मी प्रभातफेरीला जातो तो रस्ता चांगला चार-पदरी आहे. रस्त्याचा शेवटचा टप्पा एका वळणापाशी सुरु होतो नि साधारण चारशे मीटर अंतरावर स्टेडियमच्या दारात जाऊन तिथल्या वडाच्या झाडाला टेकून विश्रांती घेतो. त्यामुळे रहदारी नगण्य आणि म्हणून प्रभातफेरीला सोयीचा. सकाळी आमच्यासारखे नव-ज्येष्ठ नागरिक कानटोपी नि स्वेटर घालून, मफलर गुंडाळून काठी टेकत टेकत फिरत असतात.
पण हे श्वानवंशीयांचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या दोन्हीं टोकांना आणि अधेमध्ये पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या आधाराने यांचे टेहळणी बुरूज आपल्या राज्याचे संरक्षण करण्याचे काम डोळ्यात- आणि नाकांत- तेल घालून करत असतात. याचे उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगतो.
एके दिवशी माझी प्रभातफेरी चालू असताना मी रस्त्याच्या (किंवा भूमितीच्या भाषेत बिनचूकपणे सांगायचे तर ‘रस्ताखंडाच्या’) अंदाजे मध्यभागी असताना एका टोकाकडून जोरदार बोंब उठली. तिकडचे श्वानराज ठणाणा बोंबलू लागले. ते ऐकून माझ्या आसपासच्या, रस्त्याच्या दोनही बाजूंच्या पार्किंगच्या आडून, झाडाआडून, एका बाजूच्या बैठ्या घराकडून श्वानसेना ठणाणा बोंबलत रस्त्यावर धावली.
त्यातल्या एका श्वानाने समोरच चाललेल्या एका प्रभातफेरीकरावर सूर धरला. दुसरे श्वान ठणाणा बोंबलत समोर आलेल्या एका मोटारीच्या मागे धावत होते. आणखी एक श्वान नैऋत्येकडे मान उंच करुन (लांडग्यांची पोज) भुंकत होते. दुसरे एक त्या दिशेने निघून आग्नेयेकडे भुंकत भुंकत पळत होते. हे सारे अक्षरश: निमिषार्धात डोळ्यासमोर आलेले चित्र. एखादी रणगर्जना ऐकू यावी नि सैनिकांनी एकसमयावच्छेदेकरुन प्रतिपक्षावर तुटून पडावे तशी ही मंडळी अचानक सक्रीय झाली.
पण तरीही हा भुंकसंप्रदाय अचानक कुणावर तुटून पडला ते समजेना. सामान्यपणे एखादे पाळीव कुत्रे मालकासोबत प्रभातफेरीला आलेले दिसले वा एखाद्या आगंतुक भटक्या कुत्र्याने आपल्या राज्यात घुसखोरी केल्यामुळे ही भूमिपुत्र मंडळी सक्रीय होत असतात. पण इथे प्रत्येकाचे टार्गेट वेगळ्या दिशेला दिसत होते. त्यामुळे शत्रू नेमका कोणत्या दिशेने आला आहे हेच समजेना. मला तर सोडाच त्या सेनेलाही समजलेले दिसत नव्हते. एका कोपर्यातून सेनापतीने रणगर्जना केली आणि ही फौज समोर दिसेल त्याला शत्रू मानून तुटून पडलेली होती.
जंगल सोडून माणसांसोबत राहू लागली आणि कुत्र्यांनाही आपले शत्रू समजेनासे झाले आहेत किंवा असे म्हणू की शत्रू असे उरलेच नाहीत. आणि त्यामुळे ते स्वत:च कुणाला तरी शत्रू मानून वैर धरू लागले आहेत. कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष वैराखेरीज केवळ नेत्याने सांगितले म्हणून कुणालाही शत्रू मानू लागली आहेत. ’माणसाची संगत वाईट’ असं यलोस्टोनमधील एक लांडगा आपल्या पोरांना सांगताना एका माहितीपटात पाहिला होता, त्याची आठवण झाली.
पण श्वानवंशियांच्या या झेड-सिक्युरिटीचा त्रास केवळ नवागतांना अथवा immigrant मंडळींना, आम्हाला नाही. आमच्यासारख्या नियमित प्रभातफेरीला येणार्या मनुष्यप्राण्यांना या श्वान-मंडळींनी दीर्घ मुदतीचा व्हिसा दिलेला आहे. त्यामुळे कोणत्याही निषेध वा तपासणीशिवाय आम्हाला तिथे प्रवेश मिळतो.
पण नियमित येणार्यांमध्येही काही मंडळी मात्र व्हिसाशिवाय घुसखोरी करतात असे दिसून आले आहे. ही मंडळी आपापले घरगुती श्वानमित्रही सोबत घेऊन येतात. यांत तीन श्वान रोजच दिसतात. पैकी एक पमेरियन आहे, एक गावठी आहे. तिसर्याचा वंश मला माहित नाही पण हे साधारणपणे बेकरीत मिळणार्या खोबरा केकसारखे दिसते. म्हणजे अंगभर खोबर्याचा कीस भुरभुरावा तसे. आकाराने पमेरियनपेक्षा लहान पण मांजरापेक्षा मोठे.
ही तीनही मनुष्यमित्र कुत्री रस्त्याच्या - वा रस्ताखंडाच्या - खुल्या बाजूकडून प्रवेश करतात तेव्हा त्या बाजूच्या पहिल्या टेहळणी बुरुजाकडून शत्रू आल्याची बोंब उठते. मग सारे बुरुज गर्जू लागतात. यातले काही थेट मैदानात उतरून घुसखोराला धमक्या देऊ लागतात. पण सोबत 'महाशक्ती' असल्याने हा घुसखोर त्यांना भीक न घालता चार गाड्यांच्या चाकांचा वास घेऊन तिथे आपली मोहोर उमटवत जात असतो.
स्थानिक साम्राज्याचे सैनिक त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर उभे राहून त्याच्या या कृतीचा भुंकून भुंकून निषेध करत असतात. घुसखोर जसजसा पुढे सरकत भूमी पादाक्रांत करत जातो तसतसे पाठीमागून साम्राज्याचे सैनिक त्याने केलेल्या खुणांचा वास घेऊन लगेचच तो किल्ला सर करुन घेत जात असतात.
रस्त्याच्या दुसर्या टोकाला पोहोचेतो घुसखोराचा दिग्विजय पुरा झालेला असतो आणि तरीही मूळ साम्राज्याने काही गमावलेले नसते. खोबर्याच्या केकची मनुष्य-मित्र (महासत्ता???) स्थानिकांना बिस्किटे देऊन समेट घडवून आणते. स्थानिकांमध्ये नि घुसखोरांमध्ये तह होऊन परस्परांच्या पुच्छबाजूचा वास घेऊन त्यावर शिक्कामोर्तब झालेले असते. मग स्थानिकांपैकी कुणी एक या घुसखोराच्या नाकाला नाक लावून काही संवाद साधत असतो. आता तो प्रेमालाप असतो की आणखी काही हे मला कळणे शक्य नाही.
मला अर्थातच कुत्र्यांची भाषा समजत नाही. पण हा प्रसंग पुन्हा पुन्हा पाहिल्यावर, ऐकल्यावर नि नीट अभ्यास केल्यावर मला असं वाटतं आहे की घुसखोर आत येत असताना स्थानिक कुत्री बहुधा ‘सत्तर हजार कोटी, सत्तर हजार कोटी’ असं ओरडत असावीत आणि अखेरच्या प्रसंगात नाकाला नाक लावून ‘बरं झालं आलात, उशीरा आलात, पण बरं झालं आलात.’(१) असं म्हणत असावेत. एखादा श्वान-संवादक दुभाष्या म्हणून घेऊन मला ही माझी थिअरी तपासून पाहायची आहे.
- oOo -
(१). ज्या विरोधी नेत्यावर अगदी अलिकडे अलिकडे आरोपांची राळ उठवली होती त्याने पक्षबदल– खरंतर पक्ष-अपहरण– करून बाजू बदलल्यानंतर एका सत्ताधारी नेत्याने त्याची गळाभेट घेऊन त्याच्याबद्दल काढलेले प्रेमाचे उद्गार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा