-
१. ‘कट्यार...’ गाजू लागला की त्याच्याशी संबंधित नसलेला कुणीतरी ‘हे फक्त ब्राह्मणानेच करावे, इतरांचे ते काम नोहे’ असे म्हणतो, आणि अचानक तो चित्रपट ब्राह्मणी ठरून जातो. ब्राह्मण ‘मस्ट वॉच हं’ चे मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करू लागतात, तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्यविरोधक त्याच्यावर आगपाखड करू लागतात.
‘अरे हा केवळ चित्रपट आहे, त्यात जातीचे काय?’ म्हणणार्याला ‘तुम्हाला काय कळणार शतकाशतकांच्या शोषणाचे दु:ख’ म्हणून कानाखाली वाजवली जाते. (गाल चोळताना कट्यार आणि शतकाशतकांच्या शोषणाचा नक्की संबंध काय यावर तो विचार करून थकतो.)
२. ‘सैराट’ गाजू लागला की, ‘फँड्री’ पाठोपाठ दुसरा यशस्वी चित्रपट देणार्या या दिग्दर्शकाचे त्याच्या कौशल्याचे कौतुक सुरू होते. आता त्याला दलित आयकॉन बनवणारे मेसेजेस नि पोस्टसचा पूर येतो. फेसबुक आणि वॉट्सअॅप वर तथाकथित उच्चवर्णीय जातींना, त्या जातीच्या कलाकारांना हिणवणार्या पोस्ट दिसू लागतात. पुन्हा पोलरायजेशन होऊन सैराट हा मराठा समाजाची बदनामी करणारा चित्रपट आहे म्हणून गदारोळ होतो, समाजात उभी फूट पडते. नागराज हा सार्या समाजाचा आयकॉन होऊ शकत होता, तो एकाच समाजाच्या वर्तुळात बंदिस्त होतो.
३. भारतीय सैन्य पाकिस्तानवर स्ट्रॅटेजिक स्ट्राईक्स करते, नि उरीच्या हल्ल्यासारखे पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रि-एम्टिव स्ट्राईक्स घेते. लगेच या निमित्ताने आपापल्या वैचारिक विरोधकांना हिणवण्याचे सत्र सुरू होते. थोडक्यात पुन्हा एकवार पार्ट्या पाडून कम्पल्सरी ‘तू विरुद्ध मी’ चे खेळ सुरू होतात. आर्मीच्या जिवावर पूर्वी अंगाशी आलेला साहसवाद नि तेव्हा आपली जिरवणारे विरोधक यांचा हिशोब चुकता करणे सुरू होते.
मुळात ‘आता हे कुठे आहेत’, किंवा ‘आता हे चूप बसतील’ किंवा ‘बसले आहेत’ असे एकतर्फी जाहीर करताना आपण अशा नक्की किती लोकांना ओळखतो याचा विचार ही मंडळी करतात का?
बरं यात एखाद्याला पलिकडे ढकलून देऊन ‘हे यश तुमचे नाही.’ किंवा ‘हे श्रेय तुमचे नाही’ हे बजावण्यातून नक्की काय साधतो... तर साधतो हे की बूड न हलवता, काडीचे कष्ट न करता कट्यारच्या, नागराज मंजुळेंच्या, भारतीय लष्कराच्या यशाचे श्रेय, आपण आपल्या पदरात बांधून घेऊ इच्छितो. त्यांच्यासाठी वाढलेल्या पंगतीत, आपली ताटली घेऊन फुकटचे दोन घास गिळू इच्छितो इतकेच. एरवी कट्यारच्या निर्मितीत, नागराज मंजुळेंच्या यशात किंवा भारतीय लष्कराच्या वाटचालीत, उभारणीत आपला काडीचा वाटा नसतो. पण आपण जिथे ऐतिहासिक व्यक्तींच्या यशावर दावे करत भांडतो, तिथे वर्तमानातल्या हाडामांसाच्या व्यक्तींचे काय.
सुज्ञ वाटणारी, ज्यांच्याकडून काही सकारात्मक घडेल असे वाटणारी, अनेक मित्रमंडळी एक एक करून पाहता पाहता उन्मादी झालेली पाहिली. एकाचा ज्वर उतरत नाही तो दुसर्याचा अंतराळी जातो. देश महान होतो तो त्यातील माणसांमुळे. देश म्हणजे काही जमिनीचा तुकडा नव्हे, देश म्हणते त्यातील समाज. तो समाज सदैव लहान लहान तुकड्यात विभागला जात असताना, आणि छुपे वा उघडपणे त्यात सामील होत लहान लहान वर्तुळात सुरक्षितता शोधणारे, आणि त्यासाठी आवर्जून काही शत्रू निर्माण करत आपला गट राखणारे असताना, हा देश महान आहे किंवा भविष्यात महान होण्याचीही काही शक्यता आहे यावर माझा काडीचाही विश्वास नाही. सतत एकमेकांवर आरोप केल्याशिवाय ज्यांचे कर्तृत्व सिद्ध होत नाही, ते कर्तृत्वशून्यच असतात हे समजून चालायचे असते. अशा माणसांकडून देश महान होण्याचे तर सोडाच, आहे असा राखणेही अवघड असते.
सध्याच्या परिस्थितीत मला तरी हा देश विखंडित होत जाताना दिसतो आहे. मी तुझी एक चूक, एक दोष दाखवला, की दबा धरून बसायचे नि कुठेतरी माझी चूक, दोष दाखवून स्वतःला धन्य मानायचे, या वृत्तीने जगणारे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत. विषवृक्षाच्या रुजवलेल्या मुळ्यांतून एवढा मोठा वृक्ष उभा राहिलाय, की आता तो छाटणे कुणाच्याच हाती राहिलेले नाही. आपण फक्त ‘तो कोणी रुजवला?’ यावर जगाच्या अंतापर्यंत वाद घालत बसू. मला हे करायचे नाही. भूतकाळातील लढाया वर्तमानात लढणे हे रिकामटेकड्या निर्बुद्धांचे काम आहे, माझे नव्हे.
हा समाज अंतर्बाह्य किडला आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे आणि त्याबाबत मी काही बोलू अथवा करू शकेन याची मला कणमात्र शक्यता वाटत नाही.
- oOo -
Vechit Marquee_Both
वेचताना... : लंकेचा संग्राम       सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६
आपला देश महान आहे
संबंधित लेखन
अनुभव
राजकारण
समाज
साहित्य-कला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा