रविवार, ११ जुलै, २०२१

विम्बल्डनचा पावित्र्यभंग

टेनिसच्या चाहत्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ही चारी धाम यात्रा. प्रत्येक धामी तयार केलेल्या कोर्टनुसार कुठे कुठल्या प्रकारचा खेळ पाहायला जावे याचा अंदाज त्यांना असतो. फ्रेंच स्पर्धेसाठी मातीची कोर्ट वापरली जात असल्याने वेगापेक्षा चौफेर खेळाला (territorial play) अधिक महत्व असते. खेळणारी खेळाडू चतुरस्र नसेल तर तिचीची डाळ तिथे शिजत नाही. त्याच्या उलट विम्बल्डनचे. इथे हिरवळीची कोर्ट असतात. त्यामुळे इथे सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली प्रकारचा खेळ अधिक होतो. यात चौफेर खेळापेक्षा अनेकदा बिनतोड (Ace) सर्व्हिस करणारी खेळाडू अधिक प्रभाव पाडत असते. त्याचबरोबर फ्रेंचमध्ये बेसलाईन (म्हणजे कोर्टाची कड) अधिक महत्वाची तर विम्बल्डनमध्ये नेटजवळ वर्चस्व गाजवू शकणार्‍या खेळाडूच्याला यशाची शक्यता अधिक असते. अमेरिकन स्पर्धेत कृत्रिम हार्डकोर्ट असतात. तिथे वेगवान खेळ करणे आवश्यक असते.

एका प्रकारच्या कोर्टवर बलवान असलेला खेळाडू अन्य प्रकारच्या कोर्टवर चाचपडताना दिसत असतो. आजचा महत्वाचा खेळाडू असलेला राफाएल नदाल हा फ्रेंच स्पर्धेचा सम्राट मानला जातो. तब्बल तेरा वेळा त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. चार वेळा अमेरिकन तर दोनदा विम्बल्डन विजेतेपदही त्याने मिळवले आहे. पण ऑस्ट्रेलियन भूमीवर मात्र तो एकदाच यशस्वी ठरला आहे. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन वगळता इतर तीन स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. पण ग्रॅंड-स्लॅम पुरे करण्यात तो अपयशी ठरला. याउलट सात वेळा विम्बल्डन आणि पाच वेळा अमेरिकन ओपन जिंकलेल्या पीट सॅम्प्रासला मातीच्या कोर्टवर अंतिम फेरीही गाठता आलेली नाही. आठ वेळा विम्बल्डन, सहा वेळा ऑस्ट्रेलियन, पाच अमेरिकन ओपन जिंकणारा आणि आज चाळीशीच्या उंबरठ्यावरही निम्म्या वयाच्या खेळाडूंना मात देणारा 'फेड-एक्स' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉजर फेडररला फ्रेंच स्पर्धा मात्र एकदाच जिंकता आलेली आहे. त्यामुळे या चारही कोर्टवर जो खेळाडू प्रभुत्व गाजवू शकतो तो अधिक दर्जेदार मानला जातो. चारही स्पर्धा एकाच वर्षांत जिंकणॆ हे यशाचे परमोच्च शिखर मानले जाते. त्याला ’ग्रॅंड स्लॅम’ म्हटले जाते.

TennisBalls

विम्बल्डनच्या ग्रास-कोर्टवर 'सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली' प्रकारचा खेळ करणार्‍यांनी अनेक वर्षे वर्चस्व गाजवले आहे. त्या आधी पार पडलेल्या फ्रेंच स्पर्धेत प्रभुत्व गाजवलेले इथे कमी पडतात, नि विम्बल्डन वेगळाच विजेता देऊन जाते, ही जवळजवळ परंपराच आहे. बियॉन बोर्ग, त्या कोर्टवर बॉल-बॉय म्हणून आलेला नि विजेतेपदापर्यंत मजल मारलेला चिडकू मॅकन्रो, जर्मनीचा फायरब्रॅंड बोरिस बेकर, खेळातली आग देहबोलीमध्ये अजिबात न उतरू देणारे आंद्रे आगासी आणि पीट सॅंप्रास, आठ वेळा विजेता ठरलेला फेडरर हे या स्पर्धेतले आणि कोर्टवरचे नामांकित खेळाडू. महिलांच्या स्पर्धांमध्ये या प्रकारच्या खेळाची तीव्रता आणि वारंवारता तुलनेने कमी असली तरी बिली जीन किंग, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ आणि अलिकडे पुनरागमन केलेली टेनिस-मॉम सेरेना विल्यम्स या सर्व्ह अ‍ॅंड व्हॉली प्रकारात निष्णात मानल्या जातात. सेरेनाची थोरली बहीण व्हीनस अन्य कोर्टवर अजिबात प्रभाव पाडू शकली नसली तरी पाच वेळा बिम्बल्डन विजेती ठरली आहे.

मागच्या वर्षीच्या खंडानंतर यावर्षी झालेल्या स्पर्धेत काल झालेला महिला एकेरीचा अंतिम सामना विस्मरणीय (नोंद: सुरुवातीला ’अ’ हे अक्षर नाही!) म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियन अ‍ॅश्ले बार्टी आणि झेक कारोलिन प्लिस्कोवा यांच्यातील हा सामना म्हणजे एकमेकींना गुण बहाल करण्याचा सामना होता असे म्हणावे लागेल. यात बार्टी हरली... आणि म्हणून बिचारीला नाईलाजाने विम्बल्डन चॅम्पियन म्हणून ती थाळी स्वीकारावी लागली.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या सामन्यात नेटपेक्षा बेसलाईनवरुन खेळ अधिक होतो हे समजण्याजोगे आहे. पण नेटजवळ जाण्यास बंदी घातल्यासारखा खेळ अनेक दिवसांनी पाहिला. इतकेच काय सेंटर-लाईन आणि बेसलाईन यांच्या संगमावर उभे राहून थोडे डावीकडे, थोडे उजवीकडे खेळत बसणे प्रथमच पाहिले. (वैचारिकदृष्ट्या मध्यममार्गी असलेल्या माझ्यासारख्यालाही याचा वैताग आला, आता बोला.) क्रॉसकोर्ट, डाऊन-द-लाईन शॉटस दोघीही बहुधा विसरल्या असाव्यात. चेंडू फक्त समोर टोलवणे नि प्रतिस्पर्ध्याची चूक झाली तर देवदयेने मिळाल्यासारख्या गुण घेणे असे चालले होते. बहुतेक गुण हे बेसलाईनबाहेर चेंडू मारल्यामुळे दिले (मिळवले म्हणणे मूर्खपणाचे ठरेल) गेले. साईडलाईन बहुधा कंटाळून झोपी गेली असावी.

WimbledonCourt

रॅकेटला वरच्या कडेवर चेंडू लागणे हा तर शिकाऊ वयातही क्वचित घडणारा प्रसंग आहे. या ग्रॅंड-स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो इतक्या वेळा घडला, की हा अंतिम सामना आहे की पात्रता फेरीचा अशी शंका आली. पहिल्या सात गेम्सपैकी पाच गेम्समध्ये सर्विस भेदली गेली यावरुन खेळ हा जिंकण्यासाठी नव्हे तर प्रतिस्पर्धी खेळाडूला उदारपणे गुण नि सामना देऊ करण्यासाठी खेळला जात होता हे सहज स्पष्ट होईल. प्रत्यक्ष सामना बघताना ते अधिकच स्पष्ट झाले. आपल्या सर्व्हिसवर सलग चार ’अनफोर्सड एरर’ (प्रतिस्पर्धाने काही कष्ट न करता आपणच वेडावाकडा फटका मारून गुण बहाल करणे) करुन गेम प्रतिस्पर्ध्याला देऊ करण्याचा खेळ दोघीही खेळल्या. ’एकमेका साह्य करु’ हे ब्रीद इतके चांगले आत्मसात केलेल्या दुसर्‍या व्यक्ती माझ्या पाहण्यात नाहीत. थोडक्यात हा सामना पाहताना यावर्षीपासून ’गोल्फ प्रमाणे सर्वात कमी गुण मिळवेल ती जिंकली’ असा उलटा नियम विम्बल्डनने केला की काय अशी शंका मला बराच वेळ येत होती. गुण कमावणे हा भागच कुठे दिसत नव्हता, मग बिम्बल्डनची ख्याती असलेला सर्व्ह-अ‍ॅंड-व्हॉलीच्या गतिमान खेळाची तर अपेक्षाही चुकीची होती.

निसरड्या कोर्टवरुन घसरुन पडल्याने माघार घेतलेली अमेरिकन सेरेना विल्यम्स, मानसिक स्वास्थ्यासाठी सहभागी न झालेली जपानची नाओमी ओसाका, उपांत्य सामन्यात पराभूत झालेली जर्मन अ‍ॅंजेलिक कर्बर, बेलारुसच्या एरिन सबालेन्का आणि व्हिक्टोरिआ अझारेन्का यांच्या अनुपस्थितीत अंतिम सामना इतका सुमार व्हावा हे विम्बल्डनचे दुर्दैव. त्याहून दुर्दैव हे की इतका सुमार खेळ केलेली बार्टी या स्पर्धेत आणि एकुणात एटीपी क्रमवारीतही अव्वल आहे. असे असेल तर महिला टेनिसचे भवितव्य फारसे चांगले आहे असे म्हणता येणार नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला कुणीतरी महिलांचा सामनाही पाच सेटचा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. हा सामना पाहिल्यावर (स्वयंघोषित फेमिनिस्टांकडून ’Male Chauvinist Pig ’ ही शिवी ऐकण्याची तयारी ठेवूनही) 'खरंतर एक सेटही पुरेसा होईल' असे म्हणावेसे वाटते. पाच सेटपर्यंत प्रेक्षकांची सहनशक्ती टिकेल की नाही याची मला खरोखरच शंका आहे.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा