गुरुवार, १ मार्च, २०१८

ठणाठणा वाजे बीन

'एखाद्या कामाची पद्धतशीरपणे लहान लहान कामांत विभागणी करुन ते पार पाडणे, वा एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करुन त्याचे उत्तर शोधणे हे आपले कौशल्य आहे' हा माज उतरवायचा असेल तर एक करा. घरी एक 'बीनबॅग' आणा!

नाही, माझे डोके पूर्ण ताळ्यावर ठेवूनच मी लिहिले आहे हे.

---

बॅग येते. तुम्ही बीन्स स्वतंत्रपणे मागवता. 'बीन्स भरताना दारे खिडक्या घट्ट लावून घे' अशी अनुभवजन्य ताकीद मित्राने तुम्हाला दिलेली असते. तुम्ही तो सल्ला तंतोतंत पाळता. थोड्या चुकार बीन्स वगळता - त्यांच्यावर बारीक नजर ठेवून तुम्ही लगेचच ताब्यात घेता - अगदी व्यवस्थितपणॆ बॅगमध्ये त्या भरता. खुश होऊन अजिबात गोंधळ न होता काम पार पाडल्याबद्दल स्वत:लाच शाबासकी देता.

काही दिवस जातात...

SpilledTheBeans

सफाईसाठी तुम्ही बॅग उचलता, तर पाठीमागे एक दोन बीन्स इकडे तिकडे पळताना दिसतात. अख्खी बॅग उलथीपालथी करुन एक एक वीण तपासून कुठे फट दिसते का ते पाहता. काही सापडत नाही. असतील भरताना बॅगला बाहेरुन चिकटून राहिलेल्या म्हणून तुम्ही दुर्लक्ष करता.

असे तीनचार दिवस जातात. मग पुन्हा दोन चार बीन्स कुठेतरी दिसतात. मग तुम्ही तर्क करता, कदाचित भरताना निसटून कुठेतरी बेडखाली वा पुस्तकांच्या कपाटाखाली गेल्या असतील, त्या पंख्याच्या वार्‍याने बाहेर आल्या आहेत. तुम्ही भरताना पुरेपूर काळजी घेतलेली असते, त्यावेळी बीन्स निसटू न दिल्याबद्दल स्वत:लाच दिलेली शाबासकी तुम्ही आता काढून घेता आणि बीन्सच्या लपण्याच्या सार्‍या जागा अगदी बारकाईने तपासता. एकही बीन सापडत नाही. आपण आपल्याला दिलेली शाबासकी परत द्यावी का या संभ्रमात तुम्ही पडता.

पुन्हा दोन तीन दिवस जातात नि एक-दोन बीन्स पुन्हा वाकुल्या दाखवत हजर होतात. पुन्हा एकदा कसून तपासणी होते. यावेळी एक एक वीण अक्षरश: भिंग लावून चेक केली जाते. सर्व काही आलबेल दिसते. मग बीन्सची रिकामी पिशवी कपाटावर टाकलेली असते, त्याला चिकटून असलेल्या उडत आल्या असतील असा नवा तर्क डोक्यात येतो नि एक जास्तीची शाबासकी तुम्ही आपल्याला देऊन टाकता. ताबडतोब त्या पिशवीची रवानगी कचरापेटीत होते.

चार पाच दिवस जातात नि पुन्हा तीन-चार बीन्स ’आम्ही आऽलो. पकड... पकड आम्हाला.’ असं म्हणत नुकत्याच चालू लागलेल्या पोरासारख्या इतस्तत: धावू लागतात. कशाबशा पकडून त्यांची रवानगी कचर्‍यात होते...

... एक-दोन, एक-दोन बीन्स सापडत राहतात, कचर्‍यात जात राहतात. तर्क संपल्याने य:कश्चित माकडाकडून पराभूत होऊन गर्वहरण झालेल्या भीमासारखे पराभूत होऊन तुम्ही ’त्या कुठून येतात’ याचा शोध थांबवलेला असतो.

- oOo -

#बीनबजा
#बीनबुलाएमेहमान


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा