शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

मी अजून जहाज सोडलेले नाही! - बाबा आमटे

  • कालचा दिवस म्हणजे पर्वणी. बाबा आमटेंचे लेखन आणि अभिवाचक म्हणून चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर हे अभिवाचन गुरु, आमचे आदर्श, एकाच व्यासपीठावर. म्हणजे हल्लीच्या भाषेत काय म्हणतात तसा डब्बल धमाका. ऐंशी मिनिटांचा कार्यक्रम संपला तेव्हा असं वाटलं ‘असा कसा अर्ध्या तासात उरकला यांनी’, पण घड्याळ योग्य वेळ दाखवत होते.

    एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे प्रेक्षकांची उपस्थिती. जेमतेम चाळीस-पन्नास प्रेक्षक. निर्माती असलेल्या सोनाली कुलकर्णीला इवेंट मॅनेजमेंट शिकवायला हवे. आमचे साहित्यिकही गर्दी जमवायला अमिताभ सारखे, अमीर खानसारखे ‘विशेष आकर्षण’ घेऊन येतात, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘सनी लिओन’ असते तेव्हा लाखभराचा समुदाय उपस्थित होतो.... हे आपले उगाचच हो, आमचे आपले नेहमीसारखे. पण बाबांच्या कविता ऐकायला पन्नास माणसे जमतात हेच खरंतर खूप आहे म्हणतो मी. अजून त्यांचे नाव लोकांना ठाऊक आहे, हे काय कमी आहे. असो.

    जाता जाता: बाबांच्या ‘मी अजून जहाज सोडलेले नाही!’ मधला काही भाग...आजच्या काळाला बराचसा सुसंगत असा!
    ---

    JwalaAaniPhule
    मी: सामाजिक कार्यकर्ता ज्याला म्हणतात
    तो एक माणूस!
    पेटत्या मांसखंडांच्या प्रकाशात
    रस्ता धुंडित नवे समाजकार्य जन्माला येईल
    या एकाच उमेदीने मी
    या अघोरी निर्णयाप्रत येऊन पोचलो होतो.
    
    निर्णय घेणार्‍या केंद्रांची बेसुमार वाढ
    हा लोकशाहीचा शाप आहे
    सामान्य माणसाला तो थोडे स्वातंत्र्य
    आणि पुष्कळसा गोंधळ देत असतो
    शाश्वत मूल्यांनाही तो बाजारपेठेत आणतो
    आत्मार्पणालाही दुकाने उघडायला लावतो
    प्रत्येकाची ताकद ही गर्दी खेचणार्‍या
    आवाजावर ठरत असते.
    
    प्रतिभेला जाहिरातीवर खर्ची पडावे लागते
    आणि गुणांना सौदेबाजीतही तरबेज असावे लागते.
    विद्यापीठ चालवण्याची व्यवस्था
    बंडखोर विद्यार्थी आपल्या हातात घेतात
    पण त्यांना वेळापत्रकदेखील करता येत नाही!
    स्वातंत्र्यदेवतेच्या राज्यात
    बंदुका सिगारेटच्या पाकिटाएवढ्या सवंग होतात
    आणि न्याय विकृतीच्या हातातही सहज येतो
    आणि तो कोणत्याही देदिप्यमान बिंदूवर
    माथेफिरूच्या निरागसपणाने डागला जाऊ शकतो
    आणि ही गर्दी म्हणजे बहुमत
    हे तरी खरे आहे का?
    सडकेवरची बेफाम क्रान्ती
    आणि मतपेट्यांतून बाहेर पडणारा मूक निर्णय
    या ही दरी व तो कडा
    एवढी तफावत असू शकते
    हे नुकतेच मी वर्तमानपत्रातून वाचले आहे.
    
    जेव्हा संकल्प रूप घेतील
    आणि उद्याला आकार येईल
    तेव्हा कदाचित त्यांना कळेल
    की त्यांचे शत्रू वेगळे होते
    हातापायांवर खिळे ठोकून घेताना
    दु:ख होतेच होते
    पण हेच खिळे कडा चढताना
    पाय रोवण्याच्या कामी पडत असतात.
    
    ‘समाजकार्या’ची ही आंबट कैरी
    खाताखाता दात आंबून गेले आहेत
    तरी ती सोडवत नाही
    राजकीय पाणबुडे कोणत्या क्षणी
    जहाजाला सुरुंग लावतील याचा नेम नाही
    पण बुडण्याची खात्री वाटू लागली
    तरी माझे हे जहाज मी सोडणार नाही
    कारण त्यावर माझी सगळ्यात जास्त प्रीती आहे
    बुडत्या जहाजाच्या कर्णधारालाही ओढ असते घराची
    पण प्रसंग येतो तेव्हा घर बाजूला पडते.
    
    जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात
    तेथेच बुडता देश वाचवणार्‍या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात.
    
    वाट पाहणार्‍या किनार्‍यांना
    आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या
    मी अजून जहाज सोडलेले नाही!
    
    - बाबा आमटे 
    - oOo -

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा