रविवार, १७ जानेवारी, २०२१

चर्चा अजून संपलेली नाही...

  • चार वर्षांपूर्वी अमेरिकन सत्तांतराच्या वेळी लिहिलेली फेसबुकवर लिहिलेली पोस्ट. या आठवड्यात ट्रम्प पाय उतार होऊन बायडेन सत्तारुढ होत असताना पुन्हा एकवार वाचू.
    ---

    पोस्ट:
    या महिनाअखेर डेमोक्रॅटिक पार्टीचे ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन रिपब्लिकन ट्रम्प अधिकारारूढ होणार आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षातील ओबामांच्या कार्याचा लेखाजोखा आणि ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा याबाबत भारतीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्याबाबत आपणही आपली मते तपासून पाहू.

    FacebookFights

    प्रतिसाद १: मि. ओबामा आणि मि. ट्रम्प असे न लिहिता तुम्ही नुसतीच नावे लिहून आपला असंस्कृतपणा दाखवला आहे. ते दोघे काय तुमचे लंगोटीयार आहेत का?

    प्रतिसाद २: दोघांच्या पक्षांची नावे लिहून तुम्ही नक्की काय सुचवत आहात.

    प्रतिसाद ३: आपल्या देशातील घडामोडींबाबत काडीचा अभ्यास नाही आणि चालले अमेरिकेचा अभ्यास करायला.

    प्रतिसाद ४. कुठलीही पोस्ट न चुकता मोदींकडे वळवून त्यांच्यावर टीका करायची तुम्हाला सवयच आहे.

    प्रतिसाद ५/६/७: (एकाच व्यक्तीने हे तीन प्रतिसाद देऊन त्यात तीन वेगवेगळ्या इमोजी ऊर्फ भावचित्रे चिकटवली आहेत. कुठली तो तपशील फारसा महत्त्वाचा नाही.)

    प्रतिसाद ८: हे सारं आजच का आठवलं?

    प्रतिसाद ९: अमेरिकेला ट्रम्पसारखाच अध्यक्ष मिळायला हवा. तीच त्यांची लायकी आहे.

    प्रतिसाद १०: आपल्या कारकीर्दीत त्या ओबामाने २ मिलियन का कितीतरी बॉम्ब टाकले म्हणे, त्याच्या जाण्याची कसली खंत करता.

    उपप्रतिसादः २ बिलियन हो. (सोबत लिंक.)

    प्रतिसाद ११: ट्रम्पच हवा अमेरिकेला तो पुतीनला बरोबर वठणीवर आणेल. वरवर मैत्री दाखवत असला तरी तो मनातून कट्टर रशिया आणि चीन विरोधी आहे.

    उपप्रतिसादः तुमच्या कानात सांगितलं वाटतं येऊन. (भावचित्र)

    प्रतिसाद १२: स्वतंत्र विदर्भ ही काळाची गरज आहे.

    उपप्रतिसादः खरंतर मा.गो. म्हणाले तशी चार राज्यं करायला हवीत.

    प्रतिसाद १३: तिकडे झारखंडमधे खाण खचून कित्येक लोक मेले ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही.

    प्रतिसाद १४: बरोबर आहे, तो ओबामा काळा ना; तुम्ही आता खराखोटा डेटा जमवून त्याची कारकीर्द कशी सामान्य होती हे सिद्ध करणार असाल.

    प्रतिसाद १५: अमेरिकेचा अध्यक्ष कोण होतो हे महत्त्वाचे नाही, पुढचे दशक भारताचे असेल.

    प्रतिसाद १६: ट्रम्प हा नासाने ट्रायल घेण्यासाठी अध्यक्ष बनवलेला रोबो(ट) आहे. एक रोबोदेखील अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकतो (इतके आमचे प्रशासन काटेकोरपणे बांधले आहे) अशी पैज सीआयएवाल्यांनी पुतीन यांच्याशी लावली होती. त्यानुसारच हे चालू आहे.

    उपप्रतिसादः आपल्या देशात प्राचीन काळातच रोबोंचा शोध लागला होता.

    उपप्रतिसाद २: आमच्याकडे एक रोबो आधीच पंतप्रधान आहे. खी: खी: खी:

    उपप्रतिसाद ३: पप्पू अजून पंतप्रधान झालेला नाही, कधी होणारही नाही. स्वप्न बघू नका. हॅ हॅ हॅ.

    प्रतिसाद १७: अमेरिकेची भलामण करताना तिथे अजूनही एखादा (रेड) इंडियन अध्यक्ष झालेला नाही हे विसरू नका.

    उपप्रतिसाद : तिथे साधा इंडियनही अध्यक्ष झालेला नाही मि. एनाराय.

    उपप्रतिसादः त्याचा इथे काय संबंध?

    उपप्रतिसाद २: (भावचित्रे ).

    प्रतिसाद १८: गुड मॉर्निंग सर. (भावचित्रे )

    प्रतिसाद १९: भलत्या ठिकाणी गुड मॉर्निंग करणारा हा येडाय का?

    ...

    (चर्चा अजून संपलेली नाही... )

    - oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा