शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

ब्रह्मांडाचे वांझ अंडे

  • CosmicEgg
    ब्रह्मांडाच्या अंड्याला
    फलित न करु शकलेला शुक्राणु,
    विश्वाच्या पसार्‍याला रचून ठेवता येईल
    इतक्या विस्ताराचे कपाट
    
    कपाटाला पुन्हा विश्वातच जागा
    द्यावी लागेल ही कॅच-२२ सिचुएशन,
    हे सारे आपल्याच जबाबदारीचा भाग
    असे समजणारा कुणी मी.
    
    क्रोएशियाच्या राजधानीत मिळणारे बेकन,
    कुर्डुवाडीच्या स्टेशनवर मिळणारे बेसन,
    राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नावर
    नेमके मूग गिळून बसणारे बंडातात्या...
    
    डायनासोरची वंशावळ सांगणारे
    आणि ‘कृण्वन्तु विश्वमजुरासिकं’ ची
    गर्जना करणारे क्रीट काका;
    त्यांना ‘डायनासोर जुरासिक काळात नव्हते’
    असं सांगत मोडीत काढणारे
    शेरसिंग समीक्षक
    
    पाण्याच्या एका थेंबासरशी
    विरघळणारी काळी आई,
    आणि ‘आईन्स्टाईनच्या बैलाला ढोल’
    म्हणणारे संशोधक गोमयानंद सरस्वती;
    रक्ताचा थेंब पाहून भोवळ येणारे
    पण इतरांच्या रक्ताचे पाट वाहवू
    इच्छिणारे मॅक्डोनल्ड काका
    
    जगाची उसवलेली गोधडी शिवून देणार्‍या
    ‘विश्वमाता टेलर्स’च्या जाधव काकू
    रक्तकोमल पहाटेचा रंग नारिंगी झाला म्हणून
    मोसंबीच्या संगतीने शोक व्यक्त करणारा श्रीपाद
    
    या सार्‍यांची भेळ म्हणजे आमचा मनुष्य समाज !
    
     - रमताराम
    
    - oOo -

    तळटीप: ’साहित्याचे वांझ(?) अंडे’ या शीर्षकाखाली या कवितेबाबत थोडे विवेचन याच ब्लॉगवर वाचता येईल.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा