("पुरोगामीत्व हे जातीसारखं "बंदिस्त" होत आहे . पुरोगामित्वाचा प्रवास भाजपा ते काँग्रेस एवढ्याच परिघात फिरतो .!!" या दाव्याला दिलेला प्रतिसाद.)
थोडी दुरुस्ती: ’राजकीय पुरोगामित्वाचा’ प्रवास भाजप ते काँग्रेस एवढ्याच परिघात फिरतो.
हा मुद्दा मान्य. पण राजकारणात व्यवहार्यता नावाचा एक भाग असतो. लोकशाही मध्ये बहुसंख्य मतदार हे अ-पुरोगामी (प्रतिगामी म्हणत नाही मी) असतात. त्यांची मते हवी असतील तर व्यवहार्य, मर्यादित, आणि उलट आपल्याच डोक्यावर बसणार नाही इतपत तडजोड अपरिहार्य ठरते. अति-ताठर पुरोगामित्वाचे राजकारण अ-पुरोगामी बहुसंख्य समाजात अयशस्वीच होत असते.
मार्क्सने समाजवाद (socialism) हा कम्युमिझमचा पहिला टप्पा (अंतिम साध्य नव्हे!) मानला होता. त्याला अनुसरून सोविएत ’सोशलिस्ट’ रिपब्लिक होते, कम्युनिस्ट नव्हे! त्याच धर्तीवर पुरोगामी राजकारणाचा काँग्रेस हा पहिला राजकीय टप्पा मानायला हवा.
दुसरे असे की जेव्हा स्वच्छ पुरोगामी राजकीय पर्याय उभा राहिल तेव्हा त्यांना कोणता विरोधक अधिक सोपा असेल असा विचार करुन पाहा. या पुरोगामी पक्षाला राजकीय पराभव करताना भाजपचा पराभव करताना अधिक सोपे की काँग्रेसचा? माझ्या मते काँग्रेसचा. त्यामुळॆ जोवर तसा स्वच्छ पुरोगामी पर्याय उभा होत नाही, तोवर काँग्रेसला जिवंत ठेवणे, भाजपचा पराभव करुन सत्तेजवळ नेणे, हा पुरोगामी राजकारणाचा मधला टप्पा मानायला हवा. स्वच्छ पुरोगामी पर्याय उभा राहितो काहीच न करणे, भाजपलाच सत्तेसाठी पुढे चाल देणे मला मान्य नाही.
असा स्वच्छ पुरोगामी पर्याय केव्हा उभा राहील, कसा उभा राहील, याबाबत अजूनही मंथन होत नाही. त्यामुळे तो किमान दहा वर्षे तरी उभा राहू शकेल असे मला वाटत नाही. अशा वेळी दगडापेक्षा वीट मऊ हा निर्णयच करावा लागणार आहे; आणि तो राजकीय दृष्ट्या भानावर असलेले, अति-स्वप्नाळू नसलेले पुरोगामी करत आहेत, असा माझा समज आहे.
वैचारिकतेचा बडिवार, तुमच्यापेक्षा आम्हाला अधिक कळते हा ’holier than thou’ दावा, त्यामुळे वैचारिक सुधारणा वरुन खाली होणार हा गैरसमज, ही पुरोगामी विचारांचा पाया आकुंचित होत चालल्याची कारणे आहेत. भाजप-संघाची चलाखी ही की ’तुमचे जे आहे ते जगात भारीच आहे’ असे म्हणत सामान्यातल्या सामान्यांचा अहंकार ते कुरवाळतात नि त्याच्या खांद्यावर हात टाकायचा हक्क मिळवतात. यथावकाश खांद्यावरचा हात खिशात जाऊन त्या माणसाचे सर्वस्व हिरावून घेऊन त्याला गुलाम करतात. सामान्यातल्या सामान्यालाही ’तुला कळत नाही. माझे ऐक.’ असे सांगणे अपमानास्पद वाटत असते, हे पुरोगामी अजून समजून घ्यायला तयार नाहीत.
आणि मुळात एखाद्या तयार विचारव्यूहांतून जगण्याचे सारे शहाणपण मिळते नि ते रुजवले की काम झाले या गैरसमजातून बाहेर येण्याची गरज आहे. सामान्यांच्या जगण्यातून येणारे अनुभवजन्य शहाणपण आपल्या विचारात अंतर्भूत करुन घ्यायला हवे. केवळ आपल्या एखाद्या विचारवंतांच्या वा विचारव्यूहाच्या पोथीचे प्रेषित बनून भागणार नाही हे समजून घ्यायला हवे आहे.
कम्युनिस्ट स्वत:ला सर्वात शुद्ध पुरोगामी समजत असले, तरी त्यांना राजकारणाची व्यवहार्यता मुळीच समजलेली नाही असे माझे ठाम मत आहे. (भाजपने त्या व्यवहार्यतेला शरण जात लोटांगण घातले आहे, ते दुसरे टोक.) सत्ता असेल तर विचार रुजवणे सोपे जाते. २०१४ च्या विजयानंतर आसपास किती नव्या ’शाखा’ निर्माण झाल्या, किती शाळकरी पोरे अर्धी चड्डी घालून तिथे जाऊ लागली याचे निरीक्षण करा.
या उलट ज्योतिबाबूंना पंतप्रधानपदाची संधी होती तेव्हा कम्युनिस्टांनी वैचारिक शुद्धता वगैरेची बढाई मारत माती खाल्ली. ते पंतप्रधान झाले असते तर लोकांना कम्युनिस्ट विचारांबद्दल कुतूहल निर्माण झाले असते, त्यात विचार निदान काही प्रमाणात तरी पसरला असता असे म्हणणे फार टोकाचे होणार नाही.
आणि म्हणून पुरोगामी मंड्ळी १०० टक्के पुरोगामी असा राजकीय पर्याय उभा करतील, तेव्हा आम्ही नक्कीच त्या बाजूचे असू. (आमची ती कुवत नाही हे प्रामाणिकपणे आधीच कबूल करतो.) पण तोवर पुरोगामित्वाची पोथी व्याख्यान-लेखनादी देव्हार्यात ठेवून पूजा करत निष्क्रिय बसणे जमणार नाही. आमचा गण्या शंभर टक्के नसेल, चाळीस टक्के पुरोगामी असेल तरी त्याला निवडून देणार आहोत. कारण पुरोगामित्वात साफ नापास असणार्यापेक्षा निदान तो पास तरी होतो आहे.
आणि अशा वेळी वैचारिक सक्षम पुरोगामी ’मी अधिक पुरोगामी की तू’ या वादात संघटनेला नगण्य महत्व देत आहेत. स्वत:च्या सर्वस्वी वैयक्तिक पुरोगामित्वाचा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी आपले वर्तुळ लहान करत नेत आहेत. त्यासाठी अन्य पुरोगाम्यांचे तथाकथित दोष शोधून शोधून ’तो छुपा तिकडचा’ वगैरे बिनडोक धंदे करत बसले आहेत. जवळ करण्यापेक्षा दूर करण्याची ही अहमहमिका, ती ’अस्पृश्यता’च त्यांना दुबळे करत नेते.
पुरोगाम्यांनी राजकीयदृष्ट्या बरेच शाहाणे होण्याची गरज आहे. वैचारिकता नि राजकारण हे तंतोतंत साधले पाहिजेत हा अव्यवहार्य आग्रह सोडण्याची गरज आहे. वैचारिक निष्ठा हा जगाच्या अंतापर्यंत केवळ मूठभरांचाच प्रश्न राहणार आहे, इतरांपुढे अधिक मूलभूत प्रश्न असतात नि तेच राजकारणात अधिक प्रभावी ठरतात. तेव्हा हे जमेल तेव्हा खरे. आणि तसे झाले तरच तात्पुरती तडजोड म्हणून स्वीकारलेला काँग्रेस हा पर्याय कचराकुंडीत फेकून देता येईल.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा