’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

मालवीयांची ’टुकडे टुकडे गॅंग’ आणि जेएनयू

जेएनयू म्हटले मालवीय आणि त्यांच्या टुकडॆ टुकडे गँगची टेप ’देशद्रोही घोषणा’ या दोन शब्दांवर अडकते.


चला मान्य करु की कन्हैया आणि त्याच्या काही साथीदारांनी देशद्रोही घोषणा दिल्या.

चला मान्य करु की जेएनयू मध्ये दरवर्षी असे देशद्रोही विद्यार्थी शिक्षण घेत असतात.


ज्यांना मारहाण झाली त्यातील किती जणांनी या घोषणा दिल्या होत्या असे तुमचे म्हणणे (तुमचे म्हणणे हं, पुरावेदेखील मागत नाही मी.) आहे? जर त्यातील निदान काही जणांनी (माझ्या मते एकानेही नाही, कारण जिथे मालवीय आणि त्यांची टुकडे टुकडे गॅंग बूच बसल्यासारखी अडकली आहे तो प्रसंग भूतकाळातला आहे) तरी नसावी, बरोबर ना? मग त्यांना मारहाण झाली त्याचे काय? आणि शिक्षकांचे काय? त्यांनीही त्या घोषणा दिल्या होत्या? की ’तुझ्या आज्याने माझे पाणी उष्टावले’ म्हणून मी त्याचा पुरा वंश खणावा या मताचा आहे म्हणून सारे विद्यापीठ दोषी ठरते? आणि समजा ठरले तरी त्यावर कायदेशीर कारवाई का करायची नाही? सरकार आणि पोलिस तुमचेच आहेत ना? ते अकार्यक्षम आहेत म्हणायचे आहे का? उद्या पुणॆ विद्यापीठात चार दोन लोकांनी अशा देशद्रोही घोषणा दिल्या म्हणून ते ही उध्वस्त करायचे का?

संशयित (आरोपी नाही, गुन्हेगार असल्याचे सिद्ध होण्याचा प्रश्नही नाही) बलात्कार्‍याला उडवलेल्या पोलिस अधिकार्‍यांचे समर्थन केले तुम्ही. मग हे दोन्ही एकत्र करुन ज्या पक्षात असे संशयितच काय पण आरोपी असणारे आमदार, खासदार आहेत त्या पक्षातील कुणालाही (तो आरोपी वा संशयित असो वा नसो) जेएनयू प्रमाणॆ नुसती मारहाणच नव्हे तर हत्या करणॆही समर्थनीय असेल ना? कुलदीप सेंगर पासून निहालचंद पर्यंतची नावे तुमच्या ओळखीची असतील (इतर पक्षांनाही तोच न्याय लावावा लागेल हे तुम्ही ’तिकडे बघा की’ हा नेहमीचा हर मर्ज की दवा डिफेन्स आणण्याआधीच सहमत म्हणून टाकतो.) तुमच्या न्यायाने या पक्षातील कुणालाही मारहाण नव्हे त्याची हत्या करण्याचा हक्कही मला आहे हे मान्य आहे ना?

चला हे ही मान्य करु की कायदेशीर मार्गाने न्याय मिळणार नाही असे तुमचे म्हणणे आहे. म्हणजे जर कुणाला असे वाटले की कायदेशीर मार्गाने न्याय मिळणार नाही तर त्याने कायदा हातात घेऊन विध्वंस मारहाण करणे योग्य नसले तरी समर्थनीय आहे असे तुमचे म्हणणे आहे? असणारच. पन्नास जणांनी घेरुन मारलेल्या माणसाच्या जिवापेक्षा त्याच्याकडे गोमांस होते की नव्हते यावर मैला मैलाचे समर्थन देणारी अवलाद तुमची.

सगळॆ डावे देशद्रोही आहेत, सगळे जेएनयू डाव्यांनी भरलेले आहे, म्हणून पुरे जेएनयू उध्वस्त करणे योग्य आहे मग भले त्यातील डावे नसलेले, देशद्रोही घोषणा न देणारे बळी पडले तरी बेहत्तर असे तुमचे म्हणणे असेल तर...

...सारी लोकशाही व्यवस्थाच देशद्रोही आहे, म्हणून ती उध्वस्त केली पाहिजे आणि त्यात तिच्याशी निगडित सर्व व्यक्तींना नष्ट करणे आवश्यक मानणारे नक्षलवादीही तुमच्यासारखेच म्हणत आहेत, ते तुमचे भाऊबंद म्हणावे लागतील. तुम्हाला नि त्यांना अभिप्रेत असलेली व्यवस्था वेगळी असली तरी विरोधकांना वाटेल त्या मार्गाने नष्ट केले पाहिजे या मतावर तुमचे त्यांचे एकमत आहे. थोडक्यात अर्बन नक्षल या पदवीला तुम्हीच अधिक लायक आहात.

...एखाद्याच्या मते संघ भाजपचे लोक सतत द्वेष रुजवतात, आमच्या देशात अशांतता माजवतात आणि अमुक एका विद्यापीठात वा बॅंकेत ते बहुसंख्य आहेत म्हणून ते विद्यापीठ, ते कॉलेज अथवा ती बॅंक उध्वस्त करणार असे एखादा कम्युनिस्ट, कॉंग्रेसवाला, सेनावाला, तृणमूलवाला म्हणू लागला तर तुमच्या कृतीप्रमाणेच ते ही समर्थनीय असेल.

मुळात तुमच्या डोक्यात मेंदू आहे की शेण भरले आहे? अगदी चार-दोन देशद्रोही असले तरी पुरे विद्यापीठ देशद्रोही, करा उध्वस्त म्हणताना अक्कल कुठे गहाण टाकलेली असते? माणसे आहात की टोळीने शिकार करणारे कुत्रे? आमच्या बाजूचा नसलेल्याला काही करुन नष्ट करणे समर्थनीय मानणारे. बेअक्कल माणसांनो विद्यापीठे ही भावी पिढीच्या उन्नतीची स्थाने असतात. आपल्या बाजूची नाहीत म्हणून ती उध्वस्त करा म्हणणार्‍या तुमच्यात आणि तुम्ही ज्यांचा द्वेष करता त्या मुस्लिम आक्रमकांत काय फरक आहे? ते ही काफीर स्थान म्हणून न पटणारे उध्वस्त करत नेतात. ते दहशतवादी तसेच तुम्हीही. आणि आपल्या समाजाला कह्यात ठेवण्यासाठी ते ही शिक्षणांपासून सामान्यांना दूर ठेवून विचारांचे इंद्रिय छाटून सर्वांना त्यांच्या तंत्रावर चालणारे गुलाम बनवू पाहतात. तुम्हीही तुमच्या मताच्या विरोधातील सारे काही खुडून फक्त तुमचेच विचार(?) शिल्लक राहतील यासाठी हिंसेचा, हत्येचा पर्यायही समर्थनीय मानतात.(तुमचे आदर्श सावरकर बलात्काराचेही एक हत्यार म्हणून समर्थन करतात.) थोडक्यात तुमचे राजकारण सूडाचे आहे, 'ते' करतात ते सर्व आमच्या बाबतही समर्थनीय माना असा तुमचा आग्रह आहे. तो आम्ही या ठिकाणी मान्य करुन तुम्ही तंतोतंत मुस्लिम आक्रमकांची कॉपी आहात असे सर्टिफिकेट देत आहोत. कृपया स्वीकार व्हावा.

कसला बोडख्याचा देशद्रोह? कुण्या चार दोन माणसांनी दोन घोषणा - समजा!- दिल्या की माणूस देशाचा द्रोह होतो? अरे आमचा देश काय इतका तकलादू आहे का की दोन पोराटोरांनी असल्या घोषणा दिल्या म्हणून लगेच डळमळीत व्हायला. अरे ब्रिटिशांचे हस्तक असणार्‍यांनाही माफ करुन त्यांना मुख्य धारेत येऊ देण्याइतका सहिष्णु देश आहे. शक, हुणांपासून मुघलांपर्यंत सार्‍यांचे आक्रमण पचवून तो उभा आहे. उगा कुणीतरी काहीतरी घोषणा दिल्या म्हणून वा कुठलासा झेंडा फडकावला म्हणून त्याची कोणतीही वीट ढिली होणार नाही. तुमच्यासारख्या उंदरांनी पाया खणला तर मात्र खात्री देता येणार नाही. कधी तरी घडलेल्या एका प्रसंगाचे एक स्वयंघोषित व्हर्शन घेऊन वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांचा द्वेष करणारे, त्यांच्या विद्यापीठाचा द्वेष करणारे तुम्ही काय लायकीचे आहात?

जे एनयू सतत उत्तम शिक्षणाबद्दल अव्वल श्रेणी मिळवत आले आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या किंवा कोणत्याशा उत्खननात सापडलेल्या एन्टायर पोलिटिकल सायन्सच्या डिग्रीधार्‍यांना आजवर त्या तोडीचे विद्यापीठ का उभे करता आलेले नाही. वर्षानुवर्षे संघ देशाच्या कानाकोपर्‍यात काम करतो असे ऐकतो. शंभर वर्षांत असे एकही विद्यापीठ का उभे करु शकला नाही तो? (आमच्या पुण्यात इतरांनी उभारलेल्या, कष्ट करुन वाढवलेल्या शिक्षणसंस्था मात्र आयत्या ताब्यात घेतल्या. नेत्यांपासून शिक्षण, संस्थांपर्यंत दुसर्‍याचे ताट आयते ओढून घेणे हे व्यवच्छेदक लक्षणच त्यांचे.) पुतळे उभारण्याच्या पैशाचे गणित समजावणारे तेच पैसे वापरुन वैदिक ज्ञानावर आधारिक शिक्षण देणारे एक विद्यापीठ उभारा' असे का म्हणत नाहीत? परकीय तंत्रज्ञानाच्या बुलेट ट्रेन वर खर्चण्याऐवजी तोच पैसा वापरुन व्हॉट्स अ‍ॅपवर नुसतेच फिरवले जाणारे ’संस्कृत कम्प्युटरला सर्वात बेष्ट भाषा’ किंवा ’आमच्याकडे विमाने होती’ वगैरे दावे प्रत्यक्षात का आणत नाही? जे पाश्चात्यांनी अद्याप लावले नाहीत असा एखादा वैदिक शोध प्रत्यक्षात आणून आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी हा पैसा खर्च करावा असा आग्रह निदान शिक्षित भक्त का धरत नाहीत? सीएए, एनआरसी चे आर्थिक गणित मी मांडल्यावर तो पैसा कसा उभा करता येईल याचा आटापिटा करणार्‍यांना, ’अरे पण इतका पैसा वापरुन प्राचीन भारतीय ज्ञानाचा प्रचार-प्रसार-प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठांची साखळी निर्माण करता येईल की’ असा शहाणपणा का सुचत नाही? मूर्खासारखे ’आम्ही ते ही करु’ म्हणताना तो येणार कुठून येणार याचा विचार का करत नाहीत? शिक्षणापासून इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत सर्वत्र तुटवडा असलेला, आणि नेहरु-कॉंग्रेसने उभ्या केलेल्या कंपन्या विकून उभा करावा लागत असताना, या गोष्टींना लागणारा पैसा कोण तुमचे तीर्थरुप देणार का? तुमचे सारे पर्याय पुतळ्यांसारखे वांझ, एनआरसी-सीएए सारखे द्वेषमूलक किंवा जेएनयू प्रकरणासारखे विध्वंसक का असतात? रचनात्मक कार्याचे प्रबळ उदाहरण का देता येत नाही?

बसला आहात ती खुर्ची क्षणभर सोडा. दूर उभे राहा नि त्या खुर्चीकडे पाहा. आपण एका व्यक्तीसाठी गेल्या सहा वर्षांत कशा कशाचे समर्थन करत आलो आहोत याकडे पाहण्यासाठी त्या खुर्चीकडे पाहा. आपल्यातले किती माणूसपण आपण खर्ची घातले याचा अदमास घ्यायचा प्रयत्न करा. बरं ती किंमत ज्याच्यासाठी मोजली त्याच्याकडेही पाहा. ताळेबंद नफ्याच्या दिसतो की तुटीचा याचा विचार स्वत:शीच एकदा करुन पाहा. माणूस म्हणून जगायचे की नवनवे शत्रू निर्माण करत टोळीने शिकार करत राहायचे याचा निर्णय लवकर घ्या. सध्या आपली टोळी मोठी म्हणजे आपण सेफ आहोत असा विचार करत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात. सीएए प्रकरण दाराशी आल्यावर शहाणपण आलेल्या, इतके दिवस अक्षरश: मोदींच्या दारचा बुलडॉगची भूमिका वठवणार्‍या अर्णब गोस्वामीकडे पाहा. आजच अंजना ओम कश्यपने सीएए आणि एनआरसी हे कॉम्बिनेशन धोकादायक असल्याचे केलेले विधान पाहा. तुम्हीही त्यांच्याप्रमाणेच द्वेषाचा गाडा तुमच्या दारात, घरात येईपर्यंत वाट पाहणार आहात का? आणि तसे असेल तर त्याक्षणी आपण कुणाचे साहाय्य मागू शकतो याचा अदमास घेऊन ठेवा. कदाचित एका व्यक्तिचे माथेफिरु समर्थन करता करता तुम्ही जवळचे अनेक लोक गमावलेले असतील, तुमच्या आसपास कुणी उरलेले नसेल.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा