शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

वर्ड-क्लाऊड सिंड्रोम

’वर्ड-क्लाऊड सिंड्रोम’ नावाचा एक नवा आजार सोशल मीडिया मुळे उद्भवला आहे. लेखकाचा सूर, मुद्दा, भर कशावर आहे, त्याला काय सांगायचे आहे याकडे साफ दुर्लक्ष करुन लोक पोस्टमधील आपल्याला बोलता येईल असे शब्द फक्त उचलतात (हे पाहून मला ’ब्युटिफुल माईंड’ मधला डॉ. नॅश आठवतो!) नि त्यावर चर्चा वा प्रतिसाद करतात.

WordCloud

कालच मी स्टार ट्रेक’ या मालिकेतील एक - माझ्या मते- मननीय संवाद शेअर केला. हा संवाद अवगुण मानल्या गेलेल्या वा नकारात्मक गुण मानल्या गेलेल्या व्यक्तिवैशिष्ट्यांच्या संभाव्य उपयुक्ततेबद्दल होता. १९६६ ची मालिका कदाचित अनेकांना ठाऊक नसेल म्हणून ’ही कुठली? तर सध्या चालू असलेल्या यंग शेल्डन’मध्ये उल्लेख झालेली.’ असा संदर्भ दिला. झाले तेवढेच वाचून शाळेत निबंधात जसे ’... आणि म्हणून मला माझी आई फार्फार आवडते.’ म्हणून शेवट करावा तसे ’मला यंग शेल्डन आवडते/मी पाहतो/पाहते.’ चे प्रतिसाद पडले. एका मित्रवर्यांनी त्यातून नेमके ’आम्ही स्वत:ला तरुण असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो’ हा निष्कर्षही काढून दाखवला (अर्थात थट्टेने, पण लिहिणार्‍याचा हेतू, लेखनाचा रोख वा सूर बिलकुल ध्यानात न घेता कुठल्याही पोस्टवर आपल्याला अशी भंकस करण्याची परवानगी आहे हा आत्मविश्वास आवडला आपल्याला.)

आज आनंद मोरेने ’लायन किंग’ च्या निमित्ताने वडील/मुलगा संबंधाबद्दल एक सुरेख पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यानेही प्रस्तावनेखातर एका लेखकाच्या वडिलांप्रती न्यूनगंडाचा उल्लेख केला आहे. तिथे खाली तो लेखक कोण, मग त्या लेखकाचा मी फॅन होतो/ते की नाही आणि ’लायन किंग’ मला कसा फार्फार आवडतो, वगैरे चर्चा सुरु झाली आहे.

हे मूळ पोस्टच्या मुद्द्याशी सुसंगत नाही असे सांगितले, तर बहुतेकांचा ’ते कसे काय बुवा? ’लायन किंग’ असे मूळ पोस्टमध्ये लिहिले आहे की. त्याला अनुसरुनच लिहितोय की?’ असा ग्रह होईल याची खात्री आहे. ’इतिहासाच्या अभ्यासाचे सामाजिक बांधिलकीवर परिणाम’ या विषयावर पोस्ट लिहिली असेल तर, खाली इतिहास या शब्दाच्या व्युत्पत्तीवर चर्चा करणारे महाभाग सापडतील. मुद्दा समजून घेणे हा अस्तंगत झालेला प्रकार आहे. सोशल माध्यमांमुळे ’मला हवे तेच मी अर्थ काढणार, मला हवे तेच लिहिणार’ हा एक प्रकारचा सुप्त उद्दामपणा वा बेफिकिरी रुजली आहे.

मला अनेक लोक मी राजकीय मुद्द्यांवर फार बोलतो, किंवा लोकानुनय करणार्‍या/भंकस करणार्‍या पोस्टच लिहितो असा आक्षेप घेतात. मी विस्ताराने लिहावे असा त्यांचा आग्रह असतो. गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा मी तसे लिहितो तेव्हा ते - बहुधा ’एवढं मैलभर लिहिलेलं कोण वाचणार?’ म्हणून - त्या पोस्टवर फिरकत नाहीत. बहुधा जे तुमच्याकडे नाही त्याचा आग्रह धरणे हा ही एक सिंड्रोमच असावा. गंभीर वा मुद्द्याधारित लिहिले तरी त्याचे काय होते याचा माझी कालची पोस्ट आणि आनंदची आजची पोस्ट हा उत्तम वस्तुपाठ ठरावा.

’वार्‍यावरची वरात’ (चला या पोस्टवर आता यावर चर्चा करु) मधला तपकिरीचा फिरता विक्रेता (तपकिरीची उपयुक्तता किंवा आमचे आजोबा कसे तपकीर ओढत यावर एक प्रतिसाद होऊन जाऊ दे.) म्हणतो तसे ’सीरियस माल खपत नाही आमच्या गावात.’ किंवा ’आम्हाला आपले सस्त्यात मजा पाहिजे’ असेच फेसबुक आणि फेसबुकींचे धोरण असते. राजकीय पोस्ट यासाठीच लिहिल्या जातात. मी ही भंकस करत बसतो ते त्यासाठीच. इथे तोच माल खपतो. उरलेला आमचा माल आम्ही खपवायच्या फंदात पडत नाही.

आता यावर ’म्हणजे तुम्हाला हवे तेच प्रतिसाद आम्ही लिहायचे वाटतं’ असा दोष तुमच्या माथी मारणारा प्रतिवाद येणारच आहे. भंकस करण्यासाठी लिहिलेली पोस्ट कुठली आणि गांभीर्याने घेण्याची कुठली याचे तारतम्य विकसित करणे आवश्यक; लेखनातील मुद्दा कोणता हे समजून घेणे, त्याशिवाय त्यातील शब्दांवर, उल्लेखांवर भौगोलिक, वैय्याकरणीय, ऐतिहासिक, अनुवंशशास्त्रीय, रासायनिक अशा आपल्या मनाला वाटेल त्या दृष्टिकोनातून न लिहिणे इतके करणे जमले तर पहा असे म्हणण्याखेरीज फारसे काही करता येण्यासारखे नाही.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा