत टोळीमध्ये नेत्यापाठोपाठ महत्वाचा असे. हा एका बाजूने प्राकृतिक देवांना कौल लावणे, टोळीच्या कार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेणे वगैरे कार्ये करण्याबरोबरच टोळीतील सदस्यांच्या व्याधींउपचारांची जबाबदारीही घेत असे. थोडक्यात हा मांत्रिक आणि वैद्य यांचे मिश्रण असे. त्यामुळे टोळीप्रमुखापाठोपाठ त्याचे स्वत:चे असे विशेष स्थान असे. त्यामुळे त्यालाही अप्रत्यक्ष सत्तेची जाणीव होत गेली असेल.

पुढे माणसाने शेतीचा शोध लावला, ज्यातून त्याच्या मूलभूत गरजा एका ठिकाणी स्थिर राहूनही भागवणे शक्य झाले. आता टोळीची समाजाकडे वाटचाल सुरु झाली. निसर्गजीवी असण्याकडून नागरजीवी होताना घटलेल्या शारीरिक संघर्षांचे नि प्राकृतिक धोक्यांचे प्रमाण पाहता बाहुबलाचे निर्विवाद श्रेष्ठत्व डळमळू लागले. आपल्या अप्रत्यक्ष सत्तेला प्रत्यक्ष सत्तेमध्ये रूपांतरित करण्याची इच्छा भगताच्या मनात बळावली असेल. अशा वेळी बाहुबलींकडे असणारी राजकीय सत्ता आपल्याकडे कशी खेचून घेता येईल, निदान त्यातील वाटा मिळवता येईल याचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला असेल. मग त्यातून आपल्या हाती असलेल्या एकाधिकारालाच सत्तेचे रूप देण्याची महत्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली असेल.

परंतु हे तितकेसे सोपे नव्हते. भगताला ’स्वबळावर’ बाहुबलाशी थेट संघर्ष शक्य नव्हते. त्याच्याकडे असलेले देवता-संपर्काचे बळही त्याला अशा थेट संघर्षात उपयुक्त ठरणारे नव्हते. कारण तोवर देवता-संकल्पना ही जेमतेम प्रतीक म्हणूनच अस्तित्वात होती. आपल्या कार्यात अडथळा आणू नये म्हणून भगतामार्फत माणसांची टोळी देवाला काही देऊ करत असे नि त्याबदल्यात ते देव आपले कार्य सुकर करतील अशी आशा करत असत. उलट दिशेने त्या देवतांकडून मानवाशी कोणताही संपर्क (?) केला जात नसे. देवाचा अनुग्रह झाला की कोप झाला याचे मूल्यमापन माणसानेच वास्तवाकडे पाहून करायचे असे. शिवाय देवतांमधील प्रत्येकाचे एक कार्यक्षेत्र निश्चित असे, ते सर्वशक्तिमान, सर्वव्यापी नव्हते. त्यामुळे त्यांच्या मुखी आपले बोल बोलवावे नि त्या आधारे सत्ता मिळवावी हे शक्य होत नव्हते. आणि म्हणून वास्तविक बलाची कमतरता असलेल्या भगतासारख्या सत्ताकांक्षी मंडळींनी मानवी-देव संकल्पना जन्माला घातली असेल.

देव मानवी झाले नि त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले. केवळ विशिष्ट प्राकृतिक घटक वा घटना यांच्यापुरती त्यांची सत्ता नव्हती. एका टोळीवर अधिराज्य गाजवणार्‍या टोळीप्रमुखाप्रमाणेच ते मानवांचे पारलौकिक जगातील नेते होते. ते सर्वसत्ताधारी, सर्वव्यापी बनू लागले नि त्यामुळे विविध टोळींचे, गटांचे - पुढे धर्मांचे - देव परस्परांशी स्पर्धा नि संघर्ष करु लागले हे ओघाने आलेच. त्यापूर्वीच्या अग्नि, वायु वगैरे प्राकृतिक देवांमध्ये आपसांत संघर्ष होण्याचे कोणतेही कारण नव्हते, कारण (एकतर ती प्रतीकेच होती आणि) त्यांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती. पण देवता संकल्पनेला मानवी, सर्वव्यापी बनवल्यामुळे देवता-संघर्षांची ठिणगी पडली. पुढे संघटित धर्मांच्या स्वरूपात या देवांच्या फौजा तयार झाल्या, नि केवळ वर्चस्वाच्या लढाया नव्हे तर युद्धेच सुरू झाली.

देवता मानवी झाल्यामुळे आणखी एक महत्त्वाची सोय झाली आणि ती म्हणजे आता देव-मानव संपर्क स्थापित झाला. दोन माणसे परस्परांशी संवाद साधतात तसेच हे मानवी देव मानवाशी बोलू (?) लागले. परंतु हे देव सर्वसामान्यांशी अर्थातच बोलणार नव्हते. मानवाशी आपल्या संवादाचे माध्यम म्हणून - आपले ’प्रेषित’ म्हणून - भगताचीच निवड करावी हे ओघाने आलेच. थोडक्यात सांगायचे तर या मानवी देवतांची संकल्पना रुजवतानाच या भगतांनी, प्रेषितांनी त्यांच्या खांद्यावर बसून सत्तेच्या रिंगणात प्रवेश केला.

महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर एकनाथ शिंदेही आनंद दिघे यांची धर्मवीर म्हणून प्रतिमा रुजवत असतानाच ’ते देव, मी त्यांचा वारस, प्रेषित’ हा दावाही रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे करत असताना ते बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे या प्रस्थापित देव-प्रेषित जोडगोळीला नवा पर्याय देऊ पाहात आहेत.

टोळी ते नागर आयुष्य या संक्रमणानंतर टोळीच्या सामूहिक मालकीची साधनसंपत्ती ही साहजिक स्थिती हळूहळू मागे पडत वैय्यक्तिक मालकीच्या संकल्पनेचा उदय झाला. टोळीप्रमुख निवडला जात असे, राजसत्ता आता वारसाने मिळू लागली. भगतही शक्यतो आपला मुलगाच आपल्यानंतरचा भगत होईल अशी तजवीज करत असे. त्यामुळे प्रेषिताची अघोषित राजकीय सत्ताही वारशाने पुढे जावी असा प्रयत्न प्रेषिताने नि त्याच्या वारसांनी केला. त्याला विरोध करणार्‍यांना देवाचा आदेशाचा हवाला देऊन धर्मभ्रष्ट जाहीर केले गेले असेल (मुस्लिमांमध्ये शिया-सुन्नी भेद निर्माण झाले, ते प्रेषिताचे वारस कोण यावरुनच.) प्रत्यक्ष अथवा जैविक वारस आवश्यक तितका सबल नसेल, तर निदान त्याच्या एकनिष्ठ गटाकडे वारसा जावा असा पर्यायही समोर ठेवला गेला असेल. (ब्रिटनच्या राजगादीवर राजघराण्यातील कुणी कुठल्या क्रमाने बसावे याची काटेकोर प्राधान्ययादी असते.) त्यातून प्रेषिताचा, पुरोहितवर्गाचा एक गटच तयार झाला असेल. (भारतातील ब्राह्मण हा असा एक गट). आपणच निर्माण केलेल्या पारलौकिकाच्या, वंशसातत्याच्या भ्रामक कल्पनेच्या आहारी जाऊन धार्मिक वा राजकीय सत्ता आपल्या वारसाकडे, निदान आपल्या गटाकडे राहावी हा आटापिटा स्वयंघोषित प्रेषित-वारसांकडून सुरू झाला.

स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणामध्येही घराणेशाहीचा बोलबाला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरु यांची कन्या इंदिरा गांधी, त्यांचे पुत्र आणि आता नातू हेच त्यांचे काँग्रेसमधील वारसदार ठरले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत फारुक अब्दुल्ला, प्रकाशसिंग बादल, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, एम. करुणानिधी, या आणि अशा अनेक मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार वा खासदार यांनी आपल्या राजकीय भूमीचा वारसा आपापल्या मुलांकडे सोपवलेला आहे. यात सद्यस्थितीत अधिक चर्चेत असलेले शिवसेना-अध्यक्ष उद्धव ठाकरे हे आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मिरवत आहेत.

पण ही वारसा उतरंड सामान्य जनता नेहमीच निमूटपणे मान्य करते असे नाही. आपल्याहून कमी कुवतीचा राजकुमार वा भगतपुत्र वारस ठरतो आहे हे पाहून भगताच्या एखाद्या शिष्याला वा राजाच्या एखाद्या पराक्रमी सरदाराला वैषम्य वाटत असेल. (यात त्याच्या स्वत:च्या कुवतीबद्दलचा फाजिल आत्मविश्वासही असू शकेल.) त्यातले काही बंड करुन सत्ता हस्तगत करण्याचा वा पर्यायी सत्ता स्थापण्याचा प्रयत्न करत असतील. पुढे या वैषम्य-बंडांतून नवी राज्ये जशी निर्माण झाली, तसेच एकाहुन अधिक धर्मही. सर्वस्वी नवा धर्म, नवा पंथ किंवा नवे राज्य स्थापण्यासाठी निव्वळ वैय्यक्तिक कुवतीपलिकडे बरेच काही अधिक आवश्यक असे. भगताकडून मिळालेले ज्ञान वा अंगभूत शौर्य त्यासाठी पुरेसे नसे. मुख्य म्हणजे हे करत असताना जुन्या सत्ताधार्‍यांशी संघर्ष अटळ असे.

त्या संघर्षादरम्यान जुना पंथ/टोळी, जुने राज्य यातील बहुसंख्या ही बदलाला अनुत्सुक असे. आणि म्हणून मूळ धारेशी एकनिष्ठ राहण्याची शक्यता अधिक असे. अशा वेळी आपण नवे राज्य, नवा पंथ/धर्म स्थापन करत नसून मूळ धर्मालाच शुद्ध स्वरूपात समोर आणत आहोत किंवा मूळ राजाच्या/भगताच्या या नालायक वारसाने राज्याचा वा धर्माचा होणारा अध:पात टाळण्यासाठी उभे आहोत अशी बतावणी करणे अपरिहार्य असे. यातून जुने निष्ठावान काही प्रमाणात आपल्याकडे वळवणे किंवा निदान जुन्या वारसांशी होणार्‍या आपल्या संघर्षात तटस्थ राहतील याची खातरजमा करुन घेता येत असे. इस्लाममध्ये, ख्रिश्चॅनिटीमध्ये अनेक पंथ आपण लोकांना मूळ धर्मधारेकडे नेत आहोत असे उद्घोष करत उभे राहिले ते यामुळेच.

स्वातंत्र्यपूर्व कालात काँग्रेस सर्व जाती-धर्मांच्या, विचारधारांच्या व्यक्तींसाठी एक सामायिक मंच म्हणून काम करत होती. स्वातंत्र्योत्तर कालातील काँग्रेसी नव्या पिढीने ’स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या काँग्रेसींचे आम्हीच वारस आहोत.’ असा उद्घोष करत सत्ता बळकावली आणि भोगली असे म्हणता येईल. आपले हे वारस असणे जनमानसात ठसवण्यासाठी त्यांनी जुन्या काँग्रेसच्या गांधी आणि नेहरु या दोन दिग्गजांच्या नावाचा घोष चालू ठेवला. आपण त्यांचेच वारस आहोत अशी मखलाशी ते करत राहिले. याचाच परिणाम म्हणजे काँग्रेसमधून फुटून निघालेल्या बहुतेक गटांनी, पक्षांनी आपल्या नावामध्ये काँग्रेस हे नाव कायम ठेवले होते.

स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसमध्ये हिंदुत्ववाद्यांपासून, समाजवादी, डावे इतकेच नव्हे तर काही सरंजामदारांचे समर्थकही होते. स्वातंत्र्योत्तर कालातही काँग्रेस अस्तित्वात राहिली, तर आपापल्या विचारधारेच्या आधारे राजकारण करताना तिचा सर्वात मोठा अडथळा आपल्याला असेल असे यातील अनेकांना वाटत होते. त्यामुळे यातील अनेकांनी ’देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचे कार्य संपुष्टात येईल नि तिला विसर्जित करावे’ अशी गांधीजींची इच्छा असल्याचे प्रतिपादित करायला सुरुवात केली. तरीही स्वतंत्र भारतामध्ये दीर्घकाळ काँग्रेस हाच प्रमुख राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात राहिला. आणि तिच्या विरोधकांनी ’या काँग्रेसमधील नेते हे स्वातंत्र्यपूर्वकालातील मूळ काँग्रेसचे वारस नाहीत. त्यांना मागे सारून सत्तालोलुपांनी त्यांची जागा बळकावली आहे’ असा सूर अनेक विरोधकांनीच नव्हे तर पूर्व-काँग्रेसींनीही लावला होता. साहित्य, नाटक, चित्रपटादि कथनात्म कलांमध्ये तो उमटतही राहिला.

काँग्रेसचाच कित्ता गिरवत भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाने कुण्या मागच्या थोर नेत्यांचा अथवा राजकीय पक्षाचा वारसा सांगतच आपले पहिले पाऊल टाकले आहे. रामजन्मभूमी यात्रेमुळे प्रस्थापित नेतृत्व असलेल्या अडवानींचा चेला म्हणून मोदींनी आपले बस्तान बसवले. पण अडवानींचा दावा असलेल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करुन घेतल्यानंतर त्यांना अडवानींची गरज उरली नाही. मग देशभरात स्वत:चे नेतृत्व अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी पटेलांच्या खांद्यावर बसणे पसंत केले. दुसरीकडे गुजरात कनेक्शनचा फायदा घेत गांधींनाही मिरवणे चालू ठेवले. आज मोदींचा वारसा सांगणारे फडणवीसांसारखे महाराष्ट्र-मोदी उभे राहू लागले आहेत. या सार्‍यांच्या पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदे यांनीही आनंद दिघेंचा वारसा मिरवण्यास सुरुवात केली आहे.

पण ज्यांच्या जागी ते आनंद दिघेंना बसवू पाहात आहेत त्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे -त्यांच्या नवीन गटासह- तीन गट आज अस्तित्वात आहेत. इतकेच नव्हे तर काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बस्तान बसलेले राणे, भुजबळ यांच्यासारखे नेते अजूनही आपण बाळासाहेबांचे सैनिक असल्याचे ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आपण त्या देवाचे प्रेषित, वारस अशी मखलाशी करत असतानाच उलट दिशेन बाळासाहेबांची शिवसेना वारशाने मिळालेल्या उद्धव ठाकरेंनी ’बाळासाहेबांचा मार्ग सोडला’ असल्याचा गवगवा करत शिंदे-गट, मनसे यांच्या जोडीला भाजपही उद्धव यांचा तो आधार खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत असतात.

महाराष्ट्रातील प्रमुख नेते असलेल्या शरद पवारांनी असा देव निवडलेला नाही. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातील त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारस म्हणून मिरवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो प्रयत्न फार लवकर सोडून दिला. त्यानंतर ते बव्हंशी स्वयंभू म्हणूनच राहिले. परंतु कदाचित त्यामुळेच त्यांच्या पक्षाच्या विस्तारावर मर्यादा पडल्या. त्याला नेतृत्वासाठी अर्वाचीन, संस्थानिक नेत्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली. कदाचित त्यामुळेच मोजक्याच जिल्ह्यांत, प्रामुख्याने अर्थकारणात प्राबल्य असलेल्या एकाच जातीचा पक्ष अशीच या पक्षाची इमेज तयार झाली आहे.

धार्मिक परंपरांमध्ये मुख्य देवांच्या सोबतीला निम्नदेवता असतात. त्यांना डेमि-गॉड म्हटले जाते. राजकारणामध्ये याच धर्तीवर गांधी, नेहरु, पटेल, बाळासाहेब ठाकरे, उत्तरेत मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, पूर्वेला ममता बॅनर्जी यांच्यासारखे ’सेमि-गॉड’ किंवा श्रद्धेय नेते असतात. त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर त्यांतून फुटून बाहेर पडलेल्या गटांतील राजकारणीही त्यांचा राजकीय वारस म्हणून ओळख प्रस्थापित करण्याचा आटापिटा करत असतात. या श्रद्धेय नेत्यांच्या यादीत आनंद दिघे या नावाची भर घालण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत.

प्राचीन काळापासून प्रत्येक देवाबरोबरच त्याच्या कर्तृत्व झळाळी देण्यासाठी सहाणेसारखा, धार लावण्याच्या दगडासारखा त्याचा एक शत्रू, असा एक सैतान असावा लागतो. बायबलमधला सेटन, बुद्धाला तत्त्वच्युत करु पाहणारा मार किंवा त्याच्या विचारांशी संघर्ष करणारा देवदत्त, आणि जवळजवळ प्रत्येक हिंदू देवाने पराभूत केलेला त्याचा त्याचा (अनेकदा असुर वा राक्षस म्हटला गेलेला) शत्रू हा त्याचा सैतान असतो. भारतीय राजकारणामध्ये जुन्या काँग्रेसला अशी निवड करावीच लागली नव्हती तिचा जन्मच त्यांच्या विरोधात प्रतिकारासाठी झाला होता ते ब्रिटिश शासन तिला अनायासे सैतान म्हणून मिळाले होते.

सेनेला, भाजपला वा इतर स्थानिक पक्षांना आपले देव निवडावे लागले तसेच सैतानही. म्हणून मग भाजपने हिंदुत्ववादाची घोषणा करत काँग्रेस आणि नेहरु यांना राजकीय सैतान, तर मुस्लिमांना सामाजिक-सैतान म्हणून निवडले. सेनेने ’हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत दाक्षिणात्यांना लक्ष केले, राज ठाकरे वेगळे झाल्यावर त्यांनी मराठीवाद आणून अमराठींना- विशेषत: उत्तर भारतीयांना सैतानाची शिंगे चिकटवून दिली.

पण केवळ देव नि सैतान निर्माण करणे पुरेसे नसते. त्या देवाची काही एक शिकवणही निर्माण करावी लागते. ’देवाचा शब्द’ अशी बतावणी करत प्रेषितच ही शिकवण निर्माण करतो नि रुजवत असतो. राजकारणाती आदर्श वा श्रद्धेय पूर्वसुरी ही माणसेच असल्याने ही शिकवणही अनायासे मिळते. बाळासाहेबांनी प्रथम मराठीवाद नंतर हिंदुत्ववाद स्वीकारुन महाराष्ट्रात तोवर नसलेला राजकीय विचार पुढे आणला (संघाचा हिंदुवाद असला तरी हिंदुत्ववाद ही राजकीय विचारसरणी प्रथम सेनेच्या रमेश प्रभू यांनी निवडणुकीच्या राजकारणात आणली.) 'तीच घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत' अशी बतावणी त्यांचा वारसा सांगणारे तीनही गट करत आहेत. याउलट शरद पवार जरी महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्वाचा राजकीय नेता म्हणून ते प्रस्थापित झाले असले, तरी त्यांना स्वत:चा असा वेगळा राजकीय दृष्टिकोन रुजवता आलेला नाही. राष्ट्रवादी ही कायमच एक ’काँग्रेस’ राहिली आहे. त्यामुळे त्यांना सदोदित काँग्रेसशी जुळवून घेतच राजकारण करावे लागले आहे.

जे पवारांचे झाले तेच राज ठाकरे यांचे आधीच झाले आहे, उद्धव ठाकरेंना पदच्युत करुन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांचेही होणार आहे. पर्यायी सेना उभी करण्याच्या प्रयत्नात मूळ सेनेचा तोंडवळा नि दृष्टिकोन सोडला नाही, तर त्यांचे असे स्वत:चे स्थान निर्माण होणे अवघड आहे. त्यामुळेच सोपा पर्याय म्हणून ते सेनेचाच वारसा आपल्याकडे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

समाजात प्रत्येक माणूस समावेशक (inclusive) आणि वेगळेपण (exclusive) अशा दोन्ही अस्मितांचा आधार घेत असतो. राजकारणातही तसेच असावे लागते. शिवसेनेचे सैनिक ही शिंदेंची समावेशक ओळख आहे. वेगळेपण कोणते हे त्यांना लवकर शोधावे लागणार आहे. अन्यथा ’बाळासाहेबांचा वारसा असणारी मूळ सेना असताना तुमच्याकडे आम्ही का यावे?’ या मतदारांच्या (दुर्दैवाने आता नागरिक हे केवळ मतदार म्हणूनच उरले आहेत) प्रश्नाला ठोस उत्तर देता येणे अवघड आहे. सध्या तरी ते केवळ बाळासाहेबांचा वारस म्हणून प्रस्थापित होण्याचा आटापिटा करत आहेत.

CMShindeToDighe

पण त्यांच्या निर्णयप्रक्रियेबाबत एक महत्वाचे वेगळेपण दिसते. उद्या बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आपल्या गटाला मान्यता मिळवण्याचा, स्वत:ला बाळासाहेबांचा नवा वारस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न फसलाच, तर प्लॅन-बी म्हणून त्यांच्यापुरता नवा सेमि-गॉड निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे. प्रत्यक्ष बंडापूर्वीच त्यांनी ’धर्मवीर’ या चित्रपटाद्वारे आनंद दिघे यांना नवा हिंदुहृदयसम्राट, नवा सेनापती म्हणून मिरवणे सुरु केले. त्यांच्या राजकीय बंडाच्या काळात आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावरही आपण आनंद दिघेंचे वारस असल्याचे ठसवण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करत आहेत. त्यासाठी केवळ ठाणे पट्ट्यातच ज्यांची ओळख होती, त्या दिघेंना त्यांना महाराष्ट्रभर न्यावे लागणार आहे.

जुन्या काळात भगताला जसा स्वत:ची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आधी स्वनिर्मित देवाला प्रस्थापित करावे लागले, तसेच या नव्या प्रेषिताला आधी आपला नवा देव प्रस्थापित करावा लागणार आहे. त्यासाठी स्वत:बरोबरच त्यांच्या देवाची सत्ताही वाढवत न्यावी लागणार आहे. या प्रयत्नात त्यांनाही एका सैतानाची गरज पडणार आहे, उद्धव ठाकरेंच्या रूपाने त्यांना तो उपलब्ध आहे. परंतु निर्णायकरित्या जुन्या सेनेशी फारकत घेऊन नव्या सेनेचे हिंदुहृदयसम्राटच म्हणूनच नव्हे तर स्वयंभू धर्मवीर म्हणून आनंद दिघेंची आणि त्यांचे प्रेषित वा राजकीय वारस म्हणून शिंदेंची वर्णी लागण्यापूर्वी बर्‍याच प्रासंगिक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळवावी लागणार आहे.

- oOo -

(१) भारतातील अग्नि, वायु, सूर्य वगैरे वैदिक देव हे प्रामुख्याने प्राकृतिक होते, तसेच ग्रीक देवांच्या टायटन्स या पहिल्या पिढीतील देवही. त्यांच्याकडेही युरेनस आकाशाचा देव, तर गाया धरित्रीची देवता. त्यांची अपत्ये विविध प्राकृतिक घटकांचे देव अशी रचना होती.


हे वाचले का?

शनिवार, २ जुलै, २०२२

फडणवीसांची बखर - ४ : मी पुन्हा आलो पण...

यापूर्वीचे भाग:

फडणवीसांची बखर – १ : भाजप नेतृत्वाचा प्रवास
फडणवीसांची बखर – २ : नवा साहेब
फडणवीसांची बखर – ३ : मी पुन्हा जाईन
---

डिसेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्तासंघर्ष जोरावर असताना 'द वायर-मराठी’मध्येच तीन दीर्घ भागांत ’फडणवीसांची बखर’ लिहिली होती. २००९ पूर्वी आमदारही नसलेले फडणवीस २०१४ मध्ये मोदींच्या कृपाहस्ताने थेट मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाले होते. पाच वर्षे यशस्वीपणे मुख्यमंत्री पदावर राहून २०१९ मधील विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. या पाच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षाला पुरते नामोहरम करतानाच, सहकारी पक्ष असलेल्या सेनेला त्यांच्या आमदारसंख्येच्या तुलनेत संख्येने नि महत्वाने कमी मंत्रिपदे घ्यायला भाग पाडून त्यांनी आपली पकड मजबूत केली होती.

काही दशके ज्या सेनेचा दुय्यम सहकारी म्हणून भाजप वावरला त्या सेनेला जागावाटपामध्ये कमी जागा देऊन आपली बार्गेनिंग पॉवर त्यांनी दाखवून दिली होती. पुणे, नाशिक, नागपूर या तीन मोठ्या शहरांत सेनेला एकही जागा न देता सेनेच्या बालेकिल्ला असलेल्या मुंबईत मात्र निम्म्या जागा पदरात पाडून घेऊन त्यांनी आता भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे अधोरेखित करुन घेतले होते. एकुणात मोदीकृपेने सुरु झालेली फडणवीसांची दौड वेगाने चालू होती. महाराष्ट्र-भाजपमधील सर्वोच्च नेते हे अलिखित बिरुद ते मिरवू लागले होते.

परंतु त्यांच्या दुर्दैवाने त्यांचा आत्मविश्वास हा अहंकारी तर ठरलाच, पण अतिमहत्वाकांक्षेने जवळपासचे मित्र गमावून आयात-मित्रांवर अवलंबून राहिल्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत आणि नंतरही त्यांना बसला. त्याबाबतचे सारे विवेचन ’फडणवीसांची बखर’ या तीन भागातील त्या लेखसंग्रहात आले आहे.

FadnavisEatingSweets

त्यावेळी गमावलेली सत्ता येनकेनप्रकारेण मिळवायचीच या जिद्दीने ते कामाला लागले होते. प्रत्येक आघाडीवर मविआ सरकारला धारेवर धरत विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकांमध्ये आपले डावपेचाचे कौशल्य वापरत सरकारचे खच्चीकरण करत ते सत्तेची संधी शोधत राहिले. तशी संधी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाने मिळाली. त्यामध्ये पुन्हा एकवार आपल्या राजकारणी डावपेचांचे कौशल्य वापरुन सत्तेचा सोपान सर करु अशा भ्रमात ते राहिले. परंतु गेले दहा दिवसांहून अधिक काळ चाललेल्या राजकीय घडामोडी आणि त्याचा जूनअखेर झालेला अंत पाहता फडणवीसांच्या मनात पुन्हा एकदा ’हाथ आया मूँह न लगा’ अशीच भावना निर्माण झालेली असेल.

अमितशाहीचा उदय

मोदींच्या उदयानंतर देशभर भाजपची घोडदौड सुरु झाली असली तरी सत्ताकारणाचे मुख्य शिल्पकार होते त्यांचे सहकारी अमित शहा. या जोडीने परस्परसहकार्याने गुजरातमध्ये जसे बस्तान बसवले तसेच ते केंद्रातही बसवू पाहात होते. संघाचा विरोध न जुमानता मोदी यांनी शहांना भाजप अध्यक्षपदावर नेमले तेव्हापासून तिथेही त्यांची जोडी सोबत काम करु लागली. मोदी-शहा जोडगोळींमध्ये कार्यविभागणी जसजशी अधिक स्पष्ट होत गेली तसतसे मोदी प्रामुख्याने पंतप्रधान आणि संसदीय नेता याच भूमिकेमध्ये राहू लागले, तर निवडणुका, सत्ताकारण हे संपूर्णपणे शहा यांच्या ताब्यात गेले. त्यातून ते देशांतर्गत राजकारणातील भाजपचे सर्वोच्च नेते ठरले. त्यातून विविध राज्यांमध्ये सत्तासमीकरणे बदलत गेली. मोदींनी ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अटल-अडवानी काळातील नेत्यांना बाजूला सारून - फडणवीसांसारखी- आपली माणसे पुढे आणली (याचे विवेचन ’फडणवीसांची बखर’च्या पहिल्या भागात आले आहे.) त्याच धर्तीवर अमित शहा मोदींनी निवडलेल्या माणसांना दूर सारून आपली माणसे पुढे आणू लागले.

आसाममध्ये सर्वानंद सोनेवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता-अवरोधाचा (anti incumbancy) सामना करुन भाजपने पुन्हा बहुमत मिळवले. तरीही त्यांच्या जागी जेमतेम पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हेमंत बिस्वा सरमा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्रिपुरामधील भाजप विजयाचे श्रेय ज्यांना दिले जाते, त्या संघ-स्वयंसेवक सुनील देवधर यांच्या सल्ल्याने निवडलेले विप्लब देव यांना बदलले.

महाराष्ट्रामध्येही अमित शहा यांनी फडणवीसांच्या जोडीला आपले विश्वासू असलेल्या चंद्रकांत पाटील यांना आणून बसवले. २०१९ मध्ये हरयाना आणि महाराष्ट्र या दोनही विधानसभांच्या निवडणुका झाल्या. दोनही ठिकाणी भाजप सत्तेच्या जवळ पण थोडा मागे राहिला. हरयानामध्ये बहुमतासाठी लागणारी तूट भरुन काढण्यासाठी अमित शहा तातडीने तिथे धावत गेले नि दुष्यंत चौताला यांच्या जेजेपीशी युतीचे गणित जमवून सरकार स्थापनेचा मार्ग खुला केला. परंतु त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्याचवेळी अमित शहांचे महत्त्व वाढेल तसे फडणवीसांचे कमी होणार हे उघड होत गेले होते.(फडणवीसांची बखर’च्या दुसर्‍या भागात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या परस्परसंबंधाबाबत थोडे विवेचन आले आहे. )

ऑपरेशन लोटस

काँग्रेस वा त्यातून निघालेले उपपक्ष हे भाजपशी वैचारिकदृष्ट्या विरोधीच असल्याने त्यांचे शक्य त्या प्रकारे खच्चीकरण हा भाजपाचा नियमित कार्यक्रम असतोच. त्यामुळे त्यांचे आमदार फोडून ज्या राज्यांत सत्ता मिळवणे शक्य आहे तिथे ते साधून त्यांनी सत्ताही मिळवली. विरोधकांचे खच्चीकरण आणि सत्ता असा दुहेरी फायदा त्यांना यातून मिळत असतो. सत्ता हस्तगत करण्याचे हे हत्यार त्यांनी मणिपूर, अरुणाचल, गोवा, कर्नाटक, म.प्र. या राज्यांत आधीच वापरले आहे. याला ’ऑपरेशन लोटस’ असे गोंडस नाव देऊन यातील सत्तालोलुपता झाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो.

फडणवीसांनीही सत्तेत परतण्यासठी ’ऑपरेशन लोटस’चा घाट घातला होता. फक्त फरक इतकाच की त्यांनी आमदार फोडण्यासाठी दोन्ही काँग्रेसऐवजी सेनेची निवड केली. फडणवीसांनी सेनेऐवजी राष्ट्रवादी वा काँग्रेस फोडून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित केंद्राचा- अमित शहांचा फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला रुकार आला असता याची शक्यता अधिक होती.

पण २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर युती मोडून सेनेने दोन काँग्रेससोबत सत्तास्थापन करुन फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे सत्ता गमावलेल्या नि अहंकार दुखावलेल्या फडणवीसांनी सत्ता मिळवण्यासोबतच सेनेला धडा शिकवण्याचा हेतू मनात धरून फोडाफोडीसाठी तिचीच निवड केली, आणि आता पश्चातबुद्धीने पाहता हीच त्यांची मोठी चूक ठरली.

सेनेबाबत आस्ते कदम

वैचारिक अक्षावर सेना ही भाजपच्याच बाजूला असल्याने, कितीही वाद असले, तरी बहुमताला कधीही जागा कमी पडल्या तर हक्काचा सहकारी म्हणून सेनेला साद घालता येते. एका सोयीचा सहकारी म्हणून भाजपच्या दृष्टीने सेनेचे अस्तित्व महत्वाचे ठरते. शिवाय तिचे खच्चीकरण करणे हे हिंदुत्ववादी मतदारांमध्ये कितपत स्वीकारले जाईल, त्यावर किती रोष होईल, याचा अंदाज न घेता केलेली अशी कृती महागात पडू शकते. त्यामुळे सेनेशी थेट संघर्ष करणे सध्या टाळावे असा श्रेष्ठींचा होरा असावा. दुसरे असे की आर्थिकदृष्ट्या कळीच्या असलेल्या मुंबईमध्ये सेनेचे आमदार कमी झाले, तरी तेथील व्यावहारिक जगामध्ये तिचा प्रभाव इतका सहजी कमी होणार नाही याची जाणीव श्रेष्ठींना आहे. त्यामुळे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वर्चस्व मिळवू इच्छिणार्‍या भाजपला सेनेला इतक्यात चितपट मारण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकेल अशी जाणीव अमित शहा आणि त्यांच्या दिल्लीतील सल्लागारांना असावी.

शिवसेना आणि जदयु या दोन सहकारी पक्षांबाबत भाजपश्रेष्ठींनी एकुणातच आस्ते कदम धोरण स्वीकारले आहे. दोनही पक्षांमध्ये थेट फोडाफोडी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने त्यांची राजकीय भूमी बळकावण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. याचे एक कारण यांनी मोकळी केलेली राजकीय भूमी आपणच ताब्यात घेऊ शकतो याची पुरेशी खात्री वाटत नसावी. जदयुच्या जागा कमी होताना तेजस्वी यादवांच्या राजदच्या बर्‍याच वाढल्या होत्या, हे पाहता हा अंदाज योग्यच ठरला म्हणावा लागेल. त्याच धर्तीवर सेनेची भूमी ताब्यात घेण्यासा राष्ट्रवादी काँग्रेस सरसावेल की काय अशी सार्थ भीती शहांना असावी. यापूर्वी सेनेतून बाहेर पडलेले अनेक प्रभावशाली नेते राष्ट्रवादीची वाट धरून गेले आहेत याचा इथे उल्लेख केला पाहिजे. पैकी गणेश नाईक यांच्या पक्षांतराने नव्या मुंबईत नगण्य असलेला राष्ट्रवादी पक्ष थेट सत्ताधारी झाला. छगन भुजबळांच्या समता परिषदेमार्फत केलेल्या प्रयत्नांतून ओबीसी समाजाला आपल्याकडे आकृष्ट करुन ’मराठ्यांचा पक्ष’ ही ओळख पुसट करणे राष्ट्रवादीला शक्य झाले. इतरही अनेक माजी आमदार राष्ट्रवादीवासी झाले होते.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सम-समान जागांवर लढलेल्या भाजपने जदयुपेक्षा दुप्पट जागा मिळवूनही, आधी मान्य केल्याप्रमाणे नीतिशकुमारांना मुख्यमंत्रीपद दिले. त्याच धर्तीवर शिवसेनेला नि सेना कार्यकर्त्यांना इतक्यातच विरोधात ढकलण्याऐवजी नीतिशकुमारांबाबत अवलंबलेली जोडीदाराची राजकीय भूमी हळूहळू व्यापत जाण्याची भूमिकाच घेतली आहे. अशा वेळी फडणवीसांनी सेनेलाच फोडून सत्ता स्थापन करण्याचा घाट घालणे याचा अर्थ सेनेशी आता थेट सामना होणार याची निश्चिती होती. कदाचित म्हणूनच शिंदे आणि मंडळींना शिवसेना न सोडता सत्तासोबत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शरसंधान ठाकरेंवर नव्हे, सेनेवरही नव्हे तर त्यांचे सोबती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर केले गेले. यातून भाजपच्या सोबत येणारा नवा गट हा कोणत्याही प्रकारे मूळ सेनेचा विरोधक नाही हे ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. आणि कदाचित म्हणून शिवसेनेचे आमदार इतक्या प्रचंड संख्येने त्यात दाखल झाले.

याचाच एक भाग म्हणून शिवसेनेला फोडूनही त्यातील नेत्यालाच मुख्यमंत्री करण्याची चाल खेळण्यात आली. एवढेच नव्हे तर विधानसभा अध्यक्षपदाची माळही शिवसेनेतूनच भाजपमध्ये आलेल्या (आणि आदित्य ठाकरेंचे सेनेतील निकटवर्ती मानल्या गेलेल्या) राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात घातली आहे. एकुणात नवे सरकार हे एकनाथ शिंदेंना हवे तसे सेना-भाजप युतीचे सरकार आहे असेच चित्र तयार झाले आहे. ज्याचा अर्थ भाजपचे केंद्रीय नेते अजूनही सेनेला पुरे नामशेष करण्याच्या मनस्थितीत नाहीत असा आहे.

फडणवीस यांची वाटचाल

केंद्रात जसा मोदींचा एक चेहरा आहे, तसेच प्रत्येक राज्यात एक निश्चित नेता राखण्याचे मोदी-शहा यांचे धोरण दिसते. (त्याची कारणमीमांसा इथे ’त्राता तेरे कई नाम’ या लेखात वाचता येईल.) विधानसभेमध्ये सत्ता गमावूनही हरयानामध्ये मनोहरलाल खट्टर यांना पुन्हा संधी देण्यात आली. ’ऑपरेशन लोटस’नंतर स्थापन केलेल्या सरकारमध्येही येडियुरप्पा, शिवराजसिंह चौहान ही जुनीच नावे कायम ठेवली. पक्षाचा एकच चेहरा असल्याचे फायदे-तोटे दोन्हीही असतात. पण एक नक्की की त्यात अनिश्चितता नसते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात फडणवीस हाच चेहरा राहील हे मोदींनी गडकरींसह महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले होते.

मोदींच्या आशीर्वादाने आणि पाठबळाने फडणवीसांची घोडदौड २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत चालू होती. त्या निवडणुकांनंतर सत्ता गमावली तरीही भाजपवरील पकड त्यांनी कायम ठेवली होती. संपूर्ण राज्यभर फडणवीसांच्या सभा, कार्यक्रम यांचा धडाका लागला होता. राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फडणवीसांनी विरोधकांवर केलेले शरसंधान बातम्यांमध्ये दिसत होते. त्यातून ते पुर्‍या राज्याचे नेते असल्याचे अधोरेखित होत होते. आपापल्या जिल्ह्याच्या बाहेर न जाण्याच्या काँग्रेसी नेत्यांच्या परंपरेच्या तुलने ते अधिकच उठून दिसत होते. त्याचवेळी कोरोनाचा उद्रेकाने आलेली जबाबदारी आणि वैयक्तिक आरोग्यामुळे आलेले निर्बंध यांनी उद्धव ठाकरेंना बहुतेक वेळा मुंबईमध्ये राहावे लागत होते. त्याचा फायदा घेऊन गल्लीबोळातले भाजपनेत्यांनी ’घरबशा’ मुख्यमंत्री असा कालवा सुरू केला होता. फडणवीसांनी इतर पक्षांतून फोडून आणलेले नेते त्यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार वागत होते. या सार्‍या नाट्याचा अखेरचा अंक म्हणून सेना फोडून त्यांनी अखेर सत्तासंपादनापर्यंत मजल मारली.

असे असले तरी या दरम्यान त्यांचे अनेक दोषही अधोरेखित होत गेले. इतरांचे पंख कापताना दाखवलेली आक्रमकता स्वार्थ म्हणून गणली गेली. मोदी जसे केंद्रात आपल्याला हवे ते लोक आणतात, नको त्यांना दूर करतात; किंवा पक्षातील मागच्या पिढीतील नेत्यांना अडगळीत टाकून आपली दुसरी फळी तयार करतात, तसेच स्वत:ला महाराष्ट्र-मोदी समजू लागलेले फडणवीस करु लागले होते. पण यामध्ये गिरीश महाजन वगळता पक्षातून उभे राहिलेले नेतृत्व दिसत नव्हते. फडणवीसांभोवती असलेले कोंडाळे हे प्रामुख्याने आयात नेत्यांचे होते. यातून जुन्या भाजप नेतावर्ग नि कार्यकर्ता दुखावला गेला. भाजपने इतर राज्यात केले तसे सहकारी पक्षाला क्षीण करत नेण्याचे काम आपण करु या उन्मादात ते होते. या धोरणाला जरी हायकमांडचा तत्त्वत: पाठिंबा असला तरी हे जाहीरपणे करण्याची त्यांची तयारी नाही हे त्यांच्या ध्यानात आले नाही. सेनेने त्यांची खुर्ची काढून घेतल्याने सेनेलाच धडा शिकवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा निर्णय अहंकारी तर होताच, पण पक्षाच्या एकुण राजकीय आराखड्याला धक्का देणाराही होता.

त्यांनी सेनेशी थेट संघर्षाचे हत्यारच उगारले. त्यामुळे जुन्या सहकार्‍याचे बोट भाजप कायमचे सोडण्याच्या मनस्थितीत आल्याचा संदेश जाऊ लागला. वैचारिक विरोधक असलेल्या नीतिशकुमारांनाही अद्याप सोडण्याची तयारी न झालेल्या भाजपची, सेनेची सोबत इतक्यातच सोडण्याची इच्छा नाही हे फडणवीस विसरले. केवळ आमदारांना आपल्या बाजूला ओढून पक्ष संपतो, हा काँग्रेसबाबत खरा असलेला अनुभव सेनेबाबत खरा ठरेल असा फाजिल आत्मविश्वास त्यांनी बाळगला. ठाकरेंनी राजीनामा देताच आपले सरकार आलेच या उन्मादात जाहीरपणे पेढे भरवण्याचा कार्यक्रमही त्यांनी केला. Don't count your chickens before they hatch किंवा It ain't over till the fat lady sings या इंग्रजी उक्तींचा त्यांना विसर पडला.

याशिवाय त्यांची अति-महत्वाकांक्षा आड आली. योगी आदित्यनाथांप्रमाणेच मोदींना पर्याय म्हणून त्यांच्या बोलबाला होऊ लागला. ते प्रभारी असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने नेत्रदिपक यश मिळाल्यानंतर ते केंद्रात जाणार, मोठे मंत्रिपद मिळणार अशी भलामण होऊ लागली. २००९ मध्ये प्रथमच आमदार झालेल्या आणि पाच वर्षांतच मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या नेत्याची ही प्रगती जुन्या भाजप नेत्यांना अर्थातच खटकू लागली. त्यातच अलिकडे झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये त्यांनी खेळलेल्या डावपेचांना यश आले नि त्यांना ’सत्ता दोन बोटे उरली’ असल्याची भावना निर्माण झाली असावी. आणि त्यामुळेही ’नेता मोठा नाही पक्ष/संघटन मोठे’ या भाजपच्या नि संघाच्याही अलिखित नियमाला अनुसरून त्यांचे पंख छाटणे आवश्यक ठरले असावे.

हायकमांडची हाय-हॅंडेड कृती

असे असले तरी फडणवीसांनी खेळलेले डावपेच, गुजरात, बिहार, गोवा येथील विधानसभा निवडणुकांत प्रभारी म्हणून मिळवून दिलेले यश यांचा विचार करता त्यांना असे जाहीर अपमानित करणे योग्य नव्हते. यातून एकाच्या कष्टातून सत्ता आणायची नि दुसर्‍याच्या गळ्यात सत्तेची माळ टाकायची ही काँग्रेसमधील हायकमांड संस्कृती भाजपमध्ये पुरी रुजल्याचे संकेत दिले गेले आहेत.

जरी सेनेला पुरे नाराज न करण्याचे धोरण योग्य दिसत असले, तरी जेव्हा शिंदे आणि त्यांचा गट फुटण्याचा प्रस्ताव घेऊन राजकीय गणिते जमवण्यासाठी फडणवीस प्रथम शहांना भेटले तेव्हाच त्यांचा तो प्रस्ताव सरळ ठोकरुन लावता आला असता. परंतु तसे झालेले दिसत नाही. अगदी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतरही भाजप कार्यालयात चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या दुसर्‍या क्रमांकाचा नेता फडणवीसांना पेढे भरवताना दिसला. याचा अर्थ तोवर शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल निर्णय झालेला नव्हता.

तो झाल्यानंतरही फडणवीस यांनी स्वत: तो जाहीर करुन आपण बाहेरुन मदत करत असल्याचे जाहीर केल्यानंतर तासा-दोन तासांतच पक्षाध्यक्षांनी चॅनेलच्या माध्यमांतून त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचा आदेश द्यावा आणि फडणवीसांनी तो स्वीकारण्यापूर्वीच त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे ट्विट अमित शहा यांनी करणे हा फडणवीसांचा मुखभंग करण्याचाच प्रकार आहे. सत्तेपर्यंतचा प्रवास करु देऊन मगच त्यांच्या हातातील स्टिअरिंग काढून घेण्यात आले. वर ’सेना फोडल्याचे खापर अप्रत्यक्षपणे फक्त फडणवीसांचे नि त्याबद्दल त्यांना पदावनतीची शिक्षा देण्यात आली’ हा संकेत सेनेला देण्यात आला.

आता ’त्यांना उपमुख्यमंत्रीपदाबद्दल आधीच सांगण्यात आले होते तरीही, त्यांनी बाहेरुन पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने शहा-नड्डांचा नाईलाज झाला.’ अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न होतो आहे. पण याचा अर्थ पक्षादेश झुगारुन फडणवीसांनी बाहेरुन पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला असा होतो. फडणवीसांचे पंख कापणे हा मुख्य उद्देश असेल, तर लोकांनी हा अर्थ काढलेला हायकमांडला उपयुक्तच वाटणार आहे.

शहा आणि संघ

या सार्‍या घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आणि संघाची नेमणूक होते हे ही ध्यानात घ्यायला हवे. मोदींच्या उदयकाळी त्यांच्या राजकारणामध्ये संघाचे सल्ला मोलाचा मानला जात होता. संघाच्या स्वयंसेवकांच्या जाळ्याचा मोदी-विजयाचे जमिनीवरचे गणित जमवण्यात मोठा वाटा होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्ता-परिवर्तन झाल्यावर जुन्या पिढीला मागे सारण्याचा निर्धार केलेल्या मोदींनी संघाच्या शिफारसीवरुन प्रथमच आमदार झालेल्या फडणवीसांनी निवड केली होती. परंतु त्यानंतर उजवे हात असलेल्या अमित शहा यांना भाजपचे अध्यक्ष म्हणून नेमण्याच्या त्यांच्या इच्छेला संघाचा विरोध झाला होता. बर्‍याच वाटाघाटीनंतर संघाने नाइलाजाने त्याला रुकार दिला होता. त्याच्या बदल्यात उ. प्र. मधील विधानसभा निवडणुकीनंतर मोदी-शहांच्या इच्छेला डावलून योगी आदित्यनाथ यांचे नाव संघाने पुढे दामटले होते. त्यानंतर मोदी यांच्या दुसर्‍या सरकारमध्ये अमित शहांना गृहमंत्री म्हणून नेमताना संघाचे मतही विचारले गेलेले नाही.

गेल्या काही वर्षांतील वाटचाल पाहता, संघ नि मोदी-शहा यांच्यात काहीसा अनाक्रमणाचा करार झालेला दिसतो. संघाने सत्ताकारण नि राजकारण यात लक्ष घालायचे नाही आणि त्याबदल्या भाजप-सरकारच्या आशीर्वादाने संघाच्या वाढीसाठी आवश्यक ती सर्व मदत केंद्राने पुरवायची. याच धोरणामुळे संघ-स्वयंसेवक असलेल्या फडणवीसांना आयात नेत्यांवर आधारित राजकारण रेटता आले. परंतु आज फडणवीसांना मागे ढकलताना अमित शहा यांनी आपल्या नेमणुकीला विरोध करणार्‍या संघाचा हिशोबही चुकता केला आहे का? असा प्रश्न विचारता येईल. या दोहोंमध्ये संघर्ष होत नसला, होणार नसला, तरी कुरघोडीची खडाखडी होतच राहणार अशी चिन्हे दिसत आहे.

सत्ता स्थापनेनंतर

हायकमांडच्या (पक्षी: अमित शहा-नड्डा यांच्या) निर्णयाने नाराज झालेल्या महाराष्ट्र-भाजप नेत्यांनी अनेक ठिकाणी फडणवीसांचे अभिनंदन करणारे फलक लावताना त्यावरुन अमित शहा यांचा फोटो वगळलेला दिसला. भाजपसारखा शिस्तबद्ध पक्षामध्ये अप्रत्यक्ष का असेना, पण हायकमांडवर जाहीर नाराजी व्यक्त करण्याची ही दुर्मिळ घटना म्हणता येईल. हायकमांडची कृती जशी भाजपच्या काँग्रेसीकरणाची आठवण करुन देणारी आहे, तशी स्थानिक नेत्यांची ही कृतीही. लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र-भाजपचे सर्वोच्च नेते हे अलिखित बिरुद मिरवणार्‍या फडणवीसांची पकड श्रेष्ठींनी केलेल्या मुखभंगानंतरही कायम राहील याची ही चुणूक असू शकते.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी विधिमंडळातील अखेरच्या भाषणात फडणवीसांनी ’मी पुन्हा येईन...’ या शीर्षकाची कविता वाचली होती. निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी त्या ओळीचा आक्रमक प्रचारही केला होता. पण भाजपच्या कमी झालेल्या बळामुळे आणि सेनेच्या भूमिकेमुळे निसटलेली सत्ता मविआवर वैध-अवैध मार्गाने दडपण आणून अखेर त्यांनी मिळवली आहे. आणि तरीही ’मी पुन्हा येईन’ म्हणणार्‍या फडणवीसांवर आता ’मी पुन्हा आलो, पण...’ असे म्हणण्याची वेळ आलेली दिसते.

- oOo -


हे वाचले का?