सामान्यपणे दक्षिण भारताचा इतिहासही धड ठाऊक नसलेले लोक टारझनसारखे छात्या पिटून राष्ट्रभक्ती वगैरेच्या बर्याच बाता मारत असतात. इतिहासामधून आपल्या जातीच्या, धर्माच्या सोयीच्या घटना नि नेते शोधून त्यांच्या जयंत्या, मयंत्या, पुतळे नि देवळे उभी करुन आपल्या संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाच्या ढेकरा- आय मिन डरकाळ्या फोडत असतात. प्रामुख्याने यांच्यातच ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ या गैरसमजाला देवघरात ठेवून रोज दोन फुलं वाहण्याची पद्धत आहे.
वास्तविक संस्कृती नि इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण इतिहास म्हणतो तेव्हा केवळ राजकीय इतिहास- आणि त्याला जोडून येणारा सामाजिक इतिहासच आपल्याला अभिप्रेत असतो. सांस्कृतिक नि भौतिक इतिहासाचे आपल्याला वावडे असते. शेजार्याच्या घराला, शेजारच्या इमारतींमधील घराला वापरलेल्या विटांची माती कशी आमच्याच परसातली होती इतपतच आपले संशोधन पसरलेले असते.
सांस्कृतिक देवाणघेवाण ही निरंतर चालत आलेली प्रक्रिया आहे. विविध संस्कृतींमधून उगम पावलेल्या भाषा, संगीत वा अन्य कला, रूढी, चालीरीती या अन्य संस्कृतींमध्ये पोचल्या, पोसल्या नि रुजल्या आहेत. अनेकदा राजकीय पराभवानंतर नव्या शासकांनी त्यांचे निर्दालन करुन आपल्या लादल्यामुळे मूळच्या हळूहळू अस्तंगत होत जातात नि जेत्यांच्या तिथे रुजून राहतात.
उलट सांस्कृतिक आदानप्रदानात ज्या इकडून अन्य भूभागात गेल्या, रुजल्या त्या तिथेच अधिक प्रकर्षाने दिसतात. म्हणजे जिथे उगम तिथे त्या नाहीत, तर जिथे आहेत तिथे त्या उपर्या आहेत, असा प्रकार होतो. मग जिथे त्या आहेत त्या मूळच्या तिथल्याच आहेत हे सांगणारा ’खरा इतिहास’ लिहिला जाऊ लागतो. तर मूळ स्थानी त्या गमावलेपणाची खंत वाढीस लागून त्यावर हक्क प्रस्थापित करण्याचा आटापिटा सुरू होतो.
गंमत म्हणजे हे असेच घडते असेही म्हणता येत नाही. ही केवळ एक शक्यता असते. दुसरी शक्यता ही की मुळात त्या त्या स्थानी असलेला सांस्कृतिक ठेवा अनेकदा बाहेरचेच लोक आपल्याकडून गेल्याचा दावा करु लागतात. तर जेते आपल्या संस्कृतीला लादतानाच जितांच्या संस्कृतीमधील काही वारसा बेमालूमपणे आत्मसात करुन त्याला आपला रंग फासून टाकतात (ख्रिसमस आणि एकुणच ख्रिसमस-काळ याच्या संदर्भात या मुद्द्यांचे मी भरपूर सोदाहरण विश्लेषण केले आहे.)
आता इतक्या सुदूर भूतकाळात यातील नक्की कोणती शक्यता वास्तवात आली होती हे आज सांगणे जवळजवळ अशक्यच असते. कारण आपण यासाठी त्याचे दस्तऐवजीकरण करणार्यांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असतो. आणि त्याला जागोजागी छिद्रे असतात. जेत्यांना धार्जिणे लेखक, समाजातील सर्वात प्रभावशाली गटाला धार्जिणे असणारे लेखक, आपापल्या पूर्वग्रहाला अनुसरून नोंदींमध्ये फेरफार करणारे लेखकच बहुसंख्येने असतात. आणि तणकटांमध्ये नक्की दूर्वा कोणती याचा निर्णय इतक्या दशकांनंतर-शतकांनंतर आपण घेणे अशक्यच असते.
यावर उपाय काय? सोपा आहे तसा. वर जशा तीन शक्यता सांगितल्या तसेच अनेक शक्यतांनी हे जग बनलेले आहे याचे भान राखणे. त्यातून अनुभव, वस्तुनिष्ठ निरीक्षण, अभ्यास आणि निष्कर्ष या मार्गाने प्रथम त्यातील संभाव्य कोणत्या याचा पडताळा घेणे. त्यातील सर्वाधिक संभाव्य ही तत्कालीन वास्तवाच्या सर्वात जवळची (संपूर्ण वास्तव नव्हे!) म्हणून निवडणे; आणि हे करताना अधिक माहिती, निरीक्षण, अधिक विश्वासार्ह अभ्यास पद्धती समोर येताच ही निवड बदलू शकते हे ही मान्य करणे.
पण खरा इतिहास-खोटा इतिहास, देव-सैतान, बरोबर-चूक या बायनरी समजांच्या जगात शेणकिड्यासारखे राहू इच्छिणारे विचारहीन लोक या वाटेला कधी जातील या शक्यतेची (possibility) संभाव्यता (probability) नगण्य आहे.
याची आठवण झाली ती वेगळ्याच कारणाने. Real African Books या नावाचे एक पेज मी फॉलो करतो. फक्त पाश्चात्त्य (आणि उत्तर भारताचा) इतिहास शिकलेल्या मंडळींना ’त्या काळ्या लोकांचा इतिहास कशाला शिकायचा?' असे वाटण्याचा संभव बराच आहे. पण मानवाच्या संस्कृतीचे उगमस्थान असलेल्या आफ्रिकेबद्दल आपल्याला शून्य माहिती असते. 'दरिद्री आणि गुलाम लोकांचा प्रदेश' एवढ्या गृहितकावर आपला माहितीकोष संपतो. थोडेफार निसर्गप्रेमी (आणि जे फक्त सफारीला जाऊन फोटो काढून मिरवतात ते छद्मनिसर्गप्रेमी) लोकांना सेरेंगिटीमुळे ’समृद्ध प्राणिजीवन असलेला प्रदेश’ असा - चुकीचा - समज असतो. या पलिकडे आफ्रिका आपल्याला ठाऊकच नसते.
अर्वाचीन भारताच्या संदर्भात पाहिले तर अर्ध्या-एक राज्याचे ’साम्राज्य’ असलेल्यांचा इतिहास आपण शिकलेलो असतो. पण आफ्रिकेतील एखाद्या ऐतिहासिक साम्राज्याबद्दल आपल्या शून्य माहिती असते. तेथील संगीत, नृत्य याबाबत ते 'बार्बारिक' म्हणाजे मागासलेल्यांचे, प्राथमिक पातळीवरचे हा आपला ठाम समज असतो. या पेजवर आफ्रिकेबद्दल थोडक्यात माहिती दिली जात असली तरी बरीच उद्बोधक असते. एका अर्थी आफ्रिका चमच्या-चमच्याने आपल्याला पाजली जाते.
आज गंमत अशी झाली की या पानावर कार्लोस सान्ताना या मेक्सिकन-अमेरिकन रॉक कलाकाराचे म्हणून हे वाक्य क्वोट केले आहे. ते वाचताना मला आपल्याकडील ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ जमातीची प्रकर्षाने आठवण झाली. स्वत: कार्लोस जरी आफ्रिकन नसला, तरी हे शेअर करणारे आफ्रिकन असल्याने ’मानवी जीवनाच्या उगमा’पाशीच हा ’आमच्याच नळाचं पाणी जगभर गेलंय’ तर्क उगम पावला असावा का? असा प्रश्न मला पडला. निदान 'हा ही विचार किंवा शोध आमच्याचकडून गेला'असं इकडचे छातीपिटू टारझन म्हणणार नाहीत अशी आशा आहे. उलट शक्यता म्हणजे कदाचित तेवढे श्रेयही ते इतर कुणाला, ते ही ज्यांना दुय्यम समजतो त्या आफ्रिकनांना देण्याची तयारी नसेल.
आमचाच प्रदेश, संस्कृती, धर्म, परंपरा जगात भारी आणि जगात ’जे जे उत्तम उदात्त उन्नत’ ते ते सारे आमच्याच बापदाद्यांनी निर्माण केले हा अनाठायी दंभ सार्वत्रिकच दिसतो. अरबांनी गणितामध्ये, मोजणीमध्ये बरीच प्रगती केली होती. वाळवंटी प्रदेशात राहणार्या अरब टोळीवाल्यांनी दिशा राखण्यासाठी नक्षत्रांचा अभ्यास केला, खगोलशास्त्र विकसित केले. आज ज्यांना हिंदू-अरब अंक म्हटले जाते त्यांचा वापर सुरू केला आणि मोजणीही. पण जगात ते एकटेच हे करत होते असे नाही. भारतासह चीन द. अमेरिका येथील संस्कृतीमध्येही यांचा उल्लेख झालेला दिसतो. आता हे इथून तिथे गेले की तिथून इथे, हे ठरवणे केवळ मूल्यमापनाचा भाग आहे. त्यात अर्वाचीनांचा स्वार्थ मिसळतो आणि माहिती बाधित होत जाते. त्यामुळे शहाण्याने फक्त निरीक्षणेच तेवढी घ्यावीत (ती ही बाधित असू शकतातच) आणि सांस्कृतिक रस्सीखेचीचे तपशील नाईलमध्ये, गंगेमध्ये, तैग्रिसमध्ये, डन्यूबमध्ये सोडून द्यावेत.
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा