नेहरु म्हणजे केवळ ’एडविना’ नव्हे
सावरकर म्हणजे केवळ ’माफी’ नव्हे
पाडगांवकर म्हणजे केवळ ’सलाम’ नव्हे
लागू म्हणजे केवळ ’देवाला रिटायर करा’ नव्हे
खरंतर या चौघांच्या आयुष्यातील या चार गोष्टी हे खरेतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे व्यवच्छेदक लक्षण नाहीत, उलट अपवाद अथवा प्रासंगिक मुद्दे आहेत.
देशाच्या इतिहासातील नेहरुंच्या अजोड स्थानाऐवजी ज्यांना एडविना आठवते ते बिचारे नेहरुंच्या शिरापर्यंत पाहू शकत नाहीत इतके खुजे असतात.
सावरकर म्हणजे माफी अथवा हिंदुत्ववादीच म्हणणारे त्यांचा द्वेष करायचा हे आधी ठरवून त्यानुसार पाहात असतात.
पाडगांवकरांसारख्या अस्सल सौंदर्यवादी कवीची ओळख ’सलाम’ या कृत्रिमपणे रचलेल्या, तद्दन प्रचारकी कवितेने होते हे त्यांचे दुर्दैव.
समांतर चित्रपटांपासून मेनस्ट्रीम चित्रपट, नाटक असा व्यापक पैस असणार्या लागूंवर स्तुतीवर्षाव वा टीका यासाठी ’देवाला रिटायर करा’ या एका प्रासंगिक वाक्याचा आधार घेतला जातो हे त्यांचेही दुर्दैव. निव्वळ कालानुक्रमे भरताड स्वरुपात लिहिल्या जाणार्या आत्मचरित्रांच्या भाऊगर्दीत आपल्यातल्या नाटकवाल्याचे विकसित होत जाणे टिपणारे त्यांचे ’लमाण’, त्याचा उल्लेखही होऊ नये हे आणखी दुर्दैव.
मला डॉक्टरांतला रंगकर्मी दिसतो तो पुलंच्या ’सुंदर मी होणार’ (या मला अतिशय आवडलेल्या) नाटकातील मुख्य भूमिका नाकारुन (जी माझ्या मते त्यांच्याइतकी नेमकी कुणीच साकारली नसती. रवी पटवर्धनांनी त्या पात्राची निर्घृण हत्या केली असे माझे मत झाले.) त्यातील दुय्यम अशा डॉक्टरच्या भूमिकेला स्वीकारुन त्याचे सोने करणारा. वयाच्या सत्तरीत त्यांनी साकारलेला तो डॉक्टर माझ्या कायम स्मरणात राहील.
मुळात स्वत:ला न आवडलेले नाटक, त्यात स्वत:च्या स्वीकृत विचारांशी ताळमेळ नसलेले अतिभावनिक असे ते व्यक्तिमत्व इतके यथातथ्य सादर करताना त्या अभिनेत्याच्या अभिनयक्षमतेसोबतच बांधिलकीचाही कस लागत असतो.
सारे आयुष्य ज्या पांगळ्या मुलीच्या पायांत चेतना निर्माण करण्याचा ध्यास घेतला, त्या मुलीला स्वत:च्या पायावर चार पावले टाकताना निर्माण झालेली कृतकृत्यतेची आलेली भावना, यावर कसे व्यक्त व्हावे हा निर्माण झालेला संभ्रम आणि अखेर भावनावेगाने तिच्या पायावर डोके ठेवणारा प्रसंग त्यांनी असा लाजवाब रंगवला की त्यांच्यासोबत आमचे डोळेही भरुन आले होते. त्या पांगळ्या मुलीच्या नव्या आयुष्याच्या आनंद त्या डॉक्टरमार्फत या डॉक्टरने आमच्यापर्यंत यशस्वीपणॆ पोचवला होता. समोर केवळ साक्षीभावाने उपस्थित राहण्याच्या इच्छेने आलेल्या आम्हा सर्वांना त्यात ओढून नेले होते.
So long Doc, and thanks for everything.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा