’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

जीएंचा बिम्म

('जीएंचा बिम्म' या आगामी लेखाची प्रस्तावना)

सुटणारे पोट नि वाढणारा रक्तदाब या नव्या सुखवस्तू जगाच्या देणग्यांपासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी हल्ली दिवसाचा एक तास फिरण्यासाठी राखून ठेवला आहे. सामान्यपणे वर्दळ कमी असते अशा वेळी ही एक तासाची फेरी घडते. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. निम्मी फेरी संपवून परतीच्या वाटेवर होतो. रस्त्यात एके ठिकाणी कचराकुंडी आहे. त्याच्या आसपास बर्‍याच अंतरापर्यंत कचरा लोकशाही पद्धतीने ऐसपैस पसरलेला असतो. त्यामुळे श्वानपंथीय देखील वहिवाटीच्या हक्काने तिथे वावरत असतात. यातच एका कुत्रीची दोन पिले - एक पांढरे नि एक कबरे - तिथे लुडबुडत असतात. पिले तशी धीट नि चटपटीत. आज तिथे दहा-बारा वर्षांच्या दोन शाळकरी मुली थांबल्या होत्या. शाळेच्या वेशात नसल्या तरी पाठीवर सॅक ऊर्फ दप्तर असल्याने बहुधा क्लासच्या वाटेवर असाव्यात. त्या दोन पिलांना पाहून त्या थांबल्या. सायकला सरळ कुलूप घातले. नि बाहेरपर्यंत लुडबुडत आलेल्या पिलाला यू यू करून बोलावू लागल्या. पिलाची पहिली प्रतिक्रिया अर्थातच आतल्या दिशेने धूम ठोकण्याचीच झाली. पण त्या मुलींनी चिकाटी सोडली नाही. यू यू करत अजूनही त्या तिथेच थांबल्या होत्या. मी काही पावले चालून त्यांच्यापर्यंत पोहोचलो तोवर त्यांच्या चिकाटीला फळ आलेले दिसले. आत गेलेले पिलू तर बाहेर आलेच पण पाठोपाठ दुसरेही आले. काही क्षणातच त्यांच्या शेपट्या हलू लागल्या नि दबकत दबकत ते या नव्या मैत्रिणींकडे सरकू लागले.  त्यांना ओलांडून मी काही पावले पुढे गेलो नि मागे वळून पाहिले तेव्हा त्या चार प्राण्यांची मस्त दोस्ती झाली होती. त्यातले एक दोघींपैकी एकीच्या हातात विसावले होते तर दुसरे तिच्या मैत्रिणीशी हुलकावणीचा खेळ खेळू लागले होते. या दोघींच्या 'ममी'ज नी हे पाहिलं तर परिणाम काय होईल याचा तर्क करण्याजोगा होता. असल्या 'अनहायजनिक प्लेस' वरच्या 'डर्टी डॉग्ज'ना 'लिफ्ट' करून आपले 'क्लोथ्स' 'डर्टी' केल्याबद्दल त्यांना 'पनिशमेंट' मिळून त्या 'ग्राउंडेड' झाल्या असत्या.

घरी येईतो सहज विचार आला, असे जिवंत खेळण्याशी सलगी करून किती दिवस झाले. वय वाढले हे खरे, पण ती सलगी, तो उमाळा असा कसा गायब झाला? आपले सोडा, पण आज त्या मुलींच्या वयाची किती मुले खरंच अशा सजीव जगाशी सलगी राखून असतात? रांगत्या-लोळत्या बाळाच्या पाळण्याला आता चिऊ काऊचे भिरभिरे नसते, किणकिणते नाजूक विंड-चाईम असते. चालते-बोलते होईतो त्याच्या हाती मेड-इन-चायना बंदूक किंवा मेड-इन-चायना असूनही अमेरिकन कंपनीचे सौभाग्य मिरवणारी बार्बी डॉल असते. मुख्य दरवाज्यावर पहारेकरी बसवलेल्या 'हौसिंग' सोसायटीमधे घोडा, हत्ती, गाढव कुत्रेच काय परिचित-अपरिचित माणसांनादेखील 'प्रवेश बंद'ची अदृश्य पाटी वाचावी लागते. कुत्र्यांची जागा आता 'डॉग्ज्स' नि घेतली आहे. पतंगासारखे 'कंट्री' गेम (की स्पोर्ट्स, की आणखी काहीतरी?) आजच्या इंग्लिश मीडियमच्या जगात किती मुले खेळतात. कुठे आंतर-वाडा किंवा आंतर-आळी गोट्या च्याम्पियनशिप भरते नि काचेच्या चार तुकड्यांसाठी भान हरपून स्पर्धा खेळली जाते, त्यावरून झालेली भांडणे महिनोन महिने लढवली जातात? पैसा महामूर झाला नि बाजारात पैसा टाकून कचकड्याची खेळणी वा विडियो गेम्स (ते ही जुने झाले म्हणे, आता तर एक्स-बॉक्सही ओल्ड फ्याशन्ड झालाय असे एक चिरंजीव परवाच सांगत होते.) जिथे आईबापच वर्षा-वर्षाला मोबाईलचे मॉडेल बदलतात नि व्यक्तिस्वातंत्र्याच्या स्वार्थी, अतिरेकी कल्पनांना कवटाळून आपल्या आई-बापांपासूनही फटकून राहतात तिथे या चिल्ल्यापिल्ल्यांना प्राण्यांप्रती प्रेम, जिव्हाळा, बांधिलकी वगैरे कुठून शिकायला मिळणार. असे असूनही त्या दोन मुलींमधे अजून हिरवा असलेला तो जिवंतपणा मला लक्षणीय वाटला, दुर्मिळ वाटला.

योगयोग असा की त्याच दिवशी भाचीसाठी जीएंचे 'बखर बिम्म'ची आणलेले. फार पूर्वी वाचलेले नि सोडून दिलेले. भाचीकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा वाचून पाहून म्हणून हाती घेतले आणि त्यात पुरा गुरफटलो.

लहान मुलांसाठी म्हणून निर्माण होणार्‍या साहित्याचा साधारण पॅटर्न ठरलेला आहे. यात स्वतः वयाने मोठ्या असलेल्या नि आपल्याला लहान मुलांचे भावविश्व समजते असा ’समज असणार्‍या’ लेखकांचा कल्पनाविस्तार असतो. यात अगदी लहान मुलांसाठी बडबडगीतांपासून जी सुरुवात होते ती परीकथा, काल्पनिक जग, अद्भुत कथा वगैरे प्रवास करत किशोरवयीन मुलांसाठी ऐतिहासिक-काल्पनिक हिरोंपर्यंत गाडी पोहोचते. काही मंडळी त्यापुढे जाऊन संस्कार वगैरेचा वारसा घेऊन मुलांना अगदी सुसंस्कारित करण्याचे कंकण वगैरे बांधून बोधकथा, नीतीकथा लिहितात. याची मोठ्यांसाठीची थोडी सुधारित आवृत्ती म्हणजे पंचतंत्र, इसापनीती वगैरे प्रकारच्या तात्पर्यकथा. कालानुरुप यात थोडे बदल होऊन आता यात लवकर 'वयात' येऊ पाहणार्‍या नव्या पिढीला आवडते म्हणून (हे कोणी ठरवले देव जाणे, पण एकदा रुढी पाडली की पुढचे काम न्यूटनचा पहिला नियम करतो.) यात मारधाड, हिरो, विलन, परग्रहावरचे वा याच ग्रहावरचे आक्रमक मग त्यांना विरोध करण्यास उभा ठाकणारा आपला हिरो, त्याला मिळालेली अलौकिकाची अथवा जादूच्या एखाद्या साधनाची साथ हे अनेक धर्मग्रंथातून वा ऐतिहासिक दस्त ऐवजातून सापडणारे तपशीलच वेगळ्या संदर्भात मांडून आता मुलांचे मनोरंजन केले जाते. मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांमधून परी, राक्षस, राजकन्या, राजपुत्र, वर देणारे देव अथवा जिन यांची हकालपट्टी होऊन तिथे थेट समोरासमोर युद्ध करावे लागणारे चित्रविचित्र रंगांचे, आकाराचे, नावाचे विलन आणि दीडवीत उंचीचा आपला हिरो यांच्यात हास्यास्पद पातळीवर होणारी लढाई वगैरे मालमसाला असतो. तुलनेने नवे माध्यम असलेले चलत्-चित्राचे (Animation ऊर्फ कार्टूनचे) क्षेत्रही याला अपवाद ठरलेले नाही. सिंडरेला, हकलबेरी फिन, टॉम सॉयर वगैरे हिरो/हिरविणींची जागा आता ही-मॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन यांनी घेऊनही जमाना झाला. आता बेन-१०, जस्टीस-लीग, सुपरहिरो-लीग वगैरे करत आपल्या या तथाकथित सुपरहिरोंनी हिरोंनी आपले कार्यक्षेत्र पृथ्वीबाहेर विस्तारत नेले आहे. सतत कुठल्या ना कुठल्या धोक्याशी, आक्रमणाशी, शत्रूशी लढणे त्याला नेस्तनाबूद करणे हाच या महाभागांचा एकमेव कार्यक्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. जगण्याचे, संघर्षाचे, कुतूहलाचे, माहितीचे, विकासाचे, नात्या गोत्यांचे इतर कोणतेही आयाम या कथानकांना नसतात, असलेच तर ते या तथाकथित हिरोगिरीसमोर किती दुय्यम ठरतात/ठरवावे लागतात हे दाखवण्यापुरतेच.

या सार्‍या तथाकथित प्रगतीच्या वाटेवर त्या मुलांच्या प्रत्यक्ष भावविश्वातील गोष्टींना कोणतेही स्थान नाही. एखादे मूल आयुष्यात चक्रनेमिक्रमाने वाढत जाते तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर अंगभूत गुणांबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या परिसर घटकांचा परिणामही मोठा असतो. त्याच्यावर होणारे विविध प्रकारचे संस्कार, त्याच्या अंगभूत गुणांच्या आधारे त्यातून त्याने अंगीकृत केलेले कौशल्य, जमा केलेली माहिती नि सिद्ध केलेले ज्ञान या मार्गाने त्या व्यक्तीची  जडणघडण होत असते. यातील या परिसर घटकांचे त्या मुलाच्या जडणघडणीत स्थान, त्याचा विचार मुलांसाठी अथवा मुलांबद्दल लिहिल्या गेलेल्या बहुतेक पुस्तकांमधे, तयार केल्या गेलेल्या करमणूकप्रधान दृक्-श्राव्य कार्यक्रमात बहुधा नसतोच. बखर बिम्मची हे पुस्तक त्या अर्थाने आगळे वेगळे म्हणावे लागेल. लहान मूल ज्या विशिष्ट परिसरात, कौटुंबिक-सामाजिक पार्श्वभूमीवर जगत असते त्याचा परिणाम, प्रभाव त्याचा भावविश्वावर पडत असतो.  त्याचबरोबर त्या लहान मुलाची कल्पनारम्यता हा एक मोठा घटक असतोच. त्या लहान मुलाचे जग हे अशा वास्तव-कल्पनेच्या तीरावर उभे असते. जसजसे वय वाढते तसतसे माणूस वास्तवाशी अधिकाधिक जुळवून घेण्याचा प्रयत्न करत जातो त्याच्या भावविश्वातील कल्पनारम्यतेचा भाग कमी होत जातो. जी.एं. नी त्या वयातील ही वास्तव-कल्पनेची सरमिसळ नेमकी हेरून एका बिम्मचे आयुष्य चितारले आहे.

---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा