-
ताई,
तुम्ही धरण बांधायला काढलं. म्हटला आमचं गाव बुडणार. मग आमचं घरदार, जमिनी बुडवल्या नि एका गावच्या पाच पन्नास लोकांना अनोळखी उंबर्यांच्या पाच-पन्नास गावांत विखरून टाकलेत. तुटपुंज्या मोबदल्यासाठी आणि सुपीक जमिनीच्या बदल्यात मिळणारा वांझ जमिनीचा तुकडा पदरी पाडून घेण्यासाठी आयुष्यभराची वणवण पाठी लावली. धरणाच्या पाठीमागच्या टेकाडावार फार्म हाऊस बांधून काढणारे नक्की कुठून उगवले, आम्हाला कळलंही नाही.
आम्ही विचारलं, ‘असं का?’
तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.दादा,
तुम्ही गावात कारखाना काढू म्हटला. पुन्हा आमच्या जमिनी घेतल्यात. म्हटलात आमच्या पोराबाळांना नोकरी देऊ. कास्तगारी करून स्वाभिमानाने जगणारी आमची पोरं, हातात दंडुका घेऊन दारात टाकलेल्या खुर्चीवर बसून येणार्या जाणार्या कोटाला सलाम ठोकू लागली. कारखान्यात चाकरी करून फटफट्या उडवणार्या नि ऐटीत मोबाईल मिरवणारी पोरं मात्र बाहेरून आली.
आम्ही विचारलं, ‘असं का?’
तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.अण्णा,
कधीतरी डाळीचं उत्पादन कमी झालं. पण नेमकं आमच्याकडे मायंदाळ डाळ झाली. वधारलेले भाव पाहून, कधी नव्हे ते चार पैशांची आस वाढू लागली. पण तेवढ्यात शहरांतून महागाईची बोंब उठली. लगेच तुम्ही डाळ आयात करून भाव पाडलेत. जास्तीच्या पैशावर पाहिलेली सारी स्वप्ने मातीत घातलीत.
आम्ही विचारलं, ‘असं का?’
तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.भाई,
चुकूनमाकून धरण पावलं नि जमीनीला ओल आली. वांझ जमीन सोडून शहरात मजुरी करायला गेलेली पोरं परतुन आली, चार पिकं काढू लागली. पण आमच्या पैशावर सहकाराचे ठेकेदार आणि व्यापारी बोलेरो नि स्कोडा उडवू लागली. हे असं कसं झालं हे आम्हाला समजलंच नाही.
आम्ही विचारलं, ‘असं का?’
तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.रावसाहेब,
तुम्ही म्हणालात देशांत खूप काळा पैसा आहे, नोटा रद्द करून सारा बाहेर काढतो. आमचे नुकसान झाले तरी चालेल, पण श्रीमंताना धडा शिकवा असे ‘सवत तरी रंडकी होऊ दे’ समाधान आम्ही मानू लागलो. पण तुम्ही आमच्या पतपेढ्या, सहकारी बँका, जिल्हा/ग्रामीण बँकांना पैसे न देता आमचीच कोंडी केलीत. दातावर मारायला पैसा नसलेल्यांना तुम्ही ‘व्हॉट्सअॅप वापरता तसे कॅशलेस व्यवहार करा’ म्हणालात. पण साहेब, सगळं इंग्रजीत असलेल्या त्या तुमच्या अॅपवर आम्ही कसे व्यवहार करणार?’ असा प्रश्न विचारावासा वाटला होता. पण आमचे वडील म्हणाले, ‘ते मग इंग्रजी शिका’ म्हणतील.
आम्ही विचारलं, ‘असं का?’
तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.मोठे साहेब,
सगळ्या जुन्या नोटा तुम्ही कचर्यात टाकल्यात, बाजारात गिर्हाईक नावाचं चिटपाखरू दिसेनासं झालं. आमच्या भावांचा वीस लाख किलो टोमॅटोचा चिखल झाला, कांदा तीस पैसे किलोनेही कुणी घेईना.
आम्ही विचारलं, ‘असं का?’
तुमचे स्मार्टफोनी शिलेदार म्हणाले: देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.मला आता एकच सांगा, सैन्यात जीव द्यायला जाणारे आम्ही, शेतीवरून विस्थापित झालेले आम्ही, तुम्हाला नोटा बदलायच्या म्हणून भिकेला लागणारे आम्ही, टोमॅटोच्या चिखलात रुतणारे आम्ही. आम्हाला सतत ‘प्रगतीसाठी, विकासासाठी कुणीतरी त्याग करायला हवा’ म्हणून शहाणपण शिकवणारे तुमचे स्मार्टफोनी, ट्विटरी, फेसबुकी मित्रमैत्रिणी देशासाठी नक्की कुठला त्याग करताहेत, करणार आहेत, नि कधी?
- oOo -
रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६
... कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे
संबंधित लेखन
अनुभव
तत्त्वविचार
भूमिका
राजकारण
समाज

पांचामुखी परमेश्वर ?
“इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा, हे कसले तर्कशास्त्र आहे? ... एखाद्या धर्माचे अनुयायी असणे ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती ए...

बॉटासुराचा उदयास्त
दर महिन्याच्या अखेरीस मी ब्लॉगचा आढावा घेत असतो. पोस्ट, ड्राफ्ट्स वगैरेसह मी तिथे वाचक-राबता कसा आहे हे ही पाहात असतो. मागील महिन्यात माझ्या ‘वेचित ...

मी लक्षाधीश
महिनाअखेरीस मी ब्लॉगचा मेन्टेनन्स करत असतो. आधीच प्रसिद्ध केलेल्या लेखांना अनुरूप चित्रे वा व्हिडिओ सापडले असतील तर ते जोडणे, कुठे फॉरमॅटिंगचा घोळ झाल...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा