---
फेसबुकवर सचिन डांगे यांनी केलेली पोस्ट:
दहा वर्षांपूर्वी फ्रीज विकत घ्यायला एका इलेक्ट्रोनिकच्या दुकानात गेलो होतो. काहीतरी 5-स्टार असणारा फ्रीज पसंत केला आणि पैसे देऊन विकत घेतला. पण त्या दुकानदाराने घरी पाठवलेला फ्रीज 4-स्टार चा होता... तडक दुकान गाठले, त्याला पावती दाखवली आणि तक्रार केली तर वस्तू घेईपर्यंत जी-हुजुरी करून गोडगोड बोलणारा दुकानदार आता नीट वागत नव्हता. झालेली चूक मान्यही केली नाही.. 5-स्टार वाला फ्रीज नव्हता म्हणून 4वाला पाठवला, त्याला काय होतेय..इत्यादी.. त्याची किंमत पाचशे रुपये कमी होती, तेवढे परत दिले. वागणूक अशी की जसा मी त्या दुकानात हजर आहे की नाही.. फ्रीज घेतला, डिलिवरी झाली आणि हम आपके है कौन...
अशा प्रकारचे अनुभव भरपूर लोकांनी घेतले असतील...
डिलिवरी झाल्यावर काही प्रॉब्लेम आला तर थेट उत्पादक कंपनीला फोन लावा, आता तुम्ही कंपनीच्या भरोशावर, दुकानदाराचा काही संबंध नाही. अशा व्यवस्थेत जर दुकानदार मला काहीच value addition देत नसेल तर कशाला दुकानदाराचा विचार करावा? तेच सर्व कमी पैशात होत असेल तर online बरे आहे की..
आज असे काकुळतीला आलेले भावूक विनवणीचे बोर्ड बहुतांश त्याच इलेक्ट्रोनिक दुकानांमधून लागले आहेत... बाकी किरकोळ दुकानदारांना online shopping चा फारसा काही फरक पडलेला नाही ... खूप छळले आहे सामान्य ग्राहकांना ह्या इलेक्ट्रोनिक वाल्यांनी मागच्या तीस चाळीस वर्षात.... सबको यही पर हिसाब चुकाना पडता है. सबकी बारी आती है.
---
माझे असे काही अनुभव आहेत. त्यातील हा एक:
पुण्यातील एक प्रथितयश संगणक नि सुटे भाग विकणार्या दुकानात गेलो.तेव्हा गल्ली-बोळात संगणक विकणारे नि त्यासंबंधी सेवा पुरवणारी दुकाने फोफावली नव्हती. मध्यवस्तीमध्ये असलेले हे त्यातल्या त्यात प्रथितयश दुकान होते. (शिवाय चोरून पायरेटेड सॉफ्टवेअरही विकत असल्याने लोकप्रियदेखील.)
मला माझ्या संगणक (desktop)साठी इन्टरनल(internal) हार्डडिस्क घ्यायची होती. एक प्रसिद्ध कंपनीची हार्डडिस्क निवडली. वॉरंटी वगैरे नीट विचारून घेतले. पैसे ट्रान्स्फर केले नि थांबलो. डिस्क मिळाली. काही मिनिटे गेली. रिसीट मिळायचे नाव नाही. पुन्हा आठवण केली तर म्हणे, ‘रिसीट हवी असेल तर टॅक्स भरावा लागेल.’ वाद घातल्यावर म्हणे, ‘तुम्हाला किंमत सांगितली ती विदाऊट टॅक्स सांगितली. तुम्हाला रिसीट हवी आहे हे आधी सांगितलं नाहीत.’ म्हटलं, ‘वेगळं सांगायची गरज काय? संगणकाचे भाग– ते ही हार्डडिस्कसारखे वॉरंटी देणारे – रिसीट-विना कोण घेतो? रिसीट-विना वॉरंटी क्लेम कशी करणार?’ तर म्हणे, ‘तिची गरज नसते. आम्हाला आमचे गिर्हाईक माहित असते.’ अखेर थोड्या वादावादीनंतर रिसीट मिळाली. त्यात दिलेल्या पैशातूनच वजा केलेल्या टॅक्सचा उल्लेख होता!
घरी नेली नि संगणकाला जोडली तर त्याचा आयसी उडला. वॉरंटी क्लेमसाठी डिस्क घेऊन त्यांच्याकडे गेलो. आधी तर ही आमच्याकडची नाही असा विश्वामित्री सूर लावला. (‘आम्हाला आमचे गिर्हाईक माहित असते’ हे खरेच, पण आम्ही नंतर ओळख देऊ असे कुठे म्हटले होते.) मग रिसीट काढून दाखवल्यावर नरमले. मग दुकानाऐवजी समोरच्या बाजूला एका अंधार्या गल्लीत असलेल्या ‘सर्विस सेंटर’वर जाण्याचा आदेश मिळाला. निमूट तिथे गेलो तेव्हा ‘टेस्ट’ करून आयसी उडाला आहे असे सांगण्यात आले.
म्हटलं, ‘ते मला माहित आहे की, मला रिप्लेसमेंट हवी आहे.’ तर ‘आयसी वॉरंटीमध्ये येत नाही’ असे सांगण्यात आले. मी उडालोच. ‘अरे म्हटलं आयसी वगळला तर राहातं काय त्यात चार मॅग्नेटिक चकत्या नि त्यावर फिरणारा दांडू?’ पुन्हा ‘तुमची चूक असल्याने वॉरंटी व्हॅलिड राहात नाही.’ असे ऐकवले. म्हटले, ‘कशावरून माझी चूक? शेवटी कुठलाही पार्ट नेणारा स्वत: वा अन्य तज्ज्ञाकडूनच तो जोडणार. मी गेली दहा वर्षे माझ्या स्वत:च्या नि पाच वर्षे माझ्या कंपनीच्या संगणकांची डागडुजी करत आलो आहे. जोडणी मला व्यवस्थित करता येतेच.’ पुन्हा थोडा वाद घातला तर म्हणे, ‘कंपनीकडे पाठवावी लागेल, त्यांच्याकडून रिप्लेसमेंट येईल तेव्हा मिळेल.’ म्हटलं, ‘पाठवा, मला घाई नाही.’ तर म्हणे ‘शिपिंग चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील.’
आता माझी सहनशक्ती संपल्याने साडेपाच हजार रुपयांच्या त्या डिस्कसाठी आणखी साडेतीनशे भरले. पुढे महिनाभर फॉलो-अप केल्यावर ती हार्ड-डिस्क पदरी पडली. वास्तविक त्यांनी त्यांच्याकडील डिस्क देऊन वॉरंटी क्लेम फॉर्म भरून त्यावर माझी सही घेणे अपेक्षित असते. त्यानंतर तो फॉर्म पाठवून त्यांना कंपनीकडून दुसरी डिस्क मिळेल असा नियम होता. शिपिंग चार्जेसही कंपनी देत असे. त्यांनी मधल्या-मध्ये माझ्याकडून साडेतीनशे रूपये खिशात घातले.
त्यानंतर त्या दुकानाची पुन्हा पायरी चढलेलो नाही. पुढे अमेजनच्या उदयानंतर मी संगणकासंबंधी खरेदी ऑनलाईनच करू लागलो.
आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो तो इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा. ‘अमेजन’सारख्या (Amazon) कंपन्या डिजिटल पेमेंटसाठी आणखी सूट देतात. माझ्या साधारण एकवीस हजाराच्या टीवीवर मला जास्तीचा दीड हजार डिस्काऊंट केवळ डिजिटल पेमेंटसाठी मिळाला. याउलट हे दुकानदार ‘क्रेडिट कार्ड’ला दोन टक्के जास्त द्यावे लागतील म्हणतात.
एकदा एक आयनाईज्ड भांडे ऑनलाईन मागवले तर त्याचे हँडल तुटलेले निघाले, तातडीने ऑनलाईन रिप्लेसमेंट रिक्वेस्ट टाकली. एक दिवस गेला नि पर्यायी भांडे आले. त्याचेही हँडल तुटलेले निघाले. पुन्हा रिप्लेसमेंट रिक्वेस्ट टाकली. चोवीस तासात पिक-अप झाला नि चौथ्या दिवशी न मागता, भांडता रिफंड क्रेडिट झाला. हेच मी दुकानदाराकडे काही कारणाने रिप्लेसमेंटला गेलो तर वर लिहिलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक.
त्यांचा व्यवसाय चालावा ही सदिच्छा असतेच, पण त्यांनी ग्राहकांना उपलब्ध पर्यायांचा विचारही करायला हवा. ‘आमच्या फायद्यासाठी तुम्ही नुकसान सहन करा’ हे ग्राहक म्हणून गेलेला एखादा कॉम्रेडही मान्य करणार नाही. व्यवसायाचे आयाम बदलून नफा खर्चाचे गुणोत्तर नव्याने मांडायला हवे. ग्राहकाशी मग्रूर वर्तन करुन कसे चालेल. बाजारात स्वयंचलित वाहने आली की टांगेवाल्याला आपला व्यवसायाचे आयाम बदलण्याची गरज पडणारच. इलाज नाही. त्यासाठी गाड्याच आणू नका असे म्हणणे चूक आहे. (कॉम्रेड काहीही म्हणोत. :) )
आज एलआयसी, बँकाच काय अगदी रीटेल स्टोअरच्या काउंटरवरच्या माणसाला संगणक वापरता यावा लागतो. हा बदल रोजगारासाठी नोकरदारांना स्वीकारावाच लागला. त्याचप्रमाणॆ छोट्या व्यावसायिकांनाही व्यवसायात कालानुरुप, स्पर्धेनुरूप कोणते बदल करावेत हे शोधावेच लागेल. आपला यूएसपी(Unique Selling Point) राखावा लागेल.
इतके रीटेल स्टोअर्स उगवले, पण घराजवळचा किराणा-भुसार दुकान चालवणारा- ज्याला आपण सरसकट मारवाडी म्हणतो - दुकान कसे चालवतो पाहा. त्यांच्या दुकानात आता काय काय मिळते, सामान्य माणूस कोणत्या उत्पादनांसाठी केवळ त्यांच्यावरच अवलंबून आहे हे पाहिले तर लक्षात येईल, की त्यांनी बदलत्या परिस्थितीशी यशस्वीपणॆ जुळवून घेतले आहे. एसी दुकानात इलेक्ट्रॉनिक वस्तू भरुन काउंटरवर निवांत बसणार्यांना त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे...
मध्यंतरी एका मित्रासोबत त्या जुन्या दुकानी जाणे झाले. त्याला न मागता रिसीट आणि छापील किंमतीवर डिस्काऊंट मिळालेला पाहून भरून आलं. अर्थात याला वाढलेल्या स्पर्धेने उतरलेला माज जसा कारणीभूत होता, तसेच ग्राहकसंख्या कैकपट वाढल्याचे सकारात्मक कारणही होते.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा