सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

विनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई

त्या लहानशा गावात लोक अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. गावाने अनेक उंबर्‍यांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. गावातल्या प्रत्येकाला केवळ तिथे जन्मलेल्याच नव्हे तर लग्न करून गावात आलेल्या सासुरवाशिणीच्याही चार पिढ्यांचा इतिहास ज्ञात आहे. केस पिकलेल्या, दातांचं बोळकं झालेल्या गावच्या वृद्धांना गावाच्या रस्त्यांवर नि मैदानावर बागडणार्‍या सार्‍या पोरासोरांच्या जन्माची गाणी अजून याद आहेत. इथे जन्मलेल्या आणि मातीस मिळालेल्या समवयस्कांच्या मजारीवर त्यांनी आपल्या हाताने मूठ मूठ माती टाकली आहे. गावात भांडणतंटे, रुसवेफुगवे आहेत तसेच त्यात मध्यस्थी करून तड लावणारे बुजुर्गही आहेत. 'अशा तर्‍हेने ते सुखासमाधानाने नांदत होते' असे परीकथेतले वास्तव नसले तरी नांदत्या उंबर्‍यांचे ते गाव ही एक जिवंत परिसंस्था आहे.

अचानक एक दिवस बातमी आली की गावाशी काडीचा संबंध नसलेल्या दोन लोकांनी आणि त्यांनीच निर्माण केलेल्या कुठल्याशा संघटनांनी म्हणे ठरवले की गावात दहा पिढ्या पूर्वी नांदलेल्या कुणावर म्हणे अन्याय झाला आणि त्याचे परिमार्जन करायचे ठरले. अन्याय कुणी केला नि का केला, त्या दहा पिढ्यापूर्वीचे जग कसे होते, तो अन्यायच होता की दोन्ही बाजूंनी ईर्षेने लढवलेल्या संघर्षातला केवळ पराभव होता, याचे घेणे देण त्या परक्यांना असायचे कारण नव्हते. त्यांनी त्या दहा पिढ्यांपूर्वी नांदलेल्यांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करायचे ठरवले आणि त्यांच्या आजच्या वंशजांना गाव आंदण दिले. गावच्या लोकांना काहीच कळेना. आपले गाव, आपली जमीन, आपले घर परस्पर दुसर्‍यांना देऊन टाकणारे, आपल्या गावात कधीही पाऊल न टाकणारे हे उपरे कोण? त्यांना हा अधिकार नक्की कुणी दिला? हे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचे उद्योग कसे  नि का करत आहेत. पण गावाने विचार केला, करेनात का. ते लाख म्हणतील, आम्ही देणार आहोत थोडेच. पण गांवकर्‍यांना एक ठाऊक नव्हते. हे जे दान करणारे होते, ते शस्त्रसज्ज होते. ती शस्त्रे ते गावाबरोबरच दान करणार होते. त्यामुळे ते दान आपल्या झोळीत अलगद झेलणारे ती शस्त्रे घेऊनच  गावात येणार होते. जुने उंबरे उखडले जाणारे होते, नव्या घरांच्या पायांत लोखंडी पहारी ठोकल्या जाणार होत्या. आणि हे पुरेसे नाही म्हणून की काय तिथल्या नांदत्या उंबर्‍यातली अजून न कळत्या वयातली पोरे सोरेही शत्रू म्हणून निखंदून काढली जाणार होती. यज्ञकुंडासाठी अरण्य जाळून जमीन मोकळी करावीत तशी.

पॅलेस्टाईन हा लोकशाहीवादी जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा संघटित दरोडा आहे. जमिनीच्या एका तुकड्यावर काडीचा अधिकार नसलेले दोन लोक परस्परांशी करार करून तिसर्‍याच्याच हातावर त्याचे उदक सोडतात आणि तो तिसरा त्या तथाकथित परवानगीच्या - आणि त्याबरोबर मिळालेल्या शस्त्रांच्या - आधारे ती जमीन बळकावतो आणि जगातील सर्व स्वतंत्र माणसांचे भले करण्याची ठेकेदारी आपल्याकडे आहे असा उद्घोष करणारी संघटना डोळे मिटून आपण ते पाहिलंच नाही असा दावा करत राहते, ते ही तोपर्यंत जोवर हे बाहेरून घुसलेले लोक पुरेशी जमीन ताब्यात घेत नाहीत, स्थानिक पुरेसे संघटित होऊन तोडीस तोड प्रतिकार करू लागत नाहीत तोवर. परिस्थिती तिथवर पोचली की आता परिस्थिती एकाच जमिनीवरच्या दोघांच्या हक्काच्या संघर्षाची आहे, आम्ही तुमचे भांडण मिटवायला येतो आहोत अशी बतावणी करत अप्रत्यक्षपणे घुसखोरांना 'दुसरी बाजू' म्हणून चलाखीने मान्यता देऊन टाकते. इतका सफाईदार दरोडा जगात दुसरा कुठलाही नसेल. मु़ळात स्थानिक विरुद्ध घुसखोर स्वरूपाच्या संघर्षाला सफाईने धर्मांच्या लढाईचे स्वरूप देऊन तो कायम पेटता राहील, त्यातील दोन बाजू परस्परांशी लढत राहतील हा बेरकी विचार करणारे ते करार करणारे, दोन्ही बाजूंना शस्त्रास्त्रे देत आपण सुरक्षित राहू याची खातरजमा करून घेत आहेत.
इतिहास अशा स्वरूपाच्या घटनांची जंत्री मांडतो, अस्मिता, विद्रोह आणि मूल्यमापनाचे ढिगारे आणि नवे संघर्ष निर्माण करतो. पण स्वतःला विचारशील समजणारी माणसे अजूनही कुठल्याही व्यक्तीला एका जमावाचा भाग म्हणूनच पाहू शकतात, स्वतंत्रपणे एक व्यक्ती म्हणून नाहीच. तेव्हा अशा संघर्षाचे एका व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, एका परिसंस्थेत राहणार्‍यांच्या परस्परसंबंधावर काय परिणाम होतात याकडे बारकाईने लक्ष देण्याचे त्यांना काहीच कारण नसते. अ च्या गटातील अ१ या माणसाने आम्हा ब गटातल्या ब१ माणसाला मारहाण केली म्हणून अ गटातल्या अ१३ या माणसाच्या अ१३०२३ या मुलाला ठार मारणे आम्ही न्याय्य समजतो ही माणसाची शोकांतिका आहे. इतिहास अशा स्वरूपाच्या तर्कांनी भरलेला दिसतोच पण वर्तमानातील माणसेही याहून वेगळा विचार करताना दिसत नाहीत. इतिहास हा बव्हंशी राजकीय असतो, थोडाफार सांस्कृतिक असतो पण सामान्य व्यक्तीचा कधीच नसतो.

इतिहासाने सामान्यांचे आयुष्य बिनमहत्त्वाचे मानले असले तरी संवेदनशील कलाकार, मग तो चित्रकार असो, संगीतकार असो, लेखक असो की नाटककार किंवा परफॉर्मिंग आर्टिस्ट, तो आपआपल्या माध्यमातून याचा वेध घेत असतो. सामान्य माणसाच्या जगण्याचा वेध घेतो, त्याच्या आशा-आकांक्षा, वेदना, विचार, मूल्ये यांच्यासंबंधीच्या प्रश्नांवर भाष्य करतो, मांडणी करतो.  कलाकाराचा अवकाश त्याने स्वतः घडवलेला असल्याने परस्परसबंधित नसलेल्या पण परस्परसंगत असलेल्या काही बाबी तो एकत्र आणू शकतो, एकमेकांशेजारी ठेवून त्याचा अन्वयार्थ लावू शकतो. ती संगती त्याला त्या दोनही बाबींबद्दल कदाचित काही अधिक सांगून जाऊ शकते, जी तो नंतर तुम्हा आम्हा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असतो.

'मैं हूँ युसुफ और ये है मेरा भाई' या शीर्षकाचे नाटक नुकतेच 'विनोद दोशी थिएटर फेस्टिवल' सादर झाले. पॅलेस्टाईन या जवळजवळ शतकभर भळभळत असलेल्या जमिनीच्या तुकड्याची वेदना आणि कुराणशरीफ मधील हज़रत युसुफ यांची कथा यांची गुंफण करत अमीर निझार ज़ुआबी यांनी एका गावाची, एक समाजाची आणि काही माणसांची वेदना रंगमंचावर आणली.

कुराणातले हज़रत युसुफ यांना बंधूद्वेषाचा सामना करावा लागला, भावांनीच त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पुढे एका स्त्रीच्या भोगलालसेला नकार दिल्यामुळे तुरुंगात जाण्याचा प्रसंग ओढवला. आयुष्याच्या सुरुवातीलास अशा तर्‍हेने हिंसा आणि लालसा यांचा सामना केलेल्या युसुफ यांनी पुढे आपल्या 'स्वप्नांच्या अर्थ लावण्याच्या' कुवतीच्या आधारे (पाउलो कोएलो च्या 'अल्केमिस्ट'मधील सँतियागो हा हज़रत युसुफ यांच्याशी कितपत साधर्म्य राखून आहे हे तपासणे रोचक ठरेल.) राजाचा विश्वास संपादन केला आणि पुढे दुष्काळाच्या प्रसंगात योग्य नियोजनाच्या आधारे हजारो लोकांचे प्राणही वाचवले. पण नाटकाला युसुफ आहे तो पहिल्या टप्प्यातला. असूयाग्रस्त भावाने विहिरीत ढकलून दिल्याने मेंदूला मार बसून वेडसर झालेला. अधूनमधून विलक्षण सुसूत्रपणे विचार करू शकत असला तरी बव्हंशी गतिमंद, गावचा वेडा म्हणून हिणवला जाणारा. अली हा त्याचा भाऊ, नदा या देखण्या मुलीवर त्याचे प्रेम आहे आणि तिचेही त्याच्यावर. पण त्यांची मुले युसुफ सारखी होतील या भीतीने तिचे वडील त्यांचा लग्नाला रुकार देत नाहीत. हे तिघे जगण्यातल्या या सर्वसाधारण समस्यांशी झगडत असतानाच त्यांच्या बैसामून या गावावर मोठीच वावटळ येऊन धडकते.

पॅलेस्टाईनवर त्यावेळी हुकमत राखून असलेल्या ब्रिटिशांनी यातला काही प्रदेश तोडून स्वतंत्र ज्यू प्रदेशाची आक्रमक आणि हिंसक मागणी करणार्‍या झिओनिस्टांना आंदण देऊ केला. वरवर असे सांगितले गेले की त्या प्रदेशात राहणार्‍या लोकांकडून आपखुशीने, योग्य ती किंमत देऊन ज्यूंनी जमिनी विकत घ्याव्यात आणि तिथे आपले स्वायत्त राज्य स्थापन करावे. पण असे कधी घडत नसते हे न समजण्याइतके ब्रिटिश दुधखुळे नक्कीच नव्हते. तिथून पाय काढता घेत असताना आपली शस्त्रे 'आता निरुपयोगी झाल्याने' झिओनिस्ट ज्यूंना विकली आणि वर हा सैनिकांचा वैयक्तिक व्यवहार आहे ब्रिटिश सरकारचा संबंध नाही अशी भूमिका घेतली. आपली जमीन आपण विकली नाही की झाले असे मानून गाफील राहिलेल्या स्थानिकांचे डोळे 'दैर यासिन' प्रकरणाने खाडकन उघडले. या गावावर ब्रिटिश शस्त्रांनी सज्ज ज्यू गुंडांनी हल्ला करून ते बेचिराख केले. सहाशे लोकवस्तीच्या गावातील शंभराहून अधिक लोकांची सरळ कत्तल करण्यात आली. याचे पडसाद सार्‍या पॅलेस्टाईनमधे उमटू लागले, बैसामून मधेही उमटले.

'दैर यासिन' प्रकरणातून स्थानिकांत दोन प्रवाह निर्माण झाले असावेत. एका गटाचे मत कदाचित असे असावे की ऐवीतैवी शस्त्रबळाने आपली मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहेच तर त्याआधी सरळ सौदा करून चार पैसे पदरी का पाडून घेऊ नयेत. तर दुसरा गट आपली भूमी कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही या निग्रहाचा होता. 'नदा'चे वडील पहिल्या प्रकारचे असावेत, कदाचित म्हणून ते आपली जमीन ज्यूंना विकतात आणि दुसर्‍या गटाच्या दृष्टीने देशद्रोही ठरतात. आता हा व्यवहारी, वास्तवाचे भान असलेला विचार रुजला तर कदाचित इतर काही लोकही याच मार्गाने जाऊ शकतील या भीतीने दुसर्‍या - जमीन न सोडण्यावर ठाम असलेल्या - गटाच्या दृष्टीने  अशा लोकांना जरब बसवण्यासाठी धडा शिकवणे अपरिहार्य होऊन बसते. 'नदा'च्या वडिलांची हत्या केली जाते. आता बाहेरील हस्तक्षेप आणि परिप्र्येक्ष्य यांना अजिबात न सरावलेल्या त्या लहानशा गावात त्या हत्येचा आरोप अलीवर येणे ओघाने आलेच. 'नदा'बरोबर आपल्या लग्नाला नकार देत असल्याने अलीनेच त्यांना मारले असावे हा तर्क बिनतोड ठरतो. पण युद्धभूमीवर न्यायव्यवस्था अस्तित्वात नसते, त्यामुळे बैसामून जेव्हा दैर यासिनच्या मार्गे जाते तेव्हा या गुन्ह्याचा निवाडा - न्याय नव्हे -  बंदुकीच्या गोळ्याच करतात. अखेर उद्ध्वस्त भूमीवर फक्त अर्धवट युसूफ आणि त्याची काळजी घेणारी नदा एवढेच शिल्लक राहतात. 

बाहेरून येणारे संकट प्रथम माणसांत फूट पाडते, मग एकमेकांवर शस्त्र उगारण्यास भाग पाडते, परस्पर संशयाचे वातावरण निर्माण करते आणि अखेर मृत्यूचे दूत त्यांना मूठमाती देतात. एक परिसंस्था मोडून पडते.

अली आणि नदा तसे त्यांच्या तारुण्यसुलभ आणि मूलभूत गरजातच गुरफटलेले आहेत. युसुफचे तर जगच वेगळे, ते अधेमधे इतरांच्या जगाशी संपर्क साधते. नेचिम, रुफस हे रोकड्या, वास्तव जगाचे प्रतिनिधी म्हणता येतील. रुफसचे नाटकातले स्थान हे प्रतीकार्थाने तेथील ब्रिटिश सत्तेचे आहे. बाहेरील जग आणि गावातील लोकांमधला तो दुवा आहे.   म्हणजे तो ही एक चाकरमानी. त्याला शेफील्डमधला धुक्याने अवंगुठित असा हिवाळा आठवतो आहे, त्याला तो पुन्हा अनुभवण्याची आस आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनचा ताबा सोडणे ही त्याच्या दृष्टीने पायीचा साखळदंड तुटून मुक्त होण्याची घटना आहे, पण त्याच वेळी तो साखळदंड तोवर मुक्त असलेल्या नेचिमच्या पायी जाऊन अडकणार आहे हे नेचिमने ओळखले आहे.

नेचिम हा बैसामूनमधला एकमेव शिक्षित इसम. इतरांनी शिकावे याची इतकी आस असलेला की युसुफसारख्या गतिमंदालाही तो चिकाटीने शिकवू पाहतो आहे. जेव्हा युनोकडून पॅलेस्टाईनचा काही भाग ज्यूंना दिल्याचे जाहीर होते, तेव्हा संघर्षाला पर्याय नाही हे तो ओळखतो. वर म्हटले त्यानुसार बैसामूनमधे जमीन विकण्याबाबत जे दोन विचारप्रवाह झाले त्यातला 'काहीही झाले तरी जमीन विकायची नाही. पाय रोवून उभे रहायचे.' या मताचा माणूस. त्यासाठी नदा'च्या वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतो नि अंमलात आणतो. पण असे करत असतानाही याचे खापर अलीवर फुटणार आहे याचे आगाऊ भान त्याला आहे. म्हणून त्याने अलीला तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला आहे. पण आपण इथून गेलो आणि नंतर हत्या झाली तर उलट ती आपणच केली यावर शिक्कामोर्तबच होणार आहे हे अलीला समजते आहे. थोडक्यात ती हत्या आणि त्याचे पाप अलीच्या शिरी येणे हे अपरिहार्य होऊन बसले आहे. हे सारे घडते आहे ते बाहेरून येणार्‍या त्या उपर्‍यांमुळे!

एकीकडे सर्वांना - अगदी युसुफलाही - शिकवावे शहाणे करावे अशी आस असलेला नेचिमच शस्त्र उचलतो हे उल्लेखनीय आहे. शिक्षण हे शांततेच्या काळातील शस्त्र आहे. दारी शस्त्रसज्ज शत्रू उभा असताना ते निरुपयोगी आहे हे त्याला समजले आहे. पण त्याचे दुर्दैव हे की त्याच्यात समाजाबद्दलची कळकळ असली तरी कदाचित नेतृत्वगुण पुरेसे नसावेत. कारण अशा एका हत्येमुळे आणि जमिनी विकणे थांबवल्याने येणारे संकट थांबवता येणार नाही हे त्याला पुरेसे उमगलेले नाही. त्याला एकजुटीचे महत्त्व समजले असले तरी त्या एकजुटीसाठी त्याने केलेली कृती आततायी आहे. उरलेल्या जमीनमालकांना एकत्र करून एकजूट उभारण्याऐवजी तो आपल्याला न पटणार्‍या कृती करणार्‍यावर सूड घेतो आहे. हेच शस्त्र कदाचित उरलेल्यांच्या हाती देऊन लढा उभारावा एवढी चिकाटी त्याच्या अंगी नाही. आपल्यातील कुण्या द्रोह्याला शिक्षा देण्याइतपतच संकुचित विचार तो करतो आहे.'नदा'च्या वडिलांचा गुन्हा मान्य केला तरी त्यांच्या मृत्यूनंतर नदा'ची, अलीची होणारी संभाव्य फरफट पाहून त्याला कदाचित वेगळा निर्णय करता आला असता. एका अर्थी प्रथम सुस्त, असंघटित आणि नंतर उतावळे, आततायी नेतृत्व हे पॅलेस्टाईनच्या पीछेहाटीचे मुख्य कारण ठरले याला इतिहास साक्षी आहे.

'नदा'ने अखेरपर्यंत युसुफ'चा सांभाळ करणे याचा औचित्य काय असावे असा विचार मनात डोकावून गेला. कदाचित सर्वस्व गमावल्यावर आपल्या जुन्या जगण्यातील तेवढाच धागा शिल्लक राहिला म्हणून त्याला ती चिकटून राहते आहे की अलीचाच मागे राहिलेला एक भाग म्हणून ती त्याच्याकडे पाहते आहे? की युसुफचा सांभाळ हा संकेतार्थाने जणू लचके तोडलेल्या, शिल्लक राहिलेल्या पॅलेस्टाईनचा सांभाळ आहे? १९४७ पासून अमेरिकेच्या मदतीने इस्रायलने लचके तोडत आज दशांशाहूनही कमी शिल्लक ठेवलेल्या, मरू घातलेल्या पॅलेस्टाईनची कैफियतच बहुधा युसुफच्या संदर्भात, नदाच्या तोंडून नाटककार  आपल्या समोर ठेवत असावा.

---

नाटकः मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई
मूळ लेखकः अमीर निझार ज़ुआबी
सादरकर्ते: आसक्त, पुणे
दिग्दर्शकः मोहित टाकळकर
आभारः विनोद दोशी फौंडेशनकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा