(’लोकसत्ता’चा ’कडकलक्ष्मीच्या गुदगुल्या’ हा अग्रलेख वाचून झाल्यावर...)
सेनेचे रामंदिर राजकारण हे भाजपच्याच पथ्यावर पडणारे, कदाचित त्यांच्याच संगनमताने चालले आहे.
भाजपने गेली तीसेक वर्षे राममंदिराचा मुद्दा हा 'हर मर्ज की दवा’ म्हणून वापरला. ते अडचणीत असले, निवडणुका जड जाणार असे दिसले की हटकून संघ परिवारातील कुणीतरी- बहुधा सरसंघचालक, राममंदिरावर भाष्य करतो. एखादा खूप प्रभावी विरोधी मुद्दा असला की विहिंप गुरगुर करू लागते.
पण आता त्यांच्या तोंडून तो मुद्दा ऐकला की ’हां, आले हे तोच मुद्दा दळायला घेऊन. करायला काही नको. नुस्ते भकत बसतात.’ अशी तीव्र प्रतिक्रिया हिंदुत्ववादी असलेल्या नि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मंडळींकडून ऐकू येऊ लागली आहे. तिचा आवाज फार वाढण्याच्या आत माघार घेऊन आता सेनेचा मोहरा पुढे करुन तोच मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.
धार्मिक मानसिकतेचा हाच प्रॉब्लेम असतो. एखादा मुद्दा, विचार, परंपरा कालबाह्य झाला आहे याची समजच त्यांना नसते, किंवा ते मान्य करण्याची त्यांची तयारी नसते. एकदा यश देणारे चिरंतन तेच नि तितकेच यश देत राहील अशी त्यांना ठाम खात्री असते. तसे होईनासे झाले की मुळातूनच बदल करण्याऐवजी ते फक्त कर्मकांडांच्या वा मांडणीत बदल करुन आधी मिळाला तितकाच फायदा मिळेल अशी आशा करत राहातात. हे म्हणजे वाचून झालेल्या पुस्तकाचे कवर बदलून नवे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केल्यासारखे आहे, किंवा डिजिटल वीडिओचे नाव बदलून नवा वीडिओ पाहतो आहे अशी बतावणी करण्यासारखे आहे.
हा सारा खटाटोप मनाने हिंदुत्ववादी, पण केवळ केंद्राच्या अपयशी नि भोंगळ कारभारामुळे आता भाजपविरोधी झालेल्या नागरिकांची मते, विरोधकांकडे न जाता संभाव्य जोडीदार पक्षाकडेच जातील, याची खातरजमा करण्याचा प्रकार आहे. गोव्यात वेलिंगकरांची जी भूमिका होती, तीच इथे उद्धव ठाकरेंची आहे. भाजपविरोधी मते आपल्या पारड्यात जमा करुन, निवडणुकीनंतर युती करुन ती पुन्हा भाजपच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे.
पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत जे घडत असे तोच प्रकार आता भाजप-सेनेबाबत व्हावा अशी सोय केली गेली आहे. पूर्वी काँग्रेसवर नाराज असलेला, पण अनेक वर्षे त्याच मुशीत वाढलेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देई, आणि उलटही. त्यामुळॆ काँग्रेस नि राष्ट्रवादी आघाडी करण्यापेक्षा विरोधी लढले तर अधिक फायदा होई. आणि जिथे कुण्या एकाला बहुमत मिळत नसे, तिथे पुन्हा आघाडी करुन सत्ता वाटून घेता येई. फरक इतकाच की, तेव्हा काँग्रेस हा डिफॉल्ट चॉईस होता आता भाजप आहे, आणि राष्ट्रवादीची भूमिका सेनेने करावी असा त्यांचा प्रयत्न आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीत सेनेला ही नवी भूमिका घेण्याचे ठरले असावे.
यात सेनेचाही फायदाच आहे. चार वर्षे भाजपच्या नावे दुगाण्या झाडल्यानंतर युती करणे हा मुखभंग ठरला असता. त्यामुळे राममंदिर नि हिंदुत्वाची महाआरती सुरु केल्याने निवडणूकपूर्व वा निवडणुकोत्तर युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ’व्यापक हिंदुत्वासाठी’, ’राम मंदिराच्या निर्मितीसाठी’ आम्ही आमचे मतभेद दूर ठेवले अशी बतावणी करत सेना परत भाजपशी पाट लावायला मोकळी असेल. आणि हा खेळ महाराष्ट्रात यशस्वी झाला तर त्याचेच प्रयोग उत्तरेतही लावता येतील. अयोध्येची निवड उद्धव यांनी केली ती नेमकी यासाठीच.
अडचण होईल ती लोकसभेच्या वेळी इंगळासारखे लाल लाल डोळे करुन काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडणार्या आणि त्यावेळी ज्याला राजा मानून त्याच्या चरणी निष्ठा रुजू केली, त्याच्यावरच सेनापतीच्या आदेशावरुन विधानसभेच्या वेळी आग ओकणार्या तथाकथित सैनिकांची. ’साहेबां’नी पुन्हा मांडवली केली नि निमूटपणे तोफांची तोंडे पुन्हा काँग्रेसकडे वळवून मारा सुरु करावा लागेल; गेले अडीच-तीन वर्षे राजाला विरोध या मुद्द्यावर ज्यांच्याशी सलगी केली, त्यांना पुन्हा एकवार शत्रू मानावे लागेल.
हे सारे पाहताना मला पुन्हा पुन्हा ’झेंडा’ हा चित्रपट आठवत राहतो. या सार्या म्होतूर-काडीमोडाच्या खेळात भरडले जातात ते सामान्य कार्यकर्ते. कालपर्यंत आपला साहेब ज्या पक्षाच्या आणि नेत्याच्या नावे डरकाळ्या फोडत होता, आपल्याला ज्यांच्या विरोधात रान पेटवायला सांगत होता, ज्याच्याखातर आपण मित्र, गावकी, भावकी मध्ये अनेक शत्रू निर्माण करुन ठेवले, तोच आता त्याच पक्षाच्या, नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल?
फेसबुकवरच्या सुखवस्तू, पांढरपेशा नि बोलबच्चन ’कार्यकर्त्यां’बद्दल म्हणत नाही मी (फेसबुकवरचे ’सैनिक’ ही संज्ञा मोठी रोचक आहे. :) ) , नेत्याच्या शब्दाखातर दगडापासून तलवारी पर्यंत वाटेल त्याचा वापर करायला नि ते झेलायला तयार असलेल्या, त्यानंतर पदरमोड करुन कोर्टकज्जे करणार्या, करियर उध्वस्त करुन घेतलेल्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आहे. वाचाळवीर शाब्दिक खेळ करण्यात वा गैरसोयीच्या मुद्द्यावर सरळ मौन पाळण्यात तरबेज असतात. पण जमिनीवरील कार्यकर्त्याला येईल त्या परिस्थितीला प्रत्यक्ष तोंड द्यावेच लागते.
कार्यकर्ता तत्त्वनिष्ठ असावा, पक्षनिष्ठ असावा की व्यक्तिनिष्ठ हा मोठा कळीचा मुद्दा आहे. कम्युनिस्टांचा अपवाद वगळता तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते कोणत्याच पक्षाला नाहीत. याचे एक कारण असे की कोणत्याही पक्षाला निश्चित अशी तत्त्वेच नाहीत. इथे मी कम्युनिस्टांबरोबर भाजपचा अपवाद करत नाही. कारण आता तिथे परस्परविरोधी विचारांची कोणतीही निश्चित चव नसलेली भेळ झाली आहे. कदाचित दहा वर्षांपूर्वी मी भाजपचा ही केला असता. त्यांची विचारसरणी मला मान्य नसूनही त्यांच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारावरील निष्ठा हा त्यांच्या बांधिलकीचा मुख्य धागा होता हे अमान्य करता येणार नाही.
काँग्रेससारख्या व्यापक छत्रासारख्या पक्षाला बरेच पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पण त्यापलिकडे बहुतेक सारे पक्ष हे नेत्यांची खासगी मालमत्ता असल्याने पक्षनिष्ठा नि नेतानिष्ठा यात काहीच फरक उरलेला नाही. नेत्याने हा पक्ष सोडून त्या पक्षात प्रवेश केल्यावर त्याच्यापाठोपाठ जाणार्यांची निष्ठा अर्थातच नेत्याशी असते, पक्षाशी नव्हे; तत्त्व म्हणजे काय, ते कशाशी खातात हे तर त्यांना ठाऊकही नसते.
सेनेची वाटचाल युतीला पोषक वातावरण निर्मितीकडेच होते आहे. इतके दिवस ज्या भाजपला शिंगाला शिंगे भिडवली त्यांचाच राममंदिराचा मुद्दा उचलून त्याआधारे युतीचे समर्थन करण्याची सोय करुन ठेवली जात आहे. गेली दोन-तीन वर्षे साहेबांच्या आदेशावरुन भाजपवर वार करणार्या सैनिकांनी आता शमीच्या झाडावर ठेवलेली काँग्रेस-विरोधी शस्त्रे काढून परजायला सुरुवात करावी, म्हणजे आयत्यावेळी स्टार्टिंग-ट्रबल होणार नाही. एकदम यू-टर्न घेण्याचा धोका पत्करण्याऐवजी गाडीची दिशा आतापासून हलके हलके बदलत नेता येईल.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा