ज्या लोकांना वाटतं किंवा वाटत होतं की महात्मा गांधीजींना मारलच पाहिजे होतं, त्यांना ’जिना आणि माऊंटबॅटन (किंवा त्यांचे पूर्वसुरी) यांना का मारलं नाही?’ असा प्रश्न पडत नाही. याचं एक कारण म्हणजे विचार करणे त्यांच्या रक्तात नसते हे तर आहेच पण त्या पलीकडे मुळात गांधींबद्दल द्वेष असणार्यांच्या प्रचाराला बळी पडलेले असतात. या प्रचारकांच्या द्वेषामध्ये एका बनियाने आपल्या सारख्या जन्मजात श्रेष्ठींऐवजी देशातील जनतेचे नेतृत्व करावे ही अहंकाराला बसलेली मोठी ठेच मुख्यत: कारणीभूत असते. आता ज्यांना जिना किंवा एखादा ब्रिटिश अधिकारी ठार मारण्याऐवजी गांधींवर हत्यार चालवणे, त्यांची हत्या करणे अधिक महत्वाचे का वाटत असावे? याचे एक कारण म्हणजे त्यांना परिणामापेक्षा श्रेयाची अधिक आस होती हे नंतर दिसून आले आहे.
ज्यांना असं वाटत होतं किंवा वाटतं ते प्रामुख्याने नक्की काय करावं या संभ्रमात असलेले, सुमार विचारशक्तीचे आणि भेकड लोक असतात. त्यामुळे त्यांचा बळी म्हणून ते नि:शस्त्र म्हातार्याची निवड करतात. कुणाला तरी मारल्याने आपण काहीतरी केले इतके समाधान त्यांना हवे असते.
बुश नाही का ९/११ चा राग म्हणून एका देशाचा विध्वंस घडवतो आणि त्याचे नागरिक 'वा रे पठ्ठे’ म्हणून शाबासकी देतात? वास्तविक इराकचा काय संबंध होता? पण काहीतरी केले पाहिजे म्हणून कुणावर तरी गोळ्या झाडायच्या आणि सूड घेतल्याचे समाधान मानायचे. बरं हे करायचे तर मग ज्याला मारला तोच दोषी असा कांगावा करावा लागतो. बुशने 'वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’चा बागुलबुवा उभा केला. पण ९/११ इराकने घडवले का? असा प्रश्न ’वॉर ऑन टेरर’ च्या धुंदीत मग्न झालेल्या बहुसंख्य अमेरिकी नागरिकांनी विचारला नाही. माध्यमांनी या दोन्हींचा संबंध आहे असा संभ्रम निर्माण केला नि काम झाले
भारतातही म्हातार्याला ठार मारायचे त्यातून आपले तथाकथित शौर्य सिद्ध करण्यासाठी तोच गुन्हेगार हे सिद्ध करायचे असा फंडा वापरला गेला.
अमेरिकेत माध्यमांचा वापर करावा लागला. गॉसिप आणि चारित्र्यहनन प्रेमी भारतीय समाजात कुजबूज तंत्र अधिक सोपे नि बिनखर्चाचे होते, ते वापरले गेले. जिना किंवा ब्रिटिश अधिकार्यांना ठार मारून येणारा बॅकलॅश सहन करण्याची हिंमत या भेकडांत नव्हती. म्हणून (१) स्वातंत्र्य मिळाल्यावर, म्हणजे 'ब्रिटिश सत्ता गेल्यावर' (त्यांच्या राज्यात हिंमत झाली नाही) (२) टार्गेट म्हणून नि:शस्त्र म्हातार्याची निवड करुन यांनी आपले शौर्य (?) दाखवले.
आजही यांचे नेते व्यासपीठावरुन गर्जना करणारी, चिथावणारी भाषणे करतात आणि नंतर ’जमाव आमच्या नियंत्रणात राहिला नाही होऽ’ म्हणून रडारड करतात. केल्या कृतीची जबाबदारी घेऊन त्याचे परिणाम भोगण्याची हिंमत दाखवत नाहीत. त्यातून क्षणिक भ्रमित कार्यकर्ते खटले अंगावर घेऊन पस्तावतात नि हे नामानिराळे राहून तिथून पळ काढतात आणि आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांमधे आपणच कसे हे केले याच्या गमजा करत बसतात.
यांच्या शौर्याचीच नवी आवृत्ती दोन तीन वर्षांपूर्वी आम्हाला एनएफएआय मध्ये पाहायला मिळाली. काही स्थानिकांनी कबीर कला मंचाचा कार्यक्रम तिथे आयोजित केला होता. आता कबीर कला मंचावर काही शूरवीरांचा(!) आरोप असा की ते नक्षलवादी आहेत. (ते तसे आहेत की नाहीत या दोन्हींबाबत मी अनभिज्ञ आहे. त्यावर चर्चा नको.) त्यामुळॆ त्यांना ’धडा शिकवायला’ म्हणे एका शूर विद्यार्थी संघटनेचे लोक तिथल्या झाडीत लपून बसले. कार्यक्रम संपल्यावर, कला मंचाचे सारे कलाकार आणि सदस्य निघून गेल्याची खात्री झाल्यावर हे शूर मावळे हर हर महादेव म्हणत प्रगटले नि स्थानिक आयोजकांपैकी एक दोघांना मारु लागले आणि लगेच फरारही झाले. दुसर्या दिवशी स्थानिक ’राष्ट्रभक्त’ वगैरे म्हणवणार्या माध्यमांनी ’धडा शिकवला’ असा मथळा देऊन बातमी केली.
जसे यांच्या पूर्वसुरींनी जिना वा ब्रिटिशांशी पंगा घेण्याचे धाडस केले नाही तसेच इथे ज्यांच्यावर हे आरोप करतात त्या कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे धाडस केले नाही. उगाच एखादा फटका आपल्याला बसला तर डोळे पांढरे व्हायचे. हास्पिटलात भरती व्हायची वेळ यायची.
यांच्या शौर्याच्या पातळीचे एक उत्तम उदाहरण नुकतेच फेसबुकवर पाहायला मिळाले. यांतलेच एक शूरवीर घरबसल्या हातात वर्तमानपत्राची सुरळी घेऊन एका कोळशाला बडवत बसले होते. ते चित्र अत्यंत बोलके होते असे आमचे मत झाले.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा