जर्मनीत अठराव्या शतकात जन्मलेला सॅम्युअल हनिमान भारतीय वंशातला होता. हनिमान हे त्याचे कुलनाम ’हनुमान’ याचे जर्मन रूप. हा रामायणकालीन हनुमानाचा वंशज होता. आफ्रिकेत जसे प्रत्येक वंशाचे जमातीचे एक झाड असते, नि तो वंश त्या झाडाच्या नावे ओळखला जातो तसे भारतात मूळ पुरुषाच्या नावाने हे तर जगजाहीर आहेच. (त्यातून पुढे गोत्र संकल्पना आली.)
खरा इतिहास हा की हनुमान हा वन्यज होता, पण तो वानर नव्हता. हिंदू नि हिंदुस्तानद्वेष्ट्या पाश्चात्त्य लोकांनी रामायणात प्रक्षेप करुन तसे लिहिले नि त्याचे महत्व कमी केले. पण हे करतानाच त्याचे कार्य, त्याचे ग्रंथ चोरुन नेऊन त्यातील ज्ञान, शोध, माहिती आपल्या नावावर खपवली.
दुसरा एक ’खरा इतिहास’ असा आहे की वैदिकांनी आपल्या रामाचे महत्व वाढवण्यासाठी द्रविड वंशीय, मूलनिवासी हनुमानाला वानर बनवले, आणि त्याला केवळ रामाचा दुय्यम सहकारी बनवून टाकले. राम-रावण युद्धाचे वेळी त्याने आपल्या वनौषधीवर आधारित उपचारपद्धतीचा वापर करुन, आदले दिवशी रणात जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमा एका रात्रीत भरुन, दुसर्या दिवशी दुप्पट ताकदीने रणात उतरतील याची सोय केली होती. रावणाच्या पार्टीत असा धन्वंतरी नसल्याने हळूहळू त्याचे पारडे हलके होत गेले हा खरा इतिहास आहे.
तिसरा ’खरा इतिहास’ असा आहे की तो खरंतर वैदिक ऋषीच होता. पण त्याने चार वेद दुय्यम असून आयुर्वेद हाच वेद सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादन करायला सुरुवात केली. त्यामुळे चिडून जाऊन अन्य वैदिकांनी त्याला वेदद्रोही, कलीचा अवतार ठरवून त्याला नि त्याच्या वंशाला जातिबहिष्कृत केले. म्हणूनच पुढे त्याच्या वंशाला जर्मनीत परागंदा व्हावे लागले. पण तिकडे जाऊन त्यांनी आर्यवंशाची मुहूर्तमेढ रोवली, जी अलिकडे भरतभूच्या काही वंशजांना मूळ वंशापेक्षा अधिक शुद्ध नि आदर्श वाटत असते.
चौथा ’खरा इतिहास’ असा आहे की तो खरंतर वैदिक ऋषीच होता. एक दावा असा आहे की बृहस्पतीने जसे राक्षसांमध्ये मिसळून बुद्धिभेद करणारे लोकायत अथवा चार्वाक तत्त्वज्ञान सांगितले; जेणेकरुन त्यांचे बळ खच्ची होऊन देवांना राक्षसांवर विजय मिळवणे सोपे झाले. तीच भूमिका हनुमानाने रोगोपचार पद्धतीबाबत स्वीकारली होती. वन्य जमातींत राहून त्यांचा विश्वास संपादन करुन दुय्यम उपचार पद्धतीचा वापर करुन त्यांना शारीरिकदृष्ट्या दुबळे करत नेले नि बुद्धिभेदातून आपल्या जमातीला अनुकूल करुन घेतले. (आठवा: लंकेच्या युद्धात रामाच्या बाजूने लढलेले सुग्रीव, अंगद, नल, नीलादि ’वानर’) हीच दुय्यम उपचारपद्धती वनातून परागंदा झालेल्या काही वन्यजांनी आपल्यासोबत जर्मनीमध्ये नेली. मूळचा, अस्सल आयुर्वेद मात्र भारतातच शिल्लक राहिला.
पाचवा ’खरा इतिहास’ हा की हनुमान हा मूळ जर्मनवंशीयच होता. पण त्या कुळातील एका पुरुषाने जपानी स्त्रीच्या प्रेमात पडून विवाह केला. दोनही देशांतील धर्मसंसदांनी त्या युगुलाला जातिद्रोहाबद्दल देहान्त सुनावला. पण ते जोडपे तिथून निसटले नि मध्य भारतातील वनात लपून राहिले. जर्मनी-जपान-भारत एवढ्या मोठ्या पल्ल्याचा प्रवास केला म्हणून वेगवान प्रगती, प्रवास वा तर्काच्या कार्यकारणभावविहीन विस्ताराला हनुमान-उडी म्हटले जाऊ लागले. (त्याचा लंका ते द्रोणागिरी प्रवासाशी काही संबंध नाही. ती केवळ एक दंतकथा आहे.) जर्मन हे पुरुषसत्ताक असल्याने त्यांच्या वंशजांना पैतृक घराण्याकडून हनिमान हे कुलनाम, तर जपानी हे मातृसत्ताक असल्याने मातुल कुलाकडून मारुती हे कुलनाम मिळाले. हा मूळपुरुष आपल्यासोबत जे वैद्यकीय ज्ञान घेऊन आला त्याच्या आधारे त्याने वन्य जमातींमध्ये मुख्य वैद्य ही भूमिका स्वीकारली नि पुढे - भारतीय प्रथेप्रमाणे - हे त्यांचे वंशपरंपराग काम होऊन बसले.
ही उपचार पद्धती भारतीय ज्ञानपरंपरेनुसार बापाकडून मुलाकडे अशा मौखिक परंपरेने पुढे जात राहिली. पण सॅम्युअलला मुलगा नसल्याने ही ज्ञानधार कुंठित होईल अशी भीती त्याला वाटली. मुलीला वारस न मानण्याच्या भारतीय वृत्तीमुळे ते ज्ञान तिला देण्याऐवजी ते ग्रथित करुन सर्व जगासाठी त्याने ते ज्ञानभांडार खुले केले. आणि केवळ होमो सेपिअन्स अर्थात दोन पायावर चालणार्या वानरासाठीच असल्याने तिला 'होमिओपॅथी' असे नाव दिले.
अशा तर्हेने हनिमान हा हनुमानकुलोत्पन्न असल्याने, 'त्याने निर्माण केली' असा दावा असलेली होमिओपॅथी नामे उपचारपद्धती भारतातूनच तिथे गेलेली आहे हे सिद्ध होते. जी चौथ्या खर्या इतिहासानुसार स्थानिक आयुर्वेदाहून दुय्यम आहे हे ही सिद्ध होते. (तो पाचवा खरा इतिहास हे स्थानिक कम्युनिस्ट इतिहासकारांचे षडयंत्र आहे हे आता सर्वमान्य झाले आहे.)
- oOo -
श्रेय:
सदर संशोधनास वर्ल्ड बॅंक, युरपिय बॅंक, खरा भारत निर्माण अभियान, फूलनिवासी भारतीय, हवाई भारतीय, वैद्यवादिनी शिक्षणोत्तेजक सभा, वेदभूगोल मंडळ, ब्रह्मावर्त मुक्ती समाज आदि संस्थांनी अर्थसाहाय्य केले आहे. नासा नि युनेस्कोच्या प्रत्येकी तीन वेगळ्या समित्यांनी सदर संशोधन अनेक वर्षे पुन्हा पुन्हा तपासून चुका काढण्याचा प्रयत्न करूनही न जमल्याने अखेर ’बरोबर आहे’ असा कबुलीजबाब दिला आहे. भारताच्या आयुष मंत्रालयाने या संशोधनाबद्दल ’आम्ही हेच म्हणत होतो’ अशी ट्विटू प्रतिक्रिया दिली आहे नि आम्हांस 'भारतरत्न’हून वरचा 'भारत-कोहिनूर' असा नवा पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस केली आहे.
(संशोधनाच्या पुढील टप्प्यात ’बाराक्षार पद्धती, युनानी पद्धती यांचे भारतीय मूळ’ याविषयावर संशोधन होत आहे. याला देखील वरील सर्व संस्थांसह रुसी मुक्ति ब्रिगेड, क्रायमिया क्रायसिस सेंटर, माओरी हितकारिणी सभा, बुशमेन ब्रिगेड, आयडॅहो एकीकरण समिती आदि संस्थांचे पाठबळ लाभणार आहे.)
---
(’अ.भा. छद्मविज्ञान काँग्रेस’च्या सहा हजार आठशेव्या वार्षिक अधिवेशनात सादर केलेला शोधनिबंध)
*टीप: संशोधकांने जरी हे शीर्षक दिले असले तरी काही वाचक मात्र ’क्रोधे उत्पाटिला बळे’ म्हणतील अशी दाट शंका आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा