शनिवार, १० मार्च, २०१८

राजकीय मिथकांची निर्मिती आणि संघर्ष

दुसर्‍या महायुद्धात जर्मन सेनेची रशियात वेगाने सरशी होत होती, लवकरच त्या स्टालिनग्राडवर येऊन धडकतील अशी चिन्हे दिसू लागली होती. स्टालिनग्राड पडणे म्हणजे रशियाची निर्णायक पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु होणे असाच अर्थ काढला जात होता. मेजर कुऽनिग नावाच्या जर्मन स्नायपरची दहशत रशियन सैन्याने घेतली होती. फासे पलटायचे तर काही चमत्काराची गरज होती. पण कम्युनिस्ट रशियामध्ये चमत्कारांच्या अपेक्षेला स्थान नव्हते.

आपल्या आजोबांनी शिकवलेल्या अजोड नेमबाजीच्या बळावर शिकार करणार्‍या वासिली या एका मेंढपाळाला कोमिसार दानिलोव हा अधिकारी हेरतो, त्याला लाल सैन्यात दाखल करुन घेतो. इथून पुढे वासिलीने मारलेल्या प्रत्येक जर्मन सैनिकासाठी एक एक हेल्मेट वाढवत स्टालिनग्राड मध्ये पोस्टर्स लावली जातात.त्या पोस्टरवरील दररोज वाढत जाणारी हेल्मेट्सची संख्या पाहून जनतेच्या आणि सैन्याच्या मनात नवी उमेद निर्माण होते. मेजर कुऽनिगची दहशत हळूहळू कमी होत जाते. केवळ पंधरा-वीस हेल्मेट्सची पोस्टर्स युद्धग्रस्त स्टालिनग्राडला युद्धसंन्मुख करतात आणि जर्मनीच्या भावी पतनाची नांदी गातात.

EnemyAtTheGates
वासिली झाईत्सेव नावाचे मिथक आकार घेते आहे. (डावीकडून: कोमिस्सार दानिलोक, अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव आणि वासिली)

ही कथा आहे ‘एनिमी अ‍ॅट द गेट्स’ या चित्रपटाची. स्टालिनग्राडच्या वास्तविक युद्धात हजारे सैनिक मरतात, त्यांची कुटुंब उध्वस्त होतात. प्रत्यक्ष रणभूमीवर एखाद्या सैनिकाने मारलेल्या शत्रू-सैनिकांची संख्या वासिलीने मारलेल्या जर्मनांच्या संख्येपेक्षा अधिकही असेल. किंबहुना एखाद्या स्नायपरने दुरुन टिपलेल्या एखाद-दोन शत्रू सैनिकांपेक्षा एखादे ठाणे काबीज करणार्‍या फूट-सोल्जरची कामगिरी अधिक निश्चित, अधिक निर्णायक असते. पण देशाचा हीरो असतो तो वासिली! कारण केवळ माणसे किती मारली, किती भूमी जिंकली, यापेक्षा ती जिंकणार्‍या सैनिकांना मिळालेल प्रेरणा ही त्यांचे शौर्य जागवते, लढण्यासाठी साध्य आणि बळ दोन्ही पुरवते, आणि म्हणून अधिक महत्त्वाची ठरते. (आपल्याकडे याचाच एक वेगळा अवतार अमिताभ बच्चन अभिनित ‘मैं आज़ाद हूँ’(१) या चित्रपटात पाहायला मिळाला होता.)

शत्रूच्या एखाद्या बलाढ्य आणि अजेय अशा नेत्याची भीती आपल्या अनुयायांच्या मनातून काढून टाकण्यासाठी मिथकांची निर्मिती करणे, आपल्या साध्याला, संघर्षाला एक काल्पनिक आयाम देणे, हे साधन इतिहासात अनेक ठिकाणी वापरले गेलेले दिसून येईल. विजापूरचा महाकाय नि अजेय अफजलखान चालून येतो आहे हे ऐकून भयकंपित झालेल्या आपल्या सहकार्‍यांना प्रेरित करण्यासाठी, भवानी मातेचा दृष्टांत वापरणारे शिवाजी महाराज आठवा. संख्याबळ अतिशय तोकडे असताना, पराभवाचीच शक्यता दिसत असताना, दैवी दृष्टांताचा दावा करुन आणि सर्व सैनिकांच्या ढालीवर ‘क्रॉस’ चे चिन्ह लावून मिल्वियन ब्रिज ची लढाई जिंकणारा आणि सम्राट होण्याकडे पहिले पाऊल टाकणारा कॉन्स्टंटाईन आठवा. हेच तंत्र कोमिसार दानिलोवने वासिलीचे मिथक निर्माण करताना वापरले आहे.

इतिहासात अशा मिथकांच्या निर्मितीचे अनेक किस्से विखुरलेले दिसतात. एकतर ती थेट उचलून आपल्या फायद्यासाठी वापरली जातात किंवा त्यातील निवडक व्यक्तींना, घटनांना घेऊन वर्तमानात त्यांची मिथके तयार केली जातात, त्यांचा वापर साधन म्हणून केला जातो. ज्यांच्या इतिहासात अशी मिथके तयार करण्याजोगे कुणी सापडत नाही, ते आधीच स्वयंसिद्ध असलेल्या, विशिष्ट कर्तृत्व वा गुणवैशिष्ट्यांबाबत यापूर्वीच प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींचे मिथकांत रूपांतर करुन आयता हक्क सांगू लागतात. मग ते अर्वाचीन इतिहासातले शिवाजी महाराज असोत की पौराणिक ग्रंथातले प्रभू राम असोत. याचसाठी देशोदेशीचे इतिहासप्रेमी म्हणवणारे लोक इतिहास उकरित बसतात, त्या आधारे जनतेच्या अस्मितेला चेतवून त्यांच्यावरील आपल्या सत्तेची मांड घट्ट करत जातात.

असा एखादा त्राता, असे एखादे मिथक उभे करुन फक्त जमिनीवरच्या लढायाच जिंकल्या जातात असं नाही, मतांच्या लढायाही जिंकता येतात. भाजपची मातृसंघटना असलेला संघ इतिहासातील व्यक्तींना अशा मिथकांमध्ये रुपांतरित करण्याबद्दल ख्यातकीर्त आहेच. त्याशिवाय दक्षिणेतील द्रविड पक्ष असोत, शिवाजी महाराजांवर एकाधिकार सांगू पाहणारी शिवसेना असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारुन त्यांच्या सावलीत आपल्या सत्तेची रोपे रुजवू पाहणारी कांशीराम-मायावतींची बसपा असो, हे सारे अशा प्रतीकांच्या अथवा मिथकांच्या सहाय्याने मतांची आणि सत्तेची गणिते जमवू पाहणारी मंडळी आहेत. पण अशी मिथके, असे त्राते हे फक्त भूतकाळातूनच निर्माण करता येतात असे मुळीच नाही, ‘वासिली झाईत्सेव’ सारखी वर्तमानातली साधी सुधी माणसे देखील परिणामकारक प्रचारतंत्राच्या आधारे मिथकात रुपांतरित करता येतात.

NaMoSweeping

२०१३ मध्ये नरेंद्र मोदी नावाचे एक मिथक भाजप आणि त्याच्या मातृसंघटनेने जन्माला घातले. गुजरात नावाच्या राज्यातल्या नेत्रदिपक प्रगतीच्या बातम्या अचानक भारतभर प्रसृत होऊ लागल्या. आपण त्याचा स्वत: अनुभव घेऊन आल्याचे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक अचानक आसपास दिसू लागले. समाजमाध्यमांतून या तथाकथित प्रगतीचे फोटो पाहायला मिळू लागले. हे मॉडेल फक्त देशभरात लागू करायचा अवकाश, ‘अहा, देश किती छान’ म्हणायला आपण मोकळे होऊ असा ठाम दावा गल्लोगल्ली ऐकू येऊ लागला. कृतीच्या पातळीवर हे विकासाचे दावे, तर वैयक्तिक पातळीवर बाल नरेंद्राने पकडलेल्या मगरीच्या दंतकथा नरेंद्र कॉमिक्स मधून आम्हाला सांगितल्या जाऊ लागल्या. तुमचा आमचा हा त्राता किती जमिनीवर वावरणारा आहे (यथावकाश ते जमीन सोडून जवळजवळ विमानवासीच होऊन गेले, पण ते नंतर) हे सांगण्यासाठी जमिनीवर उकिडवे बसून खराट्याने जमीन झाडणारा नरेंद्र मोदी नावाचा कार्यकर्ता आम्हाला दाखवला गेला. पाहता पाहता नरेंद्र मोदी नावाचे मिथक उभे राहिले. त्या मिथकाने कोणता इतिहास घडवला हे आता सर्वज्ञात आहे.

त्या मिथकाच्याही पूर्वी संजय जोशी नावाचे एक मिथक गुजरातमध्ये निर्माण केले गेले होते, ज्याने गुजराथमध्ये भाजपचे सरकार आणण्यास मोठा हातभार लावला होता. पण ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांच्या वर्चस्वलढ्यात, अन्य दोन देवांच्या पंथातील लोकांनी बलात्काराचा आरोप करुन नामोहरम केलेल्या ब्रह्मदेवासारखे नव्या मिथकाच्या राज्यात ते पूर्णपणे भग्न करुन राजकीय पटलावरुन नाहीसे केले गेले. वर्चस्वाची अंतर्गत लढाई देवांसारख्या सर्वव्यापी मिथकांना चुकली नाही, ती जमिनीवरच्या माणसांना कशी टाळता येणार?

SunilDeodhar
सुनील देवधर

आज त्रिपुराच्या निकालांनतर सुनील देवधर नावाचे एक नवे मिथक आकाराला येते आहे. या नव्या शिलेदाराने त्रिपुरामध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी २ टक्क्यांरुन बेचाळीस टक्क्यांवर कशी नेली याच्या सुरस कहाण्या, सर्व निकाल अद्याप जाहीरही झालेले नसतानाही, माध्यमांतून भराभर प्रसृत होऊ लागल्या. किती वर्षे ही व्यक्ती तिथे गेली, जमिनीवर लोकांशी कशी समरस कशी झाली, निरलस कार्य वगैरे गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या.

पण त्यांनी स्वत:च आपल्या मुलाखतीतून सांगितल्यानुसार काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते (कित्येक आमदारच तिकडून इकडे आले), सीपीएमचे कार्यकर्ते, तृणमूलचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आल्याने त्यांना फायदा झाला. भाजपच्या २% मतांच्या शेअरमध्ये बाहेरुन आलेल्यांनी सोबत आणलेल्या अनेक टक्क्यांची जोड मिळून बेचाळीस टक्के झाले, हा साधा सोपा हिशोब माध्यमांतल्या प्रचंड कलकलाटाने झाकून टाकून टाकण्यात आला. आणि सुनील देवधर नावाचा नवा ‘वासिली झाईत्सेव’ जन्माला घालण्यात आला. आता हे मिथक पुढच्या निवडणुकांसाठी आपल्या अंगावरील या झुलीसह सामील होईल. ते जिथे जाईल तिथे मेजर कुऽनिग प्रमाणे त्याच्या आधी त्याची ख्याती पोचवून, प्रतिस्पर्ध्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांना ‘त्राता’ आल्याचे भासवून त्यांना बळ दिले जाईल.

कर्नाटकच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत*. मोदी आणि शहा या बिनीच्या शिलेदारांनी रणशिंग फुंकले आहे. कदाचित या निवडणुकांचे प्रभारी म्हणून वाजत गाजत सुनील देवधर तिथे जातील, तेव्हा त्रिपुराच्या निवडणुकीच्या निमित्ताने तयार केलेले मिथक त्यांच्या सोबत असेल.

मिथके उभी करण्याबरोबरच विरोधकांच्या मिथकांचा ध्वंस करणे हा ही युद्धाचा भाग असतो. त्यातून त्या प्रतीकांच्या तथाकथित ताकदीबाबत त्याच्या अनुयायांमध्ये संभ्रम आणि दहशत निर्माण करता येते, त्यांना खच्ची करत नेता येते. समोरच्याकडे बंदूक असली तरी ती चालवणारे हात जेव्हा संभ्रमाने कंपित होतात तेव्हा आपल्या विजयाची शक्यता वाढत असते. 

 चित्रपटात जरी स्पष्ट म्हटले नसले, तरी मेजर कुऽनिग हे जर्मन सेनेच्या मुखंडांनी निर्माण केलेले मिथकच असण्याची शक्यता अधिक आहे. त्या मेजर कुऽनिगला तोड म्हणून वासिलीला उभे करणे आणि मेजरची जनमानसातील दहशत नाहीशी करणे म्हणजे त्या मिथकाला उध्वस्त करणे आहे. तालिबानी मंडळींनी बमियानमध्ये बुद्धमूर्तीचा विध्वंस करणे म्हणजे ‘हा तुमचा देव/प्रेषित म्हणजे केवळ एक जड असे प्रतीक आहे; आम्ही ते उध्वस्त करतो आहोत, बघू तो आमचे काय वाकडे करतो ते’ असे आव्हान देणे आहे. राजकारणात मोदींनी आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या नेहरुंसारख्या अध्वर्यूंवर सातत्याने खर्‍याखोट्या आरोपांची राळ उडवून देत त्यांचे जनमानसातील स्थान खच्ची करत नेणे, म्हणजे तालिबानने बुद्धमूर्ती उध्वस्त करत बौद्धांना दिले, तसेच आव्हान काँग्रेस कार्यकर्त्यांना देणे असते.

अशा प्रसंगी प्रतिवाद अथवा प्रतिरोध परिणामकारक झाला नाही, तर त्याचा परिणाम म्हणजे त्यांचा आत्मविश्वासाचे खच्चीकरण होत असते. नुकतेच त्रिपुरामधील कम्युनिस्टांची दोन दशकांची सत्ता उलथल्यानंतर उन्मादाने उखडलेला लेनिनचा पुतळा हे ही विरोधकांच्या मिथकाला उध्वस्त करत नेण्याचे आणखी एक उदाहरण आहे.

अनेकांना खरंतर मिथकांची, प्रतीकांची, खोट्या त्रात्यांच्या निर्मितीची गरज नसते. त्यांच्याकडे खरोखरचे हीरो अथवा प्रतीके असतात. पण ’अतिपरिचयात्‌ अवज्ञा’ या न्यायाने त्यांना त्याची किंमत उरलेली नसते, किंवा त्यांचे महत्व न समजण्याइतकी त्यांची बौद्धिक, वैचारिक अधोगती झालेली असते. अशा करंट्यांची कशी वेगाने घसरण होत जाते हे काँग्रेसच्या उदाहरणावरुन सिद्ध होते आहे.

-oOo-

*ताजा कलम: हा लेख लिहून पुरा होईतो, प्रसिद्ध करेतो सुनील देवधर यांना तेलंगणमध्ये प्रभारी म्हणून पाठवले जाण्याशी शक्यता वृत्तपत्रांतून वाचायला मिळते आहे. सत्ताधारी टीआरएस आणि विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस ही दोन काँग्रेसबाळेच तिथे प्रमुख पक्ष असल्याने देवधरांच्या फोडाफोडीच्या कामाला सुपीक जमीन उपलब्ध आहे असा भाजपच्या धुरिणांचा कयास असावा. त्यांच्या गाठीला असलेले त्रिपुराचे तथाकथित श्रेय त्यांच्या शब्दाला अधिक वजन प्राप्त करुन देणार आहे.

---

(१). हा चित्रपट 'Meet John Doe' या १९४० मधील इंग्रजी चित्रपटाचा रीमेक होता असे म्हटले जाते. मी तो पाहिला नसल्याने खात्री न देता फक्त नोंद करुन ठेवतो.

---

( हा लेख ’अक्षरनामा’ या पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे. : https://www.aksharnama.com/client/article_detail/1869 )


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा