रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

शर्विलकाचा प्रतिशंखनाद आणि जमाव

आपले सब्जेक्ट्स* कुठेतरी एक पायरी वर चढताहेत, यातून कदाचित आपल्या स्थानाला धक्का बसू शकतो याची जाणीव झालेल्या वर्चस्ववाद्यांच्या चलाख मांडणीचे ट्रम्प यांनी उत्तम उदाहरणच सादर केले आहे. संख्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी नेहमीच आकडेवारीला प्राधान्य देतो. तिच्या अभावी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष, केलेले आरोप हे केवळ पूर्वग्रहांचे नि स्वार्थाचे अपत्य असतात. (अर्थात अलीकडे खोटे आकडेही तोंडावर फेकण्याची अहमहमिका सुरु झालेली दिसते. त्यामुळे त्या आकड्यांची विश्वासार्हता हा ही एक कळीचा मुद्दा ठरतो.)

आमच्या गटावर झालेला एक अन्याय हा आमच्यावरील नियमित होत असलेल्या अन्यायाचे उदाहरण आणि तुमच्यावर होत असलेल्या दहा अन्याय, अत्याचारांची उदाहरणे मात्र अपवाद आहेत’ हा चलाख तर्क पुरुषी वर्चस्ववादी, जातीय वर्चस्ववादी, धार्मिक वर्चस्ववादी, प्रांतिक वर्चस्ववादी, भाषिक वर्चस्ववादी कायम करताना दिसतात. परस्परांच्या विरोधात उभे असलेल्या गटांनाही ’चला आपण आकडेवारी जमा करु नि एकदाचा सोक्षमोक्ष लावू कोण शोषक नि कोण शोषित याचा’ असे म्हटले तर दोन्ही बाजू ते अमान्य करतात. कारण पर्सेप्शन हे त्यांचे हत्यार आहे. ते नाहीसे झाले की त्यांच्या गटाच्या राजकारणाला धक्का बसतो.

मला ’असे असावे’ असे वाटते तेव्हा मी ठासून ’असे आहेच’ हे सांगून माझ्यासारख्याच मानसिकतेच्या कमकुवत मनाच्या, अन्य गटाबद्दल (कदाचित त्यातील एका व्यक्तीबद्दल आणि म्हणून सरसकटीकरणाने पूर्ण गटाबद्दल) अढी वा द्वेष असणार्‍यांचा जमाव जमवू शकतो, त्याच्या आधारे माझ्या स्वार्थानुकूल खेळ्या खेळू शकतो हे बहुतेकांना ठाऊक असते. आपण शोषित असल्याचा हा वर्चस्ववाद्यांचा ’शर्विलकाचा प्रतिशंखनाद’ मूठभरांचा असला तरी माध्यमे, हत्यारे अनुकूल झाली की वास्तवाच्या, बहुसंख्येच्या आभासात रूपांतरित करता येतो आणि शोषकांनाच शोषित असल्याचे सर्टिफिकेट मिळून जाते.

आपल्याकडे जात आणि धर्म या दोन्ही हत्यारांचा वापर करुन केलेली ही शोषित असल्याची ओरड आपण अलीकडे अनुभवत आहोतच. आपले दुर्दैव हे की ट्रेवर नोआ सारखे स्पष्टवक्ते आपल्या माध्यमांतून फारसे उरलेले नाहीत. राजकीय, जातीय, धार्मिक, वांशिक, प्रांतिक नि भाषिक गुंडांपुढे शेपूट घालून बसलेले वा सरळ सरळ त्यांची दलालीच करणारे किंवा त्यांनी टाकलेले तुकडे चघळण्यात धन्यता मानणारे, नव्हे ती अभिमानाने मिरवण्याची बाब मानणारे बरेच दिसू लागले आहेत.

(*याची व्याप्ती कायम राखून केलेला अनुवाद माझ्याकडे नाही. जे प्रतिशब्द आहेत ते त्याची व्याप्ती घटवतात. इथे तर ते मला अजिबातच चालणार नाही.)
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा