शनिवार, ३० जुलै, २०२२

भूतकालाचा करावा थाट

SinkingInThePast
bigstock.com येथून साभार.

भूतकालभोगी भारताच्या अगदी सुरुवातीच्या पिढ्यांनी जे निर्माण केले ते मुद्दल गुंतवून मधल्या पिढ्यांनी त्यावर गुजराण केली. अधिक मिळवण्यापेक्षा बचत करुन पोट भरण्याचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढ्यांना दिला. शेतीकेंद्रित समाजव्यवस्थेचे चिरे निखळायला सुरुवात झाली, उद्योगांचे नि रोजगारांचे इमले उठू लागले नि माणसे अधिकच परावलंबी होत चाकरमानी झाली. त्यांची उरलीसुरली निर्मितीक्षमता लयाला जाऊन त्यांचे एककीकरण होऊ लागले. निर्मितीक्षम आणि निर्मितीशील समाज व त्यातील व्यक्तिंमध्ये असणारा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला, की माणूस उसन्या काठ्यांचे आधार घेऊ लागतो. त्यातही डोक्याला फार ताण देता, काहीही गुंतवणूक न करता फुकट मिळणार्‍या अशा काठ्या म्हणजे वारसा आणि भूतकालवैभव.

मग भूतकालभोगी पुढच्या पिढ्यांनी डोके भूतकाळात खारवून, मुरवून ठेवले आणि वर्तमानात हातांनी रोजगार करण्याचे मॉडेल स्वीकारले. पाश्चात्त्य देश, चीन, रशिया वगैरेंच्या प्रगतीला क:पदार्थ लेखत ’पण आम्ही नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ’ची पिपाणी वाजवण्यास सुरुवात केली. आणि हे करत असताना तहान भागवण्यासाठी पुन्हा त्यांच्याच पाणवठ्यावर रांग लावायला सुरुवात केली. नैतिकता ही सापेक्ष असते आणि ’आम्ही वागतो ते नैतिक’ अशी उफ़राटी व्याख्या करण्याची चलाखी आमच्या मेंदूत असल्याने आम्ही तिचा वापर केला.

मधल्या पिढ्यांनीही सर्जनशील(creative), विचारशील वगैरेऐवजी अनुकरणशील (obedient) नि पाठांतरप्रवीण समाज घडवण्याचे संस्कार केले. दांभिकपणा हा अजिबातच लज्जास्पद नाही हे बिंबवले. मग भूतकालाचे सत्यनारायण घालत वास्तवात रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन परदेशी जाऊन भरपूर पैसे मिळवण्याची स्वप्ने रुजली. आणि व्हॉट्स अ‍ॅप वा अन्य समाजमाध्यमांवर भूतकाल-भजने गाणे सुरू झाले.

वर्तमानाचा आणि भविष्याचा भार पाश्चात्त्यांकडून आलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानावर आणि चीनच्या उत्पादकतेवर सोपवून भारतीय भूतकालाचा खार चाटत समाजमाध्यमावर वाटत बसण्याइतके निवांत झाले.

अलीकडच्या काही शतकांत इथे एकच महत्वाचा शोध लागला आणि तो म्हणजे 'पाश्चात्त्यांनी लावलेले सगळे शोध इथे आधीच लावले गेले होते'.

या एकाच शोधाच्या मास्टरस्ट्रोकने पाश्चात्त्यांचे नाक खाली करुन तरुण पिढीला भूतकाळाचे झेंडे मिरवण्याची, इतिहासाची अफू चाटून धुंदीत राहण्याची सोय झाली. ’क्रिएट इन इंडिया’ ऐवजी ’मेक इन इंडिया’ हा आपल्या प्रगतीचा... नव्हे विकासाचा मूलमंत्र ठरला. प्रगतीशी आमचे नाते संपून गेले याची खंत आम्ही केली नाही. आणि आपल्या या संकुचित दृष्टिकोनाचे खापरही पुन्हा भूतकाळातून सैतान शोधून त्यांच्यावर फोडायला सुरुवात केली.

म्हणून बाबा रमताराम म्हणतात...

भूतकालाचे करावे स्मरण
भूतकालाचे वाटावे पुरण
आचविण्यांस त्याचे चूरण
चाटवावे

विज्ञान पाश्चात्त्यांचे काम
उत्पादनांस चीन ठाम
आम्ही मोजावे दाम
दोघांनाही

इतिहासाचा करावा थाट
इतिहासाचा मांडावा हाट
इतिहासाचेच चर्‍हाट
नित्य चालो

भूतकालाचा अभिमान
त्यात शोधावा सैतान
अपयशाचे तो कारण
सांगो जावे

इतिहासाचीच शाळा
नको पुस्तक वा फळा
भव्य एक पुतळा
दारी ठेवा

ऐसे वर्तिले रमतारामे
करा कोणतीही कामे
परी भूतकालाच्या नामे
पिंड द्यावा 

- oOo -

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा