रविवार, ५ जानेवारी, २०२०

वेदांग दहा वर्षांचा आहे...

वेदांग दहा वर्षांचा आहे.

वेदांगचे आईवडील संगणकक्षेत्रात काम करतात. दोघांचे उत्पन्न छाऽन आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्यांचा दीड हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे. सोसायटीमध्ये लॉन आहे, क्लब हाऊस आहे. सोसायटीच्या दाराशी येणार्‍या जाणार्‍याकडे संशयाने पाहणारा दाराशी दरवान... चुकलो सिक्युरिटी मॅनेजर आहे. सोसायटीमध्ये राहणार्‍यांच्या घरी निरोप देता यावा म्हणून त्या सिक्युरिटी मॅनेजरच्या तीन-बाय-तीनच्या ’केबिन’मध्ये इंटरकॉम आहे. त्यावरुन कोणत्याही फ्लॅटमधून दुसर्‍या फ्लॅटमध्ये बोलणे शक्य असले तरी तसा वापर कुणी करत नाही.

प्रत्येकाकडे मोबाईल आहे. वेदांगच्या आईबाबांकडे आयफोन आहे. त्याचे नवे व्हर्शन जूनमध्ये येणार आहे. ’ही बातमी शेअर करताना ’फीलींग एक्सायटेड’ असे स्टेटस वेदांगच्या बाबांनी... चुकलो डॅडनी टाकले आहे. वेदांगची मम्मी अजूनही ’इट वॉज जऽस्ट येष्टरडे’ अशा शीर्षकाखाली वेदांगचे लंगोटातले फोटो शेअर करत असते. खाली न चुकता ’शेअर्ड फ्रॉम माय आयफोन’ अशी तळटीप आलेली असते.

वेदांग राहतो त्या सोसायटीमध्ये दहा इमारती... अम्म्, बिल्डिंग्ज आहेत. त्यातून एकुण एकशेचाळीस कुटुंबे राहतात. सोसायटीमधील निवडक महिलांना बोलावून त्याची मम्मी हळदीकुंकू समारंभ साजरा करते. वर्षातून एकदा न चुकता त्याचे डॅड, 'बाबा' होऊन सत्यनारायण करतात. त्यालाही सोसायटीमधील निवडक लोकांनाच बोलावतात. कद/सोवळे नेसलेला उत्तरीयविहीन फोटो न चुकता अपलोड करुन ’ट्रडिशन नेव्हर गोज आऊट ऑफ फॅशन’ असे शीर्षक देऊन ह्या: ह्या: हसणारी स्मायली टाकतात.

वेदांगच्या शेजारी राहणार्‍यांच्या मुलांशी खेळण्याची वेदांगला बंदी आहे. ’कितीही पैसेवाले झाले म्हणून काय आमची बरोबरी करतील की काय. शेवटी संस्कार महत्वाचे’ अशी डॅड-मॉमची कुजबूज वेदांगने ऐकली आहे.

BoyInCoat
छायाचित्र केवळ प्रातिनिधिक आहे. Dreamstime.com येथून साभार.

वेदांग कुठल्याशा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातो. त्याला घराशी पिकप करायला आणि ड्रॉप करायला बस येते. बस हे वाहन फक्त शाळेच्याच मालकीचे असते असा वेदांगचा समज आहे. डॅडच्या कारमधून जाताना अधेमध्ये तडमडणार्‍या आणि समोरच्या बाजूला ड्याम मराठीमधून कुठलीशी पाटी मिरवणार्‍या गाड्यांना ’बस’ का म्हणतात याचे कोडे त्याला अजून उलगडलेले नाही.

वेदांगच्या शाळेत फक्त उच्च दर्जाचे आणि विशिष्ट समाजगटाचे लोकच शिकतात. वेदांगच्या डॅडने तशी खात्री करून घेऊनच शाळा निवडली आहे. ’इन फ्युचर’ उपयोगात येईल म्हणून घरात इंग्रजीतच संभाषण करण्याची, आणि रविवारी फक्त आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतूनच बोलण्याची वेदांगला सक्ती आहे.

वेदांगने आठव्या वर्षी गीतेचा सोळावा अध्याय आणि नवव्या वर्षी अठरावा अध्याय चोख पाठ केला होता. दोन्हींचा अर्थ त्याच्या संस्कार-शिक्षकांनाही माहित नसल्याने त्यालाही माहित नाही. वेदांगला आठवड्यातून एकदा मॅकडी बर्गर, पंधरा दिवसांतून एकदा पिझ्झा आणि महिन्यातून एकदा इंटरनॅशनल क्विझिन खाण्याची सवय आहे. त्याचे मित्र हल्ली सीसीडीमध्ये ’चिल आऊट’ करत असताना होमवर्क सोबतच आपापल्या ब्याकवर्ड प्यारेंट्सशी डील करण्याचे पॉईंट्स शेअर करत असतात.

वेदांगला आपल्या ग्रॅम्मा आणि ग्रॅम्पा ना भेटायला जायला आवडत नाही. त्यांच्या गावाकडच्या घरी साधे केबल नाही. गावात एकही मल्टिप्लेक्स नाही की पिझ्झा-हट वा सीसीडीही. घरात साधा टीव्ही नाही. चार वेळा ’लीव्ह मी अलोन’ म्हणून स्पष्ट सांगितलं तरी दोघेही पुन्हा पुन्हा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करून त्याला डिस्टर्ब करत राहतात.

वेदांगने एका खणाच्या खोलीत दाटीवाटीने राहणारे कुटुंब कधी पाहिलेले नाही. गावाकडे राहणारे तर सोडाच पण मुंबईसारख्या महानगरातूनही असे असंख्य लोक राहतात याची त्याला कल्पना नाही. अमुक एक गोष्ट हवी म्हटल्यावर ’पुरेसे पैसे नाहीत. बोनस आल्यावर घेऊ’ अशी समजूत घालणारा केविलवाणा बाप वेदांगने पाहिलेला नाही. आई रोजंदारीवर गेलेली असताना रांगत्या भावंडाला सांभाळणारी पाच-सहा वर्षांची ताई वेदांगच्या नजरेस कधी पडलेली नाही. दिवाळीत घाटावर केलेल्या दिव्यांची आरास दुरूनच डोळे विस्फारून पाहणारी, दिवे विझल्यावर त्यांत उरलेले तेल उद्या मिरचीच्या खरड्यासोबत खाण्यासाठी काळजीपूर्वक जमा करत जाणारी फाटक्या कपड्यातील कुणी धुरपदा आपल्याच समाजाचा भाग आहे याची त्याला जाणीव नाही.

वेदांगच्या डॅड-मॉमने अभावाचे जिणे म्हणजे काय याची कल्पना त्याला येऊ दिलेली नाही. पाणी प्यायचे असेल तर वॉटर-फिल्टरचा नळ सोडून ग्लास भरुन घेतो तसे खिशातले पैसे संपले की एटीएममधून काढायचे असतात, दोन्ही नळांना कायम पाणी असतेच असा त्याचा अनुभव आहे.

वेदांग चोख देशभक्त आहे. फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्स अ‍ॅपवर तो सक्रीय देव, देश अन् देशभक्ती साजरी करत असतो. शेजारी राहणार्‍या मुलाचा चेहराही आठवत नसला तरी ती कसर तो सोशल मीडियावर ’हिंदू सारे बंधू’ असे लिहिलेले प्रेरणादायी मेसेज फिरवून भरून काढत असतो. वेदांग ’संस्कृत ही कम्प्युटरसाठी श्रेष्ठ भाषा आहे’ हे सांगणारे इंग्रजी भाषेत लिहिलेले मेसेज न चुकता मित्रांना पाठवत असतो.

वेदांगची शाळा संपल्यावर तो इन्टिग्रेटेड कोर्समध्ये अ‍ॅडमिशन घेणार आहे. तिथून अमेरिकेच्या युएसमध्ये हायर एज्युकेशनसाठी जाण्याचे त्याने नक्की केले आहे. ते संपले की तिथेच सेटल होऊन ’नासा’मध्ये किंवा ’सीआयए’मध्ये काम करण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे. योग्य वयात लग्न करुन, सर्व वेळच्या वेळी व्हावे म्हणून तातडीने दोन मुले जन्माला घालण्याचे त्याने ठरवून टाकले आहे. पत्नी समजूतदार मिळाली तर ’देव देश अन् धर्मापायी’ दोन ऐवजी चार मुले जन्माला घालण्याचा निर्धार त्याने आल्रेडी केलेला आहे.

कुणीतरी मित्राने ती तयार नसेल तर चार मुलांसाठी ’चार जणींशी लग्न कर’ असा केलेला विनोद त्याला भयंकर अपमानकारक वाटला होता. 'आम्ही काय त्यांच्यासारखे आहोत काय’ असे संतापाने विचारत त्याने त्या मित्राला तातडीने अनफ्रेंड केले होते.

आपल्या दोन मुलांची नावे ’आर्य’ आणि ’आर्या’ ठेवण्याचे त्यांने निश्चित केले आहे. वरच्या बोनस दोन मुलांची नावे ’विकास’ आणि ’संस्कृती’ ठेवण्याचेही त्याने योजून ठेवले आहे.

वेदांग दहा वर्षांचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा