मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

क्रिकेट आणि टीकाकार

निवडणुकीच्या आगेमागे ‘ईव्हीएम टॅम्परिंग’चा कोलाहल ऐकू येत असतो. हे जणू राजकीय वास्तव असल्याची एका राजकीयदृष्ट्या सजग गटाची श्रद्धा आहे.

दुसरीकडे क्रिकेट सामन्यांच्या– विशेषत: कुठलाही वर्ल्ड-कप किंवा भारतीयांच्या दृष्टीने ताटा-पोटातील अन्नापेक्षाही महत्त्वाच्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी काही मंडळींकडून न चुकता घातला जाणारा ‘मॅच फिक्सिंग’चा रतीब ही दुसर्‍या श्रद्धेची किंवा सामान्यांपेक्षा आपल्या उच्च अभिरुचीची द्वाही आहे.

या दोनही गोष्टी शक्यतेच्याच नव्हे तर संभाव्यतेच्या पातळीवरही आहेत हे मला मान्य आहे. पण संभाव्य आहे म्हणजे ते घडलेच किंवा घडतेच असा कांगावा करण्यात अर्थ नसतो. शक्यता ते घटित यात बराच प्रवास असतो. तो किती खडतर आहे यावर संभाव्यता ठरत असते. शक्यता नि खात्री यातील फरक करण्यास शिकले की आयुष्य सुसह्य होते असे माझे प्रामाणिक मत आहे.

ईव्हीएम हॅकिंग अथवा टॅम्परिंगला लागणारे कुशल(!) मनुष्यबळ, गुप्ततेची खडतर वाट आदि गोष्टींचा विचार करता कोणताही पक्ष त्याची व्याप्ती पुरी निवडणूक फिरवावी इतकी व्यापक ठेवू शकणार नाही. अत्यंत मर्यादित प्रमाणात हे साध्य होऊ शकेल. पण तरीही ईव्हीएमबाबतची तक्रार मी समजून घेऊ शकतो. कारण त्यातून तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असते. कदाचित तुम्ही न निवडलेला उमेदवार तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमचे भवितव्य आपल्या हाती घेत असतो.

BatBallAndMoney

परंतु क्रिकेट वा अन्य कुठल्याही खेळाबाबत, साहित्याबाबत, संगीताबाबत, चित्रपटादि दृश्य कलांबाबत असे लादणे होत नसते. तरीही तिथे ‘सगळ्या मॅचेस फिक्स्ड असतात म्हणून मी क्रिकेट पाहणे सोडले.’ हा दावा आपण चारचौघांपेक्षा वेगळे- शहाणे, उच्च अभिरुचीचे असणे ठसविण्यासाठीच असतो असे माझे मत आहे. एरवी न विचारता हे का सांगता हो भाऊ/ताई ? विचारल्यावरही ‘मी पाहात नाही.’ एवढे सांगणे पुरेसे का वाटत नाही? म्हणून त्या दाव्यामध्ये काही वेळा ‘क्रिकेटप्रेमी कसे बावळट असतात’ हा एक उन्नतनासिका सूर मला दिसतो. (काही कॉफीप्रेमी ’चहा की कॉफी?’ या सोप्या प्रश्नाला ‘कॉफी’ असे उत्तर न देता, ’मी चहा पीत नाही, मला कॉफी’ असे आवर्जून सांगतात, तसे काहीसे.) तो गंमतीशीर असतो.या दोनही मुद्द्यांकडे पाहू.

आता शक्यतांचा विचार केला तर...

> आपण खातो त्यातील प्रत्येक पदार्थात भेसळ होऊ शकते– काही वेळा होत असतेच. म्हणून आपण खाणे खायचे थांबवत नाही. भेसळ नसण्याची संभाव्यता अधिक असणारे पदार्थ वा भेसळ ओळखण्याचे तंत्र कुठले हे शोधतो.
> दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीबद्दल वारंवार बोलले जाते. भेसळयुक्त पदार्थ विशेषत: दिवाळी सारख्या सणांच्या तोंडावर वारंवार पकडले जातात. म्हणून आपण दुग्धजन्य पदार्थ खाणे सोडतो का?
> रस्त्यावरून जाताना अनेक वाहनचालक बेफाम गाडी चालवतात. त्यातून काही निरपराधांचा बळी जातो. म्हणून आपण रस्त्यावर येणे थांबवतो का?
> अगदी जीवरक्षक म्हणावी अशा डॉक्टरांच्या वर्तुळातही बनावट, स्वार्थी डॉक्टर्स असतात. मग आम्ही डॉक्टरकडे जाणे बंद करतो की पूर्वानुभव असणार्‍यांकडून डॉक्टरबाबत खात्री करुन घेऊन त्याच्याकडे जातो?

या सार्‍या उदाहरणांमध्ये शक्यता आणि खात्री यात फरक करत असतो. प्रासंगिक घटना, अपवाद आणि सरसकट नियम यात फरक करायला हवा. अर्थात, कोणत्याही पुराव्याखेरीज ‘ईव्हीएम हॅक होतेच्चं’ किंवा ‘प्रत्येक मॅच फिक्स्ड असतेच्चं.’ म्हणणार्‍यांना कोपर्‍यापासून एकदाच दंडवत घालून दूर व्हावे. कारण हे दावे सामान्यपणे केवळ दुराग्रहाचे, विचार बंद केल्याचे आणि निष्कर्षापेक्षा श्रद्धेचे निदर्शक असतात. अशा पालथ्या घड्यांवर पाणी ओतण्यात अर्थ नसतो.

MatchFixing

आता पुढचा मुद्दा असा की मग ‘क्रिकेट मॅचेस फिक्स्ड नसतात असे रमतारामांचे म्हणणे का आहे ?’ प्रश्न गंडलेला असतो. ‘प्रत्येक मॅच फिक्स्ड असते’ असे म्हणणार्‍यांचा प्रतिवाद करणारा ‘प्रत्येक मॅच फिक्स्ड नसते’ असे म्हणतो आहे हा दावा चलाखीचा असतो वा अज्ञानमूलक. 

ही दोन विधाने परस्परविरोधी असली तरी त्यांच्या पलीकडे शक्यतांचा बराच मोठा अवकाश असतो आणि तिथे विश्लेषणाला वा समजून घेण्याला वाव असतो. ‘सगळ्या क्रिकेट मॅचेस फिक्स्ड असतात.’ या विधानाचे सर्वसमावेशक विरोधी विधान हे वरचा प्रश्न नसतो तर ‘सर्व क्रिकेट मॅचेस फिक्स्ड असतात असे म्हणता येत नाही.’ असा असतो. पण अज्ञानी मंडळींची पंचाईत अशी की त्यांना फक्त ठोस, निश्चित विधान समजते. त्यामुळे ’होतात’ किंवा ’होत नाहीत’ या दोनमध्ये त्यांचे तर्क फिरत बसतात.

बरं हे शक्यतांचं खटलं (आणि म्हणून ईव्हीएमही) जाऊ दे. समजा... समजा असल्या मॅचेस फिक्स्ड तरी जोवर तुम्हाला ते ठाऊक नाही, तोवर तुमच्या दृष्टीने तो सामना एन्जॉय करणे शक्य नाही का? जुना एखादा सामना क्रिकेट चॅनेलवर लागला तरी तो एन्जॉय करता येतो ना? त्याचा तर निकाल लागून जमाना झालेला असतो. कालच्या सामन्याचे ’हायलाईट्स’ आज मी पुन्हा पाहतो तेव्हा ते ही एन्जॉय करता येतातच. एखादा उत्तम फटका, एखादा सुरेख वळलेला वा स्विंग झालेला चेंडू, एखादा अप्रतिम झेल मला तेवढाच नसला तरी आनंद देत असतो.

इतर खेळांमध्ये अनेकांनी WWFच्या (आता WWE) कुस्त्या पाहिल्या असतील. त्या फिक्स्ड– खरंतर स्क्रिप्टेड म्हणायला हवे– असतात हे पाहणार्‍या बहुतेकांना ठाऊक असते. तरीही त्यांना मनोरंजन म्हणून लोक पाहतात. फुटबॉलपाठोपाठ तो खेळ(?) वा त्याचे प्रक्षेपण सर्वाधिक उत्पन्न मिळवत असतो.

त्याहीपेक्षा तुमच्या-आमच्या आयुष्यातील महत्त्वाचे मनोरंजन म्हणजे चित्रपट. तो तर १००% स्क्रिप्टेड असतो. एवढेच कशाला त्यातील फाईट्स, युद्धे, बॉम्बस्फोट, वगैरे हिंसक बाबी तर सोडा पण प्रेमसुद्धा १००% टक्के खोटे असते. तरीही आपण तो पाहात असताना खरे मानून त्यात रमतो की नाही. सलमान खान नि ऐश्वर्या रायचे (किंवा त्याच्या मुस्लिम नावाने लव्ह-जिहादची वगैरे आठवण होत असेल तर शाहिद कपूर-करिना म्हणा, किंवा तुमची आवडती जोडी उदाहरण म्हणून घ्या) आता फाटलं आहे हे मौलिक ज्ञान आपल्याला आधीच असूनही त्यांचा पडद्यावरचा प्रेमालाप पाहताना आपण रंगून जातो की नाही. एवढे पुरेसे नसते म्हणून आवडलेले चित्रपट लोक एकाहुन अधिक वेळा पाहतात. आता तर पडद्याबाहेरचे सोडा, पडद्यावरचेही त्यांना शंभर टक्के माहिती असूनही त्यात त्यांना मनोरंजन सापडतेच; एरवी पुन्हा पैसे का खर्च करतील ते?

सध्या पॉप्युलर असणारे रील्स अथवा मायक्रोव्हिडिओंचे माध्यम तर याचे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या मांजराचे, माकडाचे विशिष्ट हावभाव, कुणी केलेली एखादी कमेंट लोकप्रिय झाली की वेगवेगळॆ लोक त्याचे मिक्सिंग करुन आपापली स्टोरी बनवून त्याचे व्हिडिओ तयार करतात. एखाद्या चिनी व्यक्तीच्या व्हिडिओचा तुकडा घेऊन एखादा मराठी तरुण व्हिडिओ बनवतो नि त्यावर इंग्रजीमधून अनोटेशन चिकटवतो. तरीही त्या व्हिडिओचा एकुण परिणाम आपल्याला आनंद देतो की नाही. ‘हॅं: दुसर्‍याचा व्हिडिओ चोरून केलेला.’ म्हणून धुडकावतो का आपण?

तसेच क्रिकेट पाहताना तुमचे मनोरंजन होत असेल, सचिनचा स्ट्रेट-ड्राईव्ह पाहून तुमचा जीव निवत असेल, धोनीचा हेलिकॉप्टर शॉट पाहून खणखणीत शिट्टी वाजवावी असे वाटत असेल, किंवा एखाद्या परक्या संघातील फिरकी गोलंदाजाने एखाद्या कसलेल्या फलंदाजाची भंबेरी उडवल्यावर (परवाच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मुजीबने इंग्लंडच्या जो रुटचा केलेला मामा ही अशीच घटना होती.) त्याच्या पाठीवर दाणकन्‌ शाबासकी द्यावीशी वाटत असेल. मग हे सारे केवळ कौशल्यावर चालू आहे की कुठल्या आर्थिक नियंत्रणाच्या आधारेही यावर तुमच्या आकलनात, मनोरंजनात काय फरक पडतो? थोडक्यात, मुद्दा ‘आपला हेतू काय नि तो साध्य होतो का’ हा आहे.

‘माणसाला भूक असते नि ती भागवण्याची त्याची प्रेरणा असते’ हे आदिम सत्य. बाकी माणसाची सारी संस्कृती ही कृत्रिमच असते. तिच्याकडून नैसर्गिक असण्याची अपेक्षाच चुकीची आहे. कोणत्याही प्रकारचे मनोरंजन हा संस्कृतीचा भाग असतो आणि तो कृत्रिमच असतो, माणसांनीच केलेल्या नियमांनी बद्ध असतो, काही लिखित असतात, काही अलिखित.

हे मॅच-फिक्सिंग प्रकरण नवे नि ताजे ताजे असल्याने त्या कारणाचा वापर अधिक होत असला तरी त्या शिवायही टीकेचे काही मुद्दे फिरत असतात. हे मॅच-फिक्सिंगचे कारण सापडण्यापूर्वीची– आमच्या वडिलांची – एक पिढी ‘काय ते इंग्रजांनी आणलेला खेळ खेळत वेळ घालवता रे.’ म्हणून आगपाखड करत. किंवा आमच्यासोबत मॅच पाहताना, ‘पाकड्यांसमोर तुमचा काय निभाव लागणार.’ ‘शारजा में हार जा.’ किंवा ‘पॅटरसनसमोर तुमचा गावसकर म्हणजे झुरळ आहे.’ वगैरे पिंका टाकत आम्हाला हतोत्साह करण्याचा प्रयत्न करत असे.

‘टॅक्सपेअर्स मनी वाया जातो’ असा एक दावा असतो, तो सर्वस्वी चुकीचा आहे. मुळात वाया जातो हे फारच सबगोलंकार विधान आहे. एखाद्या समाजाला, शोषिताला दिलेली नुकसानभरपाईदेखील वाया गेल्याचा कांगावा करणारे असतात. त्याला फार महत्त्व द्यायचे कारण नाही. उलट भांडवलशाही नियमाने भरपूर उलाढाल झाल्याने अनेक रोजगार निर्माण होत असतात. बीसीसीआय सरकारला पैसे देत नसली, तरी सरकारकडून पैसे घेतही नाही, अन्य खेळांसारखे. खेळाच्या मैदानांसाठी राखीव भूखंडांचे म्हणाल तर सामने नसतात तेव्हा ते स्थानिक खेळांसाठी उपलब्ध असतातच. तेव्हा केवळ सामन्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ते देतात हे म्हणणे चुकीचे आहे.

CricketVsHockey
https://www.business-standard.com/ येथून साभार

आणखी एक प्रकार म्हणजे हॉकीशी तुलना. हॉकीमध्ये ध्यानचंद यांचा थोडका काळ वगळता आपण कधीही श्रेष्ठ वगैरे नव्हतो हे आपण मान्य करण्याची गरज आहे. शीतयुद्धाच्या काळात भांडवलशाही राष्ट्रांनी बहिष्कार घातलेल्या मॉस्को ऑलिंपिक वगळता अलीकडच्या कित्येक दशकांत भारताने त्यात फार काही चमक दाखवलेली नाही. आणि हा खेळ आपल्या सरकारांचा कायमच डार्लिंग राहिलेला आहे.

याउलट १९८३मध्ये विश्वचषक जिंकून आणेतो क्रिकेट हा हिणवण्याचा खेळ होता. आपला संघ हरण्यासाठीच खेळतो असे ही क्रिकेटद्वेष्टी जमात कुत्सितपणे म्हणत असे. त्या विजयानंतर आणि अगदी तळागाळात त्याचा प्रसार झाल्यानंतर बीसीसीआयने क्रिकेटचे जाळॆ वेगाने विणले, त्यातून पैसा निर्माण केला. इतकेच नव्हे तर आज आयसीसीला आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याइतकी ताकद निर्माण केली. हॉकीने इतिहासात एकदा तरी याच्या दशांशाने दबदबा निर्माण केला होता का?

काही दीडशहाणे ‘क्रिकेटमुळे हॉकी मागे पडली’ वगैरे निराधार विधाने करत असतात. का बुवा, क्रिकेटने तुमचे पैसे ढापले, मैदाने बळकावली की खेळाडू पळवून नेले? गल्लीबोळात हॉकीऐवजी क्रिकेट अधिक खेळले जाऊ लागले याला सोपी कारणे आहेत. हॉकीला विशिष्ट मापाचे मैदान लागले, विशिष्ट बनावटीची काठी लागते, खास असा चेंडू लागतो, पेनल्टी कॉर्नर वगैरेचे नियम नीट माहित असलेला पंच असावा लागतो...

याउलट कुठल्याही लाकडापासून गल्लीतल्या सुताराकडून तासून आणलेली बॅट, कागदाच्या चिंध्या दाबून बसवून त्यावर सायकलच्या चाकातील ट्युबचे तुकडे बसवून तयार केलेला चेंडू आणि कुठेही भिंतीवर खडूने तीन रेघा ओढून तयार केलेले स्टंप्स यावर मुलांचे क्रिकेट सुरू होते. खेळाचे मैदान लागत नाही. रस्त्याच्या चिंचोळ्या पट्टीतही खेळता येते. नियमही इतके लवचिक की अशा ‘स्थानिक’ क्रिकेटला रुचतील झेपतील अशा तर्‍हेने ते वाकवता येतात. उदा. एलबीडब्ल्युचा निर्णय वादग्रस्त होतो म्हणून तो नियम बाद. पण त्याऐवजी तीनवेळा पायाला लागले की फलंदाज बाद. अमुक भिंतीला लागला तर दोन धावा, गच्चीवर मारला की आउट. यातून गल्लीतली मुले सहजपणे क्रिकेटची मजा लुटत.

पुढे आयपीएलच्या यशानंतर राज्य पातळीवर, जिल्हापातळीवरील लीग्ज सुरू झाल्या नि या गल्लीतील खेळाडूंना मोठ्या सामन्यांत खेळण्याची संधी मिळू लागली. याला पर्यायी व्यवस्था हॉकीसाठी का केली नाही, केली नसल्यास काय करता येईल याचा विचार का केला गेला नाही? मेजर ध्यानचंद यांच्या काळातील यशाच्या जोरावर हॉकीचे किती काळ कौतुक करत बसणार आपण?

स्वत: पैसा निर्माण करून त्याआधारे खेळाला तळागाळापर्यंत पोहोचवणारी बीसीसीआय कुठे नि सतत - जी काही तुटपुंजी असेल ती- सरकारी मेहेरबानी घेऊन ’राष्ट्रीय खेळा’चे बिरुद मिरवणारी हॉकी कुठे. ज्यांचे कर्तृत्व सामान्य आहे त्यांना अट्टाहासाने डोक्यावर घ्या म्हणायचे आणि ज्यांनी इतके काही साध्य केले आहे त्यांच्या नावे नाके मुरडायची हा वाकुडेपणा का करत असावेत लोक?

तिसरा मुद्दा म्हणजे `ब्रिटिशांनी आणलेला खेळ का खेळता?' हा अत्यंत बावळट तर्क आहे! या वक्रनासिका मंडळींनी आयुष्यात कोणकोणते खेळ खेळले मला सांगावे. त्यातील बहुतेक खेळ हे परदेशातून आलेले आहेत हे मी दाखवू शकतो. बैठ्या खेळांमध्ये पत्ते, कॅरम, बुद्धिबळ वगैरे बहुतेक खेळ थेट वा अप्रत्यक्षपणे बाहेरूनच आलेले आहेत. बॅडमिंटन हा परदेशी व्यक्तींनी पण या देशात सुरू केलेला एकमेव खेळ असावा. याखेरीज आपले लंगडी, कबड्डी वगैरे मैदानी खेळ आज अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. आयपीएलच्या यशानंतर तेच मॉडेल राबवून चालू झालेल्या कबड्डी लीगने त्यांत पुन्हा प्राण फुंकले आहेत.

एरवी बहुतेक सर्व मैदानी खेळदेखील परदेशातूनच आलेले आहेत. आणि परदेशाचे एवढे वावडे आहे तर आपल्या आयुष्यातील कोणता भाग आपण स्वदेशी वस्तूंसाठी राखला आहे सांगाल का? जगण्यातील जवळजवळ प्रत्येक सुविधा, भोगवस्तू या परदेशी कल्पना वा तेथील उत्पादन आहे. आपल्या स्वदेशी प्रेमाची सुरुवात ६० हजाराचा चिनी मोबाईल न घेता देशी बनावटीचा मोबाईल, लॅपटॉप घेऊन करावी. स्वयंचलित दुचाकी, चारचाकी या संकल्पना परदेशी असल्याने त्या सोडून सायकल वापरावी वा घोडेस्वारी करावी. (घोडेही पुन्हा अरबस्तानातून किंवा त्याही पलिकडच्या आफ्रिकेतून आले हे जाताजाता सांगून टाकतो.)

गोळाबेरीज ही की ‘सामने फिक्स्ड असतात म्हणून मी पाहात नाही.’ या वा अशांसारख्या दाव्यांना माझ्या मते शून्य अर्थ आहे. मुळात तुम्हाला तो खेळ आवडत नसेल, किंवा पूर्वी आवडत होता नि आता आवड ओसरली असेल म्हणून पाहावासा वाटत नसेल, तर तो पाहू नयेच. त्याबद्दल इतर कुणी आग्रह करण्याचा प्रयत्न केल्यास वा न पाहिल्याबद्दल हिणवल्यास त्याला जरूर फटकारावे. पण उगाच इतरांपेक्षा आमची अभिरुची उच्चीची नि काय फालतू गोष्टीत लोक वेळ वाया घालवतात या आविर्भावात हे असे विधान करू नये.

पण हे क्रिकेटपुरते आहे असेही नाही. साहित्य, संगीत, चित्रपटादि दृश्य कला वगैरे अनेक क्षेत्रांत असेच नसते का? धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातही? आपली निवड ही चांगली आहे हे सांगून पुरत नाही, इतरांची– विशेषत: बहुसंख्येची अभिरुची वा निवड कशी निम्न दर्जाची आहे हा सूर लावल्याखेरीज लोक बोलतच नाहीत. मग ‘पुलं-वपु आवडणारे’ हा टिंगलीचा किंवा ‘कोसलाही न आवडणारे लोक असतात.’ असा हिणवणारा सूर लागतो, ‘मी हिंदी सिनेमे पाहात नाही. फक्त वर्ल्ड सिनेमा पाहतो.’ हे उच्च अभिरुचीचा दावा करणारे विधान येते, कोणत्याही व्यापक अभ्यासाखेरीज ‘मराठी लेखनाला जागतिक दर्जा नाही.’ (थोडक्यात क्रिकेटप्रमाणेच ते लेखन सर्वसामान्यांसाठी, फुटकळ असते) वगैरे विधानाच्या पिंका टाकल्या जातात.

मुद्दा खेळाचा असो, साहित्याचा असो, कलेचा असो, श्रद्धेचा असो, स्वश्रेष्ठत्वाचे दावे न्यूनगंडी मनांना पुरेसे वाटत नाहीत. आपली रेघ इतरांपेक्षा मोठी आहे हे सिद्ध करण्यासाठी इतरांची रेघ खोडून लहान करण्याचा आटापिटा निरंतर चालू राहतो.

- oOo -

संबंधित लेखन:

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
बा कपिल देवा


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा