गुरुवार, २३ मे, २०१९

Standing my ground

कुणी काय करावं, बदलावं की बदलू नये हे सांगत वांझोटे उद्योग करत नाही. मी काय करेन ते नक्की सांगतो.

मोदींनी भारतात प्रत्येक घरात सोन्याचा कमोड बसवला...
जगातील सातशे कोटींपैकी सहाशे नव्याण्णव कोटी, नव्याण्णव लाख, नव्याण्णव हजार, नऊशे नव्याण्णव लोकांनी लोटांगण घातले...

... तरीही या भूतली त्यांना मतदान न करणारा मी एकटा असेन.

IamNotOkWithThis

त्या माणसाने इथे द्वेष रुजवला आहे, समाजात फूट पाडली आहे, झुंडींना निवाड्याचे स्वातंत्र्य दिले आहे, जनतेने निवडून देऊनही तो स्वत:ला जनतेला उत्तरदायी समजत नाही. इतरांना ते चालत असेल पण जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून ते मला अमान्य आहे. खोटेपणा आणि चारित्र्यहनन यांचा त्याने राजमार्ग बनवला आहे. माझ्या आसपासच्या अनेक सुज्ञ भासणार्‍या व्यक्तींना त्याने त्या खोटेपणाचे आंधळे वाहक बनवले आहे. माध्यमांची विश्वासार्हता त्याने शून्यावर आणून ठेवलेली आहे. अशा व्यक्तीला मी माझा नेता मानू शकत नाही.

त्याने राज्यकर्ता असणे ही वेगळी गोष्ट आहे. बहुमताच्या लोकशाहीत राज्यकर्त्याला माझ्यासारख्या एका नागरिकाने त्याला नेता मानण्याची आवश्यकता मुळीच नाही. तसेच त्याला तसे मानले पाहिजे असे माझ्यावरही बंधन नाही.

  • बहुमताने निवडून आला म्हणून अरुण गवळीला मी नेता मानू शकलो नव्हतो,
  • बहुमताने निवडून आला म्हणून लालूप्रसाद यादवला नेता मानू शकलो नव्हतो
  • उ.प्र. च्या तुरुंगातच वस्तीला असलेल्या, आणि सलग चार वेळा आमदार झालेल्या राजाभैयालाही मी नेता मानू शकत नाही.

माझा नेता हा चांगला माणूस असायला हवा. त्याचे भौतिक कर्तृत्व किती आहे किंवा त्याच्यासमोर किती शेपट्या हलतात याच्याशी मला कर्तव्य नाही.

त्याच्याहून अधिक चांगली माणसे राजकारणात आहेत, तोवर मी त्याला मत देणार नाही. आणि तितकी वाईट वेळ यावी इतकी या देशाची अधोगती होईल इतका निराशावादी मी कधीच नव्हतो, नसेन.

I stand on my feet, think with my own brain. I don't need anyone else to tell me what is right for me.

बर्‍या वाईटाचे मूल्यमापन करण्याची -बहुसंख्येपेक्षा अधिक चांगलीच, विश्लेषक बुद्धी मला मिळालेली आहे. तेव्हा कोणत्याही झुंडीचा भाग होऊन त्यांचा झेंडा, त्यांचा नेता, त्यांचा जगण्याचा मंत्र आंधळेपणाने स्वीकारण्याची वेळ माझ्यावर कधीच येणार नाही.

जे भित्रे असतात, निर्णय घेण्यास घाबरतात, तो चुकला तर आपलं नुकसान होईल किंवा त्याहीपेक्षा अधिक म्हणजे चारचौघात हसं होईल म्हणून ते आसपासच्या जमावाकडून विचार नि निर्णय उधार घेतात. मला त्याची गरज नाही.

कोणत्याही 'हीट-अ‍ॅंड-ईट' विचारव्यूहाच्या, देव-पारलौकिकादि काल्पनिक खुंट्यांच्या, इतकेच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीच्या आधाराशिवाय माझ्या पायावर मी ठाम उभा आहे. कुण्या स्वयंघोषित त्रात्याची खुंटी वा कुबडी मला जगण्याला आवश्यक नाही.

- oOo -


संबंधित लेखन

1 टिप्पणी: