शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

आरसा दाखवणारा 'रेगे'

पौगंडावस्था आणि तारुण्य या सीमारेषेवर उभा असलेला कुणी एक रेगे. त्या वयात संभ्रम कमी होत त्याची जागा प्रचंड ऊर्जा आणि ऊर्मीने घेतलेली असते. याच वयात माणसे अधिक प्रयोगशील असतात, धाडसी असतात. बेदरकारपणा, धोका पत्करण्याची तयारी याच काळात सर्वात अधिक असते. अगदी रेगे सारखा पापभीरू मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगाही त्याला अपवाद नसतो.

RegePoster

दहीहंडी पाहायला गेलेला रेगे. योगायोगानेच तिथल्या हाणामारीत सहभागी असल्याच्या संशयाने त्याची वरात पोलिस स्टेशनात आणली जाते. त्याच्यासारख्या पार्श्वभूमीच्या तरुणाला पोलिस स्टेशनचे आतून दर्शन घडावे अशी वेळ आलेली नसतेच. त्यामुळे एकीकडे भलत्याच लफडयात अडकल्याची, परीक्षा बुडण्याची आणि मुख्य म्हणजे आई-वडील काय म्हणतील ही अगदी खास मध्यमवर्गीय भीती आहेच, पण त्याच वेळी 'आयला, आपण पहिल्यांदाच पोलिस स्टेशन मध्ये आलो ते ही अरेस्ट होऊन' या विचाराने त्याला सॉलिड थ्रिल वगैरे वाटते.

इथेच त्याला 'एम भाय' चे पहिले दर्शन घडते. भाय'ला सलाम करणारे, त्याच्या शब्दाखातर रेगेला सरळ सोडून देणारे पोलीस बघून हा एम भाय एकदम भारी माणूस आहे असे त्याला वाटून जाते. पुढे वेगवेगळ्या वळणावर येणार्‍या लहान सहान अडचणी, धोके यातून भाय चुटकीसरशी मार्ग काढतो हे पाहून तो एम भाय चा भक्त होऊन जातो. इतका की ज्या मित्रामुळे एम भाय ची ओळख झाली त्या मित्राने दिलेला धोक्याचा इशाराही त्याला मनावर घ्यावासा वाटत नाही.

कथेचा दुसरा पदर आहे तो काही सत्य घटनांवर आधारित किंवा त्यांच्याशी नाते सांगणारा. इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा, सचिन वाझे या एन्काऊंटर स्पेशालिस्ट मंडळींची कथा. ही कथा तशी बरीच गुंतागुंतीची. अंडरवर्ल्डशी असणारे पोलिसांचे संबंध, त्यातूनच उभे केलेले खबरे आणि वैयक्तिक प्रॉपर्टी. पोलिसांनी भाई लोकांचा, त्यांच्या माणसांचा आणि भाई लोकांनी पोलिसांचा करून घेतलेला वापर. एकाच वेळी पोलीस आणि गुन्हेगारांच्या अशा 'परस्पर-सहकार्याची' आणि संघर्षाचीही कथा. कथेतील गुंतागुंत लक्षात घेऊन त्यातील पात्रे फार तपशीलाने उभी केलेली नाहीत. पटकथेचा गाभा नेमका ठरवून अन्य घरगुती वा तपशीलाच्या बाबींना सरळ फाटा दिल्याने (अपवाद प्रदीप शर्मा या पात्राचा पहिला प्रवेश. पण इथे त्यांचे ते प्रसिद्ध वाक्य 'त्याला वापरलेल्या गोळ्यांचा हिशेब द्यावा लागत नाही' हे वापरण्याच्या हेतूने - वा अट्टाहासाने - आले असावे.) हा भाग अतिशय उत्तम उभा राहिलेला दिसतो. पटकथेने व्यवस्थित हाताळलेली ही गुंतागुंत संकलनाने मात्र थोडी घसरलेली दिसते. कालक्रमाबाबत अधेमधे संभ्रम निर्माण होऊ शकतो.

या कथानकाबाबत एक आश्चर्यजनक बाब अशी की ही वास्तवातली नावे नि प्रसंग वापरून उभी केलेली कथा कोणत्याही वादाच्या भोवर्‍यात सापडलेली दिसत नाही. निर्माता-दिग्दर्शक मनसेचा असल्याचा फायदा म्हणायचा की युती सरकारच्या काळात म्हणत तसे 'गोंधळ घालणारेच निर्माते असल्याने गोंधळ घालणार कोण?' असा प्रश्न आहे.

तर रेगेसारखा पापभीरू मध्यमवर्गीय तरुण जेव्हा पोलिस नि गुन्हेगार यांच्या या जगात अचानक दाखल होतो तेव्हा त्याचे भावविश्व पुरे ढवळून निघाले नाही तरच नवल. प्रथम सॉलिड हीरो वगैरे वाटणारे भाई लोक जेव्हा त्याने अति उत्साहाने देऊ केलेल्या मदतीचा फायदा घेऊन आपले खरे रंग दाखवू लागतात तेव्हा त्यांच्याबरोबर फरफटत जाण्यापलीकडे त्याच्या हाती काही उरत नाही. त्याच वेळी दुसरीकडे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य मिरवणारे पोलिसांचे जगही धक्कादायकरित्या वेगळे असते याचे भान होऊन तो अधिकच कोसळत जातो.

गुन्हेगारांचे, भ्रष्ट पोलिसांचे जग हे काही चित्रपटसृष्टीला नि तुम्हा आम्हा प्रेक्षकांना नवीन नाहीच. आपली हिन्दी चित्रपटसृष्टी वर्षानुवर्षे या पार्श्वभूमीवरील चित्रपटांच्या आवृत्या मागून आवृत्या काढत खोर्‍याने पैसे ओढते आहे. प्रेक्षकही चमचाभर हिंसाचार चाटवणासारखा घेऊन त्या नशेत 'आपल्या जगात हे नाही' याबद्दल स्वत:ला सुदैवी समजत जगत असतात. पण असा तुमच्या आमच्यातलाच एखादा रेगे जेव्हा या जगात फेकला जातो, किंवा ते जगच त्याला ओढून आपल्यात नेते तेव्हा हे आपल्या दारी येऊन पोचले असल्याचे भान ते आपल्याला देते. 'रेगे' तुमच्या समोर ही शक्यता मांडतो आहे, तुम्ही त्याबाबत गाफील राहू नये म्हणून.

चित्रपटाच्या अखेरीस मनात असा विचार आला की "तुमच्या आमच्या मनातही असाच एखादा रेगे असतो का? आसपास असे रेगे दिसतात का? एखादा 'एम'(!) भाय बरेच काही चुटकीसरशी करून दाखवतो - किंवा करून दाखवण्याचा दावा करतो - म्हणून त्याच्या कह्यात जाणारे आणि याची परिणती नक्की कशात होते याबाबत बेफिकीर असणारे!" चित्रपटाला शेवट असतो तो आपण पाहतो पण वास्तवात आपणही रेगेच्या वाटेनेच जाणार की शहाणे होणार आहोत?

- oOo -


हे वाचले का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा