रविवार, ५ जानेवारी, २०२०

संग्राम बारा वर्षांचा आहे...

संग्राम बारा वर्षांचा आहे...

संग्रामच्या वडिलांची कार एजन्सी आहे, त्यांच्या मालकीचा एक पेट्रोल-पंप आहे, ते बिल्डर आहेत आणि मुख्य म्हणजे ते समाजसेवक आहेत. ’संग्रामराजे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य विविध क्षेत्रात चालू असते.

संग्राम त्यांना बाबा, डॅड न म्हणता ’दादा’ म्हणतो, कारण आसपासचे सारेच लोक त्यांना दादा म्हणतात. त्यांचा उच्चभ्रू वस्तीमध्ये तीन हजार स्क्वेअर फुटाचा ऐसपैस बंगला आहे. दाराशी दोन एसयूव्ही आणि एक एक्सयूव्ही कार आहे. बंगल्यात दादांचा स्वत:चा बार आहे. आणि दहा बाय दहाचे प्रशस्त देवघरही. दारासमोर पोट खपाटीला गेलेला एक दरवान आहे आणि त्याच्या शेजारी दोन गलेलठ्ठ कुत्रे बांधलेले आहेत.

संग्रामच्या वडिलांच्या गळ्यात पाच तोळ्यांची चेन आणि डाव्या हातात सात तोळ्यांचे सोन्याचे कडे आहे. हाताच्या दहा बोटांपैकी सहा बोटांमध्ये सोन्यामध्ये मढवलेल्या विविध खड्यांच्या अंगठ्या आहेत. गळ्यात एक वाघनखाचे आणि एक साईबाबांचा फोटो असलेले लॉकेट् आहे.

संग्रामचे वडील नेहमी जाकीट कुर्ता नि पायजमा या वेषात असतात. कुर्ता नि पायजमा कायम पांढरा असला तरी भेटायला येणार्‍या पाहुण्यानुसार जाकीटाचा रंग वेगवेगळा असतो. ते खास बनवून घेतलेल्या कोल्हापुरी चपलाच वापरतात, ज्यांची किंमत काही हजारांत आहे असे त्यांचे नोकर नि कार्यकर्ते कौतुकाने सांगत असतात.

संग्रामच्या घरी सत्यनारायण, साईबाबांची जयंती, दादांची श्रद्धा असलेल्या नारायणबाबांचा दरबार, झालंच तर गणेशोत्सव, नवरात्र, जागर, गोंधळ इत्यादि धार्मिक कार्यक्रम यथासांग पार पडत असतात. आणि या दरम्यान घरात मांसाहारी पदार्थांना सक्त मज्जाव असतो. त्यावेळी फ्रीजमध्ये असलेले सारे सामिष पदार्थ फेकून देऊन तो गोमूत्राने पवित्र करुन घेतला जातो.

संग्रामच्या घरात स्वयंपाकाला दोन माणसे आहेत. विधवा आत्येच्या शाकाहारी स्वयंपाकासाठी ब्राह्मण स्वयंपाकीणबाईंची नेमणूक आहे, तर इतरांसाठी अन्न शिजवण्यास स्वतंत्र स्वयंपाकी आहे. कालानुरूप हवे तेव्हा धान्य बाजारात उपलब्ध होत असले, तरी संग्रामच्या घरी आजही वर्षभराचा धान्यसाठा दिवाळीनंतर भरून ठेवण्याची पद्धत आहे. त्यासाठी बंगल्याच्या मागील बाजूस स्वतंत्र कोठीची खोली आहे. त्यामध्ये गावाकडून आलेले धान्य साठवले जाते.

GoldenKid
छायाचित्र केवळ प्रातिनिधिक आहे. indiatoday.in येथून साभार.

संग्रामच्या आजोबांची गावी भरपूर शेती आहे. उसाच्या शेतीच्या शिडीवरुन ते प्रथम सहकारात शिरले, त्यातून कारखान्याच्या राजकारणात आणि अखेरीस झेडपी सदस्य अशी मजल त्यांनी मारली आहे. त्याआधारे चालू केलेल्या सावकारीतून त्यांच्या मालकीच्या जमिनीचा आणि हाताखाली असणार्‍या कार्यकर्त्यांच्या जमावाचा विस्तार वाढत चालला आहे. गावात रावसाहेबांना मोठा मान आहे. गावच्या देवस्थानचे ते मुख्य ट्रस्टी तर आहेतच, पण ग्रामदैवताच्या अग्रपूजेचा मानही त्यांच्याचकडे आहे.

संग्राम या ’मोठ्या दादांच्या’ गावी जाण्यास नेहमी उत्सुक असतो. तिथे रावसाहेबांचा नातू म्हणून गावकर्‍यांकडून मिळणारा मान त्याला हवाहवासा वाटतो. घरच्या नि शेतावरच्या नोकरांवर आजोबांप्रमाणेच डाफरत तो सत्तेची माफक गुर्मी दाखवत असतो. त्यातून त्याचा इगो इवलासा अहंकार पेटून उठतो. गावच्या जत्रेच्या काळात तर तो हमखास गावी जातो आणि आजोबांसोबत मानकरी म्हणून मिरवत असतो. एरवी शहरात असताना घरातील नोकरांवर दाखवतो त्याहून कैकपट रुबाब त्याला या गावातील नोकरांसमोर दाखवता येत असतो.

संग्राम वेदांगच्या शाळेत शिकतो. वेदांगच्या दोन वर्षे पुढे असला तरी दोघांची माफक मैत्री आहे. कधीमधी एकमेकांच्या घरी त्यांचे येणे-जाणे होत असते. वेदांगच्या शेजार्‍यांच्या मुलाशी न खेळण्याचा वेदांगचा निर्णय त्याला एकदम पटतो. ’पायीची वहाण पायी बरी’ असा त्याचाही बाणा आहे. आणि घरी त्याच्या दादांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. वेदांगच्या डॅडची गाडी एकदम ओल्ड फ्याशन्ड आहे असे संग्रामला वाटते. कधीमधी दादांच्या एखाद्या गाडीची किल्ली पळवून तो ती गाडी बंगल्याच्या आवारातल्या आवारात पुढे मागे फिरवत असतो. त्याचे हे प्रताप आईला नापसंत असले तरी ’अरे वाघाचा बच्चा आहे, एका गाडीची काय भीती’ म्हणत दादा त्याला प्रोत्साहन देत असतात. पण दादांच्या हातून चुकून टीपॉयवर राहिलेल्या पाकीटामधील एखादी सिगरेट कमी झालेली दिसली, तर मात्र त्यांचे हे प्रोत्साहन कुठल्याकुठे पळून जाते.

संग्रामचे वडील समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणाचा सोपान चढू पाहात असतात. घरात होणार्‍या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी सलगी ठेवून सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. ’संग्रामराजे प्रतिष्ठान’प्रमाणेच वडिलांच्या नावे उभ्या केलेल्या पतपेढीच्या माध्यमांतून ते सामान्य नागरिकाची सेवा करत आहेत.

संग्रामची आई घरची मालकीण आहे...

संग्रामनेही वेदांगप्रमाणे एका खणाच्या खोलीत दाटीवाटीने राहणारे कुटुंब कधी पाहिलेले नाही. गावाकडे आजोबांकडे गेला तरी भावकीतल्या सधन लोकांखेरीज इतर घरांमध्ये त्याने पाऊल टाकू नये याची खातरजमा रावसाहेबांचे नोकर करुन घेत असतात. धाकल्या धनीसाहेबांना हवे ते मिळावे याची खात्री करुन घेण्याची तंबी त्यांना रावसाहेबांच्या पत्नीने- म्हणजे संग्रामच्या आजीने त्यांना दिलेली असते. घरची सारी सफाई करणार्‍या, प्रसंगी दारु पिऊन वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेली घाण साफ करणार्‍या, वडिलांच्या वयाच्या शिदबाला एकेरी हाक मारतानाच काय पण आई-बहिणीवरुन कचकावून शिवी देताना त्याची जीभ अजिबात कचरत नाही. आपल्या बापाला या बालकासमोर लाचार उभे राहिलेले पाहून घाबरुन गेलेल्या त्याच्या चार वर्षांच्या पोरीच्या डोळ्यातील भीती त्याला एक प्रकारचा आनंद देऊन जाते.

संग्रामही वेदांगप्रमाणेच चोख देशभक्त आहे. फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्स अ‍ॅपवर सक्रीय राहून तो देव, देश अन् देशभक्ती साजरी करत असतो. सोशल मीडियावर तो छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे फोटो, त्यांच्या पुतळ्याच्या पायी उभा असलेले आपले फोटो सदैव अपलोड करत असतो. समाजातील विषमतेबद्दल त्याच्या मनात प्रचंड चीड आहे. आणि तो ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमितपणे व्यक्त करत असतो. या सार्‍याला ब्राह्मिनिकल व्यवस्थाच जबाबदार आहे हे त्याचे- दादांचे ऐकून पक्के झालेले मत आहे. तसे तो शिदबासह अन्य नोकरमंडळींना आणि त्यांच्या ज्ञातिबांधवांना आवर्जून पटवून देत असतो.

संग्रामच्या वडिलांप्रमाणेच त्याच्या तोंडी ’फुले, शाहू आंबेडकरांचे’ नाव सतत येत असते. वडिलांप्रमाणेच बेरजेच्या राजकारणार विश्वास असल्याने तो आपल्या ज्ञातिबांधवांच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावत असतो. वडिलांप्रमाणेच समाजसेवा करुन किंवा करण्यासाठी राजकारणात जाण्याचे त्याने पक्के ठरवले आहे. त्याच्या वाढदिवसाचे आणि सार्वजनिक उत्सवांसारख्या इतर प्रसंगांचे फ्लेक्स त्याच्या भल्यामोठ्या फोटोसह मुख्य रस्त्यावर अधूनमधून झळकत असतात.

संग्रामची शाळा संपल्यावर तो राजकारणाची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थी संघटनांच्या राजकारणात उतरणार आहे. त्यासाठी त्याला कुठल्यातरी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. उपस्थितीचे सक्तीचे झंझट शक्यतो टाळता येईल अशा ठिकाणी प्रवेश घेण्याची त्याची इच्छा आहे, जेणेकरुन समाजकार्यासाठी त्याला पुरेसा मोकळा वेळ मिळू शकेल. कौटुंबिक पातळीवर दादा आणि माई सांगतील त्या मुलीशी लग्न करुन संसारात पडण्याचे झंझट उरकून टाकण्याचे त्याने ठरवून टाकले आहे. तसेही राजकारणात असल्यावर सारा समाजच आपले कुटुंब असते असा दादांचाच उच्च विचार अंगीकारण्याचे त्याने निश्चित केले आहे.

वेदांगप्रमाणेच संग्रामनेही आपल्या दोन मुलांची नावे निश्चित केली आहेत. थोरल्याचे नाव ’विक्रमराजे’ आणि धाकट्याचे नाव ’त्रिविक्रमराजे’ ठेवण्याचे त्याने नक्की केले आहे. मुलगी झाली तर तिचे नाव ’क्रांती’ ठेवण्याचे पक्के केले आहे.

...संग्राम बारा वर्षांचा आहे.

-oOo- 

 संबंधित लेखन:  वेदांग दहा वर्षांचा आहे...


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा