जेमतेम सकाळ. चहा घेऊन डोळ्यातली उरली-सुरली झोप घालवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता नि फोन वाजतो. नंबर अपरिचित. सोशल मीडियाबाहेर संपूर्ण अॅंटि-सोशल असलेल्याने अपरिचित क्रमांकावरुन फोन येण्याची शक्यता जवळजव्ळ शून्य. तेव्हा बहुधा राँग नंबर असावा असे गृहित धरुन अनिच्छेनेच उचलता. बोलणारा नाव नि गाव सांगतो नि आपला तर्क बरोबर ठरणार याची खात्री होऊ लागते. पण बोलणारा अचानक परिचित विषयावर बोलू लागतो नि तुमची झोप ताबडतोब पळून जाते.
फोन करणारी व्यक्ती पंढरपूर जवळच्या एका गावातील शेतमजूर असते, दलित चळवळीत सक्रीय असणारी आणि स्वत: पूर्वी 'लोकमत’सारख्या वृत्तपत्रांतून थोडेफार लेखन केलेली. पण कौटुंबिक कारणाने शहराकडून पुन्हा गावाकडे परतलेली. तुमचा लेख सकाळी वाचून तातडीने फोन करुन तो आवडल्याचे सांगतानाच त्या अनुषंगाने त्यांचे स्वत:चे विचार मांडत जाते.
व्यवस्थेने केलेल्या शोषणाचा अनुभव लहान गावांतून राहणार्या दलित समाजातील व्यक्तीइतका दाहक कुणाचा असणार. पण आपले लेखन जरी अर्थकारणाशी निगडित असले तरी त्याबद्दलची भूमिका ही सामाजिक दमनाबाबतही कशी लागू पडते हे सांगणारी ही व्यक्ती नकळत आपण त्याच्या दृष्टीशी, अनुभवाशी कुठेतरी हलकासा धागा विणून आलो आहोत हे दाखवून देते. संपूर्ण शहरी आणि आता सुखवस्तू आयुष्य जगणारा मी कुठेतरी त्याच्या जाणिवेला स्पर्श करुन गेलो, याचा अर्थ आपण अगदीच असंवेदनशील नाही ही जाणीव सुखावणारी.
पण या स्तुतीसुखाचा भर ओसरल्यावर अचानक अशी जाणीव झाली की, असे वाचल्या-वाचल्या तातडीने सोडा, पण नंतरही एखादे लेखन आवडल्याचे आपण कुणाला कधी कळवले आहे का? उत्तर नकारार्थी आले. म्हणजे एखादा लेख, पुस्तक, गाणे, कविता, चित्रपट, मालिका वा एपिसोड आवडल्याचे गांवभर अनेकांना - कदाचित पुन्हा पुन्हा- सांगत फिरलो असेन, पण मूळ कर्त्याशी संपर्क करुन आवर्जून आपला आनंद वा प्रतिसाद त्याच्यापर्यंत थेट कधी पोचवला होता? एकदाही नाही! फारतर प्रतिसाद लिहून, रिव्यू स्वरुपात कळवला असेल, पण थेट संवाद नाही.
हा माझा अंगचोरपणा म्हणायचा की लेखनातील नेमकेपणा संवादात साधत नाही या अडचणीवर माझ्यातल्या ओसीडीवाल्याने काढलेला मध्यममार्ग? त्यात आता सोशल मीडियाने धुमाकूळ घातल्यावर मूळ लेखक/कर्त्यालाही कळवायची तसदी घेतली जात नाही. सरळ भिंतीवर टाकून दिले की काम झाले. वाचतील काय पाच-पंचवीस लोक वाचायचे तर.
हातात लेखणी घेऊन जगाला शिकवायला निघालेल्या व्यक्तीला सकाळी सकाळी जमिनीवर आणणारा असा अनुभव आवश्यकच असतो. तान्हाजी चित्रपटाचा इतिहासभक्तीचा धुमाकूळ चालू असताना, वर्तमानातील महाराष्ट्राच्या एका लहानशा गावात राहणार्या या तान्हाजीची थेट नाही पण फोनभेट अधिक मोलाची असते.
आरती प्रभूंनी सांगून ठेवले आहे. ’ही निकामी आढ्यता का?, दाद द्या अन् शुद्ध व्हा’. त्यांचे बोल मनावर घ्यायला हवेत.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा