(मडगांव, गोवा इथे नुकत्याच पार पडलेल्या 'दक्षिणायन' अधिवेशनाला माझ्यासह काही मित्र हजर होते. त्यासंबंधी 'आंदोलन' मासिकासाठी लिहिलेला हा लहानसा वृत्तांत.)
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत विवेकवादाच्या, पुरोगामित्वाच्या तीन अध्वर्यूंची हत्या झाली आणि भारतातील सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली. परंपरेचा उद्घोष करत, शत्रूलक्ष्यी मांडणी करत अनेक गटांचा सामाजिक राजकीय क्षेत्रात नंगा नाच सुरू झाला. एफटीआयआयसारख्या संस्थांपासून मंत्रिमंडळापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली नि या उन्मादी गटांना बळ मिळत गेले. आम्ही सांगू तेच बोला, आमच्या विरोधात जाईल असे बोलू नका अन्यथा तुमचा 'दाभोलकर करू' किंवा 'कलबुर्गी करू' अशा उघड धमक्या सुरू झाल्या.
विचारांचा लढा लढणारे पुरोगामी या हिंसक मार्यापुढे काहीसे हतबुद्ध झाल्यासारखे भासले. जरी नेते सावरले तरी कार्यकर्त्यांमधे भीतीचे, हताशेचे वातावरण पसरू लागले. उजेडापेक्षा काळोख मोठा होत आहे अशी भावना त्यांच्यात रुजू लागली. अशा वेळी पुरोगामी विचारवंत, साहित्यिक, कलाकार, पत्रकार यांना सोबत घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना 'रणात झुंजणारे आहेत अजून काही' सांगण्यासाठी डॉ. गणेश देवी यांच्या प्रेरणेने 'दक्षिणायन' यात्रेची सुरुवात झाली.
या यात्रेचे दुसरे पर्व १८ ते २० डिसेंबर रोजी गोव्यातील मडगांव इथे पार पडले. महाराष्ट्रातून रावसाहेब कसबे, तारा भवाळकर, विद्या बाळ, निखिल वागळे, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, अभय कांता, प्रवीण बांदेकर आदी मान्यवरांनी हजेरी लावली तर गोव्यातून संयोजक श्री दत्ता नायक, क्लॉड अल्वारेस आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषेदमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, जम्मू - काश्मिर, पंजाब, बंगाल, दिल्ली राज्यांमधील विचारवंत, कलाकार, साहित्यिक, विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रेची सुरुवात रविंद्र भवन येथून निघालेल्या मूक मोर्चाने झाली ज्याचे नेतृत्व श्री. हमीद दाभोलकर, श्रीमती मेघा पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांचे पुतणे श्री. श्रीविजय कलबुर्गी यांनी केले. तिची सांगता डॉ. लोहिया मैदानावर होऊन तिथे जाहीर सभा होऊन 'सनातन'चा गोवा अशी चुकीची होऊ घातलेली ओळख पुसून टाकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दुसर्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम हे चार समांतर सत्रांतून आयोजित करण्यात आले होते. पहिल्याच सत्रात 'देशातील विचारवंत पराभूत आहेत का?' या विषयावर परिसंवाद झाला. यात व्हिक्टर फरेरो, पीटर डिसूझा, रहमत तेरेकेरे आदींनी भाग घेतला. अलीकडे 'पुरोगामी आत्मपरीक्षण करत नाहीत' असा घरबसल्या आरोप करणार्यांनी या परिसंवादाला हजेरी लावली असती तर - कदाचित- त्यांचे मत बदलले असते का? असा विचार मनात येऊन गेला.
याशिवाय याच सत्रात 'देशभक्ती, राष्ट्रवाद आणि मानववाद', सांप्रदायिकते विरोधातील संघर्ष, विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष, काश्मिरमधील परिस्थिती, माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही, सेन्सॉरशिप, अंधश्रद्धा आणि विवेक हे विषय केंद्रस्थानी ठेवून विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.
यात विशेष उल्लेख करावा लागेल तो गुजरातमधे दलितांसाठी जमीन सुधारणा कार्यक्रमाला वाहून घेतलेल्या मार्टिन मक्वान यांचा. वाजतगाजत आलेल्या नि विकासाचे रम्य स्वप्न मध्यमवर्गीय नि उच्च-मध्यमवर्गीयांसमोर ठेवून त्यांचा बुद्धिभेद करणारे हत्यार म्हणून समोर आलेल्या 'गुजरात मॉडेल'ची दुसरी बाजू त्यांनी उलगडून दाखवली. 'सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या शोषणावर उभे असलेल्या या धोकादायक मॉडेलशी आपण पुरेशा गांभीर्याने लढत नाही' अशी खंत व्यक्त केली आणि 'आपण जर मानवतेसाठी लढत असू तर संख्येने आपण इतके कमी का आहोत?' असा प्रश्न समोर ठेवून समोरच्या प्रतिनिधींना अंतर्मुख केले.
अमोल पालेकर, आनंद पटवर्धन आणि संभाजी भगत यांनी कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. आपण सर्व पुरोगामी, विवेकवादी लोक कायदा आणि संविधानाला बांधिल असल्यामुळं कलेची अभिव्यक्ती जपण्याची लढाई ही पूर्णपणे संविधानिक असल्याचं मत अमोल पालेकर यांनी व्यक्त केलं. बहुभाषिक कविसंमेलनातून कवींनी आपले विचार मांडले, तर संभाजी भगत यांनी विद्रोही जलशाच्या माध्यमातून प्रतिनिधींशी संवाद साधला. प्रतिगामी शक्तींना उघडे पाडणारी आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात सतत सलणारी 'जयभीम कॉम्रेड' ही आनंद पटवर्धन यांची फिल्मही सादर करण्यात आली. त्यावर श्री. पटवर्धन यांनी विविध प्रतिनिधींशी संवाद साधला.
तिसरा दिवस माध्यम प्रतिनिधींचा ठरला. माध्यम व्यवस्था सरकारी यंत्रणा व उद्योगपतींच्या बांधली गेली असल्यानं ही लढाई कठीण असल्याचं नमूद करतानाच निखिल वागळे आणि सागरिका घोष यांनी पर्यायी माध्यमव्यवस्थेची नितांत गरज असल्याचं सांगितले. पुरोगामी, विवेकवादी लोकांनी स्वत:ची माध्यमव्यवस्था तयार केल्याशिवाय सद्य परिस्थितीला तोंड देणं अशक्य असल्याची जाणीवही करून दिली. परिषदेचा शेवट झाला तो योगेंद्र यादव यांच्या मांडणीने. त्यांनी निवडणुकांच्या राजकारणांपेक्षा, विचारांचं राजकारण करण्याची गरज व्यक्त केली. त्याच सोबत ’भारत’ ही संकल्पना नव्यानं लोकांसमोर घेऊन जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या विवेकवाद्यांच्या हत्यांमुळे विवेकवादाची मशाल विझू न देता ती उचलून पुढे जावे या मूळ उद्देशाने सुरु झालेले दक्षिणायन, त्याचा पहिला उद्घोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असणे अपरिहार्य होते. परंतु या दुसर्या सत्रात आत्मपरीक्षणाचा, संभाव्य कृतीचा विचारही चर्चेच्या, संवादाच्या परिघात आणत त्याची व्याप्ती वाढवण्यात आली. नेटक्या आयोजनाने गोवेकरांनी प्रतिनिधींकडून पसंतीची पावती मिळवलीच, पण या निमित्ताने 'सनातन' संस्थेशी जोडले जाऊ पाहणारे गोव्याचे नाव पुरोगामी विचारांशी जोडले गेले हा एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करून ठेवायला हवा.
-oOo-
संकलन: Abhishek Bhosale, Akshay Ashok Rajage
शब्दांकनः डॉ. मंदार काळे
लेखासोबत जोडलेली दोन्ही छायाचित्रे https://indianculturalforum.in/2016/12/07/dakshinayan-the-long-path-towards-reason/ येथून साभार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा