अनेक दिवसांनी फेसबुकवर काल थोडा वेळ घालवला नि पश्चात्ताप झाला. आपण किती क्षुद्र, नृशंस, किळसवाणे लोक आहोत याचे पुरेपूर दर्शन घडले. आपले संस्कार किडके आहेत, माणसे किडकी आहेत.
आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवत नाही. त्याच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम, ब्राह्मण किंवा दलित, आमच्या ग्रेट ओसाडवाडी पेक्षा दुय्यम असलेल्या उकिरडावाडीचा माणूस, स्त्री नव्हे मादी- मग ती आठ वर्षांची असो वा सत्तर वर्षांची, असे पाहायला शिकवतो. आपल्या बिनअकली सुमारपणाचे खापर आपण अन्य गटांवर फोडून कांगावा करतो.
आठ वर्षांच्या पोरीवर झालेल्या बलात्काराची बातमी ऐकूनही आमची पहिली चिंता असते ती आमचा नेता, आमचा धर्म, आमचा दगडी देवबाप्पा वाचवण्याची. असल्या किळसवाण्या मानसिकतेला धारण करणार्या कुडीला माणूस तर सोडा, जनावर म्हणणे हा जनावराचा घोर अपमान आहे.
आमची संस्कृती महान आहे म्हणणारे आपल्या नृशंस लोकांना पाठीशी घालताना आम्ही पाहतो, वर ’त्यांनी केले तेव्हा कुठे होतात’ हे आत्यंतिक मूर्खपणाचे- नव्हे क्रूरतेचे समर्थन देताना पाहतो. त्यांनी जे केले ते ते सारे तुम्ही केले तर क्षम्य मानावे असे असेल तर भिकारड्यांनो तुमची संस्कृती त्यांच्या सारखीच झाली, मग कुठल्या मसण्या श्रेष्ठतेच्या पिपाण्या नि पुंग्या वाजवता आहात.
हिंदुत्ववादी ही क्रूर, माथेफिरु जमात सत्ताधारी झाल्यापासून हिंदू दहशतवाद - होय ’हिंदू द-ह-श-त-वा-द' - मुजोर झाला आहे. संस्कृतीचे नि सहिष्णुतेचे बडिवार माजवणारे हे हरामखोर; केवळ सत्ता हाती नव्हती म्हणून त्यांचे क्रौर्य नि गलिच्छ मानसिकता दबून राहिली होती, नि त्यालाच सहिष्णुतेचे आवरण चढवून ते विकत होते हे आता निर्विवादपणॆ सिद्ध झाले आहे.
मुस्लिम दहशतवाद अधिक पसरला कारण त्या धर्माचे अनुयायी अनेक राष्ट्रांत सत्ताधारी होते, इथे सत्ता नसल्याने हिंदू माथेफिरु तथाकथित सहिष्णुतेचे बडिवार माजवत आपल्या मनातील हिंसा, क्रौर्य दडवून ठेवत होते इतकेच. सत्ता अनुकूल होताच ते सारे त्यांनी मोकळे करून थैमान सुरु केले आहे.
सर्वात हताश करणारा मुद्दा हा की मी ह्याच लोकांच्या आसपास खेळलो वाढलो आहे. आपल्या आसपासचेच लोक इतके क्रूर, गलिच्छ नि हिंसक असतात हे समोर येते, तेव्हा तो धक्का अन्य कुठल्या गटाचे हेच दुर्गुण समोर येतात तेव्हा बसलेल्या धक्क्याहून कैकपट अधिक असतो.
उच्चशिक्षित, स्वत:ला जन्मजात श्रेष्ठ समजणारी ही जमात एका लहान मुलीच्या बलात्काराबाबतही प्रथम आपला धर्म, जात, नेता, देव आदिंना प्राधान्य देते तेव्हा तेंडुलकरांना, 'मला बंदूक द्या, यांना गोळ्या घालतो’ असे म्हणावे लागावे इतका तीव्र संताप का आला होता हे समजून येते.
हे मी हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलतो आहे म्हणजे मुस्लिम माथेफिरु नाहीत असे मुळीच नाही. जगभर पसरलेला मुस्लिम दहशतवाद मी पाहतोच आहे. पण त्यांच्या क्रौर्यापेक्षा मला माझ्याच माणसांच्या- त्याही तथाकथित संभावितांच्या, सभ्य गृहस्थांच्या मनातले हे विष अधिक संतापजनक वाटते. शेजार्याचं पोरगं गुंडगिरी करतं यापेक्षा माझं पोरगं गुंडगिरी करतं ही माझ्या दृष्टीने अधिक चिंतेची बाब असते. त्याच्या ढुंगणावर लाथा घालणं हे माझं काम आणि कर्तव्य दोन्ही आहे.
माझ्या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष हा गुंडांचा, धनदांडग्यांचा बटीक आहे हे मला ठाऊक आहेच. पण हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष हे अधिक क्रूर आहेत, कारण देशात घडणार्या गुन्ह्यांना, बलात्कारांना, सर्व प्रकारच्या कृष्णकृत्यांना यांचा अघोषित पाठिंबा आहे. यांचे पदाधिकारीच अमक्याचे मुंडके आणून द्या, तमकीचे नाक कापा, मुस्लिम स्त्रियांना कबरीतून बाहेर काढून त्यांच्यावर बलात्कार करा अशा घोषणा करतात. त्यांच्यावर कायदेशीर सोडाच, पक्ष पातळीवरही काही कारवाई होत नाही.
आणि माझ्या आसपासच्या पारंपरिक भाजप समर्थकांना- ज्यांत भाजप हा ’सुसंस्कृत’ पक्ष आहे म्हणून आम्ही वर्षानुवर्षे यांना पाठिंबा देतो म्हणणारे स्वयंघोषित संभावित अधिक आहेत, काडीची शरम तर वाटतच नाही वर ’त्यांच्या वेळी नव्हते का?’, ’तिकडे बघा की’ असे निलाजरे समर्थन ते करत असतात.
जे अडाणी असंस्कृत असतात त्यांच्यातले क्रौर्य निदान नैसर्गिक असते, ते जसे आहे तसे दिसते; या सुसंस्कृतांचे क्रौर्य अधिक धोकादायक आहे. कारण ते त्या क्रौर्याला तत्त्वाचे लिंपण करुन त्याची अधिक रुजवणूक करतात, त्याचा व्यापार करतात. ते क्रौर्याचे तणकट देशभर पोचवतात नि त्याचे चोख दामही वसूल करतात.
मी हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलतो आहे म्हणजे इतर पक्षीयांनी खूष व्हायचे कारण नाही. नुकतेच समोर आलेले नगरचे उदाहरण हे सर्वपक्षीयांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारे आहे. शिक्षा झालेला महापौर काँग्रेसचा, खुनाचा आरोप असणारे राष्ट्रवादी आणि भाजपचे. ज्यांचे खून झाले त्या शिवसेनेची ख्यातीच खळ्ळ खटॅक ची. तिथे त्या प्रवृत्तीचे समर्थन करणारे - आज राजकीय दुरावा आला म्हणून - भाजपवर टीका करतात तेव्हा आपला दांभिकपणाच सिद्ध करत असतात.
राष्ट्रवादीचा आमदार आरोपी आहे म्हटल्यावर ’कायद्याप्रमाणे होऊ द्या’ असे न म्हणता ’आमच्याविरुद्ध षड्यंत्र आहे ’ असे धाकटे पवार म्हणतात. फडणवीसांनी चालू केलेल्या क्लीन चिट वाटपाच्या कार्यक्रमापेक्षा हे काही वेगळे नसते.
राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या - आणि फेसबुकवर त्यांची फुकट फौजदारी करणार्या बिनडोकांचाही, कायद्यावर काडीचा विश्वास नसतो. कायद्याला आपले काम करु द्या हे फक्त विरोधकांना सांगण्यासाठी असते, ते आपल्यावर बंधनकारक नसते हे सर्वांनी आपल्या मनाशी जोखून ठेवले आहे. इतरांच्या पार्टीतले गुन्हेगार सत्तेसाठी बिनदिक्कत आत घ्यायचे नि बलात्कारासारखा गुन्हा केला की मग त्याच्या ’मूळ संस्कृती’वर खापर फोडायचे हा निलाजरा स्वार्थी प्रकार सर्वांनीच यथेच्छ वापरला आहे. सध्या भाजपचे फेसबुकी मोकाट गुंड याच तर्काचा आधार दोन्ही बलात्काराच्या संदर्भात घेत आहेत.
यात काँग्रेसचे नाव आले नाही हे काही भिकार मानसिकतेच्या माणसांनी मनात नोंदवलेले असेल, सरसावून ’त्यांना कसे अचूक विसरता’ म्हणत मी काँग्रेसी असल्याचे आरोप करायला सरसावलेही असतील. याच भिकार मानसिकतेने आपला देश इतका ’महान’ करुन ठेवला आहे. वर उल्लेख केलेल्या सार्या पक्षांतील गुन्हेगारांचा मूलस्रोत काँग्रेसच आहे. पण ते सध्या नि:सत्व, प्रभावहीन झाल्याने त्याबद्दल बोलून काही फायदाही नाही. तीच गत रस्त्यावरच्या पाणीपुरीवाल्यांना बडवून आपले शौर्य दाखवणार्या पोचट मनसेची.
माझा समाज भिकार आहे, माझ्या समाजाचे अध्वर्यू समजणारे त्याहून भिकार आहेत. माझा देव, माझा धर्म, माझी जात, माझा टिनपाट नेता, माझ्या घराच्या छपराचे ग्रेट पत्रे, माझ्या मोरीत लावलेला गटाराचा ब्रॅंडॆड पाईप, आमच्या वंशात वीस पिढ्या जपलेला दगड, माझ्या डोक्यावर असलेला एकमेव सोनेरी केस, ढमक्याच दुकानातून वर्षानुवर्षे खरेदी केलेला बनियन इत्यादि दळभद्री अभिमानाच्या स्थानांमध्ये आम्ही गुरफटले आहोते. माणूस व्हायला आम्हाला अजून कित्येक शतके जावी लागणार आहेत.
तोवर विरुद्ध जातीच्या/धर्माच्या पोरींवर बलात्कार करा, आमच्या धर्माच्या/जातीच्या पोरीवर झालेला बलात्कार हा आमच्या धर्मा/जातीवरचा आहे म्हणून कांगावा करा, ’त्यांची’ माणसे मारा, मारेकर्यावर सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार करा, ’त्यांची’ घरे जाळा, त्यांना’ आपल्या वस्तीत घरे मिळू देऊ नका. हे सगळॆ तुम्ही करालच. कारण तुमची तेवढीच लायकी आहे. उच्च संस्कृती म्हणून मिरवणारे डुक्कर आहात तुम्ही, चिखलात लोळणारे. माणूस व्हायची लायकी नाही तुमच्यात.
नाही, माझी संस्कृती, माझे संस्कार बिलकुल महान नाहीत. (त्यांचे बघा की म्हणत येणारे हे सिद्धच करतील.) माझ्या समाजात पसरलेल्या या किडक्या मानसिकतेचा मला बिलकुल अभिमान नाही. जगण्यातील सर्वच गरजा बाहेरुन आयात गोष्टींनीच भागवणारे आणि प्रत्येक नवा उपयुक्त शोध हा ’आमच्या बापाचाच माल होता’ हे कुठल्याशा मसण्या जुन्या ग्रंथाचा किंवा बिनडोक नेत्याचा हवाला देऊन स्वत:ला नि इतरांना पटवून देत ’आम्ही श्रेष्ठ’ म्हणून आपल्या मूर्खपणात मश्गुल राहणारे भारतीय माझे बांधव नाहीत, असूच शकत नाहीत. असल्या समाजाचा देश कधीच महान नसतो, होण्याची शक्यताही नसते.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा