’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

’यशस्वी माघार’ की ’पलायन’

(’माफीवीर सावरकर’ या उल्लेखाला प्रतिवाद म्हणून ’माफी नव्हे , राजनीती : शिवछत्रपती आणि सावरकर’ या प्रसिद्ध इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचा लेख फेसबुकवर शेअर करण्यात आला. त्याला दिलेले हे उत्तर)

’यशस्वी माघार’ म्हणायचे की ’पलायन’ हे भविष्यातील यशावर अवलंबून असते. तात्पुरती माघार घेऊन नंतर यशाची जुळणी करणॆ शक्य झाले तर त्या पलायनालाही यशस्वी माघार म्हणता येते. नाहीतर प्रत्येक पळपुटा आपल्या पलायनाला ’स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ म्हणूच शकतो. ते आपण मान्य करत जाणार आहोत का? की आपल्या बाब्याचा दावा खरा नि विरोधकाचा खोटा इतके सरधोपट निकष लावणार आहोत?

इतरांसाठी अतर्क्य भविष्यवाणी करणारा द्रष्टा तेव्हाच म्हणवला जातो जेव्हा त्याची भविष्यवाणी खरी होते. (खरंतर त्या भविष्यवाणीलाही तर्काचा, संगतीचा, वारंवारतेचा आधार हवा. पण तो मुद्द्या सध्या सोडू.) एरवी तो डॉन क्विक्झोट ठरतो.

औरंगजेबासमोर हे मेहेंदळे-कथित माफीनामे सादर केलेले महाराज पुढे त्याच्या तावडीतून सुटून बाहेर आल्यावर स्वराज्य वाढवण्यात यशस्वी झाले. या भविष्याने त्यांच्या त्या कृतीला तात्पुरती माघार म्हणणे शक्य झाले. तिथे ते अपयशी ठरले असते तर त्यांच्या त्या कृतीचे मूल्यमापन वेगळ्या दृष्टीकोनातून होऊन ते ही माफीवीर ठरले असते.

कॉम्रेड डांगेंनी माफी मागितल्याबद्दल त्यांना दोष देण्यात आला होता. पण तिथून बाहेर आल्यावर ते - बहुधा - मीरत कटाच्या तयारीला लागले नि पुढे पकडले जाऊन शिक्षाही झाली. त्या भविष्यकालीन कृतीने त्यांच्या माफी मागण्याला समर्थन प्राप्त होते.

माफीनामे देणे हा सावरकरांचा गनिमी कावा होता अथवा तात्पुरती चाल होती हे म्हणणे तेव्हाच समर्थनीय ठरते जेव्हा त्याचा वापर करुन सुटका करुन घेतल्यावर त्यांनी आपले कार्य पुढे चालवून अपयशाला यशामध्ये रुपांतरित केले असते तर.

सुटका झाल्यानंतर सावरकर आपल्या मागील कार्याची उंची वाढवण्यात साफ अपयशी ठरले आहेत, नव्हे त्यांनी तसा प्रयत्नही केल्याचे दिसत नाही. त्यामुळॆ हा ’गनिमी कावा’ होता या दाव्याला सावरकर समर्थकांचा तर्क, समर्थन, पळवाट यापलिकडे कोणताही आधार मिळत नाही. त्यांना तशी संधी मिळाली नाही हे कदाचित दुर्दैवाचे असेलही. पण अमुक झाले असते, तर त्यांनी तमुक करुन दाखवले असते हा केवळ दावाच असतो. तो सिद्ध करणारा कोणताही पुरावा अस्तित्वात नसेल तर त्याला वास्तव मानता येणार नाही.

सावरकरांच्या जागी मी असतो तरी मी हेच केले असते. दिलेल्या शिक्षेचा पूर्णकाळ - जवळजवळ सर्व आयुष्यच - आत बसून आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्ष यातून एक संधी घेण्यात काही गैर नाही. त्यामुळे तसा माफीनामा देण्याला माझा विरोध नाही. की त्यानंतर त्यांना बाहेर येऊन काही साध्य करता आले नाही यातही फार काही आक्षेपार्ह नाही.

आक्षेपार्ह हे आहे की तरीही त्यांना स्वातंत्र्यवीर वगैरे उपाधी दिली जाते, त्यांना नेहरु गांधीच्या पंगतीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तो होत असेल तर राजकारणात 'अरे' ला 'कारे' होणारच. मग गांधी नेहरुंचे चारित्र्यहनन करणार्‍यांच्या आदर्शाच्या वाट्याला तेच येणार हे दुर्दैवी असले तरी अपेक्षित आहे.

मुळात ऐतिहासिक पुरुषांना राजकारणाच्या आखाड्यात ओढणे ही खुज्या मंडळींची गरज असते. एक प्रकारे त्यांचा वापर हे खुजे लोक घोड्यासारखा करत असतात. त्यावर बसून ते दौड करत असतात. आणि युद्धात स्वाराला पाडताना घोड्यालाही पाडावे लागते, त्यात घोड्याचा काय दोष हा प्रश्न गैरलागू असतो. एकदा एकाने युद्धात घोड्याचा वापर केला, की विरोधी बाजूच्या पायदळाला घोडदळात रुपांतरित व्हावे लागते. आणि युद्धात काहीही हात नसलेल्या घोड्यांवर शरसंधान करावेच लागते.

शेजारी राष्ट्राने अणुबॉम्ब बनवला की ’आम्ही त्या सर्वभक्षक अस्त्राच्या विरोधात आहोत म्हणून आम्ही फक्त बंदुकांनी लढू’ असे म्हणता येत नसते. युद्धाचे आयाम बदलले की ते अस्त्र आपल्यालाही निर्माण करावेच लागते. सामान्यांच्या दृष्टीने शौर्य आणि क्रौर्य यात फार फरक नसतो.

तेव्हा संघ-भाजपने नेहरु-गांधींचे चारित्र्यहनन सुरु केले तेव्हाच त्यांच्या आदर्शांवरही शरसंधान होणार हे ठरुन गेले होते. आपले आदर्श अस्पर्श राहावेत अशी त्यांची खरंच इच्छा असती तर त्यांनी ते संघटनेच्या अंतर्गत राखून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. त्या आदर्शांना भारतरत्नच्या निमित्ताने बाजारात आणून बसवले की त्यांच्यावर टीका होणार हे ओघाने आलेच.

आम्ही तुमच्या आदर्शांबद्दल अद्वातद्वा बोलणार, तुम्ही मात्र आमच्या आदर्शांबद्दल बोलायचे नाही. कारण आमचे आदर्शच काय ते खरे, तुमचे खोटे हा तर्क शाळकरी असतो.

तरी नेहरु-गांधींचे जे वैयक्तिक चारित्र्यहनन केले जाते तसे दुसर्‍या बाजूने - अजून तरी - होत नाही. (’गांधी गेल्यावर त्यांचा पंचा नदीत धुतला तेव्हा दुसर्‍या तीरावरच्या सार्‍या बायका गरोदर राहिल्या’ हा 'विनोद' मी माझ्या शाखाशिक्षकाकडून माझे वय वर्षे आठ ते दहा असताना ऐकला आहे! ) हे थोडे सुचिन्हच समजतो मी. पण हे ही किती काळ टिकेल हे सांगता येत नाही.

गोळाबेरीज ही की सावरकरांवर टीका व्हायला नको असेल तर भाजप-संघाने नेहरु-गांधींच्या नावे गळे काढणे थांबवावे आणि सावरकरांना बाजारात आणून बसवण्याऐवजी देव्हार्‍यात नेऊन ठेवावे. राहुल गांधींसह विरोधकांनीही नेहरु-गांधींना बाजारात आणू नये नि इथे-तिथे सावरकरांना ओढून आणू नये.

थोडक्यात परस्परांशी लढताना ऐतिहासिक पुरुषांच्या घोड्यांवर स्वार होण्याऐवजी आपापाल्या छप्पन इंची छातीने एकमेकांशी वर्तमानाच्या आखाड्यातच लढावे. भूतकालभोगी भारतात ही अपेक्षा अनाठायी आहे हे मला ठाऊक आहे. गल्लीच्या नाक्यावर गुटखा खाऊन पोरी न्याहाळत उभा असलेला रिकामटेकडा पोरगाही ’आमच्या खापरपणज्याचा आजा म्हाराजांच्या टायंबाला मोरे सरकारांच्या सवताच्या घोड्याला खरारा करायला होता.’ म्हणून काव आणत असतो. इथे तर मतांचे पीक काढायला राजकारणी बसले आहेत. एकाला त्याची परवानगी आहे नि दुसर्‍याला नाही हा कांगावा अदखलपात्रच असतो.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा