clipart.world येथून साभार.
जुलमी राजाने पाचपंचवीस नागरिकांना बडवून काढले तेव्हा कुण्या देशीच्या लेखकाने त्रिखंडी ऐतिहासिक कादंबरीचा श्रीगणेशा केला ... कुण्या देशीच्या लेखकाचा पहिला खंड लिहून संपला तेव्हा राजाने हजारो नागरिकांची तुरुंगामध्ये रवानगी केली होती. कुण्या देशीच्या लेखकाने दुसर्या खंडानंतर हुश्श केले तेव्हा देशांतील बुद्धिमंतांचे शिरकाण पुरे झाले होते कुण्या देशीच्या लेखकाने तिसरा खंड पुरा केला तेव्हा राजाने शिक्षणसंस्था मोडून लष्करी संस्था उभ्या केल्या होत्या इतके झाल्यावर राजाने त्या कुण्या लेखकाचा गौरव केला लेखकाने राजाला ’त्रिखंडभूषण’ पदवीने गौरवत त्याचा परतावा दिला काही संघर्षरतांचे बळी पडले बरेच काही उध्वस्त झाले त्यातून राजाची सत्ता हटली नि आणि लोकसत्तेचा उदय झाला आता त्या अलौकिक बंडाची, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची महती सांगणारी एक कविता त्या सिद्धहस्त लेखकाने खरडली मग गावोगावी ती कविता तो आवेशाने सादर करु लागला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दूत म्हणवून घेऊ लागला पुन्हा उलथापालथ झाली लोकशाही मार्गाने राजाच पुन्हा सत्तेवर आला आणि पुन्हा हुकूमशाही रुजवू लागला अभिव्यक्ती स्वातंत्र्याला स्मरुन लेखक पुन्हा सज्ज झाला लोकशाहीऐवजी हुकूमशाहीचे जाहीरनामे लिहू लागला लेखक खूप लिहितो... लेखक खूप व्यक्त होतो... ...कारण लेखक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो! - रमताराम
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा