शनिवार, ४ जानेवारी, २०२०

'आठवडी बाजारा’ची मुशाफिरी

(राज कुलकर्णी यांच्या ’आठवडी बाजार आणि समाजजीवन’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना)

आपल्या देशातील शिक्षणक्रमातील इतिहासाच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने राजकीय आणि प्राचीन इतिहासावर भर असतो. जगण्याशी निगडित असणाऱ्या जड वस्तूच्या, आयुधांच्या आणि माणसाच्या जीवनशैलीचा जो अतूट संबंध असतो, त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. याचे कारण ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये त्या त्या काळचे शासनकर्ते, राज्ये, साम्राज्ये आदींचा सनावळीसह काटेकोर उल्लेख असला, आणि त्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक इतिहासाची काही पानेही जोडलेली असली, तरी त्या काळी प्रचलित असणाऱ्या वस्तू आणि मनोरंजनादि पैलूंचा वेध घेणाऱ्या जड वस्तूच्या इतिहासाची, विकासाची प्रामुख्याने उपेक्षाच दिसते. क्वचित कुठे असली, तरी विद्यार्थीच काय अभ्यासकांपैकी बहुसंख्य व्यक्तीदेखील त्यांना फार महत्त्व देताना दिसत नाही. अलीकडे इतिहास हा प्रामुख्याने अस्मितेची आणि अधिक्षेपाची स्थाने नि व्यक्ती शोधण्यापुरता अभ्यासला आणि लिहिला जाऊ लागल्यानंतर ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे असे म्हणावे लागेल.

AthavadiBazaar

वास्तविक पाहता एखाद्या संस्कृतीमध्ये, एखाद्या समाजामध्ये लढाईसाठी वापरल्या जाणाऱ्या आयुधांपासून एखाद्या घरातील नित्यकर्मांना सहाय्यभूत होणाऱ्या हत्यारांपर्यंत, रोज वापरण्याची सर्वसाधारण वस्त्रे आणि विशिष्ट प्रसंगी परिधान करावयाचे पेहराव, रोजच्या आहारातील धान्ये आणि विशिष्ट सणाशी निगडित असणारी विशिष्ट पक्वान्ने यांचा अभ्यास त्या त्या काळाशी निगडित इतिहासाचा एक तुकडा असतो. त्याचा अभ्यास त्या समाजाच्या, काळाच्या, भूभागाच्या जीवनशैलीबाबत अमूल्य अशी माहिती देत असतो. संस्कृती-अभ्यासाचा तो ही एक महत्त्वाचा भाग असतो. परस्परांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असणाऱ्या समाजांमध्ये भाषेतील शब्द, वापरले जाणारे हत्यार, आहारपद्धती आदिंमध्ये काही सामायिक सापडले, तर 'त्यांच्यात काही संपर्क होता का?' हे कुतूहल निर्माण होते, आणि कुतूहल अभ्यासाला चालना देते. हे आदानप्रदान कसे नि केव्हा झाले असेल, त्याचा प्रवाह एकाच दिशेने होता की खऱ्या अर्थाने ही देवाणघेवाण होती, असा प्रश्न विचारता येतो. सामान्यपणॆ असे दिसते, की जित आणि जेते यांच्याबाबतीत एकदिश असा संबंध दिसण्याची शक्यता असते, तर व्यापारी संबंधांमध्ये देवाणघेवाण होताना दिसते. थोडक्यात या भौतिक जीवनाचे सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासामध्ये पडलेले प्रतिबिंबही इतिहासात महत्त्वाचे ठरते.

नव्वदीच्या दशकात भारतात खुले आर्थिक धोरण, जागतिकीकरण आणि संगणकीकरण हे परवलीचे शब्द झाले आणि भारतीय समाज, जीवनपद्धती वेगाने बदलू लागली. संगणकीकरणाने केवळ आर्थिक स्थिती सुधारली असेच नव्हे तर उघडलेल्या दारांतून गुंतवणुकीसोबतच अन्य संस्कृती – विशेषत: पाश्चात्य – संस्कृतीने देशात प्रवेश केला. सांस्कृतिक सरमिसळीतून महानगरी समाजाची जीवनशैली अतिशय वेगाने बदलली. त्यांचा पेहराव बदलला, जगण्यातील आकांक्षा बदलल्या, घरात विविध कामांसाठी वापरली जाणारी उपकरणे, आयुधे बदलली, करमणुकीची साधने वेगाने सामूहिकतेकडून वैयक्तिक होऊ लागली. आर्थिक राजकीय बदलांनी त्यांच्या वैयक्तिक, भौतिक जीवनात एक मोठी वावटळ आणली, जिथे एक दोन दशकातच जगण्यातील अनेक वस्तू कालबाह्य करून विस्मृतीमध्ये फेकून दिल्या.

असे असले तरी काळ सर्व भूभागांवर सारखा असत नाही. एकाच मुंबईत उच्चभ्रू वस्तीतला ‘आज’ आणि धारावी सारख्या वस्तीतला ‘आज’ सर्वस्वी वेगळा असतो. वेगवेगळी शहरे, गावे, इतकेच काय डोंगरदऱ्यांतले पाडे-वस्त्या यांच्या जगण्याचे पैलू वेगवेगळे असतात. ते वेगवेगळ्या जीवनशैलीच्या सांस्कृतिक वारशांचे जतन करताना दिसतात. एका भूभागावर अथवा समाजात माघार घेत असलेल्या अथवा घेण्यास भाग पाडलेल्या जीवनशैलीचे अनेक आयाम हे अन्य कुठे भक्कम पाय रोवून, तर कुठे तग धरून असतात. एकाच काळातला, राजकीयदृष्ट्या एकच भूमी असलेल्या भूभागावरचे जगण्याचा हे पट अभ्यासणे रोचक असते. बहुतेक सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या ‘आठवडी बाजारापासून’ ते बिग बझार अथवा ‘डी-मार्ट’सारखे रीटेल स्टोअर्सपर्यंतचा प्रवास किराणा माल, कपडे, खाद्यपदार्थ इ. साठी स्वतंत्र दुकाने या मधल्या टप्प्यामार्फत होत असतो. हे तीनही प्रकार एकाच वेळी, एकाच शहरात अस्तित्वात असतात, आणि वेगवेगळे प्राधान्यक्रम असणाऱ्या, कदाचित विशिष्ट सामाजिक-आर्थिक गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समूहाच्या गरजा भागवत असतात.

आठवड्याचे कामाचे संपूर्ण दिवस बहुधा कार्यालयीन कामातच व्यतीत करावा लागत असल्याने, महिन्यातून एकदाच ‘बिग बझार’मध्ये जाऊन महिन्याचे सारे आवश्यक जिन्नस एकदाच खरेदी करून आणणारा समाज उच्चमध्यमवर्गीय असतो. हीच मानसिकता असणारा, परंतु आवश्यकतेहून अधिक खरेदी न करता, खरेदीची सांगड उपलब्धतेपेक्षा गरजांशी अधिक जोडणारा मध्यमवर्गीय समाज हा जवळच्या किराणा भुसार दुकानातून महिन्याची एकदम खरेदी करतो. हाच समाज मोठ्या शहरांऐवजी लहान शहरे, गावे यांतून राहात असेल तर उलट दिशेने पीककाढणीनंतर म्हणजे दिवाळीनंतर वर्षभराचे धान्य भरून ठेवण्याकडे त्याचा कल असतो. हा कृषी संस्कृतीचा वारसा! तर दैनंदिन अथवा आठवडी रोजगारावर काम करणारा श्रमजीवी त्या आठवड्याचे वेतन पदरी पडले की पुढील आठवड्याची तजवीज करण्यासाठी आठवडी बाजाराची वाट धरतो. माणसांचे हे प्राधान्यक्रम नकळत त्यांच्या आर्थिक स्तराचे, भौगोलिक मागणी-पुरवठा व्यवस्थेचे निदर्शक ठरत असतात.

आठवडी बाजारात दिसणारे छत्री दुरुस्तीचे दुकान स्वतंत्रपणे बाहेर एक नियमित व्यवसाय म्हणून फार तग धरत नाही. त्याला अन्य आनुषंगिक व्यवसायांची जोड द्यावी लागते. रीटेल स्टोअर्समध्ये येणारा समाज हा बव्हंशी ‘जुने मोडले की नवे घ्या’ मानसिकतेचा असल्याने तिथे तर त्याला स्थानच नाही. अशी आणखी अनेक उदाहरणे देता येतील. प्रत्येक टप्प्यावरील या विक्रेत्यांकडे काय उपलब्ध असते हे त्यांचे ग्राहक कोण आणि त्यांची मागणी काय यावर अवलंबून असते. आणि त्यांचे ग्राहक कोण हे त्यांच्या गरजांवरून ठरत असते. एकुणात पाहिले तर प्रत्येक व्यवसाय हा एका सांस्कृतिक-आर्थिक गटाचे प्रतिबिंब असतो. आणि इतिहासाचा अभ्यास करताना त्या प्रतिबिंबाची दखल घेणे आवश्यक असते. अन्यथा काही महत्त्वाचे पैलू दुर्लक्षित राहण्याचा धोका असतो.

साधारण दोन वर्षांपूर्वी राज कुलकर्णीची ‘आठवडी बाजार’ ही मालिका वाचण्यात आली. सुरुवातीला सुटे सुटे वाटणारे लेख हळूहळू एक सूत्र समोर आणताना दिसू लागले. त्यामुळे एका व्यक्तीचे कुतूहल एक महत्त्वाचे दस्तऐवजीकरणात रूपांतरित होईल का याची उत्सुकता निर्माण झाली. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवण्यापासून माणूस सुरुवात करतो आणि नंतर एक एक करून जमतील तशा अन्य गरजांना सामावून घेत जातो. राज कुलकर्णीच्या ‘आठवडी बाजारा’च्या मुशाफिरीमध्ये यातील बहुतेक गरजांचा उल्लेख येतो आहे.

आज वडापावच्या जमान्यात कदाचित माघार घेऊ लागलेले, फिरत फिरत खाता येणारे आणि आहारदृष्ट्या पौष्टिक भाजलेले दाणे नि फुटाणे असोत, स्वातंत्र्यदिनासारख्या विशेष सणाच्या दिवशी अनोन्य संबंध निर्माण केलेली जिलेबी असो की प्रोटिनची गरज भागवणाऱ्या उसळींसाठी आवश्यक असणारी मोड आलेली कडधान्ये आदी अन्नपदार्थ हे घरात बनवण्याऐवजी विक्रीयोग्य क्रयवस्तूंमध्ये रूपांतरित झालेले इथे दिसून येतात. जुन्या कपड्यांचा बाजार हा आठवड्याच्या उत्पन्नाच्या आधारे नियोजन करणाऱ्या ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतोच. त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तूंमध्ये भारतीय आहारात महत्त्वाचे असणारे पीठ बनवण्यासाठी लागणारे जाते, उखळ-मुसळाची जोडी, घरच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे झाडू, केरसुणी आदी वस्तू, कधीमधी परवडणारे कोंबडी-मासे यांसारखे मांसाहारी पदार्थ या अन्न-वस्त्रांपासून तंबाखू-चुन्यासारख्या माफक व्यसनपूर्तीची दुकाने, स्त्रियांसाठी किमान शृंगार असलेल्या बांगड्या विकणारी दुकानेही या मुशाफिरीमध्ये सामील झालेली आहेत. इतकेच नव्हे तर विकत घेतलेल्या अन्नाची नासाडी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी उंदीर मारण्याची औषधे वगैरे माणसांच्या किमान गरजांच्या भोवती निर्माण झालेल्या गरजा भागवणाऱ्या वस्तुविक्रीचाही आढावा घेतला आहे.

माणसाच्या गरजा भागवण्यासाठी प्राचीन काळीच श्रमविभागणीतून व्यवस्था साकळत गेल्या, कुठे त्या कृत्रिमरित्या निर्माण केल्या गेल्या. त्यातील बलुतेदारी ही एक व्यवस्था आपल्या देशात बराच काळ बळकट होती. त्यातून विशिष्ट कामांना वंशपरंपरागत जबाबदारीचे स्वरूप आले. आज जागतिकीकरणामुळे उत्पादन आणि उपभोगाचे वर्तुळ कमालीचे व्यापक झाल्याने ही व्यवस्था हळूहळू नामशेष होत जात असली तरी तिचे बरेवाईट अवशेष आठवडी बाजारातील व्यवसायांतून दिसतात हे राजच्या अनुभवातून दिसून आले. मूळ बारा बलुत्यांपलिकडेही काही कामे ही विशिष्ट जात, विशिष्ट समाज वंशपरंपरागत पद्धतीने करत येताना दिसतात. त्यांची दखल घेत राज कुलकर्णीने त्यांचा इतिहास, त्यांच्या उत्पादन आणि विक्रीचे धोरण आदी बाबींवर प्रकाश टाकत सर्व बाजूंचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. बाजाराचा अभ्यास करताना या सामाजिक नोंदींची गरज ओळखली आहे. त्याबद्दल त्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. सुरूवातीला म्हटले तसे राजकीय, सांस्कृतिक इतिहास या त्याच्या जीवनशैलीपासून सुटा अभ्यासताना काही पैलू निसटण्याची आणि त्यामुळे काही संगती तुटून जाण्याची शक्यता असते. म्हणून त्या माणसाचा ग्राहक म्हणून अभ्यास करताना त्याच्या जीवनशैलीशी होणारा परिचय हा ही त्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग मानायला हवा.

राज कुलकर्णीने निवडलेल्या अभ्यासविषयाचे दस्तऐवजीकरण सामान्यपणे रिपोर्ताज या शैलीमध्ये करणे अपेक्षित असते. यात मूल्यमापनापेक्षा निरीक्षणांच्या काटेकोर नोंदींना अधिक महत्त्व द्यावे लागते. अभ्यासकाच्या दृष्टिकोनामुळे हे दस्तऐवजीकरण दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. राजने ते बव्हंशी साधले आहे. जात्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूविषयी लिहिताना मात्र थोडे स्वातंत्र्य घेत त्याने ओव्यांचा उल्लेख केला आहे, जो अपरिहार्य तर होताच, पण समर्पकही आहे. लेखनाची तात्कालिक प्रेरणा असलेल्या नोटाबंदी धोरणाचा उल्लेख हा तात्कालिक म्हणून येतो. केवळ रोखीने व्यवहार होणाऱ्या या बाजारावर मोठा परिणाम घडवणारी ती घटना असल्याने तिची दखल घेणे आवश्यक होतेही. कदाचित त्याच्या परिणामांवर थोडा अधिक भर दिला असता तर या बाजारातील रोकड विनिमयाबद्दलही थोडे विस्ताराने लिहिणे शक्य झाले असते.

या मुशाफिरीतून आणि दस्तऐवजीकरणातून आणखी काही संभाव्य अभ्यासविषय निर्माण होतात. त्यांचाही वेध राजने घ्यावा अशी अपेक्षा करतो. वर म्हटल्याप्रमाणे आठवडी बाजार आणि बिग बझार सारखे रीटेल स्टोअर्स हे दोनही प्रकार ‘एका छत्राखाली सारे काही’ स्वरुपाची विक्री केंद्रे आहेत. पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंतचा प्रवास हा ग्राहक, विक्रेते यांच्या गरजा, आर्थिक स्तर, मानसिकता यांच्या बदलाचा प्रवास आहे तसाच तो गरजेनुसार खरेदीपासून उपलब्धतेनुसार खरेदीपर्यंतच्या बदलांचा प्रवासही आहे. असे विविध पैलू घेऊन या प्रवासाचा वेध घेता येईल. या संक्रमणामध्ये सांस्कृतिक, आर्थिक आणि वर्गीय संक्रमणाचे प्रवाह दिसू शकतील. त्यांचा एकत्रित आणि स्वतंत्रपणे वेध घेणेही रोचक ठरू शकेल.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा