गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

पांचामुखी...

आपल्याकडे ’पांचामुखी परमेश्वर’ अशी म्हण आहे. चार शहाण्या माणसांचं जसं म्हणणं पडेल ते योग्य समजून पुढे जावे असा ढोबळ अर्थ घेऊ या. त्यातूनच मग पंचायत ही संकल्पना आली. समाजातील पाच प्रतिष्ठित नि सुज्ञ माणसे पंच म्हणून एकत्र बसत नि समाजातील समाजातील समस्यांचा निवाडा करत. पुढे जातींचे समाज बनले आणि जातपंचायत उदयाला आली.

अर्थात कुणाला सुज्ञ म्हणायचे, शहाणा म्हणायचे हा प्रश्न होताच. पण तरीही काही काळ कदाचित ही व्यवस्था परिणामकारक ठरली असेल. बरं या पंचांना निवाडा करण्यासाठी कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज वा मदत फारशी नसे. बहुतेक सारे काही साक्षी आणि माणसांच्या शपथेवरील जबान्या यावर ठरे. आणि यात पंचाचे पूर्वग्रह मिसळले कि निवाडा तयार होई. तो ’न्याय’ असेलच असे नाही.

पण यातून मग पंचांचा पक्षपात, गुन्हेगाराऐवजी फिर्यादीलाच शिक्षा असे प्रकार सुरु झाले. तोडग्यासाठी पंचांना द्यावयाच्या मोबदल्याच्या निमित्ताने शोषणव्यवस्था उभी राहिली. बलात्कारितेच्या कुटुंबालाच वाळीत टाकण्यापासून दंड करण्यापर्यंत प्रकार अजूनही घडतात. माणूस पंच झाला, प्रतिष्ठित असला म्हणून त्याचा निवाडा निर्दोष असेलच असे नाही, त्यात त्याचा स्वार्थ नि पूर्वग्रह अडकलेले नसतीलच असेही नाही. त्यामुळे त्याचा निर्णय पक्षपाती असू शकतो. जातीमधला श्रीमंत माणूस सरळ पंचांना पैसे चारुन विकत घेऊन किंवा पोसलेल्या गुंडांच्या सहाय्याने धमकावून सोयीचा निवाडा पदरात पाडून घेई.

एखादी व्यक्ती पंच झाली म्हणजे ती सर्वस्वी विश्वासार्ह आहे, त्याचा निर्णय निरपेक्षच असेल, असे समजणे धोकादायक ठरु लागले. त्यातून झालेल्या अन्यायांची संख्या इतकी वाढली की जातपंचायती बरखास्त करण्यासाठी चळवळ सुरु करण्याची वेळ आली.

थोडक्यात पंचांना काय वाटते, किंवा त्यांचे ’मत’ काय आहे एवढ्यावरच निर्णय घ्यायचा झाला तर तो पक्षपाती असण्याची शक्यता बरीच आहे. म्हणून मग जगभरात वस्तुनिष्ठ पुराव्यांना महत्व आले, न्यायवैद्यकासारखी शाखा उदयाला आली. केवळ साक्ष पुरेशी न ठरता त्यांना वस्तुनिष्ठ, जड आणि तर्कनिष्ठ पुराव्यांची जोड आवश्यक होऊन बसली. त्यातून निवाड्यातील पक्षपात कमी होऊ लागला. चार लोकांना गुन्हा घडला की नाही याबद्दल काय ’वाटते’ यापेक्षा प्रत्यक्ष आणि निरपेक्ष पुराव्यांचे महत्व अधिक ठरते. साक्षीपलीकडे जाऊन ती साक्ष पुराव्याने सिद्ध करणेही महत्वाचे ठरले.

जातपंचायती रद्द करणे आवश्यक ठरत असताना, चार पंचांना काय ’वाटते’ यावर निवाडा करणे, हे उलट काळात मागे नेणारे ठरते.

-oOo-

(कोणतीही चौकशी, कोणताही तपास न होता, केवळ चार न्यायाधीशांच्या ’मता’नुसार जस्टिस लोयांचा मृत्यू संशयास्पद नाही, एवढे त्या मृत्यूची चौकशी करण्यास नकार देण्यास पुरेसे आहे असा अनाकलनीय निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा