सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

मोनॅको आणि तुरुंग...

फार वर्षांपूर्वी मोपासाँची* एक छोटीशी गोष्ट वाचण्यात आली होती*.
---
मोनॅको नावाचे एक छोटेसे सुखी समाधानी राज्य होते. प्रजेची पुरेपूर काळजी करणारा राजा लाभल्यामुळे राज्यात सर्वांच्या गरजा भागवल्या जात होत्या. तेथील लोकही सद्विचारी, सद्वर्तनी आणि सदाचारी असल्याने देशात गुन्हे घडत नव्हते. त्यामुळे देशात पोलिस, न्यायाधीश, हे नावापुरतेच होते आणि त्यांना बहुधा काही काम नसे.

अशा सुखी समाधानी देशात एके दिवशी आक्रीत घडले. एका नागरिकाने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केली. राज्यात खळबळ उडाली. अशा प्रकारचा गुन्हा प्रथमच घडल्यामुळे पोलिस आणि न्यायव्यवस्था खडबडून जागी झाली. निवाडा झाला आणि त्या गुन्हेगाराला गिलोटिनखाली शिरच्छेदाची शिक्षा फर्मावण्यात आली.

पण शिक्षेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत भलत्याच अडचणी निर्माण झाल्या. त्या चिमुकल्या देशात असा शिरच्छेद करणारा वधक उपलब्ध नव्हता, इतकेच काय गिलोटिनही नव्हते. आजवर जे काही लहान सहान गुन्हे घडत त्यासाठी हद्दपारी ही शिक्षा पुरेशी असे. राजाने पुन्हा न्यायव्यवस्थेशी संबंधितांशी चर्चा केली आणि आता गिलोटिन आणि वधक यांची सोय करण्यासाठी शेजारी राष्ट्र फ्रान्सकडे मागणी नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यासाठी आवश्यक त्या पैशांची मागणी जेव्हा त्या सरकारने नोंदवली तेव्हा तो आकडा पाहून राजाचे डोळे पांढरे झाले. इटलीसह अन्य दोन राष्ट्रांकडे चाचपणी केल्यानंतरही आकड्यात फार फरक पडलेला दिसला नाही. मग पुन्हा एकवार सल्लामसलत करून आपल्याच एखाद्या सैनिकाने तलवारीने हे काम करण्याची शक्यता विचारात घेण्यात आली. पण सेनानायकाने घाबरत घाबरत सांगितले की त्याच्या त्या चार दोन सैनिकांना तलवार चालवण्याचा बिलकुल सरावच नाही. राजाने पुन्हा न्यायव्यवस्थेकडे धाव घेतली.

अखेर बराच खल करून त्यांनी असा निर्णय घेतला की ही शिक्षा देहदंडाऐवजी जन्मठेपेवर आणावी. पण राज्यात तुरुंग होताच कुठे? मग राजाला तो बांधावा लागला. आणि त्यावर एक तुरुंगाधिकारी नेमण्यात आला. असेच सहा महिने गेले. राजाने या सार्‍या व्यवस्थेच्या खर्चाचा आढावा घेतला. त्याच्या असे लक्षात आले की हा सारा  प्रकार राज्याच्या तिजोरीवर फारच भार पाडणारा आहे. मग पुन्हा थोडा खल करून त्यांनी असा निर्णय घेतला की तुरुंगाधिकार्‍याची नेमणूक रद्द करून त्या कैद्याला स्वतःवर पाहरा ठेवण्याचे काम सोपवण्यात यावे. एरवी राज्याच्या खर्चाने दोन वेळा पोटभर जेवण करून आराम करण्यापलिकडे तो काहीही करत नव्हताच. शिवाय पहारा नाही म्हणून तो पळून गेला असता तर सुंठेवाचून खोकला गेला असता. आता राजाच्या मुदपाकखान्यातला एक सेवक दिवसांतून दोन वेळा कैद्याचे अन्न आणून देई, एरवी कैदी तुरुंगात एकटाच असे. पण संधी असूनही कैद्याने पळून जायचा अजिबात प्रयत्न केला नाही.

असेच काही दिवस गेले. एक दिवशी सेवक त्याचे जेवण घेऊन जायचे विसरला. काही वेळाने तो कैदीच आपले जेवण घेण्यासाठी तिथे हजर झाला. ही नवी व्यवस्था सेवकाला भलतीच पसंत पडली, आणि मग तो पायंडाच पडून गेला. सेवकाने जेवण नेण्याऐवजी कैदीच जेवण नेण्यासाठी मुदपाकखान्यात फेरी मारू लागला. हळूहळू तेथील सेवकांशी तो गप्पा मारु लागला. त्यात त्याचा वेळ छान जात असे. पुढे मग तो जेवण झाल्यावर लगेच तुरुंगात परतण्याऐवजी जवळच्या एखाद्या कसिनोमधे जाऊन जुगार खेळत असे.  त्यातही त्याचा वेळ  छान जाई.  कधी चार पैसे जिंकला तर तो मुदपाकखान्यात जाण्याऐवजी एखाद्या छानशा होटेलात छानसे जेवण घेई. रात्रीचे जेवण घेऊन आल्यावर मात्र तो न चुकता तुरुंगात परते आणि त्याचे दार लावून घेई. अखेर तो एक कैदी होता हे त्याला विसरून चालणार नव्हते.

पण पुन्हा एकदा खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि असे लक्षात आले की फुकटच होणारा हा खर्च देशाला परवडणारा नाही. फुकट मिळालेले अन्न खाऊन दिवसेंदिवस कैद्याची प्रकृती उलट ठणठणीत होत चालली होती. त्यामुळे तो खूप काळ जगणार याची चिंता राजाला भेडसावू लागली. अखेर नाईलाजाने त्याला बोलावून त्याची  उरलेली शिक्षा हद्दपारीमधे रूपांतरित केल्याचे त्याच्या कानावर घालण्यात आले.

 आता मात्र कैदी चिडला. तो म्हणाला मी गुन्हेगार आहे म्हणून तुम्ही मला फाशीची शिक्षा दिलीत. मी काही बोललो नाही. मग तुम्ही ती रद्द करून मला तुरुंगात टाकलेत, मी काही बोललो नाही. मग तुम्ही माझा तुरुंगाधिकारी ऊर्फ रखवालदार काढून घेतलात, मी काही बोललो नाही. आता तुम्ही माझा तुरुंगही काढून घेऊन परदेशी निघून जायला सांगत आहात हे अन्यायाचे आहे. मला आता कुटुंब नाही. गुन्हेगार हा शिक्का बसल्याने कुणी रोजगार देण्याची शक्यता नाही. म्हणून मी माझी उरलेली शिक्षा इमानेइतबारे भोगायला तयार आहे ती तुम्ही भोगू देत नाही हा अन्याय आहे. माझ्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सारे उभे करणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. अखेर पुन्हा एकवार दीर्घ चर्चेनंतर त्याला त्याच्या गरजा भागतील इतकी पेन्शन देऊ केली आणि बदल्यात त्याने परदेशी जाऊन रहावे अशी अट घातली.

 राजाने दिलेल्या पैशातून शेजारी देशांत एक चांगले घर खरेदी केले. आजूबाजूला छानशी बाग, भाजीपाल्यापुरते लहानसे शेत बनवून तो सुखाने राहू लागला. अधूनमधून तो आपल्या राज्यातील कसिनोमधे जुगार खेळायला येई, राजाच्या मुदपाकखान्यातील त्याच्या जुन्या मित्रांना भेट देई आणि जुन्या आठवणी जागवत बसे.

(*'The Prisoner of Monaco'. हे रूपांतर मुळाबरहुकूम नाही. मर्यादित आकाराच्या पोस्टसाठी बरेचसे वळवून घेतले आहे.)

---

आजच ही कथा का आठवली? सांगतो. सहज डोक्यात विचार आला. मोनॅकोमधे गुन्हेगार नाहीत म्हणून तुरुंग नाही अशा स्थितीतून अशी बिकट परिस्थिती उद्भवली. देशातील बहुसंख्य लोक हे गुन्हेगार आहेत... नव्हे देशद्रोही आहेत. समजा तुरुंग तर आहेत पण  इतक्या गुन्हेगारांना सामावून घेण्यासाठी ते पुरेसे नाहीत. अशा परिस्थितीत काय करता येईल.  म्हणजे बघा मोपासाँच्या कथेत एकच गुन्हेगार होता, राज्यातील बहुसंख्य लोक गुन्हेगार, देशद्रोही असले आणि मूठभरच सच्चे, प्रामाणिक नि देशभक्त असतील तर मग या गुन्हेगारांसाठी पुरेसे तुरुंग बांधायचे झाले तर कसे नि कुणी बांधायचे? नाही म्हणजे, आपल्यासाठीच तुरुंग बांधायला कोण तयार होईल? म्हणजे मग अंगमेहनतीची कामे इतरांकडूनच करून घेण्याची सवय असलेल्या त्या मूठभरांनाच हे करावे लागेल. आणि त्यांची संख्या विचारात घेता हे 'हिमाल्यन टास्क' असेल. आणि काळाचा विचार करता इतके सारे गुन्हेगार डांबण्याइतके तुरुंग बांधेतो आणखी अनेक गुन्हेगार, देशद्रोही जन्माला येतील त्यांचे काय? का लहान मुलांना 'वाढत्या अंगाचे' कपडे घेतात तसे भविष्यात असे किती गुन्हेगार जन्माला येतील याचा अंदाज घेऊन आधीच जास्तीचे तुरुंग बांधायचे?  पण म्हणजे मग तुरुंगाची संख्या आणखी वाढणार, म्हणजे ते बांधण्याचा काळही आणखी वाढणार. म्हणजे आता पुन्हा त्या जास्तीच्या काळात जन्माला येणार्‍या गुन्हेगारांचा विचार करावा लागणार. हे मारुतीचे शेपूट लांबतच जाणार की. आता काय करावे? (आम्हाला इतरांसमोर असलेल्या समस्या आपल्याच समजून त्या सोडवून देईतो चैन न पडण्याचा आजारच आहे म्हणा ना.)

आमच्या नेहमीच्या 'If the problem is too hard and the answer seems untractable, just flip the problem' या तत्त्वानुसार एक उपाय सापडला. सोपाही आहे. त्या मूठभर, प्रामाणिक, सदाचारी देशप्रेमी वगैरे वगैरे लोकांनी नवी भूमी पादाक्रांत करून तिथे स्थलांतर करावे आणि सध्याचे पुरे राज्य हेच तुरुंग म्हणून घोषित करून टाकावे. हाय काय न नाय काय. खर्च एकदम किमान होईल पहा. आहे की नाही सोपा उपाय?
---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा