आयुर्वेद ही स्वदेशी चिकित्सापद्धती आहे या एकाच मुद्द्याला धरून, तिला राष्ट्रप्रेमाशी जोडून घेऊन आणि ’त्यातील औषधांचे साईड इफेक्ट्स नसतात’ या भंपक दाव्याची पुंगी सदोदित वाजवत अनेक तथाकथित औषधे आयुर्वेदिक - खरंतर आयुर्वेदिय म्हणायला हवे- आहेत असा दावा करत खपवली जातात.
ज्यांची ना कुठली क्लिनिकल ट्रायल होते ना कुठला अभ्यास. पुन्हा काही साईड इफेक्ट्स दिसून आलेच तर ’हे आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट्स नसतात. तुमचे ते त्रास दुसर्याच कशामुळे झाले असणार’ असे म्हणत हात वर करता येतात. अलीकडे राष्ट्रभक्तीच्या पेहरावात नटून थटून वावरणारी आयुर्वेदाची ही नवी ब्रँच आरोग्याशी - अर्थात अडाणी रुग्णांच्या - खेळत असते.
एका क्लिनिकल ट्रायलला किती काळ लागतो, किती पैसा लागतो किती अद्ययावत यंत्रणा लागते याची कणभरदेखील कल्पना आपल्याला नसते. प्रथम एखादे संयुग हे औषध म्हणून तपासण्यासाठी त्याच्या भौतिक-रासायनिक गुणांआधारे प्रस्ताव उभा करावा लागतो, त्यातून मग प्राण्यांवरचे प्रयोग, मग घातक परिणाम तपासण्याचा टप्पा, त्यानंतर धडधाकट स्वयंसेवकांवरचे प्रयोग, त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोग - जो दीर्घकाळ उपचाराचा असतो- काल औषध दिले नि आज बरे वाटले असे नसते, ज्यातून ते औषध म्हणून सिद्ध होते.
या प्रयोगात मग लैंगिक विभागणी, वांशिक विभागणी, वयोगट, जगण्याचे आणखी काही संभाव्य आयाम आणि मुख्य म्हणजे पेशंटच्या अन्य आजारांची व औषधोपचारांची स्थिती (उदा. दमा असलेल्या पेशंटला ब्रुफेन देता येत नाही.) इ. ना सोबत घ्यावे लागते. त्यानंतर औषधाचे स्वरुप (पिल, कॅप्सूल, इन्जेक्शन डोस इ.) निश्चित करावे लागते . त्यानंतर परिणामकारक डोस निश्चित करावे लागतात. या सार्या प्रक्रियेबाबत लिहायचे तर एक लेखमालाच लिहावी लागेल.
थोडक्यात सांगायचे तर हा दीर्घकाळ चालणारा नि खर्चिक प्रयोग असतो. शिवाय सारेच प्रयोग यशस्वी ठरतात असे नाही. एक ढोबळ अनुमान आहे की ४०० संयुगे तपासत गेल्यास एक औषध पदरी पडते (हे प्रमाण वाढवण्यासाठी विविध प्रयत्न चालू असतात) तेव्हा ३९९ संयुगे विविध टप्प्यांवर बाद झालेली असतात. यामुळे खर्च भागिले विक्रीयोग्य वस्तू संख्या बरोबर किंमत हे अडाणी गणित चुकीचे असते. उरलेल्या ३९९ वरचा खर्चही या एकाने भागवायचा असतो. 'घेतले काहीतरी, केला काहीतरी प्रयोग नि झाले औषध' हा बाष्कळपणा असतो. हा प्रकार आजारी व्यक्तीच्या जिवावर बेतणारा असू शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ट्रायल्स उत्पादक स्वत: करत नाहीत, त्या अन्य तटस्थ संस्थेने करायच्या असतात. (उत्पादकानेच केल्या तर चारशेपैकी साडेतीनशेच्या आसपास औषधे तयार होतील हे वेगळे सांगायला नकोच.) आणि त्याहून महत्वाचे म्हणजे या औषधांसंबंधी - साईड इफेक्ट्ससह - सर्व तपशील सर्वसामान्यांना पाहता याव्यात यासाठी ’पब्लिक डोमेन’ मध्ये असतात... कुठल्याशा अगम्य भाषेत लिहिलेल्या ग्रंथात असून फक्त त्या धर्माचा ’प्रेषित’च तो वाचू शकेल अशी स्थिती नसते.
गंमत म्हणजे इतक्या काटेकोर प्रयोगातून तयार झालेल्या मॉडर्न मेडिसीनमधील औषधाबाबत साशंक असणारे केवळ ’हे औषध आयुर्वेदिक आहे’ या एका दाव्यावर काय वाटेल ते ’पोटात घ्यायला’ तयार असतात, हा विनोद मला नेहमीच त्रास देतो.
ते औषध आयुर्वेदिक असेल तर तुम्ही म्हणता तसे खरोखर ग्रेट नि साईड इफेक्ट्स नसलेले आहे हे क्षणभर मान्य करु या. पण मुळात हे खरोखरच आयुर्वेदिक आहे म्हणजे काय, तसे जाहीर करण्याचे निकष कुठले? बाजारातील अन्य औषधांना जोडलेल्या ’केमिकल’ या घाबरवून टाकणार्या शब्दावर रामदेवबाबा तुम्हाला आयुर्वेदिक या नावाखाली जे विकतो ते डोळे झाकून तुम्ही विकत घेता ते कोणत्या अर्थाने आयुर्वेदिक असते?
झाडपाल्यापासून बनवलेले कोणतेही औषध आयुर्वेदिक म्हणायचे का? तसे असेल तर प्राण्यांपासून बनवलेल्या (हो, शाकाहाराच्या बाताड्यांनो काही प्राचीन आयुर्वेदिक औषधेही प्राणिजन्य असतात, तुमच्या परिचित आयुर्वेदिक वैद्याला खासगीत विचारून पहा) औषधांचे काय? आणि केवळ नैसर्गिक घटकांपासून बनवलेले ते आयुर्वेदिक असेल तर मग मॉडर्न मेडिसीन मधील औषधेही या ना त्या प्रकारे नैसर्गिक घटकांपासूनच बनलेली असतात ना? कृत्रिम औषधांचे मूल-घटक शेवटी नैसर्गिकच असतात.
शिवाय नियंत्रित माध्यमांत उत्पादन केलेले औषध अधिक नेमके असेल, की कुण्या नैसर्गिक स्रोतातून पर्यावरणीय घटकांच्या परिणामासह आलेले? बेटामेथासोन हे प्रत्येक गोळीमध्ये बेटामेथासोनच असणार नि नेमक्या पोटन्सीचेही. याउलट सातपुड्याच्या जंगलातून आणलेली नि निलगिरीच्या जंगलातून आणलेली दोन वर्षे किंवा दहा वर्षे वयाच्या झाडापासून मिळवलेली लेंडी पिंपळी शंभर टक्के एकाच गुणधर्माची आहे, तितक्याच तीव्रतेची आहे याची खात्री देता येईल?
मुळात प्रत्येक उपचारपद्धती - माणसासारखेच- ही आपापले गुणदोष घेऊन येते, तिच्यासकट तिचा वापर व्हायला हवा. आयुर्वेदिय औषधांना अनेक वर्षांच्या ’अनुभवांचा, परिणाम-मागोव्या’चा (empirical evidence) आधार असतो/ असावा. तर अर्वाचीन औषधांना अधिक नियंत्रित नि काटेकोर संशोधन नि उत्पादन यांचा. यासाठीच प्रशिक्षित वैद्य वा डॉक्टर असतात. निव्वळ औषध तयार आहे म्हणजे कोणीही घ्यावे असे नसते. ते अमुक एका रोग्याला द्यावे की नाही, दिल्यास किती द्यावे याचा निर्णय त्या प्रशिक्षितांनी घ्यायचा असतो. ’तो अमका डॉक्टर मूर्ख आहे, पैसेखाऊ आहे’ वगैरे दावे समजा खरे असले तरीही उपचारांबाबत त्यालाच तुमच्याहून अधिक अक्कल असते.
या तथाकथित औषधाच्या जाहिराती डिश टीव्हीच्या बेस चॅनेलवर जोरात चालू आहेत. जे मुळात औषध आहे की नाही याचाच पुरेसा पुरावा नाही, त्याचा जोरदार पुरस्कार चालू आहे. गंमत म्हणजे भारतात जाहिरातीस परवानगी असलेल्या मोजक्या ’ऑफ-द-शेल्फ’ औषधांत प्रामुख्याने बाह्योपचारांची - मलम, बाम आदि - औषधे असतात. अन्य औषधांना अशी जाहिरात करण्यास परवानगी नसते. त्याचे कारणच हे की ती केवळ प्रशिक्षितांच्या शिफारसीनेच घ्यायची असतात. असे असून मधुमेहासारख्या ’अनेक आजारांचे उगमस्थान’ मानल्या गेलेल्या औषधाची केवळ खुली विक्रीच नव्हे तर अशी जाहिरातही होते आहे हे अतिशय धोकादायक नि नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे.
तसे पाहिले तर बाजारात अनधिकृत अशी आयुर्वेदिक म्हणवणारी औषधे उपलब्ध असतातच (उदा. दक्षिणेतले दम्यावरचे हुकमी असा दावा केले जाणारे, माशाच्या पोटातून घेण्याचे औषध.) मग आताच का विरोध असा नेहमीचा प्रतिवाद येईल. पण मुद्दा असा आहे की ते औषध प्रमाणित नाही हे जगजाहीर असते. इथे ही औषधे ’सीएसआयआर’ नि आयुष प्रमाणित ’खूप संशोधन करुन नि पैसे खर्च करुन तयार केल्याचा’ दावा केला जातो आहे. एक प्रकारे सरकारी अधिकृततेची मोहोर त्यावर मारलेली आहे. आणि हे अधिक गंभीर आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'सीएसआयआर' (CSIR) ही संशोधकांना आर्थिक रसद देणारी संस्था आहे. ’वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद’ या तिच्या नावातच तिच्या कामाची व्याप्ती स्पष्ट आहे. ती औषधे प्रमाणित करीत नाही, तिला तो अधिकार नाही. त्यासाठी अमेरिकेच्या FDAच्या धर्तीवर 'केंद्रीय औषध प्रमाणीकरण संस्था (CDSCO)' असते. )
सुज्ञ नि विचाराने वागू इच्छिणार्यांसाठी हा खटाटोप. बाकी सुई नि सर्जरीला घाबरून ’तथाकथित’ परंपरागत औषधी वा साबुदाण्याच्या गोड गोळ्यांच्या तथाकथित परिणामकारकतेबाबत निश्चिंत राहून स्वत:च्या आरोग्याशी खेळ करणार्यांना शुभेच्छा.
- oOo -
'आयुष’च्या नि 'सीएसआयआर'च्या हवाल्याने जोरदार जाहिराती करुन विकल्या जाणार्या मधुमेहाच्या औषधांचा अल्ट्न्यूज.कॉम ने केलेला पंचनामा: https://www.altnews.in/bgr-34-ime-9-drugs-safe-effective-diabetes/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा