सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

कथा विकासाच्या कांद्याची

परवा सकाळी एका मित्राबरोबर चुलत-मित्राकडे (त्याचा मित्र) जाण्याचा योग आला. घरी पोचलो तेव्हा त्याच्या पत्नीने सांगितले की साहेब पूजाघरात आहेत. इतक्यात आतून ’आतच या’ असा निरोप आला.

आत पोचलो तेव्हा साहेब हात जोडोनि देव्हार्‍यासमोर बसले होते. ’घ्या दर्शन घ्या’ अशी ऑफर आली. मित्राने हात जोडून नमस्कार केला. मी आपला आपद्धर्म म्हणून हात जोडण्यापूर्वी देव्हार्‍यात डोकावले नि दचकलोच. तिथे चक्क एक अंडे ठेवले होते. मी बुचकळ्यात पडलो.

माझी अवस्था पाहून "मला वाटलेच होते, तुम्हाला आश्चर्य वाटणार म्हणून." चुलत-मित्र विजयी मुद्रेने म्हणाला. "अंड्याची पूजा? कशासाठी?" मी शंकेखोरपणे विचारले. "मी ज्युरासिक पार्क उभे करणार आहे." चुलत-मित्र सिक्रेट सांगताना वापरतात तशा मंद्रसप्तकातील षड्जाला आधारस्वर करुन बोलिला.

माझी अवस्था तेलाच्या बुधलीतून उडून मधाच्या बाटलीत पडलेल्या माशीसारखी झाली. चुलत-मित्र हसला नि दयार्द्र नजरेने म्हणाला. "मी रोज या अंड्यासमोर ’लेसोथोसॉरसाय नम:’ हा मंत्र हजार वेळा म्हणतो. सहा महिन्यात यातून लेसोथोसॉरस जन्माला येईल."

"पण एका डायनोने पुरे ज्युरासिक पार्क कसे उभे राहील." बावळट प्रश्न माझ्या तोंडून निसटलाच. माझी कीव करणारे हसून चुलत-मित्र म्हणाला. त्यानंतर मी आणखी एक अंडॆ तिथे ठेवून ’टिरॅनोसॉरसाय नम:’ या मंत्राने त्यातून एक टिरॅनोसॉरस निर्माण करेन. अशा तर्‍हेने एक एक करत मी इतर प्रजातींचे डायनोसॉर्स निर्माण करेन. मग त्या सार्‍यांसह पुरे ज्युरासिक पार्क उभे करेन. मग काय पैसाच पैसा."

"अरे पण याला किती वर्षे लागतील?" आमचा आणखी एक बावळट प्रश्न. "हा लाँग टर्म उपाय आहे. माझ्या पेन्शनची सोय होईल यातून." चुलत-मित्र आपले गुपित उघडे करत म्हणाला. "थोडक्यात पेशन्स हवा म्हणजे पेन्शन मिळेल." मी छटाक विनोद केला. चुलत-मित्राने माझा हात ओढून घेऊन टाळी दिली.

PuzzledChicken

क्षणभर विचार करुन त्याला विचारले, "का रे, तू विकासाला मत दिलं होतंस का?’"... हा प्रश्न बिलकुल बावळट नव्हता!

"हो! पण तू कसे ओळखलेस?" चुलत-मित्र अभिमानाने उत्तरला.

"एकतर तू समोर ठेवलेले ते अंडे कोंबडीचे आहे. दुसरे म्हणजे अंड्यातून जीव बाहेर यायचा असेल तर ते उबवावे लागते, त्यावर हळद-कुंकू वाहून ते साधत नाही हे तुला समजत नाही. शिवाय ते बाजारातून आणलेले असल्याने फलनशील नाही. असते तरी त्यातून कोंबडीचे पिलूच बाहेर आले असते..."

"बिचारा..." चुलतमित्र मध्येच सामायिक मित्राच्या कानात म्हणाला, "त्यासाठीच तर मंत्र असतो. मंत्रामुळॆ अंड्यातून हवा तो जीव जन्माला घालता येतो."

"... आणि समजा डायनोसॉर जन्मलाच असता तरी तो तुझ्या कह्यात राहिला असता हे तू गृहित धरलेस. समजा तो तुझ्या कह्यात राहिला असता तरी तो पोसणे तुला परवडू शकते असा आत्मविश्वास तुझ्यात आहे. आणि एकामागून एक असे जन्माला घातलेले वेगवेगळ्या प्रजातीचे डायनोसॉरस एकत्र सांभाळण्याइतकी विस्तीर्ण भूमी तू विकत घेऊ शकतो इतकी आपली आर्थिक ताकद आहे अथवा तोवर येईल यावर तुझा गाढ विश्वास आहे... इतकी अलौकिक बुद्धिमान व्यक्ती 'आम्हीविकासालामतदिलं' जमातीचीचअसू शकते." माझा कुत्सित प्रतिसाद मी पुरा केला.

"अगदी बरोबर. कशी वाटली आयडिया?" चुलत-मित्र स्तुतीला सहर्ष स्वीकारत विचारता झाला.

"तुला देशाचे अर्थमंत्रीच बनवले पाहिजे. सर्वांच्या पोटापाण्याची सोय चुटकीसरशी होईल." मी म्हणालो.

"असे म्हणणारा तू पहिलाच नाहीस." तुपकट आत्मसंतुष्ट चेहर्‍याने तो म्हणाला.

"अंडे है तो मुमकिन है।" मी शेवटचा ठेवून दिला.

वीतभर रुंद हसून त्याने तो ही स्वीकारला.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा