रविवार, २४ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ७ : मोबाईल-विशेष

माझी ब्लॉगयात्रा - ६ : अनुक्रमणिका आणि सूची << मागील भाग

( मागील भागाच्या शेवटी या भागाचे जे नाव दिले होते ते ’काही अनुभव’ असे होते. माझ्या वैय्यक्तिक, व्यावसायिक आयुष्यात उत्पादक/सेवादाते-ग्राहक संबंधांबाबत मला जे अनुभव आले, त्यातून जे आकलन झाले त्यांच्या आधारे तो भाग लिहिण्याचे नियोजन होते. त्या आकलनाच्या आधारेच ब्लॉगलेखनाच्या शिफारस व प्रसिद्धीसाठी काही तंत्र वापरले आहे. परंतु तो भाग अपेक्षेहून खूप मोठा झाल्याने आणि एक स्वतंत्र लेख म्हणून विकसित झाल्याने या मालिकेतून गाळून टाकला आहे. तो जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा त्याची लिंक इथे समाविष्ट करेन.)

मोबाईलवर लेखनसूची?

मागील भागाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ’सूची देण्याचा जो श्रम केला, तो मोबाईल थीमवर वृथा गेला’ असल्याने आता मोबाईल थीमची ही मर्यादा कशी दूर करता येईल याचा विचार करु लागलो. मोबाईल थीम्स या स्वत:च एक सूची असतात. समास नाहीत की या सूचीच्या वरच्या बाजूस काही समाविष्ट करता येईल इतकी मोठी जागा नाही. जागा आहे ती फक्त एखादी पोस्ट ओपन केल्यावर तिच्या तळाशी. वाचक आधीच स्क्रोल (scroll) करुन तिथे पोहोचलेला असतो. त्यात पुन्हा सूची स्क्रोल करत बसण्याची त्याची/तिची मानसिकता उरत नाही. मांडणीच्या सुबकतेचा विचार केला तरीही ते बरोबर दिसत नाही. पुर्‍या सूचीचा नाद सोडून केवळ एका पोस्टचे सजेशनच पोस्टखाली दिले तर...?

कोणत्याही ब्लॉगवर सर्वात अलिकडच्या पाच (हा आकडा तुम्हाला बदलण्याची सोय आहे) पोस्ट एकाखाली एक दिसतात आणि सर्वात तळाशी ’older Post’ किंवा ’जरा जुनी पोस्ट’ असे एक बटण वा लिंक असते. मोबाईल थीमवर पोस्टस नव्हे, तर पाच पोस्टची सूची दिसते. पण तिथेही खाली हा पर्याय दिसतो. ते बटन दाबून जुन्या पोस्टकडे गेलात की त्यासोबतच ’नवीनतर पोस्ट्स’ किंवा ’Newer Posts' हा पर्यायही दिसतो. हे दोन पर्याय एक प्रकारे तुम्ही पुस्तकाचे पानच उलटून पुढच्या पानाकडे जात असल्याचा आभास निर्माण करतात.

परंतु यात दोन तोटे आहेत. ही बटणे एकाहुन अधिक पोस्टची सूची/पान उघडतात. त्यानंतरच तुम्ही कोणत्या पोस्ट पाहू वा वाचू शकता हे तुम्हाला समजू शकते. शीर्षकदेखील तेव्हाच दिसते. याशिवाय हा पर्याय पोस्ट्स फक्त कालानुक्रमेच दाखवत जातो. एखादा वाचक तुमचा ब्लॉग नियमित वाचत असेल, तर त्याच्या दृष्टीने हे पर्याय कुचकामी आहेत. त्याऐवजी तिथे जर रॅंडम क्रमाने एखादी पोस्ट तिथे सुचवली गेली, तर कदाचित बर्‍याच जुन्या, न वाचलेल्या, पण वाचून विसरलेल्या पोस्टही वाचकाला शिफारस म्हणून दाखवता येतील. तुमच्या ब्लॉगचा उशीरा शोध लागलेल्या वाचकाला हे उपयुक्त ठरेल नि तुमच्या जुन्या पोस्ट्सच्या ’टीआरपी’साठीही.

याच धर्तीवर आता प्रत्येक पोस्टखाली आणखी एका पोस्टचे रेकेमेंडेशन दिले की एकप्रकारे पोस्ट्सची साखळी तयार होईल नि वाचक एकामागोमाग एक पोस्ट्स वाचू शकेल. परंतु हे सोपे नव्हते. एकतर पोस्टच्या खालची जागा ही ब्लॉग-थीमच्या म्हणजे ब्लॉगर या ब्लॉगमंचाच्या अखत्यारीतील तर विजेट्स ही ब्लॉगमालकाला दिलेली स्वतंत्र ओसरी!. ब्लॉगमालकाने काय करायचे ते तिथे करावे, थीमला हात लावण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये हा उद्देश. याचे कारण असे की थीमच्या कोड/प्रोग्राममध्ये बदल करायचा तर काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. तिथे झालेली चूक संपूर्ण ब्लॉगला भोगावी लागते.

त्याचवेळी मी माझ्या दुसर्‍या ब्लॉगवर ’रॅंडम पोस्ट रेकेमेंडेशन’चे विजेट टाकले होते. तेच इथे वापरावे असा विचार केला. पण हा Code/program Javascript मध्ये होता. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे ही भाषा मी टाळण्याचा माझा प्रयत्न होता, कारण अनेक ब्राउजर (browser) ती टाळतात. आणि सोपी असल्याने एखादा किमान माहितगार प्रोग्रामर तिच्यात सहज बदल करुन तुमची वाट लावू शकतो. एवढेच नव्हे विजेटसाठी लिहिलेल्या त्या प्रोग्राममध्ये वापरलेले लॉजिक हे तसेच्या तसे थीममध्ये नेता येणार नव्हते. त्यामुळे ते थीमच्या भाषेत रुपांतरित करुन, थोडे बदल करुन, डेस्कटॉप/लॅपटॉपची थीम आणि मोबाईलची थीम अशा दोन्हीकडे मूळ थीम/मांडणीमध्येच घुसवून दिले. आता दोनही थीम्सच्या तळाशी ’हे वाचले का?’ शीर्षक असलेली एक चौकट येते. त्यात एका रॅंडम पोस्टचे शीर्षक आणि त्या पोस्टमधील थोडा मजकूर दिसतो. ही झलक पाहून वाचकाला ती पोस्ट वाचावी की नाही याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. आधीच्या अगदीच माहित नसता मागे जाण्यापेक्षा हे थोडे बरे म्हणावे असे.

HeWaachaleKaa

पण पोस्ट-शिफारसीचा हा पर्याय तेव्हाच उपयोगाचा असेल, जेव्हा वाचक ब्लॉगच्या मुख्य पानावरुनच प्रवेश करेल. एखाद्याकडे विशिष्ट पोस्टची लिंक असेल, नि ती क्लिक करुन तो वाचक थेट त्या पोस्टवरच आला, तर हा पर्याय त्याला/तिला उपलब्ध असणार नाही. आणि असा थेट येणारा वाचक तेवढेच वाचून चालता होण्याची शक्यता अधिक असल्याने, त्याला ब्लॉगवर पकडून ठेवण्यासाठी(ही कल्पना माझ्या व्यावसायिक आयुष्यात भेटलेल्या ’अकाउंट मॅनेजर’ या संकल्पनेमधून सुचली.) प्रत्येक पोस्टच्या तळाशी ही पोस्ट शिफारस यायला हवी हे मला लक्षात आले. त्यामुळे आता ’हे वाचले का?’ची चौकट मी प्रत्येक पोस्टच्या खाली समाविष्ट केली. यासाठी हा पर्याय केवळ दोन्ही थीम/मांडणींमध्येच नव्हे, तर पोस्टच्या मूळ आराखड्यामध्येच (template) मध्येही घुसवून दिले.

आणि एकदा हा पर्याय स्वीकारला तर केवळ मोबाईलसाठीच का, डेस्कटॉप/लॅपटॉप मांडणीतही तो सहज घुसवता आला. एरवी त्या मांडणीमध्ये विविध प्रकारच्या अनुक्रमणिका होत्याच. त्यामुळे तिथे तो गरज म्हणून नव्हे तर उपलब्ध आहे म्हणून आणि ’जाहिरात’ म्हणून समाविष्ट केला. आता नकळत मी प्रसिद्धी/जाहिरातीच्या टप्प्यामध्ये प्रवेश केला होता. पुढे इतर अनेक वेबसाईटवर हा प्रकार वापरलेला 'मला दिसू लागला’. या तंत्राचा चांगलाच उपयोग होऊन ब्लॉगचा दरमहा वावर चांगला वाढला.

RelatedPosts

पण मला हे पुरेसे वाटत नाही. कारण यात वाचकाच्या आवडीचा वा प्राधान्याचा विचार नाही. ज्याअर्थी त्याने सध्याची पोस्ट वाचली आहे, त्याअर्थी त्याच्या विषयामध्ये त्याला रस असावा असा तर्क करता येतो. त्यामुळे खरेतर सर्वस्वी रॅंडम पोस्टची शिफारस करण्याऐवजी, त्या वाचलेल्या पोस्टच्या वर्गीकरणांपैकी किमान एक वर्गीकरण समान असलेली पोस्ट सुचवली, तर ती उघडली जाण्याची शक्यता आणखी वाढते.

यासाठी प्रत्येक पोस्टला चिकटवलेल्या टॅग्स अथवा लेबल्सचा उपयोग करुन घेता येतो. दोन पोस्ट्सना एखादे लेबल सामायिक असेल तर त्यांच्यात काही समान आहे असे गृहित धरता येते. याचा वापर करुन प्रत्येक पोस्टला ’संबंधित लेखन/पोस्टस’ सुचवणे शक्य आहे. या कल्पनेच्या आधारे प्रत्येक पोस्टच्या खाली तीन संबंधित पोस्ट्स वाचकाला सुचवण्याची सोय करुन ठेवली.

केल्याने शिफारस

आपल्या लेखनाची जाहिरात करायची तर सुरुवात आपल्याच ब्लॉग अथवा ब्लॉग्समधून करता येईल. ही वेबसाईट आपल्याच ताब्यात असल्याने, आपल्याला हवे तिथे अन्य लेखांची शिफारस अथवा जाहिरात करता येते. कोणत्याही वेबसाईट अथवा ब्लॉगवर जाहिरात ही दोन प्रकारे दाखवली जाते. पहिला प्रकार म्हणजे टेक्स्ट-इन (Text-In), म्हणजे मजकुरामधील दोन पाठोपाठच्या परिच्छेदांच्या मध्ये आणि दुसरा म्हणजे मूळ विंडोवर दुसरी तरंगती (pop-up) विंडो दाखवून त्यावर.

पहिला प्रकार बराच जिकीरीचा आहे. या पर्यायामध्ये उत्पन्नासाठी स्वीकारलेली त्रयस्थ जाहिरात दाखवायची तर प्रोग्राम गुंतागुंतीचा होतो. कारण अशा जाहिराती मजकुराचा भाग नसून जेव्हा वाचक ते पान उघडतो त्या क्षणी निवडल्या जाऊन तिथे दाखवल्या जातात. तेच पान पुन्हा उघडले तर तीच जाहिरात दिसेल याची शाश्वती देता येत नाही, किंबहुना दिसूच नये अशी इच्छा असते. परंतु आपण त्रयस्थ नव्हे तर आपल्याच अन्य पोस्टची जाहिरात दाखवणार असल्याने जाहिरातही आपल्याच कह्यात असते. वर म्हटले तसे पोस्टच्या नि ब्लॉगच्या खाली जी रॅंड्म पोस्ट रेकेमेंडेशन जाहिरास्त म्हणून दाखवतो आहे, तीच पोस्टच्या अधेमध्ये दाखवणेही सहज शक्य आहे. परंतु निदान माझा ब्लॉग व्यावसायिक नसल्याने, आणि एक वाचक म्हणून मजकुराच्या मध्येच येणारा असा प्रकार मला स्वत:ला आवडत नसल्याने, पोस्ट/लेखन पुरे झाल्यावरच ती जाहिरात दाखवण्याचा पर्याय निवडला आहे.

अनेक वृत्तपत्रांच्या वा तत्सम वेबसाईट्सवर लेख/बातमीच्या अधेमध्ये अन्य लेख/बातमीच्या लिंक्स अथवा व्हिडिओही घुसवून दिलेले दिसतात. अनेकदा त्या लिंक्स अनेकदा त्या मजकुराचा भाग नाहीत हे ही ध्यानात येत नाही. याचे कारण हीच मंडळी ’क्रॉस रेफरन्सिंग’(Cross-referencing) हा प्रकारही अनेकदा वापरताना दिसतात. म्हणजे एका बातमी अथवा लेखामध्ये अन्य बातमी वा लेखाचा उल्लेख आला (किंवा हेतुत: आणला), की तिथे उल्लेखालाच लेखाची/बातमीची लिंक चिकटवून दिलेली असते. या दोन प्रकारांची गल्लत होऊन वाचकाला वाचताना त्रास होतो. मी स्वत: हा शक्य तिथे हा क्रॉस रेफरन्सिंगचा पर्याय वापरतो. आणि म्हणून मजकुराच्या अधेमध्ये पोस्ट रेकेमेंडेशनची जाहिरात घुसवणे टाळतो.

हा मजकुराच्या गोंधळ टाळायचा असेल तर पॉप-अप (pop-up) विंडोचा वापर काही वेळा केला जातो. (पुढे maharashtratimes.com च्या केस स्टडीमध्ये याचा उल्लेख येईल.) परंतु हा ही प्रकार वाचकाला तापदायक असतो. एखादा लेख बातमी/वाचत असताना मध्येच एक विंडो येऊन ’या बातम्या वाचल्या का?’, ’महत्त्वाच्या बातम्या’ वगैरे शीर्षकाखाली दुसर्‍या कशाची शिफारस केली जाते. वैतागून ’अरे बाबा, जे वाचतोय ते तर पुरे होऊ दे.’ असे म्हणावेसे वाटते. अर्थात त्यांना याची थोडी जाणीव असल्याने एक लेख उघडल्यावर थोड्या वेळाने हा पॉप-अप येतो, बहुधा तो लेख वाचण्यास लागणार्‍या वेळाचा अंदाज घेऊन त्या नंतर.

SlideIn

पण असा अंदाज लढवण्यापेक्षा वाचक लेखाच्या/बातमीच्या तळाला पोहोचला, की मगच हा पॉप-अप देणे शक्य आहे. काही वेळा हा पर्याय वापरला जातो. परंतु यात किंचित धोका असा की वाचकाने वाचन मध्येच सोडून दिले, तर ही शिफारस येत नाही, आणि वाचक निसटून जाण्याची शक्यता वाढते. तरीही मध्येच येणारा पॉप-अप हा आता बहुतेकांचा नावडता प्रकार आहे. लॉगिन सक्तीचे असलेल्या वेबसाईट्स वगळता आता तो फारसे कुणी वापरत नाही.

त्याऐवजी ’स्लाईड-इन’(Slide-in) विंडोचा वापर होतो. लेख/बातमी जसजसा खाली स्क्रोल होत जातो तसतसे उजव्या बाजूच्या खालच्या कोपर्‍यातून (काही ठिकाणी उजव्या अथवा डाव्या बाजूला कडेला गेल्यावर) पॉप-अप सारखीच एक छोटी विंडो सरकत आत येते. यावर जाहिरात वा शिफारस दिली जाते. ही छोटी विंडो कोपर्‍यात असल्याने मूळ मजकुराला अडथळा करत नाही. तसंच पुन्हा उलट दिशेने स्क्रोल केले, तर ती गायबही होते.

पण या दुसर्‍या प्रकारात एक मोठा अडथळा आहे तो पॉप-अप ब्लॉकरचा. बहुतेक ब्राउजर आता पॉप-अप ब्लॉकर्स (pop-up blockers) सह येत असल्याने, हे पॉप-अप अथवा स्लाईड-इन पॉप-अप उघडलेच जात नाहीत. परंतु यावर आता बहुतेक प्रसिद्ध वेबसाईट्सनी उपाय शोधला आहे. या विंडोज पॉप-अप म्हणून न उघडता सरळ नवे पान म्हणून उघडतात, आणि आपल्या स्क्रिप्ट/कोड द्वारे त्यांचा आकार लहान करतात. अर्थात हे व्यावसायिक वेबसाईट्सना शक्य आहे. ब्लॉगमध्ये इतके गुंतागुंतीचे प्रोग्रामिंग करणे म्हणजे ’मियाँ बोटभर नि दाढी हातभर’ अशी अवस्था व्हायची. तरीही काही स्लाईड-इन विजेट्स उपलब्ध आहेत. परंतु ती अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याने मी वापरलेली नाहीत.

तुमचे एकाहुन अधिक ब्लॉग असतील, तर एका ब्लॉगवरील लेखनाची सूची अथवा शिफारस दुसर्‍या ब्लॉगवर देऊन एका ब्लॉगच्या वाचकाला दुसर्‍या ब्लॉगवर खेचून नेता येते. यात वर दिलेले पोस्ट शिफारसींचे सर्व पर्याय वापरता येऊ शकतात. त्या पलीकडे मी वापरलेला पर्याय म्हणजे मार्की (Marquee) अथवा सरकती पट्टी. मी हा पर्याय निवडला याचे कारण पुन्हा मोबाईल थीमची मर्यादा. अशा जास्तीच्या माहितीसाठी मला तिथे फक्त पोस्टसूचीच्या वर जागा मिळते. तिथे मला उभी सूची देणे शक्य नसते, कारण याच ब्लॉगमधील लेखांची सूची खाली सरकून कदाचित स्क्रीनबाहेर जाईल. म्हणून मी उभ्याऐवजी आडव्या सूचीचा विचार केला.

पण मोबाईल स्क्रीनची रूंदी फारच कमी असल्याने, ती सूची स्थिर असली तर जेमतेम एकाच लेखाचे शीर्षक तिथे दिसू शकेल. त्याऐवजी तिला सरकती ठेवली तर अन्य ब्लॉगवरील अलीकडच्या काही पोस्टच्या लिंक्स मी तिथे देऊ शकतो. हा प्रकार द्यायला तसा सोपा कारण तो HTML भाषेत ही तयार मिळते. पण यात फार काही बदल करता येत नाही्त. शिवाय हे आता 'बाहेरच्या वाटेवर' (deprecated) असल्याचे जाहीर केले असल्याचे समजल्यामुळे, ते बदलून CSS कोड वापरून ही मार्की अथवा सरकती पट्टी तयार केली. माझ्या दोनही ब्लॉग्सवर एकमेकांच्या अलिकडच्या लेखांची सूची या सरकत्या पट्टीद्वारे मी देऊन ठेवली आहे.

(क्रमश:)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा