बुधवार, २२ मे, २०१९

Blame It On EVM

पाच वर्षांपूर्वी ईवीएम हॅकिंग आणि (त्याहीपूर्वी अनेक वर्षे) ’धनदांडग्यांच्या मदतीने सत्ताधारी जिंकले’ असे रडणारे आजही तसेच रडत असतील, तर इतक्या वर्षांत या विरुद्ध त्यांना प्रतिबंधात्मक किंवा पर्यायी असा कोणताही उपाय शोधता आलेला नाही, या आपल्या अपयशाची कबुलीच ते देत आहेत.

EVM

’ईवीएम हॅकिंग मुळे आम्ही हरलो’ हे रडगाणे म्हणजे माझे लकी पेन हरवले म्हणून नापास झालो या तर्कासारखे आहे. मतपत्रिकेकडे परत जायला हवे हे विरोधकांचे - त्यात काही वास्तविक आणि काही स्वयंघोषित पुरोगामीही आहेत - म्हणणे नि संघ-भाजपच्या ’आपल्या गौरवशाली (मनात: माझ्या सोयीच्या) भूतकाळाकडे चला.’ म्हणण्याइतकेच प्रतिगामी आहे.

ईवीएमबद्दलचा संशय हा कोणत्याही पुराव्याखेरीज खात्रीत रूपांतरीत होणे हा ते करणार्‍याच्या पूर्वग्रहालाच दृढ करत असतो इतकेच. (आणि केवळ निरीक्षण, अनुभव ते पुरावा म्हणून सिद्ध होणे यात यऽऽऽऽ मैलांचे अंतर असते हे अडाण्याला नसेल तरी जराशी समज असणार्‍यांना समजायला हवे)

अशा पळवाटा शोधू पाहणार्‍या मानसिकतेमध्ये, एकदा मोडून पडल्यावर पुन्हा उठून उभे राहण्याची जिद्द अवतरणे फार अवघड असते. ते कुणावर तरी खापर फोडून त्याखाली आपले नाकर्तेपण गाडून टाकतात नि पुन्हा सुस्त होत असतात. स्वत:च्या चुका शोधणारा नि त्यांचे निवारण करणाराच पुन्हा उठून उभा राहू शकतो.

मूळ समस्या ’पुरेसा अभ्यास केलेला नाही’ ही आहे. हे मान्य करत नाही तोवर केवळ लेखणी बदलून तुम्ही पास होणार नाहीच. फारतर स्वत:ची समजूत घालता येईल. पण त्याने होईल इतकेच, की मार्चमध्ये नापास झालेला परत ऑक्टोबरला गटांगळ्याच खाणार आहे.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा