शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

पुलं जन्मशताब्दी

ज्यांचे नाव न घेता फक्त ’भाई’ म्हणून कानाच्या पाळीला हात लावणार्‍यांपासून, नाव उच्चारताच पोटशूळापासून मस्तकशूळापर्यंत सारे आजार उसळून येणार्‍यांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा भाग झालेला 'हशिवनारा बाबा’ आज शंभरीत पोचला.

विदूषक, नाटक्या, लेखक, परफॉर्मर, गायक; भीमण्णा, मन्सूरअण्णा, कुमार, वसंतखॉं पासून आरती प्रभू, बोरकरांपर्यंत अनेक ’उत्तम गुणांची मंडळी’ जमवून जगण्याचा उत्सव करणारा, हसता हसवता जगण्यातील विरुपतेवर बोट ठेवणारा, दांभिकतेची यथेच्छ खेचणारा आणि गाता, हसवता अचानक अंतर्मुखही करणार्‍या आजोबाला सेंचुरीच्या शुभेच्छा.
---

भारतीय इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपरिपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामासाची माणसे असतात. त्या गायिका, त्या नर्तिका ह्यांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणा‍र्‍या स्त्रीसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिथे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळापासून त्याला हाडकावरच वाढवल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तू नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकीला लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे पण वाटायला लागले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांची मुकाबला करून प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझे अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळ्यांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टीकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.

परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्या तेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यात त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यातल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली. दुकानदार "तेलाचे भांडे कुठाय?" म्हणून खेकसला.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्र्य धिटाई शिकवते. लगेच सावरून म्हणाली, "दिवाळी कसली? खायाला त्याल द्या..."
"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.
मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवडया पैशात किती बसतं ते द्या-"
"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"
"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत्-" पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे’ असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितीतही मला मजा वाटली.
"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?"
"अ‍ॅट लीस्ट फिफ्टीन-" दुकानदार,
त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो.

त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही.

आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे, पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडें धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टीची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो.

(’एक शून्य मी’)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा