’वेचित चाललो...’ वर नवीन:   

प्रतीक्षा       सत्तांतर       हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

मंगळवार, २८ मे, २०१९

एका किंग-स्लेअरची गोष्ट (एक राजकीय रूपककथा)


 ---

एक आटपाट नगर होतं. तिथं एक पाटलाची गढी होती. पाटील अगदी पाटलासारखा होता. कधी रयतेची काळजी घेई, कधी त्यांचं शोषण करी. पाटलाचे सगे-सोयरे, सोयरे-धायरे, जातवाले-गाववाले पाटलाच्या अधिक मर्जीतले होते, हे तर ओघानं आलंच.

गावात एक तेजतर्रार फायरब्रॅंड तरुण तालमीत नित्य नेमानं मेहनत करत असे. त्याला पाटलाचं हे वर्चस्व मान्य नव्हतं. पाटीलकी ही शोषक व्यवस्था आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानं गावातच अ‍ॅंटी-पाटीलिझमची मुहूर्तमेढ रोवली. ग्रामपंचायतीची निवडणूक असो, पंचायत राजमधून मिळणारे लहान-सहान ठेके असोत की, कुठल्या-कुठल्या सरकारी योजनांमार्फत येणारी मदत असो. प्रत्येक पातळीवर तो पाटलाला नडू लागला. कालचं पोरगं आहे म्हणून पाटीलही दुर्लक्ष करत असे. गावातील लोकांना पाटलाचं वर्चस्व डाचत असलं तरी एक अपरिहार्यता म्हणून किंवा शेवटी अडीनडीला तोच कामात येतो म्हणून बहुतेक लोक त्याबद्दल फारशी तक्रार करत नसत. त्यामुळे त्या तरुणाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण तरी देखील गल्लीतली चार-पाच पोरं त्याच्या आसपास असतच.

‘गांजलेल्या व्यक्तीला तुझ्या या दूरवस्थेला हा जबाबदार असे म्हणून’ दगडाकडे जरी बोट दाखवलं तरी ती ते खरं मानून ते बोट ज्याचं आहे, त्याला आपला त्राता मानत असते. कारण विपन्नावस्थेत, किमान गरजांबाबतही गांजलेल्या व्यक्तीची सारासारविवेकबुद्धी फारशी काम करत नसते. त्या क्षणी ही स्थिती लवकरच पालटेल असं आश्वासन देणारा कुणी देवबाप्पा तिला हवा असतो. एका ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी दुष्काळ पडला. आलेल्या सरकारी मदतीचा जास्त वाटा पाटलानं आपल्याच लोकांना दिला म्हणून तरुणानं रान उठवलं. त्यामुळे जनतेनं त्यालाच सरपंच म्हणून निवडून दिलं. पण एकाच वर्षांत झालेला सावळा-गोंधळ पाहून पंचायत चालवणं हे या प्राण्याचं काम नव्हे, हे लक्षात आल्यानं गावातील काही ज्येष्ठांनी त्याच्याकडून राजीनामा लिहून घेतला. पाटील पुन्हा राज्य करू लागला.

या पदच्युतीनं तो तरुण अधिकच पेटला. सनदशीर मार्गानं पाटलाला पदच्युत करता येत नाही, हे ध्यानात आल्यावर ‘या अन्यायी, शोषक पाटलाची सत्ता मी उखडून काढीन,’ अशी गर्जना त्यानं केली. मग तालुक्याला गेला, शहरात गेला नि जमेल त्या बाहेरच्यांशी संधान बांधून त्यानं एक फळी उभी केली. आपल्या या अभियानाला शहरातला एक नेता त्यानं पकडून आणला. गावात पाटलाच्या शोषणाविरोधात धामधूम सुरू झाली. गावाबाहेरून पगडीवाले, फेटेवाले, टोपीवाले, बोडके लोक धोतर नेसून, जीन्स घालून, अर्ध्या चड्डीवर जमेल तसं गावात धडकू लागले. पाहता पाहता गावात पाटीलविरोधी कृती समिती उभी राहिली. ग्रुप-ग्रामपंचायतीत या पाटलासमोर कायम माघार घ्याव्या लागणार्‍या शेजारच्या गावातल्या पाटलानं त्यात आपली वर्णी लावून घेतली. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या एकमेव न्यायानं तरुणानं त्याला ताबडतोब सोबत घेतलं. बर्‍याच दबावानंतर प्रस्थापित पाटलानं सरपंचपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण त्या जागी कुणी सरपंच व्हावं याबाबत कृती समितीमध्ये एकमत होईना. शेजार गावच्या पाटलानं आपलं घोडं दामटून पाहिलं, पण पुरेशा पाठिंब्या अभावी निमूट माघार घेतली.

हा तिढा बरेच दिवस चालला. आपला तेजतर्रार तरुण नि त्याचे तरुण साथीदार अस्वस्थ होत होते. असला सनदशीर वगैरे प्रकार चिवटपणे चालवण्याइतकी चिकाटी त्यांच्यात नव्हती. मग त्यांच्या त्या अस्वस्थपणाला हेरून शेजारच्या गावच्या पाटलानं ‘धडक कृती करायला हवी’ असं पिल्लू सोडलं. पाटलानं धूर्तपणे नेमकं काय करावं हे सांगितलं नसलं तरी अशा उतावळ्या, अस्वस्थ तरुणांकडून धडक कृती म्हणजे काय होऊ शकते, याची त्याला धूर्ताला पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे ते जे ठरवतील त्यात ‘सक्रीय’ सहभाग घेण्याचं ठोस आश्वासन त्यानं त्यांना देऊन टाकलं. थोडक्यात निर्णयाची जबाबदारी त्यानं त्यांच्यावर टाकली.

एके दिवशी मध्यरात्र उलटून गेल्यावर पाटलाची गढी धडाडून पेटली. त्याच वेळी गावाबाहेर त्याच्या उभ्या पिकातही अग्नितांडव सुरू झालं. सकाळ होईतो अंगावरच्या कपड्याखेरीज पाटलाकडे काहीही उरलं नव्हतं. पंचनामा, सरकारी मदत या बाबी कितपत कामाच्या असतात, हे स्वत:च पाटील असल्यानं त्याला ठाऊक होतं. त्यामुळे शेजारच्या पाटलाने देऊ केलेली रक्कम घेऊन पाटलानं गढीची जमीन आणि शेताचा एक तुकडा वगळता उरलेलं सारं शेत त्याच्या नावावर करून दिलं. आलेल्या मूठभर पैशातून गावाबाहेरील उरलेल्या शेतात एक झोपडी बांधून पोटापुरतं पिकवत तो जगू लागला.

इकडे नव्या पाटलानं गढीची जागा साफ करून स्वत:चा नवा वाडा उभा केला. जुन्या पाटलाचे बरेचसे सगे-सोयरे, सोयरे-धायरे, जातवाले-गाववाले आता नव्या पाटलाच्या मर्जीतले झाले, हे तर ओघानं आलंच. दोनच वर्षांत जुन्या पाटलाच्या अनुपस्थितीत त्यानं इतकी वर्षं हुलकावणी दिलेलं सरपंचपदही हस्तगत केलं.

त्या तेजतर्रार तरुणाचं काय झालं? शहरातून सुटीसाठी गावात आलेल्या नव्या पाटलाच्या पोरानं तिकडे पाहिलेल्या कुठल्याशा सिनेमा की टीव्ही मालिकेतून ऐकलेली ‘किंग-स्लेअर’* ही पदवी त्याला बहाल केली. त्या धुंदीत तो काही महिने राहिला. मग अंगभूत अस्वस्थपणानं म्हणा की ‘कालचा गोंधळ अधिक बरा होता’ याची जाणीव झाल्यानं म्हणा, तो आहे तिथंच राहून आता नव्या पाटलाच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहात होता. पण नवा पाटील पूर्वी त्याच्या बाजूलाच राहिलेला असल्यानं त्याची कुवत जाणून होता. त्यामुळे त्या तरुणाची सारी रसद तोडत, त्याच्या मित्रांना एक एक करून आपल्या बाजूला वळवून घेत त्यानं त्याला निष्प्रभ करून टाकला. त्यामुळे जुन्या पाटलाची गढी उदध्वस्त झाल्यावर आता आपण सरपंच होऊ अशी त्याला स्वप्नं पडत होती, ती धुळीला मिळाली. पण पडेल तरी नाक वर या न्यायानं ‘मला राजकारणात रस नाही. मी रयतेत राहून तिची सेवा करेन,’ अशी मखलाशी करायला सुरुवात केली.

जेव्हा नवा पाटील दुसर्‍यांदा सरपंच म्हणून निवडून आला, तेव्हा हा तेजतर्रार तरुण भडकून जुन्या पाटलाकडे गेला नि नव्या पाटलाला सरपंचपद बहाल केल्याबद्दल शिव्यांची लाखोली वाहू लागला. ‘तू मेल्याशिवाय ही पाटीलकीची व्यवस्था नाहीशी होणार नाही’ म्हणू लागला. जुन्या पाटलानं सारं ऐकून त्याला गूळपाणी देऊन शांत केलं नि परत लावून दिलं.

तेव्हापासून तो नियमच झाला. आपला तेजतर्रार तरुण रोज एकदा तरी जुन्या पाटलाच्या झोपडीवर जाऊन त्याला शिव्या देतो, ‘तू मेल्याशिवाय ही पाटीलकीची शोषक व्यवस्था नाहीशी होणार नाही’, म्हणतो आणि तिथून उठून नव्या पाटलाच्या वाड्यासमोर असलेल्या वडाच्या पारावर बसून विषण्णपणे त्या वाड्याकडे पाहात असतो. जमेल तेव्हा सरत्या तारुण्याबरोबर मागे सरत चाललेल्या केसांवर हात फिरवत जुन्या पाटलाचं राज्य आपण कसं खालसा केलं, याच्या सुरस चमत्कारिक कथा ताज्या दमाच्या मुलांना, तरुणांना सांगत बसतो, नव्या पाटलाचं राज्य घालवण्यास उद्युक्त करतो. नव्या पाटलाच्या दरबारी काठ्या घेऊन उभी राहणारी ही पोरं साळसूदपणे त्याचं ऐकतात नि दूर जाऊन त्याची टवाळी करत फिदीफिदी हसत बसतात.

त्या वेळी हातापायांचा कंप सांभाळत त्याचा म्हातारा आपली वीतभर जमीन कसत असतो आणि वाड्याच्या वरच्या खिडकीतून नवा पाटील या दोघांकडे पाहून मिशीला पीळ देत गालातल्या गालात हसत असतो.

---
(कथा, प्रसंग काल्पनिक असले तरी पात्रांबद्दल ती खात्री देता येणार नाही.)

( पूर्वप्रसिद्धी: ’अक्षरनामा’ https://www.aksharnama.com/client/article_detail/3319)

* किंग-स्लेअर : नुकत्याच संपलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतील जेमी लॅनिस्टरला मिळालेलं उपनाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा