" माझ्याकडे फक्त प्रश्नच आहेत आणि आसपास सोयीच्या उत्तराभोवती प्रश्न गुंडाळणारी बहुसंख्या" अशी एक ओळीची पोस्ट फेसबुकवर लिहिली. आणि झटक्यात "’काळे, तुम्ही स्वत:ला काय समजता?’ अशी पृच्छा झाली. तशी ती होणार हे माहित होतेच, फक्त ती इतक्या झटपट येईल असे वाटले नव्हते. पण फेसबुक आणि एकुणच देश नि जगातही (बहुधा) स्वत:ची मांडणी करण्यापेक्षा दुसर्याला चॅलेंज करणे, मोडीत काढणे याला प्राधान्य असते हे विसरलोच. त्यातून आपण बरोबर असल्याचे समाधान करुन घेता येते. ज्यांना ही एकोळी पोस्ट आक्षेपार्ह वा अहंपणाची वाटली त्यांनी हे करुन पाहा.
आपल्याला असे प्रश्न कधी पडले होते, किंवा आपण असे निकष कधी लावले होते ज्यातून आपला गट, जात, धर्म, नेता, गाव, गल्ली योग्य ठरली नव्हती, अन्य पर्याय अधिक योग्य असे उत्तर मिळाले होते? जेव्हा असे प्रश्न, असे निकष आपल्याला सापडू लागतात तेव्हा त्यांच्या उत्तरांतून नवे प्रश्न निर्माण होण्याची निरंतर प्रक्रिया सुरु होते. याचे कारण असे प्रश्न असे निकष तुमच्यासमोर आले याचाच अर्थ आपल्या जमावापासून थोडे दूर होऊन, अलिप्त होऊन तुम्ही विचार करु शकत आहात याचा अर्थ आहे. आणि आजवर प्रत्येक प्रश्नाचे, निकषाचे उत्तर म्हणून तुमचा गट, तुमच्या धारणाच विजयी होतात असे तुमच्या लक्षात येत असेल तर माझा तुमच्याबद्दलचा आक्षेप वाजवी आहे असे समजून चाला.
आर्किमीडिज म्हणाला होता की मला पृथ्वीबाहेर उभी राहण्यास थोडी जागा द्या, मी तुम्हाला पृथ्वी उचलून दाखवतो. माझ्या मते त्याचा ध्वन्यर्थ हाच आहे. मला या जगापासून अलिप्त राहता आले, दुरून पाहता आले तर मी त्या जगाच्या आकाराच्या समस्याही लीलया पेलून दाखवेन. पण हे फार थोड्या लोकांना जमते किंवा जमायला हवे अशी त्यांची स्वत:ची इच्छा असते. त्यांना ’कशाला एवढा विचार करायचा’ म्हणून टिंगलीला सामोरे जावे लागते. आर्किमीडिजचा सिद्धांत पुढे सिद्धच नव्हे तर भौतिकविज्ञानाच्या पायातील एक मोठा दगड म्हणून मानला गेल्यावर आर्किमीडिजच्या या दाव्याचा उल्लेख आदराने केला जाऊ लागला. अन्यथा त्याचाही डॉन क्विक्झोट झाला असता. विचारांना भौतिक यशाची पावती नसेल तर त्यांचे श्रेष्ठत्व मान्य होणे अवघड असते. कारण बहुसंख्या त्या विचारांबद्दल अनादरानेच बोलणार असते.
फार तात्त्विक झाले हे. पण माझ्याच बाबत असे निकष, असे प्रश्न कुठले की ज्यांतून माझा नसलेला गट किंवा मला न पटणारे, मी न स्वीकारलेले विचार किंवा विचारव्यूह श्रेष्ठ ठरतात? असा प्रश्न साहजिकच येईल. त्याची काही सोपी उत्तरे आहेत.
माझा धर्माधिष्ठित राजकारणाला साफ विरोध आहे, मला ते पटत नाही हे जगजाहीर आहे आणि त्यामुळॆ संघ, भाजप, जमात, जमाते-इस्लामी एमआयएम सारखे एका धर्माची राजकारणे करणारी मंडळी माझ्या मर्जीतली नाहीत हे उघड आहे. पण काही प्रश्नांच्या बाबत माझी उत्तरे त्यांच्याकडे बोट दाखवणारी आहेत. उदाहरणार्थ, ’स्वतंत्र भारतात सर्वात चांगले संघटनकौशल्य कोणाचे?’ याला माझे उत्तर ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे उत्तर आहे. पण त्यावरुन त्यांच्या कार्याचे, विचाराचे यशही सिद्ध होते असे मी मानत नाही. आजच्या सत्ताकारणात (राजकारणात नव्हे!) सर्वात बलवान नेता म्हणून अर्थातच मोदींचे नाव येते. या पलिकडे एखाद्या देशव्यापी पक्षावर इतके भक्कम नियंत्रण मिळवणॆ हे दाद देण्याजोगे कौशल्य आज अन्य कुणाकडे नाही हा मुद्दा नोंदवून ठेवण्याजोगा. एमआयएमचा असदुद्दिन ओवैसी हा अप्रतिम संवादकौशल्य असणारा, तोल ढळू न देता आपले मुद्दे सप्रमाण, साधार रेटणारा सर्वोत्कृष्ट नेता आहे. तर मोदी हे जनतेच्या मनाची पकड घेणारे सादरीकरण करणारे श्रेष्ठ वक्ते आहेत (त्यांचे वक्तृत्व श्रेष्ठ आहे असा याचा अर्थ नाही. त्यांच्या भाषणात वक्तृत्वापेक्षा सादरीकरणाचा भागच अधिक असतो.)
सध्या माझा विचार समाजवाद-साम्यवाद यांच्याशी झटे घेत आहेत. मी त्यांना स्वीकारेन की नाकारेन हा खूप लांबचा मुद्दा आहे. त्यासाठी अनेक प्रश्नांच्या चरकातून मी त्यांना पिसून काढेन. एक पुस्तक वाचले, भारी वाटले, की झालो मी त्या बाजूचा इतके सोपे माझ्या आयुष्यात - कदाचित दुर्दैवाने - घडत नाही. त्यामुळे या दोनही विचारसरणींना प्रश्नांच्या आधारे तपासताना मला त्यांच्यातही मर्यादा दिसतात.
साम्यवाद्यांची अपेक्षित अंतिम समाजव्यवस्था मला अजूनही भाबडी, क्षणभंगुर, अति-आदर्शवादी वाटते. व्यावहारिक समस्यांचा सामना करण्यास ते मॉडेल अक्षम आहे असे माझे मत आहे... अगदी तोच गट त्या व्यावहारिक बाजूंचा सर्वाधिक विचार करणारा असूनही! हे दोनही विचार राजकीय, सत्ताकारणाच्या दृष्टीने कुचकामी झाले आहेत. वर्तमानाच्या परिप्र्येक्षात वैचारिक, तात्त्विक नव्हे, सत्तेची वाट शोधणारी त्याची कारणमीमांसा त्यांच्याकडून होत नाही असे माझे मत आहे. आणि विचार जर तात्त्विक नसेल, पुस्तकी नसेल, व्यापक कल्याणकारी समाजव्यवस्थेचे मॉडेल देणारा असेल तर त्याला सत्तेची जोड लागतेच असे माझे ठाम मत आहे.
कदाचित याबाबत ते ही धार्मिकांसारखेच ते ही वरुन-खाली असा विचार करतात असा माझा समज आहे. (आणि आपल्या दुरवस्थेला बाह्य घटकांना जबाबदार धरणे हे दुसरे साम्य.) वैचारिक भूमिकेत जसा ते समस्येकडून निराकरणाकडे असा खालून-वर विचार करतात तसा ते राजकारणाबाबत करत नाहीत. तिथे ’हे विचार, त्यावर संघटन नि जग आबादीआबाद होणार’ अशी वैचारिक दृष्ट्या थकल्यासारखी भूमिका ते घेतात. त्यावर काळ समाज नि भूभागाच्या संदर्भात स्वतंत्रपणे व्यावहारिक विचार करतात का?... मला शंका आहे.
थोडक्यात आपले वाटत नाहीत त्यांचे गुण सापडतात आणि जे आपले वाटू लागले त्यांच्या मर्यादाही, याचे कारण प्रश्न! माझ्या परिचितांमध्ये भांडवलशाहीचा उत्तम अभ्यास केलेले लोक आहेत, साम्यवादाचा उत्तम अभ्यास केलेले लोक आहेत, आपआपल्या धार्मिक विचारपरंपराचा अभ्यास केलेले लोक आहेत. पण त्यातले फारच थोडे मी विचारलेल्या नव्या प्रश्नांना सामोरे जातात. मला शंका आहे की त्यांना ते ते विचार पटले आहेत, पण समजले नसावेत. कारण समजले, उमज पडली तर नव्या प्रश्नांना सामोरे जाता यायला हवे.
म्हणून गणित हा विषय आपल्याकडे अधिक नावडता दिसतो. तो प्रश्नाचे उत्तर देत नाही तर उत्तर शोधण्याची रीत समजावतो. त्याच्या आधारे तुम्ही भविष्यात त्याच स्वरूपाची अनेक गणिते स्वत:च सोडवू शकता, त्यासाठी कोणत्या गाईडची आवश्यकता पडत नाही. पण ती रीत समजून घ्यावी लागते, पाठ करुन भागत नाही. आणि मुख्य म्हणजे कोणते गणित सोडवण्यासाठी ती उपयुक्त ठरेल याचा निर्णय आपला आपल्याला घ्यावा लागतो. आपल्या देशात पढीकवृत्तीला एकदम सोयीचा इतिहास हा अधिक आवडीचा असतो. याचे कारण तो भूतकाळाबद्दल बोलतो. त्याला भविष्य नसल्याने आणि त्याची आपल्या गटांच्या सोयीची मांडणी करण्याची सोय असल्याने आपला लाडका होऊन बसतो.
तुम्ही नुसते अन्य लेखकांचे संदर्भ वा क्वोट्स तोंडावर फेकत असाल,”बाहेरुन कळणार नाही, आत या’ म्हणत असाल, तर तुम्ही पढतमूर्ख आहात नि तुमचे स्वीकृत तत्त्व वा विचार तुम्हालाच समजलेले नाहीत असा त्याचा अर्थ आहे हे समजून चाला.
आणखी एक महत्वाचा मुद्दा. मी तसा प्रिविलेज्ड क्लासचा माणूस आहे. आर्थिक नि शारीर दुर्बळतेमुळे ज्या अभावांचा सामना करावा लागला त्यापासून मी अनेक मैल पुढे आलो आहे. एरवी जात, धर्म, लैंगिक भेदाभेदाचा सामना मला करावा लागलेला नाही. किंबहुना यामुळेच मला जे विचार पटतात ते व्यापक कल्याणकारी असतील का याबाबत मला उलट शंकाच आहे. त्यामुळे कम्युनिस्ट मंडळींचे ’डी-क्लास’ होण्याचे आग्रह मला एका बाजूने पटतात, दुसर्या बाजूने हास्यास्पद वाटतात (हा मुद्दा तूर्त सोडून देतो.)
म्हणून आपल्याला जे पटले ते विचार, तो धर्म, तो आध्यात्मिक अथवा राजकीय बुवा, अंडरवेअरचा ब्रँड हाच काय तो श्रेष्ठ आणि इतर सर्व पर्याय दुय्यम असा ’विचार न करताही’ दुराग्रह धरणार्यांचे मला कौतुक वाटत आले आहे. हीच ती बहुसंख्य मंडळी आहेत जी आपल्याला हव्या असलेल्या उत्तराभोवती प्रश्न तयार करतात, त्याची व्याप्ती आपल्या सोयीची ठेवतात (उदा. अमुक जातीच्या, गहू वर्णाच्या, ओसाडगाव-खुर्द मधील आठव्या गल्लीत राहणार्या, अमुक ते अमुक इतक्या वयोगटातील सर्वांमध्ये सर्वात हुशार माणूस मीच आहे.) आणि ती एकोळी पोस्ट यांनाच उद्देशून आहे.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा