मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सीसल आणि ससुल्या

तुम्ही कार्टुन्स पाहता की नाही ठाऊक नाही. वॉर्नर ब्रदर्स’च्या प्रसिद्ध बग्स बनी या पात्राचा सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये ससा-कासवाच्या त्या प्रसिद्ध शर्यतीची कथा सांगितली होती.

'बग्स बनी’ला मूळ कथा आधीच माहीत असल्याने, कुठेही विश्रांती घ्यायची नाही असे ठाम ठरवून तो ते साध्यही करतो. पण तरीही बिचारा ती शर्यत हरतोच...

CecilAndBugs

...त्याचे कारण असतो तो सीसल नावाचा चलाख टर्टल, ज्याच्याशी बग्सने शर्यत लावलेली असते. या सशाला दोन कासवांमध्ये काही फरक चटकन दिसत नसल्याचा फायदा घेत, शर्यतीच्या वाटेवर एकुण दहा कासवे उभी केलेली असतात. कितीही वेगाने धावला, कासवाला मागे टाकले तरी, पुढे जावे तो कासव पुन्हा आपल्या पुढेच पाहून बग्सला हे कसे घडते ते कळत नाही. शक्य तितका वेग वाढवत तो फिनिश लाईन पार करतो. बघतो तर सीसल तिथे आधीच हजर असतो. निमूटपणे पैजेचे दहा डॉलर बग्स त्याला देतो.

मूळ कथेमध्ये ’स्लो अ‍ॅंड स्टेडी विन्स द रेस’ हा संदेश दिला होता. पण या कार्टुन एपिसोडमध्ये सीसल टर्टल हे चक्क संख्याबळाचा आधार घेऊन चीटिंग करुन रेस जिंकते असे दाखवले आहे.

मूळची ससा-कासवाची कहाणी वॉर्नर ब्रदर्स अशा ’अर्वाचीन’ मूल्यव्यवस्थेत आणतात तेव्हा गंमत तर वाटतेच पण त्याचबरोबर ती अंतर्मुखही करते. 'स्लो अ‍ॅंड स्टेडी विन्स द रेस’ हे मूल्य म्हणून इतिहासजमा झाले आहे का? असा प्रश्न राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्वच क्षेत्रांतील सद्यस्थितीबाबत पडत असताना कदाचित ’चीटर्स विन द रेस’ हे नवे मूल्य आहे का अशी भीती भेडसावू लागते.

पण खरी गंमत पुढेच आहे. पुढेही पहिल्या दोन तीन एपिसोडमध्ये अशा तर्‍हेने सीसल टर्टल हे पात्रच हीरो म्हणून, मुख्य पात्र म्हणून पुढे आणायचे घाटत असताना प्रेक्षकांना मात्र पसंत पडला तो बग्स. मग पुढचे एपिसोड 'बग्स बनी’लाच केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेले आणि त्यांनी इतिहास घडवला. 'डिस्ने'च्या मिकी माऊस, डोनाल्ड डक, प्लूटो कुत्रा आणि गूफी यांच्याप्रमाणेच 'वॉर्नर ब्रदर्स’च्या बग्स बनी आणि त्यांच्या सोबत आलेल्या पोर्की पिग, डॅफी डक आणि एल्मर फड यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.

वॉर्नर ब्रदर्सने सीसल प्रमाणेच कासव जिंकावे अशा तर्‍हेने रेसचे नियोजन केले होते... पण त्यांनाही अपेक्षित नसताना फिनिश लाईन पार केली ती बग्सनेच!

म्हणजे आज जरी 'चीटर्स विन द रेस’ असे असे दिसत असले तरी जर प्रेक्षकांनी ठरवले तर बग्स शर्यत जिंकू शकतो. आपण संख्याबळापुढे, फसवणुकीपुढे मान तुकवायची की ठामपणे ताठ मानेने उभे रहायचे हे मात्र ठरवायला हवे.

आणि हो, मुख्य म्हणजे सशाने दोन कासवांमधील फरक नीट ओळखायला हवा!
---

डिस्ने असोत की वॉर्नर ब्रदर्स, त्यांच्या साध्या कार्टुन्समधूनही छोट्यांबरोबर मोठ्यांसाठीही काही ठेवून दिलेले असते. त्यामुळे प्रत्येक एपिसोड हा तितक्याच उत्सुकतेने पाहिला जातो, लहान-मोठे कुणीही तो एन्जॉय करु शकतात.

फक्त रंग, आकार आणि स्थान बदलून निरनिराळे ’नवे’ विलन निर्माण करुन एका ठोशात त्यांना लोळवणारा हास्यास्पद हीरो निर्माण करणार्‍या आपल्याकडील एनिमेटर्सना कुणीतरी हे सांगायला हवे.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा