रविवार, १ मार्च, २०२०

केजरीवालांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी...?

('केजरीवालांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी हा पर्याय असेल का?' या प्रश्नाच्या अनुषंगाने केलेला विचार...)

तिसरी आघाडी हे नेहमीच स्वार्थलोलुप, परस्परविरोधी आणि मुख्य म्हणजे संकुचित वर्तुळाची आकांक्षा असलेल्या पक्षांचे कडबोळे असते. ते एकाच वेळी इन्क्लुझिव आणि एक्स्लुझिव असते. त्याचे कम्पोझिशनही स्थानिक स्वार्थांच्या रेट्यामुळे बदलते राहते. हा काही टिकाऊ पर्याय नव्हे. केजरीवाल देशव्यापी पक्षाचा विचार करतील तर ठीक अन्यथा ते ही त्या कडबोळ्यातले एक होऊन बसतील.

या कडबोळ्याला नेता कधीच नसतो, त्यामुळॆ 'केजरीवालांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी’ असे म्हणण्याला अर्थच नाही. तिथे सारेच स्वयंभू असतात. त्यामुळॆ समाजवाद्यांमध्ये जसे द. शुक्रवार पेठेतले समाजवादी आणि पू. शुक्रवार पेठ समाजवादी असे भेद राहून रस्सीखेच चालू असते तसेच तिसरी आघाडी आणि आघाडीसदृश काँग्रेसचे चालू असते.

आजची काँग्रेस ही स्थानिक काँग्रेस पक्षांची आघाडीच आहे. तिला राष्ट्रीय नेता नाही. राहुल गांधी होऊ नयेत याचा आटापिटा मोदी-भाजप-संघ तर सोडा, काँग्रेसचेच स्थानिक बुजुर्ग नेतेच करत आहेत. स्थानिक काँग्रेसींना राहुल गांधी केवळ प्रचारक म्हणून, पोस्टर बॉय म्हणून हवे आहेत, त्यांनी सत्तेत वाटा मागू नये अशी त्यांची इच्छा आहे. थोडक्यात सोनिया मॉडेलच त्यांना पुन्हा हवे आहे. सोनियांच्या नेतृत्वाला नाकारुन बाहेर पडलेले शरद पवार पुन्हा त्यांच्याच काँग्रेसशी युती करतात तेव्हा नेमके हेच साध्य करीत असतात.

KCR_Kejariwal

संघ-भाजपला तिसरी आघाडी हा पर्याय होऊ शकत नाही, किंबहुना तिसरी आघाडी हा एका प्रभावशाली पक्षाचा पराभव करणे इतक्या मर्यादित उद्देशाने केलेला संग असतो. एका पक्षाला हटवून दुसर्‍याला प्रभावशाली करण्यास हातभार लावण्यापलिकडे त्या प्रयोगातून काहीही साधत नाही. काँग्रेस हटवून भाजप आला, भाजप हटवून अन्य कुणी.

ते अन्य कुणी जोवर देशव्यापी नाहीत तोवर भाजपचे, मोदींचे स्थान बळकटच राहणार आहे. जसे पूर्वी काँग्रेसचे होते... अण्णा आंदोलनाने त्या पक्षाला मूर्तिमंत भ्रष्टाचार या पातळीपर्यंत आणून ठेवेपर्यंत.

आणि काँग्रेस जाऊन भाजप येणे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडणे झाले तसेच होण्याची शक्यता बरीच राहते. कारण सत्तेतून एखाद्याला हटवणे हा कार्यक्रम सकारात्मक नसतो. अण्णा आंदोलनाने काँग्रेस सरकार उलथताना पर्याय समोर न ठेवल्यानेच भाजप-संघ आज आपल्या डोक्यावर बसला आहे. पुन्हा तोच प्रकार घडवण्याचा विचार र्‍हस्वदृष्टीचाच म्हणावा लागेल.

याचे आणखी एक कारण म्हणजे देशाच्या नागरिकांना त्राता, चेहरा कळतो. दिल्लीत केजरीवाल हा चेहरा असणे आणि भाजप/काँग्रेसकडे असा चेहरा नसणे हा दुसरा मुद्दाही महत्वाचा ठरला हे विसरुन चालत नाही. शीला दीक्षितांनी दिल्लीतच सलग तीन टर्म्स काँग्रेसला सत्ता मिळवून दिली होती. बंगालमध्ये ज्योतिबाबू गेले, लोकांनी ममताबाई निवडल्या. चंद्राबाबू प्रभावहीन झाले कारण जगनमोहन हा पर्यायी चेहरा पुढे आला.

मोदींसमोर तसा चेहरा उभा राहू नये याची काळजी जशी संघ-मोदी-भाजप-आयटीसेल यांनी घेतली, तशीच ती स्वार्थासाठी जुन्या काँग्रेसी नेत्यांनीही घेतली. त्यामुळे जोवर तसा चेहरा उभा राहात नाही तोवर मोदी नि भाजप घट्ट राहणार आहेत. आणि असा चेहरा तिसरी आघाडी नावाचे कडबोळे कधीच देऊ शकणार नाही. जनता दलाने पाच वर्षांत तीन पंतप्रधान दिले. कुण्या एकाला इतरांनी स्थिर होऊच दिले नाही. परिणामी पुन्हा काँग्रेस आली. थोडक्यात तिसरी आघाडी ध्रुवीकरणाने तात्पुरती सत्ता मिळवेल, पर्याय उभा करणार नाही !

’नोटा’ला मतदान करा', 'त्यातल्या त्यात चांगला उमेदवार पाहून मतदान करा' म्हणणारे भाबडे असतात, सत्तेच्या राजकारणाबाबत पूर्ण अडाणी असतात. या दोनही मार्गांनी नको असलेले सत्ताधारी पायउतार होण्याची शक्यता शून्य असते. हे साधारणपणॆ आठ-दहा जणांनी कलेक्टर-कचेरीसमोर घोषणाबाजी करुन आंदोलन केल्याचे श्रेय पदरात पाडून घेण्याइतकेच प्रतीकात्मक असते. त्याने काडीचाही बदल घडत नसतो.

’त्यातल्या त्यात चांगला’ उमेदवार निवडा, भले तो निवडून येवो न येवो, भले त्याला विधिमंडळात संसदेत तोंड उघडण्याची, विधेयक आणण्याची संधी मिळो न मिळो असे म्हणणारे मोठे गंमतीशीर असतात. एकीकडे राजकारणातील व्यक्तिकेंद्रित विचारांना नाकारत असताना हा विचारही व्यक्तिकेंद्रितच आहे, फक्त व्यक्तीचे तथाकथित गुण वेगळे मोजले आहेत एवढाच फरक आहे, हे त्यांच्या ध्यानात येत नाही.

तेव्हा भाजप-संघ यांना देशव्यापी पर्यायाची तयारी करण्याखेरीज पर्याय नाही. मग तो शून्यापासून उभा करणे असो की इंग्रजीत ज्याला 'फ्लिपिंग द हाऊस' म्हणतात तसे जुने घर ताब्यात घेऊन रिनोव्हेट केल्याप्रमाणे काँग्रेसचा सांगाडा ताब्यात घेऊन त्याला सर्वस्वी नवी दिशा, नवे कार्यक्रम देणे असो, पर्याय व्यापकच हवा. फुटकळांची मोळी प्रकारचा उपयोगाचा नाही. अशा तात्पुरत्या कडबोळ्याने बुडत्याचा पाय अधिक खोलातच जाणार आहे.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा