सामाजिक बहिष्कार किंवा प्राकृतात ’वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते. केवळ या ब्रह्मास्त्रामुळे अनेक निरपराधांना जातपंचायतीच्या अन्यायकारक निर्णयांपुढे मान तुकवावी लागत असे/लागते. यातून जातपंचायत ही एक शोषक व्यवस्था म्हणून उदयाला आली. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचे प्रारूप असलेली जातपंचायत आज विसर्जित करण्यासाठी चळवळ करण्याची वेळ आली आहे.
या जुनाट परंपरेचा आविष्कार नव्या स्वरूपात होतो आहे. जे फेसबुकवरून अमुक कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमुक अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका. अमके अॅप ताबडतोब अन-इन्स्टॉल करा... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ’जाती’च्या माणसांना देत असतात. उपभोगाची, प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता तशीच मध्ययुगीन, संख्याबळावर एखाद्याचे शोषण करण्याची आहे.
आपल्याला हवे तसे त्याने वागावे, आपल्यासमोर मान तुकवावी यासाठी बुद्धिहीन झुंडीचा वापर हत्यार म्हणून करण्याची पद्धत, विरोधकांऐवजी त्यांच्या स्त्रियांची नालस्ती करण्याची डरपोक वृत्ती ही मनुष्य टोळ्या करुन राहात होता त्यावेळच्या माणसाच्या बुद्धीची मागास पातळी दाखवते.
टोळ्या होत्या तेव्हा विरोधी टोळीच्या स्त्रियांवर थेट बलात्कार होत, आता रंडी/रांड वगैरे शब्दातून होतात इतकेच. त्या काळी लढाईत जेत्या टोळीचे लोक जित टोळीच्या स्त्रियांवर बलात्कार करत, किंवा त्यांना उत्पादक भूमी म्हणून त्यांना गुलाम करून त्यांच्या मार्फत आपली संख्या वाढवत. त्याचबरोबर त्या टोळीतील लहान मुले - विशेषत: पुरुष - सरसकट ठार मारले जात. (म्हणूनच बहुधा आणीबाणीच्या प्रसंगी स्वत:ऐवजी प्रथम मुलांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण झाली असावी का? त्यांना स्वत:च्या जिवाचा धोका तुलनेने कमी, मुलांना अधिक म्हणून.)
”इतक्या लहान मुलाला का मारायचे?’ असा प्रश्न जेत्या टोळीच्या ’सैनिका’ला फारसा पडत नसे. हे मूल मोठं होऊन आपल्या टोळीला मारक ठरेल असा सरळ हिशोब होता. (माणूस वयाने वाढला की सुज्ञ होतो यावर त्यांचा विश्वास नसे. तो मोठा होऊन हिंसाच करणार हा ठाम विश्वास असे त्यांचा. त्यांच्या बुद्धीची कुवतच तेवढी असे, आजही अनेकांची तितकीच आहे.) वारंवार बलात्कार करुन ठार मारलेल्या आठ वर्षांच्या मुलीबद्दल ’साली बडी हो के क्या करती, आतंकवादी बनती.’ असा विचार करणारे टोळीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नसतातच. थोडक्यात हे सर्वस्वी रानटी लोक... वर स्वत:ला संस्कृतीचे ठेकेदार म्हणवतात हा या देशातला सर्वात मोठा विनोद आहे; आणि त्यांचा तो दावा मान्य करणारे सुशिक्षित नि स्वयंघोषित सभ्य लोक ही या देशाची शोकांतिका आहे.
ज्या फ्रेंच नियतकालिक 'शार्लि हेब्दो’वर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करुन त्यातील अनेकांना कंठस्नान घातले याचा जगभर गवगवा झाला. परंतु याच शाली हेब्दोने दहशतवादापासून दूर पळणार्या आणि समुद्रावरच करुण अंत होऊन किनार्यावर निष्प्राण पहुडलेल्या अलान कुर्दी या छोट्याबद्दल अश्लाघ्य भाष्यचित्र प्रकाशित केले होते. हे टोळी मानसिकतेचे उत्तम उदाहरणच म्हणता येईल (ते चित्र आणि त्याला जॉर्डनची राणी रानिया हिने दिलेले सडेतोड उत्तर इथे पाहता येईल)
त्या टोळीचा माणूस म्हणजे नक्की वाईट, त्याला ठार मारले तर काय बिघडले अशा टोळीची मानसिकता असणार्या रानटी जमातीला प्रत्यक्ष बलात्कार करता येत नाहीत, सरसकट वंशविच्छेद करता येत नाही, ही गेल्या सत्तर वर्षांत रुजवलेल्या लोकशाहीची देणगी!
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा